अडाणी कोण?.. पंडित की मुल्ला?.. वेळापत्रक!..
बुधवार, ६ डिसेंबर, २०१७ मुकेश माचकर

बोधकथा, विनोद आणि मार्मिक विचार असा दमदार, कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून..

एका मेंढपाळाला एकदा एक हिरा सापडला.

मोसंबीएवढा मोठा हिरा लक्षावधी रुपये किंमतीचा होता. पण, मेंढपाळाला तो एक चमकदार दगडच वाटत होता. त्याला तो हिरा आहे हेही माहिती नव्हतं आणि त्याची किंमतही माहिती नव्हती. त्याने त्याच्या लाडक्या मेंढीच्या गळ्यात तो हिरा बांधला.

एका गावाजवळून तो जात असताना एका सराफाने गळ्यात हिरा बांधलेली मेंढी पाहिली आणि त्याचे डोळे लकाकले. लाखो रुपयांचा हिरा मेंढीच्या गळ्यात बांधणारा मेंढपाळ अडाणी असणार, हे उघड होतं. त्याच्याकडून स्वस्तात हिरा पदरात पाडून घेण्यासाठी तो कळपापाशी गेला आणि मेंढपाळाला म्हणाला, छान चमचमता दगड आहे रे हा? कितीला दिलास?

एखाद्या दगडालाही ग्राहक येईल याची मेंढपाळाने कधी कल्पनाच केली नसती. दगडाचे किती पैसे मागणार? हिंमत करून त्याने सांगितलं, आठ आण्याला पडेल.

सराफाला आता आणखी हाव सुटली. तो म्हणाला, आठ आणे फार होतात या दगडाचे. चार आण्याला देतोस तर बोल.

मेंढपाळ म्हणाला, चार आणे फार कमी होतात. आठ आणे बरोबर आहेत.

सराफ तसाच पुढे निघाला. त्याला वाटलं होतं की पुढच्या वळणापर्यंत पोहोचेस्तोवर मेंढपाळाचं मन पालटेल आणि तो चार आण्याला राजी होईल. वळणावर पोहोचेपर्यंत हाक आली नाही, म्हणून त्याने 
मागे पाहिलं, तर दुसरा सराफ हिरा खरेदी करून निघाला होता. हा धावतपळत तिथे पोहोचेपर्यंत हिरा घेऊन तो निघून गेला होता. मेंढपाळाने त्याला आठ आण्याचं नाणं दाखवलं.

सराफ त्वेषाने म्हणाला, मूर्ख, अडाणी, बेअक्कल… लाखो रुपयांचा हिरा फक्त आठ आण्याला विकून मोकळा झालास बिनडोका.

मेंढपाळ म्हणाला, मी तर साधा मेंढपाळ आहे. मी बिनडोक, मूर्ख, अडाणी, बेअक्कलही आहे. मला त्या हिऱ्याचं मोल माहिती नव्हतं. तुम्ही सराफ आहात. त्याची किंमत लाखो रुपये आहे, हे तुम्हाला 
माहिती होतं. तुम्ही तो आठ आण्याला विकत मिळत असताना घेतला नाहीतच ना? मग तुम्ही स्वत: काय ठरलात?

....................................

शेखचिल्ली म्हणाला, मी एक जोक सांगतो. एक होता मुल्ला…

त्याला मध्येच तोडत फजलू म्हणाला, नको सांगूस? तू नेहमी मुल्ला मौलवींचेच जोक सांगतोस. आपल्यावरच विनोद करून काय समाधान मिळतं तुला? हिंमत असेल तर कधी पंडित, शास्त्रींवरचे पण जोक सांग की.

शेखचिल्ली म्हणाला, ठीकाय. मी काय घाबरत नाही कोणाला. एक पंडित होता. तो एकदा नमाज पढून मशिदीतून बाहेर आला...

.............................................................

लोकसभेचे वेळापत्रक 
स. १० वाजता- अध्यक्षांचे आगमन 
स. १०.१५ वा. - ''बैठ जाईये!!!''
स. १०.३० वा. - ''प्लीज बैठ जाईये!!!''
स. १०.३५ वा. - ''कृपया, बैठ जाईये!!!''
स. १०.३८ वा. - ''घर जाईये!!!''
शेम! शेम!! शेम!!!

..................................प्रतिक्रिया द्या3359 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर