कौन है जो सपनों में आया...
मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७ मीरा सिरसमकर

आपल्या संगीताने संस्कृतीला वेगळे वळण देणाऱ्या एल्विस प्रेसलीला अवघ्या ३६व्या वर्षी लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड मिळाले. दुर्दैवाने अवघ्या ४२व्या वर्षी या महान गायकाचा अंत झाला.

'कौन है जो सपनों में आया, कौन है जो दिल में समाया' हे झुक गया आसमान या सिनेमातील जुबिली कुमार राजेंद्रकुमार याच्या तोंडी असलेलं गाणं, ते गायलंय मोहम्मद रफी यांनी. संगीत दिलंय सुप्रसिद्ध संगीतकार शंकर जयकिशन या जोडीने. हे गाणं आहेच सुंदर, सुगम आणि सुश्राव्य पण ते सरळसरळ एका वेस्टर्न गाण्यावरून कॉपी केलेलं आहे. अर्थात संगीतकार त्याला प्रेरणा म्हणतात ती गोष्ट वेगळी! पण अशी बरीच हिंदी गाणी तिकडून आयात झालेली आहेत. ती तिकडे गाजली. मग त्यावरून इकडे आली आणि इकडेही अर्थातच खूप गाजली .

हे गाणं घेतलं होतं सुप्रसिद्ध रॉक अॅण्ड रोलवाला अमेरिकन गायक एल्विस प्रिसलेच्या मार्गारिटा- Who makes my heart beat like thunder? या गाण्यावरून.. १९५५ ते १९७५ अशी अशी एकूण वीस वर्षं थरारक आणि झळाळणारी कारकीर्द गाजवणारा हा गायक.

शाळेत तसा साधारण आणि कोणाचं विशेष लक्ष न गेलेला हा 'शाय' मुलगा. त्याला गाण्याची आणि गिटार वाजवण्याची मात्र प्रचंड आवड होती. त्याच्या जीवनाची कथा अत्यंत रोचक आणि वेगवेगळ्या अतर्क्य घटनांनी भरलेली आहे. त्याच्या गाण्याने त्यालाच नाही तर संपूर्ण अमेरिकेच्या संस्कृतीलाच वेगळ्या वळणावर नेले..

वयाच्या अठराव्या वर्षी त्याला गाण्यासाठी ब्रेक मिळाला. १९५४ मध्ये त्याच्या पहिल्या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं, अमेरिकन रेडियोवर ते गाजलं आणि अक्षरशः दोन वर्षांमध्ये तो आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गायक झाला. त्यानंतर त्याने जवळपास ३३ सिनेमांमध्ये काम केलं. त्याचे अनेक टीव्ही शोज गाजले. जगभरात सर्वत्र त्याच्या गाण्याच्या करोडो रेकॉर्ड्स खपल्या. त्याच्या रेकॉर्ड्सचा खप जवळपास १०० कोटींवर गेला होता. त्याला मानाचे तीन ग्रॅमी पुरस्कार आणि १४ नामांकने मिळाली. त्याची संगीत क्षेत्रातील कामगिरी इतकी अफाट होती की त्याला चक्क वयाच्या ३६व्या वर्षी लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळालं. संपर्क माध्यमांचा इतका सुळसुळाटही नव्हता, त्या काळात त्याला इतकी प्रसिद्धी मिळाली .

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका बलाढ्य होऊ लागली होती. एकूणच आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य येऊ लागलं होतं. मुळात तिथल्या संस्कृतीत एक खुलेपणा होताच, तो आता जास्तीत जास्त स्तरांवर खुला होऊ लागला. वयाची अठरा वर्षे पार केली की मुलं स्वतंत्र राहत. त्यासाठी पैसे कमावणे आलंच. आपापली कामं झाली की मग वीकेंडला मौजमजा करणं, मनसोक्त खाणं-पिणं, लांब लांब रस्त्यांवर चारचाकी गाड्या फिरवणं (पेट्रोल म्हणजे अमेरिकन गॅस खूप स्वस्त होता तेव्हा!).. एकूणच मज्जानु लाइफ- असा एक नवा वर्ग तिथे उदयाला येत होता. या मज्जानु संस्कृतीचा उदय आणि प्रसार तिथे प्रामुख्याने पन्नास ते सत्तर या दोन दशकांमध्ये होऊ लागला होता. तऱ्हेतऱ्हेचे पोशाख घालून, एका हातात पॉपकॉर्नचा मोठा पुडा किंवा बियरची बॉटल आणि दुसरा हात मैत्रिणीच्या कमरेत घालून पॉप गाण्यांचे शोज अटेंड करणे, हे तिथले फॅशन स्टेटमेंट होऊ लागले होते. या संस्कृतीला एल्विसने प्रतिष्ठेचा प्रचंड हातभार लावला. तिथल्या वंशवादाची तीव्रतादेखील याच काळात कमी होऊ लागली होती. एल्विसच्या स्टेज शोजमध्ये कायम अमेरिकन-आफ्रिकन महिला आणि पुरुषांचा समावेश असे. या खुल्या संस्कृतीमुळे अमेरिकन नागरिकांची सरमिसळ होऊ लागली. एल्विसचे सुरवातीचे गाण्यांचे शोज पन्नास ते साठच्या दशकातले. त्या काळी तर अमेरिकेत काही ठिकाणी मुलींसाठी स्वतंत्र शाळा कॉलेज नसलं तर त्यांचं शिक्षण चक्क बंद होई पण नवल म्हणजे या अशा गाण्याच्या स्टेज शोजना मात्र या मुली सर्रास मुलांबरोबर येत असत .एल्विसच्या गाण्याचे शब्द कानावर पडताच किंवा त्याने एन्ट्री मारताच मुली किंचाळत आरडाओरडा करत अक्षरशः उन्मादत. काही तर बेशुद्धही पडत. थियेटरच्या बाहेर अॅम्ब्युलन्सची सोय केलेली असे. या मुली कार्यक्रम चालू असताना समोरच्या रांगेत घुसून त्याला हात लावण्यासाठी धडपडत, त्याने रुमाल किंवा त्याची एखादी वस्तू फेकावी म्हणून हात वर करून करून त्याला हाक मारत असत. कार्यक्रम संपला की त्याची सही घेण्यासाठी मुलींचीच प्रचंड झुंबड उडे..

भरपूर उंची, मजबूत गोरा बांधा, झुबकेदार केसांचा कोंबडा, गालावर हनुवटीपर्यंत आलेले फक्कड कल्ले, देखणा म्हणण्यापेक्षा चिकणा आणि निरागसतेकडे झुकलेला चेहरा आणि त्यावरचे किंचित 'शाय' भाव... त्याच्या जन्मजात गोड मधाळ आवाजाला या इतक्या सगळ्या आकर्षक पार्श्वसंगीताचा सूर जात्याच लाभला होता. अल्पावधीतच तो प्रचंड पॉप्युलर झाला. तिकिटांची विक्री सुरू झाल्याचे जाहीर होताच तासा-दोनतासांमध्ये त्याचा शो हाऊसफुल होत असे! त्याचे कपडे, त्याची गाणी म्हणतानाची शारीरिक हालचाल, डावा ओठ किंचित वर करून केलेली सुरिल्या शब्दांची फेक, त्याचं नजरेत नजर घालून बघणं, त्याचं नृत्य, माईक हातात घेऊन स्टेजवर फिरणं, गिटार वाजवणं.... सगळं सगळंच अद्‌भूत आणि अनोखं वाटत असे प्रेक्षकांना. त्याच्या एका कटाक्षाने बायका-मुली वणव्याच्या धनी होत. अमेरिकन पॉप संगीताच्या क्षेत्रातच नव्हे तर हॉलीवूडमध्येही अजूनही त्यालाच नंबर एकचा सेक्स सिम्बॉल मानलं जातं. गिटारवर फिरणारी त्याची बोटं आणि ती हाताळताना होणारे त्याचे हावभाव ही एखाद्या तरुणीशी केलेली सलज्ज कुजबुज वाटे अनेकांना!

त्याचं खासगी जीवन अनेक वादप्रवादांनी भरलेलं होतं. सुरुवातीला काही काळ तो अमेरिकन सैन्यात होता. त्या नोकरीदरम्यान तो जर्मनीला गेला तेव्हा एका मुलीच्या प्रेमात पडला. काही वर्षांनी त्यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगीही झाली पण पाच वर्षांमध्येच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अनेक मैत्रिणी त्याच्या आयुष्यात आल्या. या मुली त्याची प्रसिद्धी आणि पैसा पाहून आपणहून त्याच्याकडे भारल्यासारख्या येत असत. त्याच्या आईचा त्याच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव होता. जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो आईशी संपर्क करत असे. वयाच्या एकविसाव्या वर्षी थोडे पैसे मिळताच त्याने त्याच्या मेम्फिस गावात आईसाठी मोठं घर घेतलं, गाडी घेतली पण दुर्दैवाने तिचा लवकर मृत्यू झाल्यामुळे तिला याचा फारसा उपभोग घेता आला नाही. असं म्हणतात की आईच्या मृत्यूच्या धक्क्याने आणि नंतरच्या काळात घटस्फोटाने एल्विस खूप खचला होता. त्याने नंतर कोणाशीही लग्न केलं नाही. तसंही एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या एल्विसला नंतर कमावलेल्या प्रचंड संपत्तीचा माज कधीच आला नव्हता. कितीही झगमगीत स्टेज शोज केले तरी त्याच्या वास्तव जीवनात एकदा तो शिरला की त्याला त्या अवास्तव प्रसिद्धी आणि पैशांचा झगा काढून ठेवावासा वाटे. प्रत्यक्ष जीवनात तो कोणाशीही कधी उर्मटपणे वागला नाही. मात्र दरवेळी आपण स्टेजवर चांगला परफॉर्मन्स केला पाहिजे आणि आपली लोकप्रियता टिकून राहिली पाहिजे याचं दडपण त्याच्यावर असे. महिनोंमहिने त्याला झोप येत नसे. शिवाय तो पोटाच्या विकाराने त्रस्त असे. त्यातूनच मार्ग काढण्यासाठी तो अतिरेकी ड्रग्सच्या आहारी गेला. कितीही पैसा, प्रसिद्धी आणि लोकांची वाहवा लाभली तरी माणूस खऱ्या प्रेमाची भूक त्यातून भागवू शकत नाही, हे सत्य एल्विसच्या बाबतीतही खरं ठरलं.. वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी त्याला हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्याचे निधन झाले.. हा अटॅक आला तेव्हा तो त्याच्या घरीच होता. मी टॉयलेटला जाऊन येतो असं मैत्रिणीला सांगून तो एक पुस्तक घेऊन गेला. तिथे पुस्तक वाचायची त्याला सवय होती. आदल्या रात्री त्याला नीट झोपही लागली नव्हती. आत गेल्यानंतर तो केव्हातरी झटक्याने पडला. तिकडे त्या मैत्रिणीला खबरही नव्हती. हा अजून कसा आला नाही म्हणून तिने जवळपास दोनेक तासांनी पाहिलं तर हा तिथेच निपचित पडला होता. आश्चर्य म्हणजे त्याने आधी मृत्युपत्र करून ठेवलं होतं आणि त्याची सगळी संपत्ती त्याने मुलीच्या आणि काही भाग पत्नी व वडिलांच्या नावे करून ठेवला होता...

 प्रतिक्रिया द्या8725 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर