फेबुगिरी
मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७ टीम बिगुल

ताज्या घडामोडींबाबत किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल नेटवर्किंगसाइट्सवर व्यक्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातल्या काही निवडक पोस्ट्स खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी:

आजच्या काळात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं आणि यश मिळवणं फार जिकीरीचं अन् अनिश्चित असं झालं आहे. खूप जणांच्या सक्सेस आणि अनसक्सेसफुल स्टोरीज् आपल्या समोर असतात. या सगळ्यामध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण कथा वाटते ती कन्हैयालाल मिश्रा यांची...

स्वातंत्र्यपूर्व काळात सनदी सेवेसाठी ICS exam घेतली जायची. सन १९२६ साली कन्हैयालाल मिश्रा ICS exam उत्तीर्ण झाले. पण कन्हैयालाल यांचे वैशिष्ट्य म्हणजे या परीक्षेतील निबंध या पेपरमध्ये त्यांना पैकीच्या पैकी (१५०/१५०) गुण मिळाले होते. त्यांची इंग्रजीवरील पकड इतकी जबरदस्त होती की त्यांची उत्तरपत्रिका तपासणारे परीक्षक सर आर्थर क्विलिच-काऊच यांनी कन्हैयालाल मिश्रांच्या प्राध्यापकांना इंग्लडहून पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी कन्हैयालाल यांच्याबाबत खालील गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

"It is the englishman who had conquered India, but it is only K L Mishra who conquered English."

पण दुर्दैव असं की, कन्हैयालाल मिश्रांना ICS मध्ये रुजू करून घेण्यास नकार देण्यात आला. उत्तम गुणांनी पास होऊन पण त्यांना सेवा नाकारण्यात आली. याचं कारण म्हणजे, कन्हैयालालनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये नोंदवलेला सहभाग. ब्रिटिश सरकारच्या ब्लॅक लिस्टमध्ये असणाऱ्यांना ICS मधून वगळण्यात आले.

आयुष्यातील एवढं मोठं स्वप्न अशा रीतीने अपूर्ण राहणं ही खूप मोठी शोकांतिका होय. आपल्यासारख्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना तर हे विशेष समजू शकतं. कन्हैयालाल यांचं दुःख मोठे होतेच पण यामुळे ते खचले मात्र मुळीच नाहीत. ते पुढे कायदेपंडित म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांची वकील म्हणून कारकीर्द अतिशय नावाजली गेली...

उत्तर प्रदेश सरकारचे महाधिवक्ता म्हणून कार्यरत असताना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी सुद्धा त्यांचे एका समारंभात कौतुक केल होतं. प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला यांना गोलकनाथ खटल्यात भर कोर्टात शाब्दिक चिमटा काढण्याचे धारिष्ट्य फक्त कन्हैयालाल मिश्राच करू शकतात. या प्रसंगाचे वर्णन फाली नरीमन यांच्या आत्मचरित्रात फार रोचकपणे केले आहे.

तर अशा कन्हैयालाल मिश्रांकडून आजच्या विद्यार्थ्यांना घेण्यासारखं खूप आहे...आपलं नाणे खणखणीत असलं म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या पलिकडे असणाऱ्या आयुष्याच्या स्पर्धेत सुद्धा यशस्वी होता येते.. स्पर्धा परीक्षा फक्त एक मधला थांबा आहे... गाडी ही पुढे गेलीच पाहिजे.

- समीरा जाधव

...................................................

गावातल्या मित्रानं काल-परवाच घेतलेली नवीकोरी i-20 दाखवली. मागच्या काचेवर त्यानं मुलांची नावं रंगवलीयत:

प्रणय-संस्कृती !

म्हाराष्टाचं पुरोगामीपण ठसठशीत छापात डोळ्याला जाणवलं व मी प्रसादाचा भंडारा घ्यायला पंगतीच्या दिशेने वळलो!

- हेमंत राजोपाध्ये

...................................................

13000 हजार शाळा बंद किंवा स्थलांतरित करण्यापेक्षा ....

त्या दुर्गम भागातील शाळांचा अभ्यासक्रम सहा महिन्यांचा करा.

कारण... शाळा बंदचा फटका... सर्वात जास्त मुलींना बसणार आहे.

त्यांना अर्धवट शाळा बंद करून घरकामाला जुंपले जाईल.

कारण भारत.... घाणेरड्या पुरुषी मानसिकतेचा टेंभा मिरवणारा देश आहे.

#13000 हजार शाळा वाचवा.

- पराग वडके

...................................................

सोनेरी dragons चे, सोनेरी कौलांचे एक मोठे वैभवशाली राज्य होते. लाल सिल्कचे जड ड्रेस घालून लांब मिशांचे गंभीर राजे तिथे राज्य करत.

तिथे एक नदी होती. तिचे नाव वून्तिंग. म्हणजे हुंदडणारी. ती खूप गोलगोल फिरायची, सारखी आपला रस्ता सोडून दुसरीकडे वाहायची. तिचा राजाच्या डोक्याला झाला होता ताप.

त्याने काय केले तर तिचे नाव बदलून युन्तिंग ठेवले. म्हणजे सरळ चालणारी.

तरीपण ती डोक्याला तापच राहिली. राजाला हे माहीत असणार. नाहीतर नाव कशाला कोण बदलतंय. नाव बदलणं म्हणजे अगदीच टोकाचं. हतबल-types. बस तेरा नाम ही मुकम्मल है. इससे बेहतर भी नज़्म क्या होगी..

you know na. I mean किती घोळ घालायचे:|

आता एका गोष्टीवर नीट मुद्देसूद थांबून त्यातून तात्पर्य वगैरे काढणं जमत नाही. कारण एक गोष्ट म्हणजे काहीतरी static नाही...एक गोष्ट म्हणजे एक पिवळे गवतफुल. मग निळ्या पंखामधून पुढचे फुल दिसते. इथून तिथे. हाती काही नाही. दिवस काजळला की हाती राहते न काढलेली रांगोळी.

तर सांगायचं असं की सरळ चालता येत नसले तरी "चालवता" येतं नदीला. राजाला नाव बदलायची गरज नव्हती. साबरमतीला कसे कठडे केलेत मस्त. सिमेंट दोन्ही बाजूंना. किंवा गोदावरीचे नाशिकमधले घाट कसे झालेत. गुळगुळीत एकदम. नदी गप मधून वाहते. वाहणे धरणांनी काबीज केले आणि वळणे सिमेंटच्या काठांनी. "river beautification" तसेच. Inland Navigation चे घाटही तसेच.

गोमतीपासून, कोसीपासून, मंडोवी-झुवारीपासून, कुवमपासून, मिस्सिस्प्पीपासून, ऱ्हाईनपासून, गोदावरीपासून, साबरमतीपर्यंत सगळ्या सारख्या.

पण नर्मदेच्या तीराला जांभळाची झाडे होती गर्द. कालिदासाने खुण दिलीये ना ही. झाडं नसली तर यक्षाचं काय होणार? बालकवींचा झरा नुसताच सरळ केला तर कसं चालेल? नदीतीरीचा कदंब तरूच नसेल दोला बांधायला, तर राम कोणाला विचारेल सीतेचा रस्ता? निलांजनेच्या काठचं जंगल नसेल तर सिद्धार्थ काय करणार गयेमध्ये? तो बासरीवाला रांझा.. हिरवळीत गुरे चारणारा महिवाल.. सगळ्यांची पंचाईत.

गोदावरीच्या काठांनी करंज होते सावलीच्या पानांचे, आपल्या पांढऱ्या-गुलाबी कळ्या नदीत धाळणारे. यमुनेतीरी काशचे शुभ्र कापूसगुच्छ फुलायचे, अगदी ढगांना हसत आव्हान देत. कुठे लिलीज होत्या बेटांमध्ये पांढऱ्या सुवासिक. कुठे रानटी सोनटक्का होता. कुठे केवडा होता दाट. कुठे झुवारीच्या तिराना Sonneratia होता, आपल्या फुलात आपले पुढेचे इवले झाडपण मिरवणारा.

या सगळ्या riparian गोंधळात अनेक लोक राहायचे. Moorhens, सारस, कासव, otters सुद्धा, मासे हक्काने हा chaos शोधत यायचे ब्रीडिंग सीझनमध्ये. कुठे कुठे नदी अतीच मोठी असली की माणसंपण राहायची बिंदास लांबलांब काठ्यांच्या गवताळ घरांमध्ये.

हा riparian भाग छोटा, पण जमीन आणि नदीमधला जिवंत, सळसळता पूल.

सगळ्या जिवंत ecosystemsचा हा एक धर्मच. chaos आणि हळूहळू रूप बदलत जाणे. नकळत. पण नक्की. टपोर अनंताच्या कळीचे मोतिया फुल होते. तसे.

मग हे भाग खुप खुप खुप समृद्ध होतात..जुन्या गावातल्या मुन्सिपल शाळेसारखे. गजबजलेले.. Riparian पट्टी, Wetlands, डेल्टा, हिमालयाच्या पायाजवळची तराई, उंच डोंगरावरची अल्पाइन तळी, समुद्र आणि जमिनीला जोडणारा बे, कोरल्सची रंगीत बेटे.

एक रंग दुसऱ्यात मिसळत जातो, रखरखीत दुपारची सुरंगी संध्याकाळ होते, एक सूर दुसऱ्या सुरात फुलतो, कवितेच्या एक ओळीवरून, वरवर बघता लिंक नसणारी, पण एकमेकात छोटी चांदणसाखळी असणारी दूसरी उगवते, एकाच नात्यात राग, चिडचिड, पोटभर हसरा आनंद, गोंधळ, खारट पाणी, बिन्तांग शांतता हे एकत्रच येतं.

थोडा chaos तो बनता है ना बॉस.

- परिणीता दांडेकर

...................................................

एका लग्नामधे 'दिदी तेरा देवर दिवाना'च्या चालीवर मंगलाष्टक ऐकले.

कर्णसंपुटात शिश्याचा रस ओतल्याची जाणीव झाली.

शार्दूलविक्रीडित बचाव संघटनेने महाराष्ट्रव्यापी संपाची हाक दिली आहे.

- यशवंत पाटील

...................................................

मिंधेपणाची परमावधी!

उत्तर प्रदेशातील नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीत अमेठीत काँग्रेस हरली तर झाडून साऱ्या वृत्तवाहिन्यांवर ती बातमी headline बनली ,
पण,
याच निवडणुकीत,
भाजपाची या राज्यात सत्ता असून देखील
वाराणसी ( प्रधानमंत्री )
गोरखपूर ( मुख्यमंत्री )
आणि
कौशम्बी ( उपमुख्यमंत्री )
या ठिकाणी भाजपा हारली त्याची हाक ना बोंब!!

- दत्ता राशिनकर

...................................................

कोणत्याही धर्मग्रंथात डायनासोरचा उल्लेख का आढळत नाही?

कारण धर्मनिर्मितीच्या धाकाने त्यांनी आधीच आत्महत्या करून टाकली होती.

- संदीप राहुल

...................................................

रेखा मॅडम अचानक कुठल्या तरी रिअॅलिटी शोमध्ये दिसल्या आणि बऱ्याच जणांचे देठ परत हिरवे झाले. मला मात्र चेहऱ्यावरच्या सुरकुत्या लपवण्याची कसरत करणारी, वाढते वय न स्वीकारता चेहऱ्यावर मेकअपचे थरच्या थर देणारी आणि जातायेता टीपं गाळणारी डिप्रेशनची एक पेशंटच दिसते आहे.

- सचिन कुलकर्णी

...................................................

संघ-भाजप-मोदी यांना विरोध करताना, काँग्रेसला अॅडव्हान्टेज देणे... पटत नाही.
काँग्रेस जैतापूर प्रकल्प रद्द करणार का?
कोकणासाठी गाडगीळ समिती रिपोर्ट लागू करणार का?
समुद्र किनारे जसे आहे तसेच ठेवणार का?
कोकणात रेड कॅटेगरी म्हणजे प्रदूषणकारी उद्योग प्रतिबंध करणार का?
मध्य भारतातील जंगल वाचविणार का?
नॉर्थ-ईस्ट राज्यातील निसर्ग जपणार का? 3000 धरणं रद्द करणार का?
उत्तरं काँग्रेस समर्थकांनी जरूर द्यावीत...

- सत्यजित चव्हाण

...................................................

अशियाई लोकांमध्ये हिवाळ्यात जीवनसत्व ब-बारा अर्थात व्हिटामीन B12 आणि D3 ची कमतरता होते. पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध नसल्याने किंवा उपलब्ध असूनही तो अंगावर न पडल्याने ही कमतरता होते. ह्याशिवाय आपण शाकाहारी आणि त्यातल्या त्यात अन्नविविधता जास्त नसलेले शाकाहारी असाल तरी ही कमतरता जास्त असते. प्रोसेस्ड मांसातूनही फारसे B12 मिळतेच असे नाही. ह्यावर सोपा उपाय म्हणजे जमेल तेवढी त्वचा उघडी ठेवून कोवळ्या उन्हात फिरायला जाणे, पण सगळ्यांनाच ते शक्य असते असे नाही शिवाय पुरुषसत्ताक वातावरणात रहाणार्‍या स्त्रिया आणि पुनरुज्जीवनवादी स्त्रीयांना अशी त्वचा उघडी टाकणे शक्य होत नाही. ह्यास्तव आपल्याच घराल्या ज्या कुठल्या खोलीत थेट सूर्यप्रकाश येत असेल तिथे पूर्ण अंगावर ऊन पडेल अशा पद्धतीने अर्धा ते एक तास निवांत पडून रहावे. घर आपलेच असल्याने आपण हे कमी कपड्यांत करू शकता. शक्य असल्यास फुल्टुस नेकेड व्हावे आणि मग इनडोअर सनबाथिंगचा आनंद घ्यावा. हा सनबाथ शक्यतो झोपेतून उठुन आंघोळ केल्यानंतर चहा पिण्याच्या पूर्वी घ्यावा. साधारण आठ ते नऊ किंवा नऊ ते दहा. कामामुळे हे शक्य नसल्यास आपल्या बॉसला बी१२ चे महत्त्व समजावून सांगावे किंवा मग सरळसरळ संपावर जावे, कारण बी १२ च्या कमतरतेमुळे हिवाळ्यात हाडे दुखल्याने असेही ऑफिस आठवडा दोन आठवडा बुडतेच.

घरातल्या घरात सनबाथ घेतांना खिडकीतून उन थेट अंगावर पडते तसे आणि शेजारच्या बिल्डिंगमधल्या नजराही थेट अंगावर पडु शकतात, अशामुळे खिडकी अर्धी बंद करून अथवा तिला पातळ पडदे बसवून किंवा मग आणखी काही युक्ती करून ऊन आत येईल पण बाहेरच्यांना दिसणार नाही अशी असे काहीतरी करावे. भारतीयांच्या बदलेल्या कुटुंबपद्धतीमुळे आणिक आर्थिक स्थैर्यामुळे अनेकांना घरातल्या घरात नेकेड सनबाथ घेणे सहजशक्य आहे. शिवाय तीनेक दिवस असा सनबाथ घेतल्यानंतर स्ट्रेस कमी होऊन शरीर आणि आत्मा सुखावतो तेव्हा हे अवश्य आजमावून पहा आणि हवे असल्यास त्याची फेसबुक व इन्स्टाग्रामवर जाहिरात करा.

- राहुल बनसोडे

...................................................

माझा एक मित्र आहे. त्याचं नाव वकील हनमंते. पाण्याचा टँकर चालवतो. तसे दोन टँकर भाड्याने दिलेले आहेत. बऱ्यापैकी चाललंय. तो फेसबुकवर नाही. अँड्रॉईडदेखील वापरता येत नाही किंवा त्याला कंटाळा आहे. सहज म्हणून विचारलं होतं एकदा त्याला. तुझं नाव वकील कयं काय रे? एवढंच म्हणाला. माझ्या बापाला वकील व्हायचं होतं. पण शिकता आलं नाही. मी मस्तीमुळं शिकलो नाही. पण त्याला खूप बरं वाटतं जेव्हा कुणी नाव पुकारतं... वकील रामनाथ हनमंते. बापाला वकील झाल्याचा फिल येतो. मलाही बापाचं स्वप्न पूर्ण केल्याचा फिल.

तसंच अगदी सेम लांबच्या ओळखीत एक म्हातारा आहे. त्याचं नाव जवान डॅनियल बनसोडे.

- वैभव छाया

...................................................

रात्रभर गारठ्याने कुडकुडत पहाटे जराशी झोप लागली. म्हणून उतरायच्या ठिकाणापासून गाडी मैलभर पुढं आल्यावर जागा होऊन उतरलो. बाहेर अजूनच बेफाम गारठा. कसाबसा अर्ध्यापर्यंत एक रिक्षा मिळून तिथं उतरलो आणि दुसऱ्या रिक्षाची वाट बघत उभा राहिलो. थंडी कुडकुडीपासून हुडहुडीपर्यंत वाढली होती. आणि तेवढ्यात -

- समोर नजर टाकली तर तिथल्या पेट्रोलपंपावर मोठ्ठ्या होर्डिंगवर 'अमुक इतक्या लोकांनी गॅसची सबसिडी सोडल्यामुळे अमुक इतक्या गरीब बायांना त्याचा लाभ झाला' असं सांगत छातीवर हात बांधून साक्षात 'शेठ' उभे दिसले. ताठ बाणा. कडेकोट ड्रेसभूषा. करारी मुद्रा. उन्ह-गारठ्याची पर्वा न करता दिवसरात्र होर्डिंगवर उभे आणि मी कुडकुडहुडहुडत रस्त्याकडेला.

एकदम मला 'सैनिक तिकडे सीमेवर आणि इकडे तुम्हाला..' हे अतोनात सुप्रसिद्ध कायच्या काय म्हणजे कैच्या कै म्हणजे काहीच्याबाहीच भक्ततर्कट आठवले आणि तसल्या पहाटे आणि तसल्या गारठ्यात कुडकुडहुडहुडणे विसरून मी खदाखदा हसून घेतले.

- बालाजी सुतार

...................................................

देव आहे की नाही?... किंबहुना, तुझा देवावर विश्वास आहे की नाही?... हा प्रश्न मी स्वतःला आणि इतरांनी मला असंख्य वेळा विचारून झाला असेल. एकवेळ देव आहे की नाही यावर उत्तर देणं सोपं असेल, पण आपला देवावर विश्वास आहे की नाही हा प्रश्न फारच अवघड वाटतो मला. लहानपणीच ज्या अनेक गोष्टींशी आपला परिचय असतो त्यामध्ये देव ही बाब असतेच असते, तेव्हा तो देवबाप्पा असतो. खोटं बोललं तर कान कापणारा... हिंदू धर्माचं माझ्या आवडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे देवांची चंगळ... म्हणजे त्या देवांची चंगळ असं नाही तर आपला आवडता देव निवडण्यासाठी आपल्याला मिळणारी सवलत ही चंगळच असते, आणि त्यासाठी आपल्याला उगाच भक्ती वगैरे करावी लागत नाही. आपोआप चॉईस मिळत जातो. म्हणजे घराचं म्हणून एक दैवत असलं तरी इतर दैवतांवर बहिष्कार असा नसतो. कोणताही देव चालणं किंबहुना तो आपला मानणं ही खरं तर हिंदू धर्माची आद्य ओळख असली पाहिजे. बाकी वेद-पुराणं आणि कोर्टाच्या सोयीसाठी गीता हा धर्मग्रंथ या सगळ्या नंतरच्या ओळखी... मला देव लहानपणी भेटला तो गोष्टींमधून. एखादा गरीब लाकूडतोड्या किंवा सुतार अडचणीत असायचे, एखादी म्हातारी संकटांमुळे मेटाकुटीला आलेले असायचे, एखादा गरीब ब्राह्मण संसारामुळे पिचलेला असायचा... त्यांचं संकट दूर करण्यासाठी देव प्रकट व्हायचा आणि त्यांना वरदान द्यायचा. नाही तर रूप बदलून यायचा आणि त्यांची तात्पुरत्या संकटातून सुटका करून जायचा. खूप भारी वाटायचं. आपणही असं संकटात सापडलो तर देव येईल असं वाटायचं. पण तेव्हाची संकटं म्हणजे कोणाचा तरी कुत्रा विनाकारणच आपल्यावर जोरजोरात भुंकणे, किंवा एखादा भुंगा-कीडा खोलीतून बाहेर न जाणे, ज्या कोपऱ्यात बसले तिथेच मुंगळ्यांची भली मोठी रांग निघणे अशी किरकोळ असायची. आणि त्यासाठी देव काही यायचा नाही. लहानपणी वाचलेली गोष्टींची पुस्तकं, आजी किंवा एखाद्या घरकाम करणाऱ्या मावशी यांनी सांगितलेल्या गोष्टींमधून सर्वात आधी रामाची ओळख झाली. हा राम म्हणजे ‘जय श्रीराम’वाला उग्र नव्हे, तर ‘राम-राम’वाला मधाळ... आई-वडिलांचं ऐकणारा, भावांवर प्रेम करणारा, शिक्षकांनी शिकवलेलं मन लावून शिकणारा आणि म्हणून त्यांचा आवडता विद्यार्थी, सीतेसाठी शिवधनुष्य मोडणारा, वडील आणि धाकट्या आईच्या खातर आनंदाने वनवासात जाणारा, वगैरे वगैरे... तेव्हा तो आवडता होऊन गेला. सीतेला अग्निपरीक्षा घ्यायला लावणारा आणि नंतर कोणा त्रयस्थानं शंका घेतली म्हणून तिला एकटीला वनवासात धाडून देणाऱ्या रामाचा राग येणं ही खूप नंतरची घडामोड होती. तोपर्यंत या पठ्ठ्यानं लहानपणच्या भावविश्वात बस्तान बसवलेलं होतं. लवकरच कृष्णानं त्याला replace केलं, किंवा रामाला sidingला टाकलं असंही म्हणता येईल. तरीही राम काही कायमचा मनातून गेला नाही. बुद्धीनं विचार करायची सवय लागली तेव्हा त्याच्याबद्दलचे नाना आक्षेप वाढत गेले, पण म्हणून त्याला सोडून दिलं नाही. तो अजूनही टिकून आहे, कदाचित रामाचेही पाय मातीचे असावेत. राम-कृष्णानंतर थोड्या गंभीर वयामध्ये शंकराचा प्रवेश झाला. भोळा सांब, नीळकंठ, याची सर्व रुपं आवडू लागली. किशोर वयामध्ये कृष्ण हा सर्वोत्तम प्रेमी वाटत असतो, पण थोडी maturity आल्यावर शंकर-पार्वतीपेक्षा उत्कृष्ट प्रियकर-प्रेयसी कोणी नाहीतच अशी मनाची खात्री पटली. या जोडीला अजून कोणी replace केलेलं नाही. देवांबद्दल इतका विचार केल्यानंतरही देवावर विश्वास आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीच. हे सर्व देव खूप काव्यात्मक आहेत. ते तसे नसते तर देव आवडला असता का हे माहिती नाही. त्यामुळे देवावर विश्वास आहे की नाही असं कोणी विचारलं तर मी अनेकदा ‘देव आवडतो पण त्याच्यावर विश्वास आहे की नाही माहिती नाही’ असं काहीच्या बाहीच उत्तर देते तेव्हा समोरच्याला काहीही कळलं नाही म्हणून मला विचारणाऱ्याबद्दल सहानुभूती वाटते आणि ‘हिला काहीच कळत नाही’ म्हणून विचारणाऱ्याला माझ्याबद्दल सहानुभूती वाटते. देवाचा प्रवास हा असा सहानुभूतीवर येऊन ठेपतो.

- निमा पाटील

...................................................

माजोरडेपणा आणि फुकट मिळत असेल तर हावरेपणा व उधळेपणा आपल्या समाजाचा स्थायीभाव आहे की काय? दरवर्षी आम्हाला दत्तजयंती निमित्त असणाऱ्या कार्यक्रमाचे आणि महाभंडाऱ्याचे आमंत्रण असते. तिथे अत्यंत मेहेनती कार्यकर्ते आहेत. तसेच अन्नही चांगले असते. कार्यकर्ते सर्वांना कळकळीची विनंती करत असतात की लागेल तेवढेच अन्न घ्या. लागले तर पुन्हा घ्या परंतु ताटात एकही कण शिल्लक राहता काम नये. अन्न वाया घालवू नका. वर्षानुवर्षे लोकांमध्ये संथ गतीने फरक पडतोय. 
जेवण झाल्यांनतर आपापली ताटे काउंटरवर नेऊन परत द्यायची असतात पण उरलेले अन्न खाण्यासाठी सांगितले जाईल म्हणून काहीजण ताटे मैदानात ठेवूनच सटकले. शिवाय पाण्याचे प्लास्टिक ग्लासही अस्ताव्यस्तपणे टाकून पळाले. कार्यकर्ते किती राबणार? स्वयंशिस्त हा प्रकारच नाही.

- योगेश राऊत

...................................................

गेल्या 15 वर्षात बोटावर मोजण्याइतके सिनेमे टॉकीजमध्ये पाहायचे राहून गेले असतील. सुरुवातीच्या काळात सिनेमा पैसा वसूल आहे की नाही हे ठरवायचा माझा स्वतःपुरता निकष होता - आख्या पिच्चरमध्ये एकदातरी अंगावर काटा आला पाहिजे. या हिशोबाने कित्येक टुकार समजले गेलेले सिनेमेसुद्धा मला झिंगाट अनुभव देऊन जायचे. हा अनुभव नशा देणारा असायचा. तेव्हा दुसऱ्या कुठल्या नशेची गरजच पडली नाही. DDLJ पाहिला आणि सगळ्या आठवणी चाळवल्या गेल्या. पहिल्यांदा रिलीज झाला तेव्हा मालेगावला पाहिलेला. मोहन टॉकीजला. पप्पा मुळात पिक्चर शौकीन असल्याने त्यांनी असंख्य सिनेमे थेटरात जाऊनच दाखवलेले. त्यात मोहनला फ्री एन्ट्री असायची. प्रत्येक सिनेमात एखादी जागा अशी असते की हाऊसफुल थेटरमध्येसुद्धा प्रत्येक प्रेक्षकांच्या अगदी एकाच वेळी हार्टबीट वाढत असावी - चुकत असावी. हे असे क्षण परत दुसऱ्या सिनेमात नाही अनुभवता येत. भले तो कितीही ग्रेट असो. प्रत्येक सिनेमा वेगळा त्यातल्या आनंदाच्या, हळवेपणाच्या जागा वेगळ्या. म्हणजे 'घातक' मध्ये सनी देओलच्या "कसम गंगा मैया की, घर में घूस के माँरुंगा, सातों को एक साथ माँरुंगा!" ची नशा "एक बार जो मैंने कमिटमेंट करदी..." नाही देत. मिथुनच्या 'दाता' पिक्चरच्या "कुंदन, माँ के पैरों तले जन्नत होती है।" ह्या सुरेश ओबेरॉयच्या डायलॉगची नशा राजश्रीचा कुठलाही फॅमिली ड्रामा नाही देऊ शकत. अर्थात हे सर्व सापेक्ष आहे. प्रत्येकासाठी वेगळं. पण सिंगल स्क्रीन बंद पडत गेले तशी ही नशा मात्र कमी कमी होत गेली. इंटर्वलला पाववडे मिरच्यांचा वास नाही की बाटल्यांवर ओपनर फिरवल्याचा आवाज नाही. क्रीमरोल नाही. शेंगा नाही की दूध जीरा फ्लेवरच्या पेपस्या नाही. अजय देवगणच्या 'कयामत'ला "एक ही आदमी है जो ये काम कर सकता है..." पासून सुरू झालेलं माझं ओरडणं अजयची एन्ट्री झाली तरी थांबत नव्हतं. किती तो उत्साह!! पप्पा कधी कधी जुन्या पिक्चरच्या आठवणी घरात सांगतात तेव्हा भरभरून बोलतात. मला तर फक्त हेवा वाटतो मं. म्हणजे "मेरे पास माँ है" हाऊसफुल थेटरात ऐकताना काय सॉल्लिड नशा असेल ना!

हा सगळा अनुभव माझ्या मुलीला देता यावा असं वाटायचं. परत रिलीज झालेले सिनेमे मी चुकूनही चुकवत नाही. कुणीतरी ते सर्वच्या सर्व जुने सिनेमे परत रिलीज करावे अन मी आणि मुलगी दोघांनी सिनेमा एन्जॉय करावा असं वाटायचं. मला आनंद दिलेल्या सिनेमातल्या त्याच ठराविक जागांवर पोरगी कशी रिअॅक्ट करेल माहीत नाही. आणि हे सगळ्याच आवडी-निवडी बद्दल म्हणता येईल. पिक्चर-पुस्तकं-गाणी-भटकणं. म्हणजे एखादं चारपाचशे पानांचं पुस्तक एका बैठकीत वाचून व्हावं. पण एखाद्या पानात असा जीव अडकावा कि दोन दोन दिवस तिथच जीव घुटमळावा. ओवी दुमडेल का ते पान? की लावेल थुंकी आणि सोडेल अर्ध्यावर. मुळात ती वाचेलच कशाला. वाचेल कि फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे. ज्या वयात मी टायरांसोबत खेळलो त्याच वयात करत बसल ती चेंज- बार्बी बाहुल्यांचे कपडे, त्यांचा मेकअप. एखादी जगजीतची गज़ल पहिल्यांदा ऐकण्यात यायची तेव्हा ती ऐकण्यापूर्वीचा मी आणि नंतरचा मी किती वेगळा असायचो. पोरगी रमेल का त्या संगीतात. की झुमेगी एखाद्या पबबार मध्ये. अरेंज मॅरेज नाहीतर प्यार करना, भाग के शादी इतके सोपे पर्याय वाट्याला येतील की एखाद्या रसरशीत प्रेमभंगातून निब्बर होऊन बाहेर पडेल. तरीही जगेल ऐटीत. जगाला फाट्यावर मारत. जाऊदे. कुठंही भरकटतो मी. कुणी सांगावं तिचं आयुष्य माझ्यापेक्षा जास्त अनुभव समृद्ध निघावं. आपण आपल्याच अनुभवावर एवढा गुरुर करतोय. पण आपण तरी कोणती झाट जिंदगी पाहिलीये.

सध्या दोघी हाताने तिला देता येईल तेवढं देतो. पिक्चर-पुस्तकं-गाणी-भटकणं. बघूया पुढं काय होतंय ते.

- जितेंद्र घाटगे

...................................................

मैं कभी साधारण बैंक कर्मचारी नहीं बन सकता था 
खाने-पीने के सामानों का सेल्‍समैन भी नहीं 
किसी पार्टी का मुखिया भी नहीं 
न तो टैक्‍सी ड्राइवर 
प्रचार में लगा मार्केटिंग वाला भी नहीं

मैं बस इतना चाहता था 
कि शहर की सबसे ऊँची जगह पर खड़ा होकर 
नीचे ठसाठस इमारतों के बीच उस औरत का घर देखूँँ
जिससे मैं प्‍यार करता हूँ
इसलिए मैं बांधकाम मज़दूर बन गया ।

- साबिर हक़ा (इराण)

- अनुवाद : गीत चतुर्वेदी.

- अमर पोवार

...................................................

 प्रतिक्रिया द्या4408 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
अरविंद तुलालवार - मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७
समीरा जाधव ह्यांची कन्हैया मिश्रांविषयी माहिती विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा दायक आहे.
nitin chandorkar - मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७
parineeta madam ,vaibhav sir, ghatge sir,sutar sir yanche lekh khup chhan aahet manapasun aavdale

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर