कायमची वस्ती.. मुल्लाची छत्री.. गावजेवण..
मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७ मुकेश माचकर

बोधकथा, विनोद आणि मार्मिक विचार असा दमदार, कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून..

इब्राहीम नावाच्या फकिराची झोपडी गावाबाहेरच्या एका तिठ्यावर होती.

गावातून येणाऱ्या रस्त्याला तिथेच दोन फाटे फुटले होते. नवखे प्रवासी येत आणि इब्राहीमला रस्ता विचारत. तो आपल्या तंद्रीत काही उत्तर द्यायचा.

एकदा एका प्रवाशाने त्याला विचारलं, वस्तीला जाणारा रस्ता कोणता?

इब्राहीम म्हणाला, डावीकडे जा. तीन मैलांवर वस्ती आहे.

तो माणूस थोड्या वेळाने तणतणत आला आणि म्हणाला, तू मला चुकीचा रस्ता सांगितलास. तीन मैलांवर तर तिथे दफनभूमी आहे. वाटेतल्या माणसांनी सांगितलं उलट्या दिशेला तीन मैलांवर गाव आहे, वस्ती आहे. तू उलटा पत्ता सांगितलास.

इब्राहीम म्हणाला, पण, मी तर असं पाहिलंय की उजवीकडे तीन मैलांवर जे गाव आहे, तिथला कोणी तिथे कायमचा राहात नाही. ती वस्ती कशी? शेवटी सगळ्यांना डावीकडेच यावं लागतं? तिथे जी माणसं गेली आहेत, ती मात्र कायमची तिथेच वसली आहेत. त्यालाच वस्ती म्हणतात ना?

....................................

मुल्ला नसरुद्दीन बाजारात छत्री विकायला उभा होता.

त्याची मोडकी, तारा तुटलेली, कापड फाटलेली छत्री होती. किंमत लिहिली होती १०० रुपये. नवीकोरी छत्री ५० रुपयांना उपलब्ध असताना या छत्रीचे १०० रुपये कशासाठी द्यायचे, असा प्रश्न एकाला पडला.

मुल्ला म्हणाला, म्हणजे काय? विलक्षण टिकाऊ छत्री आहे ही. नीट काळजीपूर्वक वापरली तर शंभर वर्षं टिकेल.

शंभर वर्षं? काय काळजी घ्यायची तिची? संभाव्य ग्राहकाने विचारलं.

मुल्ला म्हणाला, फार काही नाही करायचं. फक्त ऊन आणि पावसापासून जपायचं तिला. बास्स.

.........................

रामकृष्ण परमहंसांकडे एक श्रीमंत माणूस यायचा. दर सणाला तो मोठं गावजेवण द्यायचा. तो मांसाहारी होता. त्याने दिलेलं प्रसादाचं जेवणही चमचमीत मांसाहारी असायचं. एके वर्षी अचानक ही मेजवानी बंद झाली.

रामकृष्णांनी विचारलं, अरे, प्रसादाचं जेवण अचानक बंद केलंस… धर्मावरून विश्वास उडाला की काय तुझा?

तो माणूस म्हणाला, नाही नाही. माझे दात पडले. आवडीचे पदार्थ मला खाता येत नाहीत, पचतही नाहीत. मग मी कशाला फिकीर करू गावाच्या जेवणाची?

आपण चवीने अन्न चाखू शकतो, तोवरच माणसाला इतरांना खाऊ घालण्यात आनंद मिळतो.

........................................

 प्रतिक्रिया द्या1979 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर