नदी वाहते... कुणासाठी?
सोमवार , ४ डिसेंबर, २०१७ यशोधरा काटकर

'नदी वाहते' ही केवळ नदी वाचवण्याची कहाणी नाही, ती त्यापेक्षा खूप मोठा आशय मांडू पाहते. ही कहाणी चित्रपटासोबत संपत नाही. संघर्षाचे पर्याय शोधत नदी वाहतच राहते.

एकदा बेल्जियममध्ये असतात मी आणि साची गप्पा मारत बसलो होतो. ती म्हणाली, "यशुआज्जी, माहिते का तुला, आमच्या बेल्जियममध्ये ना तीन नद्या आहेत... थ्री थ्री!"

आता त्या टिचभर बेल्जियममध्ये तीन नद्या, मग माझा मातृभूमीबद्दलचा अभिमान उफाळून आलाच. मी म्हटलं, 'साची, आपल्या भारतात तीस... नाही नाही तीनशे...नाही... तीन हज्जार नद्या आहेत." 
तिला ते तीन हज्जार म्हणजे किती ते समजलं नसलं तरी न मोजता येण्याइतक्या नद्या आहेत हे त्या चिमुकल्या डोक्यात बरोबर शिरलं आणि तिचे डोळे आश्चर्याने भरून आले,
"हॉ, सो मेनी? इतक्या?" 
"हो मग ?"
"मग सांग बघू नावं?"

आता आली का पंचाईत? पण आता हार मानून चालण्यासारखं नव्हतं. गंगा, यमुना, सिंधू, ब्रह्मपुत्रा, रावी, चिनाब, सतलज, झेलम अशी नद्या मोजायला सुरुवात झाली. सगळी राज्यं पार करत महानदी, इरावती, घटप्रभा, मलप्रभा, कावेरी इथपर्यंत गाडी आली आणि अडली ती अडलीच. माहीत होती ती नावं आम्ही एकीकडे फळ्यावर लिहीत चाललो होतो. ती लिस्टदेखील बरीच मोठी आणि साचीची समजूत घालण्यापुरती पुरेशी होती पण एक गोष्ट लक्षात येऊन लाजच वाटली की काही प्रमुख नद्या सोडल्या तर आपल्या देशात एकूण नद्या किती आणि त्यांची नावं आपल्याला ठाऊकसुद्धा नाहीत.

आत्ता ते आठवण्याचं कारण म्हणजे अलीकडेच संदीप सावंत दिग्दर्शित 'नदी वाहते 'हा चित्रपट बघण्याचा योग आला. सह्याद्रीच्या राकट रांगांच्या पायथ्याशी वसलेल्या एका लहानशा गावातून अंती नावाची एक नदी वाहते. शेती आणि शेतीशी जोडधंद्यांवर जगणारी या गावातली साधी माणसं.यांचं सगळं जगणं, असणं त्या नदीवर अवलंबून. एके दिवशी कुणीतरी आगंतुक येतो आणि नदीच्या वरच्या बाजूला 'धरण 'बांधून तिथे टूरिझम सेंटर उभारू पाहतो. एकदा अशा काही गब्बर मूठभरांसाठी असलेल्या व्यावसायिक ग्राहकवादाचे हातपाय तिथे फैलावायला लागल्यावर तिथलं निसर्गचक्र, कृषिसंस्कृती आणि एकूणच जीवनशैलीचा ऱ्हास होणार असतो. गावातल्या शेतीशी संलग्न छोटेमोठे व्यवसाय करणाऱ्या तरुण धडपड्या मुलांना याचा शोध लागतो आणि मग सुरु होतो नदी वाचवण्याचे पर्याय शोधण्याचा संघर्ष!

खरं तर या चित्रपटाला रूढ अर्थी 'कथा' नाही, यातली माणसं कोकणातल्या खेड्यातली, त्या मातीतूनच रुजून वर आल्यासारखी अस्सल वाटतात. त्यांची कहाणी उलगडणारा चित्रपट अंतीसारखा कडेकपारींना वळसे घालत, खाचखळगे पार करत अगदी सहज संथपणे प्रवाहित होत राहतो. गावातला वरची /खालची वाडी हा भेद, बचतगटांवर कब्जा करू पाहणारी, पर्यायाने प्रगतीच्या विचारांवर कुरघोडी करू पाहणारी स्थानिक राजकारणाची केंद्रं, बँकांकडे शेती किंवा कृषी व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम योजना आहेत पण त्यांच्या मार्गात येणारे अडथळे,करप्ट सरकारी यंत्रणा असा खूप मोठा सामाजिक-आर्थिक-राजकीय अवकाश या कहाणीला लाभला आहे. यात गोंधळलेले, कुठलाच निर्णय न घेऊ शकणारे तरुण आहेत तसेच अस्तित्वासाठी लढा देणाऱ्या विचारशील, क्रियाशील तरुणांचा गट आहे. ही केवळ नदी वाचवण्याची कहाणी नाही, ती त्यापेक्षा खूप मोठा आशय मांडू पाहते.

यात जितका मोठा हात लेखक-दिग्दर्शक संदीप सावंत यांचा आहे तितकाच या सर्व प्रॉडक्शनचं डिझायनिंग करणाऱ्या नीरजा पटवर्धन यांचा आहे. त्यांनी या चित्रपटाची पूर्वतयारी करताना जे नद्यांमधून... हो नद्यांमधून, काठावरून नाही... नद्यांमधून प्रवास करण्याचे, तिथली माणसं, त्याचा जीवनसंघर्ष समजून घेण्याचे कष्ट घेतले ते ऐकून थक्क व्हायला झालं. त्यांना जोड मिळाली संजय मेमाणे याच्या नदीचे अनेक मूड्स टिपणाऱ्या नितांतसुंदर छायाचित्रणाची आणि संथपणे साथ करणाऱ्या पार्श्वसंगीताची!

यातला मला स्वतःला खूप भावला तो मायलेकींचा जगण्याचा लढा. यातली आई गावातल्या खालच्या वाडीवर राहणारी, उन्हातान्हात शेतात राबल्याने रापलेली एक कष्टकरी बाई आहे. एकटीने मुलीला वाढवणारी, तिला शिकायला कॉलेजात पाठवणारी आणि या कौटुंबिक जवाबदाऱ्या पार पडून पुन्हा बचतगट चळवळ, ग्रामसभेत भाग घेणारी जागरूक बाई आहे. तिचाही रोजच्या जगण्याचा एक संघर्ष आहे पण ही बाई तेवढ्यातच अडकून पडत नाही. ती मुलीला कॉलेजात पाठवते पण तिला शेतीत हात राड करायला शिकवते, दुधाचा रतीब घालायला जा म्हणते म्हणजे तिचे पाय जमिनीवर ठेवायला लावून शिक्षणाबरोबर श्रमाच्या प्रतिष्ठेचे संस्कार ती मुलीला देते. मुलगी लहानपणापासून अंतीच्या अंगाखांद्यावर बागडलेली आहे, तिचे सतत बदलते विभ्रम तिला बरोबर समजतात, तिचं गाणं आणि रडणंही तिला ऐकू येतं इतक्या त्या एकरूप झालेल्या आहेत. म्हणजे ही आई कुणी सामान्य खेडवळ बाई नाही, ती भरण-पोषण करणारी 'मदर अर्थ 'बनून सामोरी येते आणि तिच्या कुशीत जन्मलेली ती मुलगी ती नदीच असणार नसते का? त्या मुलीचं व्यक्तिमत्व आणि संपूर्ण वावर यातून ती नदीचे प्रतीक बनून राहते. निसर्गाच्या कुशीत आयुष्याची लय सहज पकडून समाधानी आयुष्य जगणाऱ्या या मायलेकी आणि स्त्रीच्या कुशीतला निसर्ग अशी ही प्रतीकसृष्टी. अंतीच्या अस्तित्वाच्या संघर्षात या मागे कशा राहतील?

अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून चित्रपट संपतो पण कहाणी संपत नाही. त्या माणसांचं जगणं संपत नाही. संघर्षाचे पर्याय शोधण्याचे प्रयत्न चालूच राहतात, नदी वाहत राहते.

ज्यांनी हा चित्रपट अजून बघितला नाही त्यांनी तो नक्की बघावा. संदीप आणि नीरजा चित्रपटाचे शोज गावोगावी करत आहेत, त्याचे वेळापत्रक 'नदी वाहते'च्या फेसबुक पेजवर येतच राहते. त्याकडे लक्ष ठेवा आणि वेळात वेळ काढून बघाच.

माझ्यासारखे अनेक असतील ज्यांची गाडी गंगा-यमुना-सरस्वती या तीन नावांपलीकडे जात नाही. आज आपली गंगा प्रदूषित, यमुनेचं झालेलं डबकं, मुळामुठेची क्षीण होत चाललेली पात्रं याला आपणच जवाबदार आहोत आणि आपली मुंबईकरांची मिठी? ती नदी होती हे आज सांगायची लाज वाटते. पर्यावरणातल्या संसाधनांवर सर्वात पहिला हक्क स्थानिक रहिवाशांचा असतो, बाहेरचे पाहुणे हे काही काळासाठी येतात पण ते पर्यावरणाला सर्वांत जास्त हानी पोचवून, हात झटकून निघून जाणार असतात. स्थानिकांनी आपली जवाबदारी ओळखून वागलं पाहिजे आणि येणाऱ्या पाहुण्यांना/प्रकल्पांना ती घ्यायला भाग पाडलं पाहिजे. नाहीतर साची जेव्हा भारतात येईल तेव्हा यशुआज्जीकडे तिला दाखवायला नदीच असणार नाही. गोव्यातल्या माझ्या खेडेगावाच्या आजूबाजूला कोणत्या नद्या आहेत बरं, विचार सुरू झाला आहेच!!

 प्रतिक्रिया द्या1528 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर