राहुल गांधींच्या मास्टर स्ट्रोकने भाजप-संघाची गोची
सोमवार , ४ डिसेंबर, २०१७ अभिषेक माळी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमनाथ मंदिरात अभिषेक करून संघ आणि अन्य हिंदुत्ववाद्यांची पंचाईत करून टाकली आहे. पुरोगाम्यांनी या कृतीकडे जातीयवादी म्हणून बघता कामा नये.

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एका मागोमाग मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा लावला होता. त्यात सोमनाथ मंदिराला दिलेली भेट विशेष गाजत आहे. सोमनाथ मंदिराला केवळ ऐतिहासिक महत्त्व नाही तर गुजरातच्या आणि देशभरातल्या असंख्य हिंदूंचे ते श्रद्धास्थान आहे. राहुल गांधींनी मंदिराला भेट देऊन तेथे विधिवत पूजा-अभिषेक केला. या सगळ्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच मंदिराच्या बाहेर भेट देणाऱ्या पाहुण्यांची जी नोंदवही आहे त्यात अहमद पटेल आणि राहुल गांधींची नोंद काँग्रेस मीडिया व्यवस्थापक मनोज त्यागी यांनी  अहिंदू अशी केल्याचे प्रकरण समोर आले. नंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाल यांनी राहुल गांधी नुसते हिंदू नाहीत तर जानवेधारी ब्राह्मण आहेत असा दावा करून नवाच वाद निर्माण केला. यावर राहुल गांधींनी आपला संपूर्ण परिवार शिवभक्त असल्याचे सांगितले. राजकीय अपरिहार्यता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनापण या वादात उडी मारावीच लागली. “गुजरातचे मंदिर तुझ्या पणज्याने (परनाना) बांधलेले नाही.” इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याची पाळी त्यांच्यावर आली. (राहुल गांधींचे पणजोबा म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू) वास्तविक पाहता नेहरूंच्या प्रयत्नांनीच सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार होऊ शकला पण तो या लेखाचा विषय नाही, असो. काही अतिउत्साही पुरोगामी राहुल गांधींनी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला तडा दिला, राहुल गांधी हेही जातीवादी निघाले अशी मूर्खपणाची विधाने करत आहेत.

नेहरू-गांधी परिवाराला बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आजवर केले आहे. याचाच एक भाग म्हणून “नेहरू घराणे मुळचे गियासुद्दिन गाझीचे वंशज आहेत किंवा इंदिरा गांधींचे पती फिरोज यांचे आडनाव खान होते व ते मुसलमान होते.” अशा अफवा पसरवण्याचा आटोकाट प्रयत्न संघ परिवार आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांशी सबंधित भुरट्या विचारवंतांनी इतके वर्षे अविरतपणे चालवला आहे. पण यात काहीच तथ्य नाही अधिक माहितीसाठी वाचा: http://maliabhi.blogspot.in/2017/12/blog-post.html

काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष राजकारणाला आजवर मुस्लिम व इतर धर्मियांचे लांगूलचालन आणि हिंदुविरोधी म्हणत विरोधकांनी टीकेचे लक्ष्य बनवले. काही अपवादात्मक प्रसंग वगळता काँग्रेसने सदैव सर्वजन हिताय हेच धोरण जपलेले आहे. मुस्लिम व इतर धर्मियांचे लांगूलचालन झाले खरे पण ते केवळ राजकीय होते, काँग्रेसच्या वास्तव ध्येयधोरणांमध्ये सर्वधर्मसमभाव हे तत्त्व कसोशीने पाळले जाते पण राजकीय विरोधक काँग्रेसची आणि विशेषतः नेहरू-गांधी घराण्याची प्रतिमा जनतेसमोर हिंदूविरोधी आणि मुस्लिमधार्जिणी अशी निर्माण करण्यात काहीप्रमाणात का होईना यशस्वी झाले होते. हिंदुत्वाच्या आडून जातीयवाद आणि वैदिकवर्णवर्चस्ववाद खपवण्यात संघ व इतर ढोंगी हिंदुत्ववादी सदैव प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या प्रपोगंडाला बळी पडून अज्ञानी हिंदूंची लक्षणीय व्होट बँक त्यांच्या पाठीशी उभा राहिली.              

राहुल गांधी फिरोज गांधी या पारशी व्यक्तीचा नातू असले तरीही हिंदूच आहेत. कारण पारशी धर्माचे नियम याबाबतीत फार कडक आहेत. पारशी धर्म फक्त जन्माने लाभतो, स्वीकारता येत नाही. अगदी पारशी व्यक्तीशी लग्नानंतरदेखील तुम्ही पारशी बनू शकत नाही. तुमचे आई-वडील दोघेही पारशी असल्याखेरीज तुम्ही पारशी असू शकत नाही. फिरोज गांधी व इंदिरा यांचा विवाह हिंदू रितिरिवाजांनी झाला होता.

ते ब्राह्मण असण्याचा दावा करण्याचे कारण असे की आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या निकालानुसार आंतरधर्मीय/जातीय विवाहानंतर देखील अपत्याला आईची माहेरची जात-धर्म ओळख लावता येते. (http://www.livelaw.in/caste-child-born-inter-caste-couple-depend-upon-circumstances-child-brought-ap-hc/) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार धर्मांतराने जात बदलत नाही. (http://www.livelaw.in/person-can-change-religion-faith-not-caste-belongs-caste-linkage-birth-sc/)

राहुल गांधींचे हिंदू आणि तेही ब्राह्मण असणे म्हणजे संघ परिवाराच्या आणि भाजपच्या जनाधाराच्या मुळावर घाव घालण्यासारखे आहे. संघाच्या शाखेत जाऊन किंवा तथाकथित हिंदुत्ववादी मित्रांकडून ऐकलेल्या बाजारगप्पा म्हणजेच इतिहास असे समजणाऱ्या सामान्य हिंदू लोकांचा आणि ब्राह्मणांवर आरक्षणाने अन्याय झाला या भावनेतून उद्विग्न झालेल्या ब्राम्हणांचा जो काही थोडाबहुत जनाधार संघाला आहे तोही यामुळे हिरावून घेतला जाऊ शकतो.

वास्तविक पाहता वैदिक धर्म शास्त्रानुसार हिंदू व्यक्ती आणि हिंदूइतर व्यक्ती (म्लेच्छ) यांच्या संकरातून जन्मलेली संतती ही चांडाळ म्हणजे शुद्राहून शूद्र अतिशूद्र ठरायला हवी. पण राहुल गांधींना अतिशूद्र म्हणावे तर त्यांना हिंदू म्हणून मान्यता द्यावी लागते म्हणजेच आजवरचा सगळा प्रचार खोटा होता. हे स्वतःलाच थोबाडीत हाणून घेण्याचे काम आहे. हा शूद्र-ब्राह्मण वगैरे भेदभाव दाखवला तर आजवरचा हिंदुत्ववादाचा मुखवटा गळून पडून वैदिकवर्चस्ववादी, जातीवादी आणि मनुवादी खरा चेहरा समोर येण्याची भीती संघाला सतावते आहे. धर्मशास्त्राचा आधार प्रमाण मानायचा झाल्यास आपण लोकशाही आणि न्यायव्यवस्थेला मानत नाही याची एकप्रकारे कबुलीच संघाला द्यावी लागेल. थोडक्यात काय तर संघ आणि भाजपची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे. संघाला हे जाम लागत आहे, अगदी सोसवेना झाले आहे पण ओरडताही येत नाही.  

थोडक्यात काँग्रेसचे राजकारण आजही धर्मनिरपेक्ष आहे आणि ते सदैव तसेच राहील. पण जनतेमध्ये निर्माण झालेली हिंदू विरोधी प्रतिमा पुसण्याचे काम या निमित्ताने होत आहे. विरोधक आणि राजकीय विश्लेषक याला मवाळ हिंदुत्व (Soft Hindutva) असे म्हणतान दिसतात. हा त्यांच्या आकलनातील दोष आहे. धर्मनिरपेक्ष असतानाच आम्हीही इतर सर्व धर्मांप्रमाणेच हिंदूहितेशी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे हिंदूहितवाद होय. हिंदुत्ववाद आणि हिंदू हितवाद यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे अतिउत्साही पुरोगामी मंडळींनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका करणे थांबवून त्यांना साथ द्यावी. आज प्रसंग बाका आहे आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याची आज खरे तर गरज आहे.

 

 प्रतिक्रिया द्या6432 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Vivan - सोमवार , ४ डिसेंबर, २०१७
अहो विद्वान ! जर आईची जातअपत्याला लावता येते हे मान्य केले तर राहूल गांधी ब्राम्हण कसे होतील ? ते इटालियन ख्रिश्चन होतील कारण सोनिया गांधी या इटलिच्या असून ख्रिस्ती आहेत. ख्रिस्ती लोकांमध्येपण ब्राम्हण जात असल्याचे आम्ही तरी एेकले नाही. तर थोडंसं डोकं वापरून (असल्यास !) लिहीत जा. देशात पिडी भरपूर आहेत, खरया रिपोर्टर्सची गरज आहे, ते बना. बिगूलचे इतर चांगले लेख वाचा व तसे लिहीत जा !

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर