फेबुगिरी
सोमवार , ४ डिसेंबर, २०१७ टीम बिगुल

ताज्या घडामोडींबाबत किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल नेटवर्किंगसाइट्सवर व्यक्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातल्या काही निवडक पोस्ट्स खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी:

मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून मी सेवेत आलेलो असलो तरी रिलायंस एज्युकेशन कंपनी लिमिटेडसारख्या एखाद्या कंपनीचा कर्मचारी म्हणून रिटायर होणार!

आणि हो,

हे विधान अजिबात अतिशयोक्तीपूर्ण नाहीये. २०१२पासून मी हेच मत जाहीरपणे मांडत आलोय. प्रथम संस्थेच्या 'असर'विषयी बोलतानाही खासगीकरणास पार्श्वभूमी तयार करायला 'असर'चा फॉल्टी डेटा कसा पद्धतशीर वापरला जातोय, हे आम्ही सतत बोलत, लिहित आलोय...

'शाळा आमच्या ज्ञान टाटांचे!' 
असे म्हणत झेडपी शाळांत एका भांडवलदाराची घुसखोरी सुरु झाली होती!भांडवलदाराच्या हातात शिक्षणाचा आशय देण्याविषयी तेव्हा विरोध दर्शवणारे लेखन केले म्हणून नोटिसही निघाली होती.

मुंबई महापालिकेच्या काही शाळा कंपनीला चालवायला द्यायचा निर्णय जवळ जवळ झालाचय.

गोरगरिब, वंचित घटकांतली मुले शिकताय अशा राज्यभरातल्या १३०० झेडपीच्या शाळा बंद करायचा निर्णय झालाय!

लोकसहभागाच्या प्रेमात बुडालेले शिक्षक अजून 'बिट्वीन द लाइन' वाचायला शिकत नाहीयेत. शिक्षकांचेच वागणे खासगीकरणास पूरक आहे. गोड बोलून त्यांना फसवले जातेय!

या देशातल्या उच्च शिक्षणाची दिशा ठरवायला बिर्ला-अंबानी यांची द्वीसदस्यीय समिती आधीच्या सरकारने नेमली होती. आताचे सरकार तोच अजेंडा पुढे नेतेय. सरकार कोणतेही असो. काही फरक नाहीये.

शिक्षक संघटनांच्या सेवानिवृत्त नेत्यांचे मजेत चाललेय. नव्याने निर्माण झालेल्या शिक्षणातल्या प्रश्नांची त्यांना उकल होत नाहीये. त्यामुळे संघटित होऊन विरोध करणे फार पुढची गोष्ट...

सावध ऐका पुढल्या हाका!

#शिक्षणाच्याहक्काचेकायझाले?

- भाऊसाहेब चासकर

..............................................

बाबासाहेब शेवटचे प्रबोधनकार होत. त्यांच्या नंतर प्रबोधनाची मोठी जबाबादारी तथाकथित पुरोगामी चळवळी आणि माध्यमांवर होती. त्यांनी क्रिकेट, सिनेमा आणि नथुराम गोडसे यावर पानेच्या पाने खर्ची घातली. आपल्या पैशाने त्यांनी प्रबोधनाच्या चळवळींना आपल्या वर्तमानपत्रात जरूरीपेक्षा जास्त स्थान दिले नाही. मात्र पुरोगामित्व टिकवून ठेवण्यासाठी दर वर्षी १४ एप्रिलला बाबासाहेबांनी अपृश्यांसाठी काम केले हे इतर समाजाच्या डोक्यात ठसवलं. आज बाबासाहेबांच्या लेकरांना सुद्धा अस्पृश्य या परीघाबाहेर बाबासाहेबांनी काय काम केले हे ठाऊक नाही..

- किरण चव्हाण

..............................................

फेसबुकी कट्टर उजव्यांची (पक्षी: हिंदुत्ववाद्यांची) वैशिष्ट्ये.

1. आदिमानवासारखे अजूनही टोळ्या करून राहतात.
2. तर्कशुद्ध युक्तिवाद करण्याऐवजी भावनिक युक्तिवाद करून डोक्याची आयबहीण करतात..
3. यांच्या प्रत्येक पोस्टमध्ये व कंमेटमध्ये फुरोगामी, मळमळ, जेएनयू, पाकिस्तान, शांतीदूत, देशद्रोही हे शब्द असतात.
4. मुद्दयावर चर्चा करण्याऐवजी वैयक्तिक चिखलफेक करण्यात हे पटाईत असतात....
आणि सर्वात महत्त्वाचं..
5. यांचे व यांच्या पाठीराखयांचे मानसिक व वैचारिक वय एकसारखेच असते.. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणून विचारवंत..
6. हे स्वतःच स्वतःला देशभक्त, नेशन फर्स्ट वगैरे असली विशेषणे लावून देशभक्त म्हणून सिद्ध सांगत फिरतात.
7. सरकारच्या कामगिरीवर प्रश्न विचारलेल्यांना कम्युनिस्ट, काँग्रेसवाला म्हणतात. यांच्या हिंदुत्वाआडून केलेल्या जातीयवादावर बोट ठेवल्यास हे समोरच्याला ब्रिगेडी म्हणतात .
7. 99.99% सरकार व त्याच्या विचारसणीस अनुकूल भूमिका घेऊनही हे स्वतःला तटस्थ, वस्तुनिष्ठ वगैरे असे म्हणून इकडे मिरवत असतात.
8. आम्ही जात पाळत नाही, धर्म नाही तर राष्ट्र प्रथम मानतो अशी मांडणी करून आपल्या जातभाईचे कळप करून त्यात सुरक्षितता शोधून दुसऱ्यांना जातीयवादी वगैरे म्हणतात ..

बस की अजून सांगू...?

- शिवराज दत्तगोंडे

..............................................

#ऑर्थोडॉक्स_इंदुरीकर.. #मुलींबद्दल_भेदभाव..

कीर्तनकारांनी आधुनिकतेची कास धरून समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे, हे इंदुरीकर महाराज त्यांच्या अनेक प्रवचनात मुलीवर जास्त बंधने लादा असा सरळ संदेश देतात, जर 15 दिवसांनी मुलीला मारा किंवा धाक दाखवा म्हणजे मुलगी नीट राहील असली फालतू थेरी मांडतात..
मुलीचा मोबाईल चेक करा तिच्यावर बंधनं घाला आणि मुलाने काय करा? बोंबलत फिरा.. आजचं जग वेगळं आहे मुलांच्या सोबत संवाद ठेवणं महत्त्वाचं आहे मारून झोडून प्रश्न सुटत असते तर झालं मग..लोकं हसतात तुम्हाला ऐकतात म्हणून आपलं काही फालतू थेरी मांडणे योग्य नाही..

- #आपलाच_सुशांत_कांबळे..

..............................................

जोतीराव फुलेंचं निधन झालं १८९० साली. म्हणजे १९ व्या शतकात. 
मोहनदास करमचंद गांधी ह्यांचा खून झाला १९४८ साली. म्हणजे २०व्या शतकात. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचं निधन झालं १९५६ साली. म्हणजे विसाव्या शतकात.

आज केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेवर आहे भाजप-संघ परिवार. त्यांचा कार्यक्रम-- गोरक्षा, गाईच्या शेणा-मुतावर संशोधन, प्राचीन भारतीय भारतीय विमानविद्या, हिंदूंचं सुवर्णयुग, मुसलमान व ख्रिश्चन अराष्ट्रीय किंवा राष्ट्राच्या विरोधात आहेत, अन्य अल्पसंख्यांकांनी हिंदूधर्माचं वर्चस्व मान्य करावं, अशा प्रकारचा आहे. म्हणजे पूर्णपणे आधुनिकतेच्या आणि विवेकाच्या विरोधातला आहे. हिंदुत्ववाद म्हणजे भारतीय फॅसिझम. फॅसिझम म्हणजे व्यक्तीने आपलं अस्तित्व राष्ट्रामध्ये विलीन करणं. अर्थात हिंदुत्वाला अनेकजण ब्राह्मणवाद असंही म्हणतात. ब्राह्मणवाद म्हणणार्‍यांचं मत असं की काँग्रेस आणि भाजप दोघेही ब्राह्मणवादी वा मनूवादी विचारांचे आहेत.

गझनीच्या महंमदाने सोमनाथ मंदिर फोडलं, लुटलं १०२६ मध्ये. बाबरी मशीद बांधण्यात आली १५२८-२९ मध्ये. हिंदुत्ववादी (ब्राह्मणवादी) ह्यांच्या दृष्टिने तोच हिंदुस्थानवरचा घाला होता. कारण त्यांच्या दृष्टीने आधुनिक भारत तेव्हापासूनच अस्तित्वात होता.

भारत नेशन-स्टेट म्हणजे राष्ट्र-राज्य बनला १९४७ मध्ये. तोपर्यंत आधुनिक अर्थाने आपण राष्ट्र-राज्य नव्हतो.

फुले, आंबेडकर, गांधी, नेहरू ह्यांनी व्यक्तीस्वातंत्र्य, व्यक्तीमूल्य ह्यांना आपल्या विचारधारेत आणि कार्यक्रमात महत्त्वाचं स्थान दिलं होतं.

हे विसरून १९ आणि २० व्या शतकातल्या लढाया २१ व्या शतकात खेळल्या जात आहेत.

हिंदुत्ववादी आणि फुले-आंबेडकरवादी ह्या दोघांचीही धारणा अशी आहे की हिंदु-मुस्लिम किंवा ब्राह्मण-ब्राह्मणेतर हे वाद प्राचीन काळापासून आजवर चालत आहेत. त्यांचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोवर भारत हे राष्ट्र-राज्य नाही. ते आधुनिक राष्ट्र-राज्य बनायचं असेल तर मुळापासूनच सर्व बदलावं लागेल.

फारसा फरक नाही हिंदुत्ववादी, ब्राह्मणवादी आणि फुले-आंबेडकरवाद्यांमध्ये. दोघांचाही भर इतिहासावर आहे, भविष्यावर नाही. भविष्य घडवण्याची जबाबदारी घेण्यावर नाही.

भारतीय राज्यघटना हा आरंभबिंदू मानून पुढे कशी वाटचाल करायची ह्यावर तरी एकमत व्हायला पाहीजे. काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट ह्यांना विसरून किंवा बाजूला ठेवून किंवा त्यांचा नायनाट करून. पण तेही होताना दिसत नाही.

- सुनील तांबे

..............................................

पुरषांना कसं प्रपोझ करायचं असे प्रश्न मला कुणी विचारले की मी ह्यात एक्सपर्ट असणार आणि माझ्याकडे रामबाण उत्तर असणारच ह्याबद्दल समोरचीला असलेल्या आत्मविश्वासाबद्दल मला कौतुक वाटतं.मला प्रपोज करण्याचे जसे काय शंभर अनुभवच्च आहेत अगदी.. ( किती मजा आली असती. शिट्टी मारून लाईन मारण्याचे माझे स्वप्न आजही जिंदा आहे.) कैकदा अशी वेळ येते की स्त्रियांना बोलून काहीच दाखवावं लागत नाही. स्त्रियांचे डोळे रेडियोसारखे असतात. त्यातून सगळ्या बातम्या मिळतात. त्या ज्या पुरषाला ऐकू येत नाहीत तो रेंजच्या बाहेर आहे असे समजावे आणि त्याच्याकडे पाठ फिरवावी. किंवा त्याने ऐकू येत असूनही आपण बहिरे असल्याचे नाटक केले तर व्हॉल्यूम एकदाच वाढवावा आणि मागणी घालून मोकळे व्हावे. हो तर हो नाही तर फूट हे तत्व असेल तर जगात कुणालाही प्रपोज करू शकतो आपण. हाय काय नी नाय काय.

- रेणुका खोत

..............................................

आज रविवार आहे, गेला आठवडाभर कष्ट करून आपण सगळे थकलो आहोत.

१. सकाळी नऊच्या आधी उठणे हे पाप असते रविवारी याची नोंद घ्यावी.

२. भाजीचे झोरे आणि दळणाचे डब्बे यातले आपल्याला काहीही कळत नसते. ही असली कामे सांगितली की त्या कामाला झुरळासारखे झटकून टाकावे.

३. आज विराट कोहली बहुतेक डबल सेंच्युरी मारणार आहे. कोपऱ्यावरील वाण्याला सांगून कोल्डड्रिंक्स आणि चिप्स वगरे मागवून ठेवावे.

४. सोफ्याची सर्वात लांब बाजू आपले पाय पसरून अडवून ठेवावी.

५. दर तासाला चहा देत जा, सारखे सारखे मागायला लावू नकोस असा सज्जड दम घरी देऊन ठेवावा.

६. दुपारी जेवण झाल्यावर त्याच सोफ्यावर टीव्ही बंद न करता ताणून द्यावी.

७. झोपेतून उठला की तिथूनच चहा मागावा.

८. संध्याकाळी आंघोळ करून दिवसभरात केलेल्या तपश्चर्येची उत्तरपूजा बांधण्यासाठी आपल्या टोळभैरव मित्रांसोबत बाहेर जाऊन यावे.

- हर्षद बर्वे

..............................................

शेक्सपिअरचं साहित्य वाचलं की माणूस अचंबित होऊन जातो .. ती शैली, ती पल्लेदार वाक्ये, ती विषयाची विविधता, ते कॅरेक्टरायझेशन, तो अभिजात दर्जा ... माशा अल्लाह ! ... एकाच माणसाने हे सर्व लिहिलंय हे पटतच नाही.

मला कधी कधी असा संशय येतो की, दुसऱ्याच कुणाचं तरी लिखाण ढापून शेक्सपिअरने आपल्या नावावर खपवलं असावं आणि आपली ही चोरी जस्टीफाय करण्यासाठी केवळ एक वाक्य स्वतः लिहिलं असावं ...

... नावात काय आहे !!!

- सॅबी परेरा

..............................................

शाळा बंद करण्याचा आत्मघातकी निर्णय!!! कल्याणकारी राज्य व्हावे असे जर असेल तर सरकारने शिक्षण धोरण बदलले नाही पाहिजे.. स्कूल चले हम.. सब सिखो, सब पढो! अशा घोषणा द्यायच्या आणि ग्रामीण भागातील 1300 शाळा बंद करायच्या हे सरकारचा दुटप्पीपणा आहे . संविधानाच्या मूलभूत हक्काच्या कलम 21मध्ये शिक्षण हक्क मूलभूत करताना 6 ते 14 वयोगटातील शिक्षण अनिवार्य करायचे पण दुसऱ्या बाजूला त्यांना शाळांपासून वंचित करायचे ह्या धोरणाने सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. प्राथमिक शिक्षण अनिवार्य करा, असे महात्मा फुले हंटर कमिशनपुढे बोलले होते, छत्रपती शाहू यांनी ते अनिवार्य केले 1917 साली केंद्र सरकारला वा राज्य सरकारला अनिवार्य करण्यास 2002 साल उजाडले.. आज वर्ष सुरू आहे 2017 आणि शाळा बंद करण्याचे निर्णय सरकार घेत आहे.. ही लाजिरवाणी बाब आहे. 
जिथे विद्यार्थी कमी म्हणजे 10 ते 50 आशा या शाळा असल्या तरी या शाळा जिथे भरत होत्या, त्या इमारती आता कोणत्या कामासाठी वापरल्या जातील? त्या चक्क महिनाभरात मोडकळीस येतील. यात बहुतेक वस्ती शाळाच असणार आहेत . लहान मुले ज्या आवारात वावरत असतील ते छान वाटते. हा या बालकांचा किलबिलाट आता ज्या शाळा बंद केल्या तिथला थांबेल मग तिथे किती उदास वाटेल? घरापासून शाळा दूर गेल्या तर त्याचा परिणाम लहान मुलींच्या शिक्षणावर नक्कीच होणार आहे.. केंद्राने विद्यांजली उपक्रम राबवायचे आणि मुलांना शिक्षणापासून वंचित करायचे हा निर्णय आमच्या मते तरी प्रतिगामी आहे, आत्मघातकी आहे.

- मंगेश खराटे

..............................................

यंदा सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी डीजे बंद चळवळीचं मनापासून स्वागत... जत्रेचं स्वरुप यायला लागल्या नंतर मी जाणंच सोडून दिलं... नेत्यांची भाषणं तर डोक्यात जायची...
ह्या दिवशी काही तरी वेगळं असावं अशी माझी नेहमीच इच्छा राहिलीय... त्यापैकी एक
डिबेट: फार पूर्वी माझं वाचन वगैरे नव्हतं तेव्हा मी बाबासाहेब आणि जातीबद्दल कोण काय बोललं तर नुसती शिवीगाळ आणि मारहाण करायचो.. पण जेव्हा वाचन आणि अभ्यास केल्यावर हिणकस टोमण्यांना वैचारिक माध्यमातून उत्तर देऊ लागलो... शिवीगाळ आणि मारहाण पेक्षा ह्यात प्रचंड मजा होती...
असो तर बांधवांना डिबेट कॅलीबर कसं करता येईल ह्याचा विचार झाला तर बरं होईल... आरक्षणावरून मुलांना खूप छळलं जातं... तर आरक्षण का मिळालं आणि ते का गरजेचं आहे हे मुलांना सांगता यायला हवं...
पुढे जर सक्षम पिढी घडवायची असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी कळायला हव्यात आधी आपल्या मुलांना मग इतरांना..

बघुयात.. मी काही तरी सुरुवात करीन..

एक प्रश्न : महापरिनिर्वाण दिनी होणाऱ्या कव्वाल्या पण बंद होणार आहेत का?

- सुधीर जाधव

..............................................

पोस्टकार्ड कथा :

बैलगाडीत बसण्याचा त्याचा पहिलाच अनुभव होता. प्रवास सुखकारक नव्हता पण अनुभव देणारा नक्कीच होता. 
ते बैल आपल्या मालकाच्या हुकूमानुरूप वागत होते. शेतकर्‍याने हाळी दिली रे दिली की ते बैल थोडा वेळ जोरात धावायचे. पुन्हा ' ये रे माझ्या मागल्या...' सारखे वेग कमी करत नुसते चालायला लागायचे. मग, तो शेतकरी 'परानी'ची काठी त्यांच्या पाठीत हाणायचा नि बैलांना पळवायचा . एकला मारले की दूसरा जोरात पळायचा. पण, कधीतरी त्याच्याही वाटेला मार यायचा. परानीचे टोक त्यांच्या ढुंगनात घुसायचे. ते कळवळून पळायचे. 
आपला मालक कुठल्यावेळी कोणता पवित्र घेईल हे त्या मुक्या जनावरांना कळत नव्हते व ते बर्‍याचदा गोंधळून ती कशीबशी बैलगाडी ओढत होते.

'किती साम्य आहे, या बैलाच्या नि आपल्या जगण्यात' तो विचार करू लागला.

इतरजण आपल्याला 'बायकोचा बैल' का म्हणतात, हे तत्क्षणी त्याच्या लक्षात आले.

- जोसेफ तुस्कानो

..............................................

एकाच व्यक्तीने तुमचे संपूर्ण आयुष्य व्यापलेले तुम्ही दीर्घकाळ सहन करू शकत नाही.

सार्वजनिक व्यवहारात तोच तो चेहरा, त्याची देहबोली, शब्दफेक कित्येकदा उबग आणतात.

तत्कालीन पंप्र नरसिंहरावांच्या कारकिर्दीतील शेवटच्या काळात प्रचारादरम्यान त्यांचा चेहरा टीव्हीवर दिसला की मी तात्काळ रिमोटनी चॅनल बदलत होतो.

त्यांचा कार्यकाळ एवढा काही वाईट नसतानासुद्धा!

- मुकुंद सूर्यवंशी

..............................................

'जे निर्णय घेतले त्याची किंमत चुकवण्यास तयार - पंतप्रधान'

'जे निर्णय' म्हणजे अनेकवचन आहे. म्हणजे 'त्याची किंमत' नसून 'त्यांची किंमत' पाहिजे.

त्याशिवाय मराठीत 'चुकवणे' म्हणजे पळ काढणे, जबाबदारी नाकारणे असा अर्थ होतो. चुकवण्यास तयार ऐवजी 'भोगण्यास तयार' असे भाषांतर हवे होते. अर्थात आपले पंतप्रधान भोगवादी नाहीत असा कुणाचा युक्तिवाद असेल तर माझ्या या पोस्टची किंमत चुकवण्यास मी तयार आहे.

- आनंद मोरे

..............................................

सकाळी पुण्यात उतरल्या उतरल्या अवधुतांचं दर्शन झालं. मंडप वगैरे लावलेला आहे. भाविकांची मोठी रांग.. अन् स्पीकरवर 'चम चम करता है ए नशीला बदन..' या गाण्याच्या चालीवर परमेश्वराचा राग आळवला जात होता...

- दिग्विजय जिरगे

..............................................

विशीत असतानाच डोक्यावरचं ओझं हळूहळू कमी व्हायची लक्षणं दिसायला लागली. सुरुवातीला खूप घाबरलो होतो. त्यात कोणीतरी खल्वाटो निर्धनः क्वचित म्हणून दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. खल्वाटो सधनः सदैव नव्हे! इथेही क्वचितची मेख होतीच. म्हणजे 'आयुष्यात कशाची ददात संभवत नाही' असं सांगून लगेच पुढच्या ओळीतच 'धनप्राप्तीकडे दुर्लक्ष करू नये' अशा ज्योतिषी सल्ल्यासारखं. केस कमी होण्याचा म्हणजे टक्कल वाढण्याचा दर पाहता निदान लग्न होईपर्यंत तरी काळजी नव्हती. ते टिकून रहावेत म्हणून काही विशेष प्रयत्नही केले नाहीत. कसली कसली तेलं लाव, क्रिमं चोपड, विशेष शांपू लाव असे सल्ले लोक देत असत. एका वयस्कर न्हावीबुवांनीतर हळहळ व्यक्त करून 'माझ्याकडे दर आठवड्याला येऊन तेल मालिश करत जा' असा सल्ला दिला होता. नव्या पुलापाशी फुटपाथवर जडीबुटी घेऊन बसलेल्या वैदू बाईनी 'ओ साहेब' म्हणून हटकलं की ती दुसऱ्याच कुणाला तरी बोलावते आहे असं समजून पुढे चालू लागत असे. आता आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार होतं? आमच्या घरात दोन्हीकडून मोठ्या टकलांची परंपरा! लग्नानंतर मात्र टक्कल वाढण्याचा दर वाढला. तो आता काहीसा स्थिरावला आहे.

काहींचे केस अकाली गळायला लागून रंग मात्र काळा राहतो. काहींचे अकाली पिकून अगदी साठी-सत्तरीतही घनदाट असतात. शेवटपर्यंत रंग आणि संख्या असं दोन्ही टिकून असलेले भाग्यवान क्वचितच पहायला मिळतात. मला अजून तरी अनुभव नाही पण पांढरे केस असलेल्या टकलांना डाय लावताना फार कसरत करावी लागत असणार. चुकून इकडेतिकडे लागला तर मधेच बेटावर झुडूप आल्याचा भास. टक्कल म्हणजे फक्त डोक्यावरचा केस गेलेला भाग नव्हे तर अशा माणसाचा उल्लेखही 'ते बघ एक टक्कल चाललय' , 'तिकडून एक टक्कल आलं' असा केला जातो. सिनेमांमधून टकल्यांची चेष्टा तर ठरलेली असते. व्हिलन लोक टकले असले की त्यांच्या खतरनाकपणाला धार चढते बहुतेक. (पहा: शेट्टी, कुलभुषण खरबंदा, अमरिश पुरी). हिरो कधी टकले पाहिले नाहीत. अर्थात आता असलेले केस नाहीसे करून टक्कल करण्याची स्पर्धा असते ते सोडा. बॉसही टकले असले की लोक टरकून असतात.

मोठं टक्कल असलेले पाटील सर त्यांच्या वाढदिवसाला नवीन सफारी सुट आणि नवीन विग घालून आले होते. सगळी ट्रेनिंग डिव्हीजन आ वासून पहात होती. टोप हा प्रकार मी तेव्हा पहिल्यांदाच पाहीला. त्या वेषात पाटील सर एकदम दहा वर्षांनी तरूण दिसायला लागले होते. रामचंद्रन सर म्हणजे अण्णांची स्टाईल एकदम वेगळी. आम्ही त्यांना गंमतीनं वाटी म्हणत असू. तुळतुळीत केरळी काळ्या रंगाचं टक्कल पुढच्या बाजूला जतन केलेल्या झुल्फांनी शिताफीनी झाकून टाकायचे. म्हणजे डाव्या कानावरून निघालेले केस कपाळ ते उजवा कान असे अर्धचंद्राकृती मार्गक्रमण करून थेट मागे जायचे. ही त्यांची खास केरळी तैलबुद्धी युक्ती असावी. ते होतेही प्रचंड हुशार. कामातल्या अनेक युक्त्या त्यांच्याकडून शिकलो पण ही काही जमली नाही.

टकलांमधेही प्रकार असतात. काहींचं पुढून सुरू होतं तर काहींचं फक्त मधल्या भागातच असतं. कडेच्या कंपाउंडमधून कधी निमुळती शिखरे तर कधी सपाट मैदानं उघडी पडलेली असतात. त्यांना चिवड्यातला लाडू, विमानतळ, लाडूतला बेदाणा, चांदोबा अशी उपनामे आहेत. यावर काहींच्या 'नाझ्का लाईन्स'ही स्पष्ट दिसत असतात. टकलांवर आता यशस्वी केशारोपणही करतात म्हणे. जाऊदे. इथे कोणा लेकाला हवेत आता केस? आपण बरं नी आपलं टक्कल बरं. काय?

- अनंत अच्युत

..............................................

सण हुल्लडबाजीने साजरा करण्याच्या भारतीय स्पर्धेत मुस्लिम पोरेही उतरलेली दिसतात.
शहरांमध्ये कालचा सण बहुतेक ठिकाणी मोटारसायकल डे म्हणून साजरा होताना दिसला आणि समाजातील जाणत्यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसतेय.

- अविनाश पवार

..............................................

फेण्यांचा प्रामाणिकपणा 
वसंत नरहर फेणे (वय ९१ पूर्ण) हे मराठीतील एक श्रेष्ठ लेखक. यांच्या ‘कारवारी माती’ या ग्रंथालीने काढलेल्या सहाशे पानी कादंबरीचे प्रकाशन काल दादरला झालं. 
प्रकाशनसमारंभात फेण्यांबद्दल बोलताना “ते वयाच्या विशीत कवितासुद्धा करत असत आणि त्या सत्यकथेत प्रकाशित झाल्या आहेत. त्या काळात हे अतिशय प्रतिष्ठेचे समजलं जात असे” असं निवेदिकेनं सांगितलं. आपल्या भाषणात फेण्यांनी सांगितलं- माझी फक्त एकच कविता सत्यकथेत प्रकाशित झाली आहे. ती म्हणजे ‘भारत माझा स्वतंत्र झाला’. तिला तात्कालिक महत्त्व असल्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ च्या अंकात ती प्रसिद्ध झाली. मात्र त्यानंतर मी पाठवलेल्या २/३ कविता सत्यकथेने साभार परत केल्या. म्हणून मी कविता लिहिणं बंद करून कथा लिहू लागलो.
स्वतःचं कर्तृत्व बढाचढाके सांगण्याच्या आजच्या काळात फेण्यांचा हा प्रामाणिकपणा फारच उठून दिसतो.

- सुबोध जावडेकर

..............................................

"पांढरे केस"

बारा वर्षांनी जेंव्हा तुम्ही परत एकदा शहराच्या त्या भागात पोचाल तेंव्हा तिथला प्रसिद्ध कुत्रा म्हातारा झालेला दिसेल, सेकंडहँड पुस्तकांच्या दुकानाच्या जागी आता अस्सल स्कॉच विकणारे दुकान असेल, ज्यात अस्सल स्कॉचपेक्षाही भारी भारतीय "आर्य चाणक्य" व्हिस्की दिमाखात चमकत असेल,

जुन्या कळकट तेल्याचा "तो" लठ्ठ आणि मठ्ठ मुलगा अमेरिकन जीन्समध्ये विदेशी साबण, सेंटस , मोबाईल फोन्स विकत असेल,

जिने तुमच्या हजेरीचे फर्मान काढले ती सरकारी कचेरीही स्वच्छ, ब्राह्मणी झालेली असेल, तिथल्या कामगारांची गालफडे वर आलेली असतील, साहेबांच्या लाचेचा आकडा ऐकून चक्कर येईल,

काम संपवून जेव्हा तुम्ही रस्त्यावर याल तेव्हा तुम्हाला केस पांढरे झालेली, जुनाट साडी नेसलेली 
तुमची एक जुनी शिक्षिका रस्त्याने पाय ओढत जाताना दिसेल, बाईंच्या चेहऱ्यावरच्या खिन्नतेने विलक्षण सुन्न होऊन तुम्ही आपल्या छोट्या गाडीतून शहराच्या परिचित भागाकडे पळत सुटाल .

- मिलिंद पदकी

..............................................प्रतिक्रिया द्या2591 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर