प्रश्नाविना उत्तर.. गांधीजींचे भोजनतंत्र.. अद्‌भूत धाडस
सोमवार , ४ डिसेंबर, २०१७ मुकेश माचकर

बोधकथा, विनोद आणि मार्मिक विचार असा दमदार, कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून..

तिबेटमध्ये एक गणिताचा शिक्षक होता.

तो दरवर्षी नव्या वर्गाला शिकवण्याची सुरुवात करण्याआधी फळ्यावर दोन आकडे काढायचा. ४ आणि २. मग मुलांना विचारायचा, उत्तर काय आहे?

उत्साही हात वर व्हायचे.

काहीजण सांगायचे, उत्तर आहे दोन… चार वजा दोन बरोबर दोन किंवा चार भागिले दोन बरोबर दोन.

शिक्षक नकार द्यायचा.

काही मुलं म्हणायची, सहा… चार अधिक दोन बरोबर सहा.

शिक्षक पुन्हा नकार द्यायचा.

मग काही मुलं म्हणायची, आठ… चार गुणिले दोन बरोबर आठ.

शिक्षक तरीही नकार द्यायचा.

मुलं म्हणायची, हे चीटिंग आहे. दोन संख्यांच्या बाबतीत आम्ही जे शिकलो ते सगळं करून दाखवलं, तरी एकही उत्तर का बरोबर नाही?

शिक्षक म्हणायचा, मी तुम्हाला विचारलं, उत्तर काय आहे? एकानेही मला हे का विचारलं नाही की प्रश्न काय आहे? तुम्ही उत्तरं कसे देऊ लागता धडाधड?

...........................

लुई फिशर एकदा गांधीजींच्या अ-स्वाद भोजनतंत्राच्या तडाख्यात सापडला.

गांधीजींच्या आश्रमात त्यांच्याबरोबर भोजनाच्या पंक्तीला तो बसला. सगळ्यांच्या ताटात कडुनिंबाची चटणी वाढली गेली. हा पाहुणा होता म्हणून त्याच्या ताटात ती वाढली नव्हती. कडुनिंबाच्या पाल्याची ती चटणी म्हणजे कडूझार जहर. तोंडाची सगळी चव घालवणारी. तोंडाची 
चव घालवणं आणि भोजनाचा आनंद काढून घेऊन फक्त उदरभरणाच्या पातळीवर ते आणणं हेच तिचं काम होतं.

गांधीजींनी पाहिलं, पाहुण्याच्या ताटात चटणी नाही. त्यांनी ती मागवून वाढायला लावली.

लुईला वाटलं की हा काहीतरी खास पदार्थ असणार. त्याने मोठ्या कौतुकाने ती खाल्ली आणि तोंड कडूझार झालं. त्याला त्या चटणीचं प्रयोजन सांगितलं गेलं. त्याने विचार केला की ही चटणी आधी संपवून टाकूयात एकाच घासात. पाण्याने तोंड स्वच्छ करू. मग बाकीच्या भोजनाचा आस्वाद घेऊ.

त्याने चटणी जीव मुठीत धरून एका घासात गटकली आणि पाणी पिऊन जीभ ताळ्यावर आणली. आता घास घेणार तेवढ्यात गांधीजी म्हणाले, अरे, पाहुण्यांना चटणी खूप आवडलेली दिसतेय. आणखी वाढा.

...............................

'आजकाल कोणीही उठतो
आणि फेसबुकवर ज्ञान पाजळतो,'

हे वाक्य फेसबुकवरच लिहिणाऱ्या तमाम महानुभावांच्या अद्भुत आणि लोकोत्तर धाडसाला त्रिवार वंदन/मानाचा मुजरा/ शतशः सलाम!

......................प्रतिक्रिया द्या5592 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर