मोदी-शाह यांची गुजरातमध्ये 'अस्तित्वपरीक्षा'
शनिवार, २ डिसेंबर, २०१७ सचिन मोहन चोभे

देशाची सत्ता मिळवून देणाऱ्या ‘गुजरात मॉडेल’मुळे गुजरातमधील सत्ता जाते की काय, ही चिंता भाजपला सतावत आहे.  तर, स्थानिक नेतृत्व सक्षम नसल्याने येथे काँग्रेसही संभ्रमात आहे.

निवडणूक आणि क्रिकेट म्हणजे भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय. या दोन विषयांवर चर्चा करताना मग दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे व अत्यावश्यक गरजेचे विषयही मागे पडतात. आताही गुजरातमधील निवडणुकीच्या निमित्ताने याची प्रचीती येत आहे. कारण, सध्या देशभर फक्त एकच चर्चा सुरू आहे की, गुजरातमध्ये काय होणार? येथे कोणाची सत्ता येणार आणि काँग्रेसचे भवितव्य काय असणार? राहुल गांधींना कितपत यश मिळणार आणि जर, काँगेसला चांगल्या जागा मिळाल्या तर, मोदींच्या भाजपात काय होणार? कारण येथील निवडणूक काँग्रेस पक्षाऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. गुजरातमध्ये दहा दिवसांच्या राजकीय अभ्यास दौऱ्यात दिसलेले चित्र मराठी वाचकांसमोर मांडण्याचा हा प्रयत्न.

गुजरात निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. दोन टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपाने सर्व अस्त्रे परजत उडी घेतली आहे. तर, काँग्रेसनेही यंदा सत्ता मिळवायचीच असा चंग बांधून मोठी यंत्रणा कामाला लावली आहे. या दोन प्रमुख राजकीय पक्षांमधील ही लढाई गुजरातला कोणत्या वळणावर नेते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण, याच निकालावर देशातील राजकारणाचेही पुढील गणित ठरणार आहे. त्यामुळेच मोदींनी आपल्या गृहराज्यातील निवडणूक मनावर घेऊन संपूर्ण देशातील भाजपच्या अग्रणी नेत्यांसह केंद्रीय मंत्रिमंडळातील धुरीण गुजरातमध्ये आणून बसविले आहेत. नोटाबंदी आणि जीएसटी कर लागू करण्याच्या निर्णयामुळे देशातील मध्यमवर्ग भाजपापासून दुरावत आहे. तर, या दोन्ही निर्णयांनी भाजपाला हरप्रकारे मदत करणाऱ्या व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. याचे पडसाद सुरतमध्ये दिसतात. तर, शहरांतील गरीब वस्त्यांसह गुजरातच्या ग्रामीण भागात फिरताना शेती आणि शेतकरी यांच्या व्यथा ऐकून बहुचर्चित ‘गुजरात मॉडेल’चा फोलपणा उघडा पडतो. या दोन्ही ठिकाणी मोदींसह एकूणच भाजपाच्या कार्यपद्धतीवर मोठी नाराजी आहे. ‘ग्राउंड लेव्हल’वर काम करणाऱ्या संघाला याची पुरेपूर कल्पना आहे. तसेच देश आणि संघटनेपेक्षा कोणीही मोठा नसल्याचे तत्वज्ञान सांगत जगभर मुशाफिरी करणाऱ्या संघाला मोदींचे एकखांबी मोठेपणही खुपत आहे. यापूर्वी याच संघाने बिहार निवडणुकीत याचा संदेश देण्यासाठीचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आरक्षणावर वक्तव्य करून मोदींना अपशकुन घडविण्याचा पाया रचला होता. आताही गुजरातमध्ये संघाने थेट मैदानात उतरून प्रचार करण्याचे टाळले आहे. परिणामी मोदींसह भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांना आणखी धावपळ करावी लागत आहे.

जातींच्या लढाईत हिंदुत्वाची हवा गुल

२०१४ मध्ये संपूर्ण देशात ‘गुजरात मॉडेल’चा मुद्दा घेऊन ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून मोदींनी अर्थतज्ज्ञ पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडील सत्ता हस्तगत केली होती. त्यासाठी त्यांना संघासह देशा-परदेशातील उद्योजकांनी सढळ हस्ते मदत केली होती. मात्र, आता त्याच ‘मॉडेल’बद्दल या सर्व घटकांत मोठी नाराजी आहे. या ‘मॉडेल’द्वारे उभे राहिलेले गुजरातचे प्रमुख रस्ते आणि काही ठिकाणच्या चकाचक इमारती यांच्याही पुढे असणारा गुजरात आता सर्वांना समजू लागला आहे. खालावलेला मानव विकास निर्देशांक आणि शिक्षण व आरोग्य या दोन सेक्टरमधील या राज्याची पीछेहाट आता सर्वांनाच समजू लागली आहे. तर, शेतकरी आणि कष्टकरी बांधवांसह प्रशासनामधील नाराजीही समोर येत आहे. त्यातही वाढत्या बेरोजगारीने येथील तरुण भांबावला आहे. तो कोणाला मतदान करणार, यावर खर्या अर्थाने या निवडणुकीच्या विजयाचे गणित ठरणार आहे. या सर्व नाराज घटकांना गुजराती अस्मितेचा डोस सलग दोन निवडणुकांमध्ये देण्यात मोदी-शाह यांच्या भाजपाला यश आले होते. तसेच त्यावेळी भाजपाकडे हिंदुत्ववादाचे कार्डही होते. मात्र, यंदा गुजरातचे मैदान धर्माऐवजी जातीय राजकारणाकडे वळल्याने मोदींच्या पक्षाची पंचाईत झाली आहे. त्यातही गुजरामध्ये सत्तापरिवर्तन झाल्यास देशावर मोदींची असणारी पकड ढिली होणार आहे. त्यातूनच पुढे जाऊन भाजपाच्या संसदीय नेतृत्वात बदल करण्याचा मुद्दाही उचल खाऊ शकतो. त्यामुळेच ही निवडणूक मोदींची पुढील राजकीय दिशा ठरविणारी असल्याचे मत येथील बुद्धिवादी व्यक्त करीत आहेत. आणि मोदींनाही याची पुरेपूर जाणीव असल्याने तेही यंदाच्या निवडणुकीत ‘करो या मारो’ याच विचारांनी उतरले आहेत.

राहुल गांधी यांची गाडी तुलनेने सुसाट...

मागील पाच वर्षात सोशल मीडियाद्वारे काँग्रेस आणि याच पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची यथेच्छ हेटाळणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. याच यंत्रणेने देशातील विरोधी पक्ष खिळखिळा करण्याचे कंत्राट घेतले आहे. मात्र, गुजरात निवडणुकीच्या माध्यमातून यंदा प्रथमच राहुल गांधी यांनी ‘हम भी कुछ काम नाही’चा संदेश देण्यात खर्या अर्थाने यश मिळवले आहे. मागील वीसेक वर्षांपासून या राज्यात भाजपाची सत्ता आहे. केशुभाई पटेल यांनी राज्यातील ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी मोठे काम करून भाजपाचा खर्या अर्थाने विस्तार केला. त्यानंतर २००१ मध्ये नरेद्र मोदी यांनी राज्यशकट हाती घेतला. त्यांनी येथील कॉर्पोरेट्‌स मंडळींच्या सहकार्याने भौतिक विकासाचे नवे प्रारूप निर्माण केले. याच कालावधीत देशात सत्ताधारी असलेल्या कॉंग्रेसने या उद्योगी राज्यालाही रस्ते आणि ग्रामीण विकासासाठी मोठा निधी दिला. मात्र, तरीही आपल्या राज्याला केंद्रीय सत्तेमधील काँग्रेस कशा पद्धतीने दुजाभाव देत आहे आणि मोदी किंवा भाजापावरील टीका म्हणजेच गुजराती अस्मितेला धोका आहे. याबद्दल त्यांनी मोठ्या खुबीने पेरणी केली. गुजरातमधील बुद्धिवादी आणि भडोचसारख्या भागातील जनता त्यामुळेच याबद्दल बोलताना आठवण करून देते की, मुंबईवरून अहमदाबादकडे येतानाचा ‘एक्स्प्रेस रोड’ही केंद्र सरकारच्या निधीतूनच झाला आहे. काँग्रेस पक्षानेच गुजरातची अंकलेश्वर ही पहिली औद्योगिक वसाहत उभारल्याचेही गुजराती बांधवांच्या आठवणीत आहे. मात्र, आपणच केलेल्या कामाचे श्रेय घेण्यात देशभर हा पक्ष कमी पडला. तर, गुजरात राज्यात या पक्षामधील प्रमुख नेत्यांमधील बेबनाव भाजपाच्या एकहाती नेतृवाला फुलण्यासाठीचे मोकळे रान उपलब्ध करून देत होता. मात्र, हेच सगळे ओळखून यंदा उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्थानिक नेत्यांऐवजी दिल्लीवरून स्वतंत्र यंत्रणा गुजरातमध्ये आणली आहे. तसेच शेजारच्या राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतूनही काँग्रेस पक्षाशी विचाराने पक्के असलेल्या नेत्यांना पाचारण केले आहे. परिणामी या निवडणुकीद्वारे राहुल गांधी यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यात यश मिळवले आहे.

काँग्रेसपुढे भाजपाची दमछाक...

काँग्रेस पक्षाने यंदा हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी व अल्पेश ठाकूर या तीन नेत्यांना एकत्र घेऊन बेरजेचे राजकारण केले आहे. एकूण गुजरातमधील जातीय गणित लक्षात घेता या निवडणुकीतही सर्वाधिक ३७ टक्के असलेल्या ओबीसींना महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, यांच्यातील जाती व पोटजातींचे मतदान कोण कसा फिरवतोय, याला महत्त्व आहे. ठाकूर समाज ओबीसींपैकीच एक आहे. तसेच लोकासंख्येच्या १६ टक्के असणाऱ्या पटेल समाजाचा नेता म्हणून तेवीस वर्षीय हार्दिकला राहुल गांधी यांनी महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. हार्दिकच्या कथित ‘सीडी’ प्रकरणाचे बुमरँग उलटल्याने आता त्याला घेरण्यासाठी पटेल समाजात फूट पडण्यावर भर दिला जात आहे. तर, या राज्यात दलितांची लोकसंख्या फक्त सहा टक्केच असल्याने भाजपाने त्यांना सत्तेच्या केंद्रस्थानी न ठेवल्याचा मुद्दा लक्षात घेऊन जिग्नेश मेवानी यास काँग्रेस पक्षाने साथीला घेतले आहे. तसेच गुजरातमधील शैक्षणिक दूरवस्था आणि बेरोजगारी या दोन मुद्दयांना प्रचारात अग्रक्रम देऊन तरुणांना आपलेसे करून घेण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे. एकूण मतदानाच्या टक्केवारीत १८ ते ३५ वयोगटातील युवकांचे स्थान २२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यातील १५ टक्के मतदान मिळवणारा राज्यात सत्ता मिळवू शकतो असा राजकीय अभ्यासकांचा विचार आहे. एकूणच राहुल, हार्दिक, अल्पेश व जिग्नेश या चार तरुणांच्या काँग्रेस आघाडीच्या बेरजेच्या गणिताने भाजपाची दमछाक झाली आहे. त्यामुळेच केंद्रीय मंत्रिमंडळातील धुरिणांसह आता संघाच्या विविध शाखांनाही आपलेसे करून घेण्यावर पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी भर दिला आहे.

काँग्रेसकडे कमतरता स्थानिक चेहऱ्याची

गुजरात राज्यात मोदी म्हणजेच भाजपा असे चित्र आहे. त्यामुळेच सतत २२ वर्षे सत्तेत असूनही मोदींचा पर्यायी चेहरा भाजपामध्ये तयार होऊ शकलेला नाही. त्यामुळेच ‘गुजरात मॉडेल’चा चेहरा अजूनही मोदीच आहेत. मागील काही वर्षांत ज्या पद्धतीने भाजपात मोदींना पर्याय उभा राहू शकला नाही. तसाच विरोधी काँग्रेसमध्येही तसा आशादायक चेहरा या राज्यात उभा राहू शकलेला नाही. (येथील बुद्धीवाद्यांसह सामान्य जनतेच्या म्हणण्यानुसार तसा चेहरा उभा राहू न देण्याची विशेष काळजीही येथे घेतली गेली आहे.) याचीच समस्या आता काँग्रेस पक्षालाही भेडसावत आहे. कारण, मोदींचे गृहराज्य असल्याने भाजपा त्यांनाच चेहरा समजून निवडणुकीत आक्रमकपणे उतरला आहे. तर, स्थानिक नेतृत्वाआभावी काँग्रेस थोडी पिछाडीवर आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल गुजराती जनता आशेने बोलते. मात्र, प्रचार संपला की, पुन्हा आम्हाला नेता कोण असणार, असाही प्रश्न त्यांना पडत आहे. काँग्रेस पक्षाच्या येथील स्थानिक नेतृत्वावर विश्वास नसल्याचाच फटका येथे खऱ्या अर्थाने राहुल गांधी यांना बसत आहे. ‘नवसर्जन’ अर्थात ‘नवीन पहाट’ होण्याच्या अपेक्षेने लाखो गुजराती बांधव काँग्रेसकडे पाहतात. मात्र, तशा पद्धतीचा चेहरा दिसत नसल्याने काठावरील बहुमताने का होईना पुन्हा एकदा येथे भाजपाचेच राज्य येण्याची शक्यता येथील बुद्धीजीवी व्यक्त करतात. असे असतानाही एकूण मतदारांमध्ये सुमारे ३८ टक्के असणाऱ्या तरुण आणि शेतकरी यांच्या मतदानावर येथील विजयाचे गणित फिरण्याचाही अंदाज अभ्यासक व्यक्त करतात. हीच काय ती काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

‘गुजरात मॉडेल’भोवती चर्चा आणून देशाची सत्ता मिळविल्यानंतर आता याच ‘मॉडेल’मुळे राज्यातील हाताची सत्ता जाते की काय, असेच चित्र भाजपासाठी आहे. तर, स्थानिक नेतृत्व सक्षम नसल्याने येथे काँग्रेस काहीअंशी संभ्रमात आहे. मात्र, या निवडणुकीच्या माध्यमातून देशभरातील कॉंग्रेस पक्षात नवचैतन्य आले आहे, हे नक्की. या राज्यात सध्या असलेल्या एकूण जागांत किमान १५ जागांची वाढ झाल्यासही संपूर्ण देश राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मान्य करील. आता तरी या विरोधी पक्षासाठी असेच आशादायक चित्र असल्याने, या निवडणुकीच्या निकालाचा खरा परिणाम मोदींसह अमित शाह यांच्यासाठीच महत्त्वाचा ठरणार आहे.
 प्रतिक्रिया द्या5690 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर