फेबुगिरी
शनिवार, २ डिसेंबर, २०१७ टीम बिगुल

ताज्या घडामोडींबाबत किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल नेटवर्किंगसाइट्सवर व्यक्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातल्या काही निवडक पोस्ट्स खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी:

वेगवेगळी राज्ये निर्माण करण्यासाठी न थकता किंवा वेळप्रसंग पाहून कमी-जास्त प्रभावी वातावरण निर्माण करणे, ते जर अपेक्षेप्रमाणे होत नसेल तर खरे-खोटे विषय निर्माण करून त्याला भावनिक खतपाणी घालणे, त्यावेळी आपल्यावर मोठे राज्य असल्याने भयंकर अन्याय होतो आहे, याची खरी-खोटी बोंब ठोकणे आणि त्या सर्वांवर एकमेव, खात्रीशीर व भरवशाचा उपाय म्हणजे फक्त वेगवेगळी, छोटीछोटी राज्ये निर्माण करणे हाच होय!

हे म्हणजे आपल्या घरातील कर्तेपण जाणीवपूर्वक नालायक, संधीसाधू आणि पक्षपाती व्यक्तीला द्यायचे, तो घरातील सदस्यांशी पक्षपाताने वागला की त्यांवर उपाय म्हणजे त्याला बदलून टाकणेपर्यंतचा मार्ग, शोधण्याऐवजी घरातील सदस्यांनाच दुसऱ्याच्या स्वाधीन करायचे किंवा वेगळे व्हायला सांगायचे, असे झाले आहे! 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'कृण्वन्तो विश्वमार्यंम्' हे मानणाऱ्यांना हे पटणे शक्य नाही. या विचारांची कर्तृत्ववान माणसे ज्यांना दिसत नसतील तर अशी जबाबदारी देतांना आणि निवडतांना आपली दृष्टी स्वच्छ ठेवा, भरपूर माणसे दिसतील. अगदी अशी आणि हीच दृष्टी ठेवली तर, सध्या असलेली हीच माणसे पण व्यवस्थीत वागतील, अगदी 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'कृण्वन्तो विश्वमार्यंम्' हेच डोळ्यांसमोर ठेवून!

स्वतंत्र विदर्भ हवा, आता स्वतंत्र मराठवाडा हवा, मग स्वतंत्र उत्तर महाराष्ट्र किंवा कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र का नको ?

- माधव भोकरीकर

................................................

नोटबंदी आणि GST नंतर आता तिसरा दरोडा टाकायची सरकारची जी योजना आहे त्यात आपण अक्षरशः भिकेला लागणार आहोत.

FINANCIAL RESOLUTION & DEPOSIT INSURANCE BILL, 2017 (FRDI), या नव्या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच संमत केला. तो आता संसदीय समितीकडे जाईल आणि नंतर कायदा म्हणून संसदेत मंजूर करून घेतला जाईल. तो कायदा झाला की, बँकेतल्या तुमच्या पैशांवरचा तुमचा हक्क संपला, असं विधान, अतिशयोक्ती वाटली तरी करायला हरकत नसावी.

कर्जबुडव्यांमुळे तोट्यात जात असलेल्या बँकांना जिवंत ठेवण्यासाठी आजपर्यंत सरकार भांडवल उपलब्ध करून देत होतं. ज्याला BAIL OUT म्हणतात. नव्या कायद्यात BAIL IN अशी तरतूद आहे. याचा अर्थ असा की, आपल्यासारख्या खातेदारांचा पैसा, बँक कुठल्याही क्षणी "जप्त" करू शकते. किंवा तो 5% व्याजाने जबरदस्ती फिक्स डिपॉझिटमधे पाच वर्षांसाठी ठेवू शकते. मधल्या काळात तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी अथवा कुणाच्या आजारपणासाठी तो लागला तरीही मिळणार नाही.

वास्तविक, बँक कोणाला किती कर्ज देते, त्याची वसुली वेळेवर करते की नाही, पुरेसं तारण घेते की नाही, ती का डबघाईला आली, यावर आपलं कहीही नियंत्रण नसतं. किंबहुना, आपल्याला कर्ज देताना आपलं घर, गाडी, जमीन, स्वतःकडे तारण ठेवणारी बँक, आपले पैसे तिच्याकडे ठेवताना, आपल्याला काहीच तारण देत नसते. विश्वास, हे एकच तारण आपल्याकडे असतं. तोच आता सरकार उखडून टाकायला निघालं आहे. म्हणजे मल्ल्या आणि अंबानीने कर्ज बुडवून बॅंकेचं वाटोळं करायचं आणि तुम्हीआम्ही ती कर्ज फेडायची असाच त्याचा अर्थ झाला.

THE HINDU या प्रतिष्ठित वृत्तपत्रात, दिल्ली विद्यापीठाच्या व्यापारशास्त्राच्या प्राध्यापिका मीरा नांगिया यांनी एक लेख लिहिला आहे. काही पाश्चात्य देशात ही पद्धत असली तरी भारतात ती आणणं हे आर्थिक अराजकाला निमंत्रण ठरेल. कारण भारतात 66% बचत ही बॅंकांमध्ये होते. कर्जवसुलीचे कायदे अधिक कडक करण्याऐवजी, सरकार निरपराध मध्यमवर्गाला फाशी देत आहे. सायप्रस या देशात हा प्रयोग झाला तेव्हा मध्यमवर्गाची 47% बचत बुडाली होती.

वेळेवर जागे व्हा!

- व्हॉट्सअॅपवरून

................................................

सगळेच भय्याभूषण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भय्याभूषण पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा मनसेच्या नेत्यांनी व्यक्त केली. त्यातच आता काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयावर हल्लाही करण्यात आला. हे सगळेच प्रकरण राजकारणाकडे वळले आहे. कुणालाही फेरीवाला, लोकांचे प्रश्न यात काडीमात्र रस नाही, हेच यातून स्पष्ट होते. असो. पण मुख्यमंत्रीच कशाला आपण सगळेच भय्याभूषण आहोत. भय्यांशिवाय आपले पानही हलत नाही. दूध, भाजी, इस्त्री, भेळ पाणीपुरी या सगळ्यासाठी आपल्याला भय्याच लागतो. त्यांच्याकडून वस्तू न घेऊन सांगतो कुणाला? मुख्यमंत्री कुठल्यातरी कार्यक्रमात म्हणाले की, उत्तर भारतीयांचे मुंबईच्या जडणघडणीत योगदान आहे. त्यावरून हा सारा प्रकार सुरू झाला आहे. पण मुख्यमंत्री म्हणाले त्यात चूक तरी काय? भय्या जाऊदे, इतरही अनेक लोक मुंबईत राहतात त्यांचेही योगदान आहेच. आता योगदान म्हणजे काही केलेला त्यागच असला पाहिजे असे काही नाही तर तेदेखील मुंबईच्या आतापर्यंतच्या वाटचालीत सहभागी झालेले आहेत इतकेच. ते नाकारता कसे येईल? आज अनेक व्यवसाय हे उत्तर भारतीयांच्या हाती आहेत. ते त्यांनी हिसकावून घेतले नाहीत. पण मराठी माणसांनी ते केले नाहीत. मग तो पाणीपुरीवाला असो की पानवाला, मच्छीवाला असो की दूधवाला, धोबी असो की इस्त्रीवाला आणि सिक्युरिटी असो की कामगार. हे सगळे व्यवसाय मराठी माणसे का करत नाहीत? त्यांना कुणी रोखले आहे? जे मराठी माणसांसाठी लढण्याची भाषा करतात त्यातील किती जणांनी मराठी माणसासाठी त्याग केला? वडापावच्या पलीकडे आपल्या या नेत्यांनी कधी विचार केला नाही. शिववडापावच्या गाड्या ठिकठिकाणी उभ्या राहिल्या, पण अनेकांनी त्या भय्यांकडे सोपवून दिवसाचे, महिन्याचे भाडे किंवा त्यातील हिस्सा घेतला. चूक कुणाची? मराठी माणसाला मुंबईत घर घेणे अशक्य आहे. कुणा मराठी नेत्याची हिम्मत आहे का मुंबईत मराठी माणसानेच घर घेतले पाहिजे म्हणण्याची? मराठी माणसे मुंबईबाहेर गेली. सगळे चिडीचूप. यातील अनेक नेते राजकारणापलीकडे जाऊन बिल्डर बनले. फक्त मराठी माणसाला घरे मिळतील असे धोरण त्यांनी राबवल्याचे कुठे दिसले नाही. आपापल्या नेत्यांच्या स्मारकासाठी फुकट जागा मागितल्या पण मराठी माणसासाठी ते जागा मागू शकत नाहीत. हे आपले मराठी नेतृत्व. एक कुठला तरी चौक उत्तर भारतीयाच्या नावे उभारला जातो आणि तिथे मुख्यमंत्री उद्‌घाटनाला जातात. आज बाहेरची माणसे येऊन इथे स्थिरावतात आणि त्यांचे चौकही उभे राहतात. मग यात दोष असेल तर कुणाचा? दक्षिणेकडच्या राज्यात असे फार कमी होते. ते का? उत्तर भारतीयांना हाकलण्यापेक्षा आधी आपल्या माणसांना तर उभे करा! आपली माणसे बाईकवरून तोऱ्यात फिरतात, भगवे झेंडे घेऊन मराठी असल्याचा अभिमान बाळगतात, मराठी माणसाचे प्रश्न दाखवून सतत फक्त राजकारण करणाऱ्या पक्षांसाठी केसेस अंगावर घेतात आणि आठवड्याअखेरीस 'बसतात'. दोष आपल्यातही आहे तो आपण कधी ओळखणार आहोत?

- महेश विचारे

................................................

छोट्या छोट्या कहाण्यांमध्ये छोटे छोटे ट्विस्ट

१. बागेत फिरून आल्यावर घरी येताना नेहमीचा उडपी बंद आहे म्हणून दुकानातून इडली-डोशाचे पीठ आणि रेडीमेड चटणी घेऊन घरी जावे आणि मस्त पेपर वाचत इडली-चटणी किंवा डोसा खाण्याचा बेत रचावा.
.
.
आणि बायकोने सांगावे की कालचा बराच भात शिल्लक आहे.

२. खूप वर्षांनी अचानक फेसबुकवर किंवा अन्यत्र बालमैत्रीण भेटावी, आज देखील ती पूर्वीइतकीच सुंदर असावी, तिला घरी येण्याचे आमंत्रण द्यावे, ती येणार त्यादिवशी घर नीट आवरून ठेवावे, स्वतः वेळेवर दाढी-आंघोळ करून स्वच्छ टीशर्ट वगैरे परिधान करावा. 
.
.
तिने घरी आल्यावर आणि बायकोशी ओळख करून दिल्यावर बायकोला वहिनी म्हणून संबोधावे.

 

३. कॉलेजात असताना खूप आवडलेली (आणि न पटलेली) मैत्रीण बायकोला ठाऊक असावी. तिचा सध्याचा पत्ता ठाऊक नसावा. नेहमीच्या चेकअपसाठी हॉस्पिटलच्या ओपीडीत गेल्यावर अचानक तिची गाठ पडावी. 
.
.
तिचे पांढरे विरळ केस, गलेलठ्ठ बांधा आणि पोटाला हार्नियाचा पट्टा बघितल्यावर बायकोने आपल्याकडे चोरून टाकलेला खवचट कटाक्ष निमूट झेलावा.

वपु वगैरेंच्या शैलीत अशा तीन कथा लिहिता आल्या आणि शुभ्र रेशमी झब्बा परिधान करून स्टेजवर स्टाईलमध्ये सांगता आल्या तर किती प्रसिद्धी, टाळ्या आणि मानधन मिळेल, नाही?

- विजय तरवडे

................................................

"मनी" आठवते का "कोसला" मधली? अंगाला देवीचे फोड आल्याने तडफडणारी आणि त्या शरीराच्या प्रत्येक भागावर आलेल्या फोडामुळे कोणत्याच अंगावर झोपू न शकणारी? तिच्या वेदना दुसरा कुणी समजू शकेल काय?

पण आपली स्वत:ची मुलगी अशी अंथरुणावर तडफडत आहे आणि आपण तिला जवळसुद्धा घेऊ शकत नाही, ही जी भावना आहे, ह्या मजबुरीतले तिच्या आईचे दु:ख? तिच्या भावाचे म्हणजे पांडुरंग सांगवीकरचे दु:ख, तिच्या बापाचे तोंडावर न दिसणारे पण त्याच्या मनातले दु:ख?

मानवाच्या मानवतेला मारण्याची ताकद फक्त विषाणू मध्ये आहे. मग तो विषाणू देवीचा असो, प्लेगचा असो, एड्सचा असो किंवा इबोलाचा असो किंवा माणसाला माणसातून उठवणारा कोणताही विषाणू असो.

मानवाच्या दोन लाख वर्षाच्या इतिहासाचा अभ्यास केला तर मानव वंश अजून पृथ्वीवर टिकून आहे याचे आश्चर्य करावे तेवढे थोडेच आहे. लाखो प्राण्याच्या प्रजाती येऊन नष्ट झाल्या, पण मानव जात ह्या भयंकर विषाणू आणि जीवाणूंच्या ताब्यातून अजून आपले स्थान टिकवून आहे, हि मानव जातीची कमालच म्हणायची. किंवा आजपर्यंत मानवाची पृथ्वीवरील लोकसंख्या काबूत ठेवण्याचे काम ह्या विषाणूमुळे झाले आणि पृथ्वी वरील जिवांचा समतोल राहिला असा सकारात्मक अर्थ पण आपण घेऊन शकतो.

आधुनिक विज्ञानाच्या मदतीने मानवाचे ह्या विषाणू आणि जीवाणू वर विजय मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण पुढील शंभर वर्षाच्या भविष्यात तर तो विजय दिसून येत नाही. परंतु काही विषाणू उदाहरणार्थ प्लेग, देवी यांच्यावर मानवाने विजय मिळवला आहे आणि पृथ्वीची लोकसंख्या भरमसाठ वाढू लागली आहे. १९९५ च्या काळात एड्स हा रोग एखाद्या साथीच्या आजाराचे रूप घेतो की काय अशी शंका जगातले सगळे शास्त्रज्ञ आणि सामजशास्त्रज्ञ घेत असताना ह्या रोगावर बऱ्या पैकी नव्हे तर चांगल्या पैकी कंट्रोल करण्यात मानव जातीला यश आले आहे. नाहीतर विकसनशील राष्ट्रातील तीन चातुर्तांश लोकसंख्या दहा वर्षात या रोगाला बळी पडेल असा अंदाज होता.

ही लढाई तर जिंकली. पण पिक्चर अभी बाकी है दोस्त.

पृथ्वीवरील माणसांची लोकसंख्या १०० कोटी व्हायला दोन लाख वर्ष लागली आणि नंतरच्या फक्त १०० वर्षात ती दोनशे कोटी झाली, आणि नंतरच्या पन्नास वर्षात तो चारशे कोटी झाली. म्हणजे १९७० साली पृथ्वीची लोकसंख्या ४०० कोटी होती आणि आज ती जवळ जवळ आठशे कोटी आहे. याच वेगाने जर पृथ्वीची लोकसंख्या वाढत राहिली तर अजून पन्नास वर्षात पृथ्वीवर माणसाला राहायला नाही तर आळ्या सारखं वळवळायला सुद्धा जागा पुरणार नाही.

आणि मग पुन्हा लढाई चालू होईल, निसर्ग विरुद्ध मानव यांची. निसर्गाकडे समतोल साधण्यासाठी असणारी हत्यारे म्हणजे जीवाणू जीवाणू आणि विषाणू. आपल्या किम अण्णांनी आणि ट्रम्प तात्यांनी जर निसर्गाला संधी दिली तर निसर्ग काम करेल पण तो खूप वाईट रीतीने आपले काम करतो.

त्यापेक्षा किम अण्णांनी आणि ट्रम्प तात्यांनी मनावर घेतलं तर बर होईल.

- विकास गोडगे

................................................

इकडे तिकडे कितीही जिंकून उड्या मारा, गुजरातमध्ये हरलात तर चुल्लूभर पाणी घेऊन त्यात उड्या माराव्या लागतील. कितीही उसनं अवसान आणलं तरी तिकडे हातभर फाटलीये, हे दिसतंच आहे...

- सुनील अकेरकर

................................................

गावात नगरपालिकेची निवडणूक लागल्या..
पहिलीच निवडणूक असलेने धम्माल मजा चालूय.
आमच्या जिल्ह्यात निवडणुका म्हणजे लय धम्माल असते..
कुणाला निवडून आणायचं हे नंतर ठरतं.
पण कुणाला पाडायचेय हे पहिला ठरतं.. 
प्रत्येकाची वेगवेगळी उद्दिष्टे असतात. कुणाला मागील वजावटा काढायचा असतो..
कुणाला खुप जुना म्हणजे अगदी मागील पिढीतील पण कुठलातरी बदला घ्यायचा असतो.
गाव तसं व्यावसायिक असलेने जास्त कुणी गुंतत नाही अशा निवडणुकीत. पण मजा असते...
जवळचे दोन मित्र उमेदवार असलेने त्यांना पण वेळ द्यावा लागतोय..
आणि मी फेसबुक फक्त आणि फक्त पॉपकॉर्नसाठी वापरतो..
आणि त्याच पॉपकॉर्नचा साठा आता अमर्याद मिळालाय गावातच.
त्यामुळे निवडणूक होईपर्यंत फेसबुक लॉगआऊट करतोय..
जै हिंद..
मला पॉपकॉर्नचा भरपूर स्टॉक मिळाला.
#मी_लाभार्थी

#_व्हय_हे_माझं_सरकार

- सर्जेराव जाधव

................................................

हिंदूसंघटन हा शब्द मोठा घोटाळ्याचा आहे, कारण त्यांचे भिन्न दोन अर्थ होतात आणि ते आलटून पालटून सोयीस्कर रितीने वापरले जातात. हिंदू संघटन ह्या शब्दाचा एक अर्थ स्वतःला हिंदू म्हणविणाऱ्या जनतेचे संघटन असा होतो आणि दुसरा अर्थ हिंदू धर्माच्या अभिमानाच्या सूत्रात सर्व हिंदू म्हणविणाऱ्यांचे संघटन असा होतो. याबाबत काही ठळक बाबी आपण लक्षात घेणे महत्वाचे आहे. तार्किक चर्चेच्या पद्धतीने आणि बुद्धिवाद लढवून तुम्ही समजता तसा हिंदू धर्म नाही, हे पटवून देण्याचा उद्योग समाज परिवर्तनात एका मर्यादेपलीकडे उपयोगी ठरण्याचा संभव नाही. हिंदू समाज कसा आहे, याचे ज्ञान हिंदू प्रजेला धर्मग्रंथांच्या अभ्यासातून झालेले नाही. ते ज्ञान प्रत्यक्ष जीवनातून व जीवन जगताना झालेले असते. जीवनात आलेल्या या अनुभवांच्या विरुद्ध पोथ्यांचे हवाले फार उपयोगी ठरत नसतात.

सर्व हिंदू प्रजा एकसंध करायची असेल तर त्यासाठी दोन अटी आहेत. मागचा इतिहास हा सर्वसामान्य जनतेच्या गुलामगिरीचा इतिहास असल्यामुळे त्या समाजरचनेचा अभिमान तिच्याविषयीची गौरवबुद्धी व या समाजरचनेचे समर्थन करणा-याविषयी असणारी गौरवबुद्धी याचा त्याग करूनच हे कार्य करता येईल. आपल्याला गुलाम करणाऱ्या, त्या गुलामगिरीचे समर्थन करणा-या व्यवस्थेविषयी जनतेला प्रेम वाटावे, ही अपेक्षा चुकीची आहे.... प्राचीन समाजरचनेच्या गौरवबुद्धीचा म्हणजे हिंदू या नावाचा त्याग ही हिंदू प्रजेच्या संघटनेची पहिली अट आहे. दुसरी अट वर्तमानकाळात विषमता दूर करण्याचे आणि मागासलेल्याना पुढे आणण्यासाठी घ्यावयाचे जे कार्यक्रम त्यांचे उत्साहाने स्वागत करण्याची व मनापासून त्यांची अंमलबजावणी करण्याची आहे. या दोन अटी ह्या देशात फक्त सेक्युलर पक्षच पार पाडू शकतात. त्यामुळे तेच हिंदू प्रजा संघटित करू शकतात.

हिंदू धर्माच्या अभिमानाच्या सूत्रात हिंदूना संघटित करण्याचा उद्योग हा फारसा यशस्वी होण्याचा संभव नाही. स्वतःची गुलामगिरी रास्त आणि समर्थनीय मानणारे आधुनिक मन तयार करणे अशक्य असल्यामुळे हिंदू धर्माच्या सूत्रात धर्माचा अभिमान ठेवून फक्त वरिष्ठ वर्ग एकत्र आणता येतो. उरलेला हिंदू समाज तेथे संघटित करण्याचे स्वप्न साकार होणे कठीण आहे.

- नरहर कुरुंदकर ('वाटा तुझ्या-माझ्या')

.....................................

इंग्रजी बोलना 
आए या ना आए
बोलना चाहिए

फिसमध्ये एकाला इंग्रजी बोलायची फार हौस.. दे दनादन इंग्रजी फेकायचा.. आमची फुकट करमणूक व्हायची अनेकदा..
एकदा १२वी झालेली मेव्हणी पुढे शिकत नाही म्हणते.. खूप सांगतोय पण ऐकतच नाही.. I am trying to conceive her but she is not conceiving only हे तो मोठ्या तळमळीने सांगत होता आणि इकडे आम्ही हसून वारलो...

- उल्का राऊत

................................................

भावा - भावात पटत नाही 
जावा - जावात पटत नाही 
बहिणी - बहिणीत पटत नाही 
बाप - लेकात पटत नाही 
नवरा - बायकोचं पटत नाही 
शेताच्या एक-दीड इंच तुकड्यावरून हाणामाऱ्या होतात, प्रॉपर्टीच्या हिश्शावरून मुडदे पाडले जातात
घरातलेच वाद निस्तरता येत नाहीत


पण पार दुरवर कुठंतरी जातभाईवर अन्याय झाला की गांडीतले किडे त्या अद्न्यात, अनोळखी व्यक्तीसाठी वळवळू लागतात

निसर्ग नियमानुसार जन्म झालाय मग यात जाती धर्माचं योगदान ते कोणतं? 
जन्माला आलात धर्म चिकटला

बरं आजवर काय काय केलंत धर्मासाठी 
जबरदस्तीने वर्गण्या गोळा करून जयंत्या-मयंत्या साजऱ्या करायच्या फक्त

खिशात नाही आना अन् मला सावकार म्हणा 
आधी स्वत:च्या समस्या निस्तरा मग काय ती माजसेवा सॉरी समाजसेवेकडे वळा

झालं वाचून निघा आता

- गजानन खरात

................................................

मंगेश पाडगावकरांचं एक वाक्य लक्षात राहिलेलंय 
"आमटीचा भुरका मारल्यावर होणारा भुरकार हा मला ओंकाराइतकाच पवित्र वाटतो"..
साध्या सोप्या गोष्टीत छोटे छोटे आनंद वेचणारी माणसं ही. आपण ही तसेच थोडेबहुत. अर्थात त्यांच्या इतकं शब्दात अचूक पकडता येत नाही.
त्यांच्याच स्टाइलमध्ये सांगायचं तर, दिवसअखेरी काम संपवून, लेदर जॅकेट चढवून बुलेट सुरू केली म्हणजे तिचा तो थरथरता थ्रोटल मला मंदिरातल्या घंटानादा सारखा भासतो. हँडलवर हात ठेवल्यावर पूजेनंतरची आरती घेतल्यासारखं होतं आणि पहिला गियर टाकून निघालो की जीव अगदी तल्लीन होऊन जातो.
हाही एक प्रकारचा परमेश्वर.
आणि हेही एक प्रकारच अध्यात्मच....

- बिपीन कुलकर्णी

................................................

अमित शहांनी मनमोहनसिंहांचा उल्लेख 'नमुना' असा केलाय. मनमोहनसिंगाच्या पदव्या मला माहीत आहेत. अमित शहा कितवीपर्यंत शिकलेले आहेत? कोणाला माहीत असेल तर कृपया सांगा. फक्त उत्सुकता म्हणून विचारतोय.

अर्थात असंस्कॄतपणानं बोलायचं असेल तर शिक्षणाची गरज नसतेच.

- विश्वंभर चौधरी

................................................प्रतिक्रिया द्या1751 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
अरविंद तुलालवार - रविवार, ३ डिसेंबर, २०१७
महाराष्ट्राच्या राजधानीतच ,इथली मराठी माणस महान नाहीत ,तर ते विदर्भ आणि मराठवाडा च्या विकासात अडथळा कसा काय आणतात? नागरिकांमध्ये धर्म,जात,लिंग, प्रांत, भाषा ह्यांवरून फूट पाडणे म्हणजेच राजकारण? महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक नेतृत्व किती परिपक्वता दाखवतात, त्यावर पुढचे ध्रुवीकरण अवलम्बुन आहे. नाहीतर महाराष्ट्राचा तेलेंगाना आणि आंध्र प्रदेश करणार असे दिसते .

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर