त्यांना गुरूचं स्थान कोणी दिलं? जनतेनंच ना?
शनिवार, २ सप्टेंबर, २०१७ निळू दामले

गुरमीत, आसाराम, रामपाल यांचं फावतं, कारण मनानं हरलेला समाज त्यांना शरण जातो. या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी विचारशक्ती आणि तर्क वापरणारा समाज तयार व्हायला हवा.

गुरमीत राम रहीम याला बलात्काराच्या आरोपावरून वीस वर्षाची सजा कोर्टानं सुनावलीय. गुरमीतचा आश्रम, आश्रमातले अनैतिक, बेकायदेशीर व्यवहार इत्यादी गोष्टी आता साऱ्या जगाला माहीत झाल्या आहेत. गुरमीत विकृत होता. मनोरोगी होता. गुरमीतनं एक स्वतंत्र देशच चालवला होता आणि भारत नावाच्या देशातले कायदे गुरमीतच्या डेरादेशाला लागू नव्हते याची माहितीही बाहेर येतेय. गुरमीतचं साम्राज्य उभं राहिलं ते राजकीय आश्रयामुळं हेही आता पुरेसं स्पष्ट झालंय.

दुसरे एक भीषण आसाराम बापू सध्या तुरुंगाची हवा खाताहेत. टँकरनं लोकांवर रंग शिंपडणारे, गर्भार स्त्रीला डोहाळे येतात तेव्हां तिला मुकुट, कमरपट्टा, मनगटपट्टा वगैरे घालून झोपाळ्यावर बसवतात, तसेच झोपाळ्यावर झुलणारे हे आसाराम बापू. त्यांच्यावरही बलात्काराचे आरोप आहेत, खुनाचे आरोप आहेत.

संत रामपालही सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावर खून आणि बलात्काराचे आरोप आहेत.

असे अनंत विकृत अध्यात्मिक धार्मिक पुरुष देशभर पसरलेले आहेत. गुरमीतला मिळालेल्या प्रसिद्धीमुळं या महाराज सत्पुरुष परमात्म्यांबद्दलचे तपशील जगाला माहीत झाले.

गुरमीत यांच्यापेक्षा वेगळी  गुन्हेगार वर्तणुक श्रीश्रीरवीशंकरनी केली आहे. त्यांनी यमुनेच्या काठावर एक मोठ्ठाच्या मोठ्ठा कार्यक्रम घडवला. यमुनेच्या पात्राची वाट लावली, भरून न येणारं नुकसान केलं. न्यायालयानं रोखलं असतानाही न्यायालयाला धाब्यावर बसवून श्रीश्रीनी प्रचंड बांधकामं पात्रात केली. समाजाचं धार्मिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक बळ पर्यावरणापेक्षा जास्त  महत्वाचं आहे असं ठासून सांगत त्यांनी कायदे पायाखाली तुडवले. कोर्टानं सांगितलेला दंडही भरायला हा माणूस तयार नाही.

गुरमीत ते श्रीश्री अशा विविध छटांच्या गुन्हेगार माणसांना राजकीय आश्रय आहे.सर्व राजकीय पक्षांनी त्यांना आश्रय दिला आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, सेनापती, उद्योगपती इत्यादी मंडळी या गुन्हेगारांची भक्त आहेत. या सर्व मंडळींच्या पाठिंब्यामुळं आणि मदतीमुळंच वरील गुन्हेगारांची साम्राज्यं उभी राहिली आहेत. या गुन्हेगारांच्या प्रभावामुळं राजकीय पक्षांना मतं मिळत असतात.

गुन्हेगार नसलेलेही अनेक गुरू भारतभर आहेत. सद्‌गुरू पै, नानासाहेब धर्माधिकारी, पांडुरंगशास्त्री आठवले हे सज्जन, अध्यात्मिक धार्मिक लोक होऊन गेले,पण त्यांचे वारस अजूनही आहेत. अनिरुद्ध बापूंची मोजदाद वरील माणसांमधे करता येईल. ही काही प्रसिद्ध नावं. गावोगावी प्रचलीत असलेले पण तेवढा गवगवा नसलेले अनंत महाराज, सत्पुरुष महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. या सर्वांचे आश्रम असतात, मठ असतात, भेटण्याच्या जागा असतात, कार्यक्रम असतात. यातल्या अनेकांचं काम पिढीजात चालतं, सद्गुरुंचा मुलगा, धर्माधिकारींचा मुलगा, पांडुरंगशास्त्रींची मुलगी अशा रीतीनं पिढ्यानपिढ्या हे काम चालतं. याला कोणी व्यवसाय म्हटलेलं त्यांच्या अनुयायांना आवडणार नाही पण एकूण व्यवहार व्यवसाय या सदरात मोडावा अशा प्रकारचा असतो.

गुरमीत आणि वरील सज्जन माणसं यात फरक आहे. वरील सज्जन माणसांनी अनेक समाजोपयोगी कामं केली आहेत. वरील लोकांनी राजकारणाची वाट घेतलेली नाही, राजकीय पक्षांना त्यांचा थेट वापर करता आलेला नाही. वरील सज्जन माणसांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही माणसं प्रवचनकार आहेत, ते  प्रवचनातून लोकांना  चांगलं वागायला शिकवतात. चांगलं म्हणजे काय तर साधारणपणे संत वगैरे सांगतात ते किंवा गीतेत सांगितलंय ते. कुटुंबात रहा, आपापली कामं सचोटीनं करा, परोपकार करा असं ही माणसं सांगत असतात. कोणत्याही बेकायदेशीर, अनैतिक वर्तनाचं समर्थन ही माणसं करत नाहीत, तसं वागणं बरोबर नाही असंच सांगतात.

अशा प्रकारच्या सज्जन प्रवचनकार अध्यात्मिक पुरुषांमधे काहीनी  एकेक जात पकडून ठेवली आहे. कोणी उघडपणे कबूल करत नाही पण विशिष्ट जातींचे पाठिराखे त्यांनी गोळा करून ठेवले आहेत. वरवर ही माणसं जातीपाती नष्ट करा, जाती पाळू नका असं सांगतात पण वागतात मात्र नेमकं वेगळं. बोलणं एक आणि वागणूक दुसरीच ही भारतीय परंपरा हे अद्यात्मिक पुरुष पाळत असतात.

गुरमीत ते सज्जन ते गावोगावचे महाराज यांमधे एक समान सूत्र आहे. ही सर्व मंडळी धर्म, संस्कृती, अद्यात्माची भाषा करतात आणि त्यासाठीच त्यांना करोडो अनुयायी लाभतात. या मंडळींचे उत्सव होतात, सत्संग होतात, निरनिराळी धार्मिक सामूहिक कृत्यं होतात आणि त्यात करोडो माणसं वर्षातून अनेक वेळा सामील होत असतात. गंमत म्हणजे ही अनुयायी माणसं स्वतंत्रपणे देवळात जात असतात, सतत आणि वेगळी निमित्त साधून. नवी गाडी घेतली की देवळात, लग्न झालं की देवळात, मूल झालं की देवळात, बढती मिळाली की देवळात, आजार दूर झाल्यावर देवळात. लग्न होत नसेल, बढती होत नसेल, भ्रष्टाचाराचं बालंट आलं असेल तरीही ही मंडळी सुटका मागण्यासाठी देवळात जातात.  शिवाय गणेशोत्सव असतो, नवरात्र असतं, इतरही जत्रोत्सव असतात.

वरील सर्व गोष्टी शेकडो वर्षं, दिवसरात्र, बारोमास चालू असतात. यातून माणसांना चांगलं वागा असा संदेश दिला जात असतो. प्रश्न असा पडतो की इतकी शतकं दिवसरात्र चांगलं वागा असा संदेश कां द्यावा लागतो? गीता आहे, गीतेवर अनेकांनी केलेली भाष्यं आहेत, शेकडो संत आहेत आणि त्यांनी केलेल्या रचना आहेत, अनंत देव आहेत आणि त्यांची स्तोत्रं आणि आरत्या आहेत. हे सारं कायम कानावर पडत असताना पुन्हा पुन्हा महाराज, बुवा, प्रवचनकार, बाबा यांच्याकडं कां जावं लागतं?

अध्यात्म आणि धर्मवाल्यांचं म्हणणं असतं की लोकं असहाय्य झाल्यामुळं देवाधर्माकडं वळतात.

देशात गरिबी आहे, विषमता आहे, शेतीची अवस्था वाईट आहे, उद्योगात बेकारी आहे, पर्यावरणाचा सत्यानाश झाला आहे, अनारोग्य पसरलं आहे. हे सारं दूर करण्यासाठी सरकार, शाळा-कॉलेजं, इस्पितळं, न्यायालयं इत्यादींची सोय आहे. परंतू त्या साऱ्या गोष्टी निरुपयोगी ठरलेल्या आहेत. सगळा देशच भ्रष्टाचारानं आणि बिनकामाच्या शॉर्टकटनं भरलेला आहे अशा परिस्थितीत लोकांनी कोणाकडं पहावं असा प्रश्न अद्यात्मवाले विचारतात.

त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल हलक्या आवाजात मोदी, ठाकरे, पवार, पनीरसेल्वम, लालू यांची नावं घेतात. वरवर उल्लेख  गणपती, शंकर, ब्रह्मदेव, सरस्वती, ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी असे करतात पण प्रत्यक्षात वरील नावांशी विपरीत वर्णन करणाऱ्यांची पाठराखण करतात, त्यांच्या मदतीवर आपापली कामं चालवतात. सगळीच नसली तरी बरीचशी मंडळी हा उद्योग करत असतात.

धर्म किंवा ही संत महाराज इत्यादी माणसं जे जे करा म्हणून सांगतात ते अगदी साधं आणि उघड आहे. भारतीय राज्यघटना आणि कायद्यात ते सारं सांगितलेलं आहे. हुंडा घेतला तर शिक्षा होते. लुटालूट केली, खोटे चेक दिले, कबूल केलेले पैसे दिले नाहीत, रस्त्यावर घाण केली, संगीत वाजवून व इतर वाटांनी शेजाऱ्याला त्रास दिला, प्रदूषण केलं, अत्याचार केला, बलात्कार केला, खोटं बोललं, केलेले करार पाळले नाहीत, नेमून दिलेलं काम केलं नाही या साऱ्या गोष्टींना शिक्षा होते. मग वरील गोष्टी सांगण्यासाठी अध्यात्मिक गुरु माणसाला कां लागतो?

आपल्या देशातली माणसं मनानं कमकुवत आहेत काय? त्यांचा नैतिक पाया कच्चा आहे काय? हज्जारो वर्षांच्या धर्मांच्या व सत्पुरुषांच्या संदेशांच्या माऱ्यानंतरही सतत त्याला चांगलं वाग चांगलं वाग म्हणून सांगावं लागतं इतका हा समाज मानसिक अशक्त आहे? कायद्यानंही सांगितलं असताना त्याच्या डोक्यात चांगलं वागणं शिरत नाही याचा अर्थ त्यांना कायदाही समजत नाही असा घ्यायचा काय? माणसानं तयार केलेली राज्यघटना ती देवानं सांगितलेली नाही म्हणून लोकांना अमान्य आहे काय?  धर्म ही गोष्ट हज्जारो वर्षं सांगूनही लोकांना स्पष्ट होत नाही, धर्माचा अर्थ सांगण्यासाठी दर हजार माणसांसाठी एक गुरुबिरू लागतो याचा अर्थ धर्मातच बराच घोळ किंवा संदिग्धता आहे काय?

शंभर, पाचशे, हजार, दहा हजार, पन्नास हजार वर्षांपूर्वी  काही देव नावाच्या कोणी तरी सांगितली. देव नावाचा फार पॉवरफुल गृहस्थ ती तत्त्व न पाळणाऱ्यांना शिक्षा करतो असं सांगितलं गेलं.  ती तत्त्वं पाळली तर पॉवरफुल देव लोकांना  नाना प्रकारे बक्षिसं आणि सुख देतो असं सांगितलं गेलं. हे सारं कित्येक हजार वर्षं माणूस ऐकत आला आहे. काळ बदलत गेला तरी तो पॉवरफुल देव शिल्लकच दिसतो. स्त्रीला पाळी आली असताना ती अशुद्ध असते असं सांगणारा देव आता स्त्रीला पाळी येणं यात अशुद्धता नाही हे सिद्ध झालं तरी शिल्लक आहे. समाजाला कोण घातक आहे ते सांगून त्यांचा नायनाट करायच्या आज्ञा देव देत असे. देव सांगत असे की तुमच्या यज्ञात विघ्न आणणाऱ्यांना मारून टाका. आता असं कोणालाही कधीही मारून टाकता येत नाही. कोणतंही कृत्य करतांना कायद्याची चौकट पाळावी लागते, धर्माची आज्ञा नव्हे. कोणाला तुरुंगात घालायचं असेल, कोणाची इस्टेट जप्त करायची असेल, कोणाला दंड करायचा असेल तर  योग्य कायदेशीर  प्रक्रिया करावी लागते. असं असलं तरी लोकांना शिक्षा करायला देव शिल्लक आहे.

खरं म्हणजे माणसाच्या जगण्यातल्या बहुतेक सर्व गोष्टींचा विचार आता कायद्यानं केला आहे. राज्यघटना सार्वभौम झाली आहे. कायदा आणि राज्यघटना यात परिस्थितीनुसार बदलही केले जातात.  माणसाच्या जगण्याचा सार्वजनिक भाग आता कायद्याच्या कक्षेत येतो.

अशा परिस्थितीत देव, धर्म आणि त्याचे अर्थ सांगणाऱ्या लोकांना समाजात कोणत्या प्रकारचं स्थान आहे? एक लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारली आहे.  देशाची अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था कशी असायला हवी हेही या व्यवस्थेत माणसं ठरवतात. अन्याय झाला, त्रुटी शिल्लक असल्या तर त्याही दूर करण्याची संस्थात्मक व्यवस्था समाजात सिद्ध झाली आहे.असं असताना  बाबा, गुरु, महाराज, प्रवचनकारांची आवश्यकता काय?

आज घडीला देव, धर्म आणि अध्यात्माचं श्रेत्र अतिशय निरुंद आणि मर्यादित झालेलं आहे.  जगण्यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरेशी स्पष्टता आली आहे. तरीही कित्येक बाबतीत विज्ञान, कायदा अपुरा पडतो.  जगातल्या सर्व गोष्टींवर विज्ञानात उत्तरं नाहीत. विज्ञान माहिती देतं पण जितकी माहिती देतं तितकं अजून किती तरी अज्ञान शिल्लक आहे हेही स्पष्ट करतं. माणसाचं आणि समूहाचं वर्तन कित्येक वेळा इतकं बुचकळ्यात पाडतं की विज्ञान, कायदा इत्यादीमधे उत्तरं सापडत नाहीत. नीतीमत्तेनं आणि सचोटीनं वागूनही आपल्यावर अन्याय का होतो याचं उत्तर माणसाला सापडत नाही. अशा स्थितीत माणूस असहाय्य होतो, सैरभैर होतो. तराफा शोधण्याचा प्रयत्न करतो. या संदिग्ध अवस्थेत, पोकळीत देवानं स्थान मिळवलं, टिकवलं आहे.

गेल्या दोनेकशे वर्षात विज्ञान, तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया, वस्तू, बाजार या घटकांनी समाजाचं नियंत्रण करायला सुरवात केली. धर्म आणि देव यांचा समाजाचं नियंत्रण करण्याचा एकाधिकार वरील गोष्टींनी हिरावून घेतलाय. धर्म आणि देवाचं स्थान खूपच नियंत्रित झालंय. देवाधर्मामधे त्यातून एक असुरक्षितता निर्माण झालीय. आपलं स्थान, आपलं महत्व, पुन्हा प्रस्थापित करण्याची धडपड देवधर्म बुवा महाराज प्रवचक इत्यादींच्या वाटेनं करतोय.

समाजाचं नियंत्रण म्हणजे नेमकं काय, कोणकोण नियंत्रक आहेत इत्यादींची जाणीव शिक्षण, माध्यमं, कला, ज्ञान निर्मिती या क्षेत्रामधून होत असते. ही क्षेत्रं माणसाच्या जाणीवा अधिक प्रगल्भ करतात,  माणसाला अधिक जबाबदार आणि जगण्याला लायक बनवतात. या प्रक्रियेत लोकनियुक्त सरकार आणि राज्यघटना हे दोन महत्वाचे घटक आणि टप्पे आहेत. नियंत्रणाचा हा खटाटोप भारतीय माणसानं अजूनही समजून घेतलेला नाही.

समाजातला दुराचार आणि दुःख यावर देव, व्रतं-विधी-उत्सव हे उपाय नाहीत, त्या गोष्टी म्हणजे डोकं दुखताना लावायचा बाम आहे हे लोकांच्या अजून लक्षात आलेलं नाही. गरिबी, विषमता, अनारोग्य, अस्थिरता हे दोष दूर करण्यात  लोकशाही व्यवस्था अपुरी  पडत आहे हे खरं. पण उपासना हा उपाय नाही, आपल्या समाज बांधणाऱ्या संस्था अधिक मजबूत करणं, त्या अधिक निर्दोष करणं, त्या प्रभावी करणं हाच उपाय आहे. भले तो उपाय दीर्घ काळ घेणारा आणि कष्टाचा असेल.

गुरमीत तुरुंगात गेला. तुरुंगात पडलेल्या आसारामलाही उद्या भरपूर शिक्षा होईल. रामपालवरचे गुन्हेही सिद्ध होतील. चार दिवसांनी सारं काही पूर्वीसारखंच सुरु होईल. भ्रष्ट आणि अकार्यक्षम भाजपच्या जागी भ्रष्ट आणि अकार्यक्षम काँग्रेस किंवा जनता दल किंवा शिव सेना किंवा अद्रमुक राज्यावर येईल. टीबी, मलेरियाचे बळी वाढतच रहातील. विषमता शिल्लक राहील, बहुसंख्य माणसं दुःखात रहातील. बंडल विद्यापीठाच्या साच्यातून बंडल विद्यार्थी  बाहेर येत रहातील. माणसं अधिक असहाय्य आणि हताश होतील.

कमकुवत, मनानं हरलेला आणि शरण गेलेला, उपकारशरण समाजच गुरमीत इत्यादी अध्यात्मिक-धर्मपुरुषांना जन्मला घालतोय.

भावना आटोक्यात ठेवून बुद्धी आणि विचारशक्ती आणि तर्काचा जास्त वापर करणारा समाज तयार होणं आवश्यक आहे.

(लेखकाचे याआधीचे लेख http://www.niludamle.com या ब्लॉगवर वाचता येतील.)प्रतिक्रिया द्या1133 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
dilip - सोमवार , ८ जानेवारी , २०१८
ऊत्तम लेख पण पुर्वग्रहदुषित!! युरोप अमैरीकेतील कुंटुबव्यवस्था आणि भारतातील आज मोडकळीस आलेली का होईना पण धर्माच्या आधारावर निर्माणहोवुन टिकलेली कुंटुबव्यवस्था अभ्यासा म्हणजे धर्माचे महत्व कळेल आधुनिक युरोपमध्येही व्हॅटीकनसिटी आणि पोप आहेतच!! ईस्लामिक देशात एक धर्म एक देव एकच कुराण पण हिंसाग्रस्त पण तरीही धर्माचे अनूयायी मक्कामदीनेला जमा होताततच! भारतीयांनी मात्र अस काही केले की मग मात्र कायदा असताना धर्माची आवश्यकताच का? असा प्रश्न विचारला जातो? कायद्यातील आणि धर्मातील एक फरक अजून बुध्दीवाद्यांच्या लक्षात येत नाही धर्म माणसाला "गुन्हा " करुच नये अशी शिकवण देतो तर कायदा गुन्हा करुनही निर्दोष कस सुटायच याची शिकवण देतो! भारतातील लाखो खेड्यात कोट्यावधी भारतीय कुठल्याही हिंसेशिवाय चोरीमारीशिवाय गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात जिथे ट्राफीक पोलीस कधीच नसतात हा समूजुतदारपणा धर्माने निर्माण केलाय! आता प्रतीकांचा बुरखा घालुन फसवणारे आहेत म्हणून धर्म फेकुन दिला तर संसद न्यायालय पोलीसस्टेशन कायदा ईथे जी ऊघडऊघड लुट लुच्चेगिरी चालते ते पाहून कायदा अन व्यवस्था खरोखर आवश्यक आहे का? असा प्रश्न पडतो!
शंतनु - बुधवार, २० सप्टेंबर, २०१७
उत्तम लेख. धर्म ही सारवजनिक मनातली एक सोयीची कल्पना आहे. राष्ट्र, चलन, कंपनी ह्या देखिल अशाच काही कल्पना. लोकशक्ती लोकमत एकाच दिशेनी वळवण हे ही यान साधत. इतिहासात भव्य राजवाडे , कालवे पिरॅमिड अझटेक पिरॅमिड हे यामुळेच निर्माण झाले. अर्थात आता धर्माची गरज नाही हे स्पषट आहे.
Rohini Deshmukh - शनिवार, २ सप्टेंबर, २०१७
अप्रतिम लेख. पण यात आपण प. पू. पांडुरंगशास्त्री आठवलें चा जो उल्लेख केलाय तो अभ्यासपूर्ण नाही. कारण त्यांनी स्वयंशिस्त असलेला फार मोठा समाज निर्माण केलाय.

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर