हिंमत असेल तर गोरखपूरबद्दल बोल, अभिसार शर्मा!
शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७ अभिसार शर्मा

वंदे मातरमवरील चर्चेमध्ये गोरखपूरमधल्या मुलांच्या मृत्यूचा विषय का काढताय, असा प्रश्न विचारून एका चॅनलच्या अँकरने प्राधान्यक्रम स्पष्ट केलेत. हे सगळं थांबवायचा दम आहे आपल्यात?

तुझ्यात हिंमत आहे का अभिसार शर्मा? तू तर राष्ट्रवादीसुद्धा नाहीस पण तुझ्या बिरादरीच्या एका नकली राष्ट्रवाद्यानं काल प्राइम टाइम टीव्हीवर डरकाळी फोडत म्हटलं होतं, आणि लक्षात ठेवा,

 'आम्ही वंदे मातरमवर चर्चा करतोय आणि तुम्ही विनाकारण गोरखपूरमध्ये मरण पावलेल्या साठ मुलांचा विषय काढताय…'

या चॅनलच्या अँकरनं स्पष्ट केलं होतं की त्याचे प्राधान्यक्रम काय आहेत. तो आतासुद्धा विरोधकांना आरोपीच्या पिंज-यात उभा करेल. तो आताही सीमेवर रोज मरणा-या सैनिकांकडं दुर्लक्ष करेल आणि त्यासाठी उदारमतवादी, जेएनयूचे विद्यार्थी आणि डाव्यांना आरोपीच्या पिंज-यात उभा करेल. तो आतासुद्धा शेतक-यांच्या दुर्दशेकडं डोळेझाक करेल आणि तो गोरक्षकांच्या आतंकावर गप्प राहून आपल्या नपुंसकतेचं दर्शन घडवेल. पण तू?

तू, अभिसार शर्मा, आहे दम तुझ्यात?

आहे का दम योगी सरकारला हे विचारण्याचा की, नऊ ऑगस्टला मुख्यमंत्री बीआरडी हॉस्पिटलला जाऊनसुद्धा तिथंच साठ मुलांचे बळी का गेले? मुलांचे मृत्यू ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यामुळं झाल्याचं गोरखपूरच्या जिल्हाधिका-यांनी ऑन रेकॉर्ड मान्य करूनसुद्धा योगी सरकार का म्हणतंय की, असं काही झालेलं नाही? खोटारडेपणा का? लपवाछपवी का?

पुष्प गॅस कंपनीच्या प्रतिनिधीनं हे सांगितलंय की आम्ही फेब्रुवारी २०१७पासून बीआरडी हॉस्पिटलला ६८ लाखांचं थकित बिल भरण्याचं आवाहन करीत होतो, परंतु त्यांनी काही केलं नाही. मग योगी सरकार असं का म्हणतंय की मुलांचे मृत्यू ऑक्सिजन पुरवठा बंद केल्यामुळं झालेले नाहीत? या लाजिरवाण्या खोटारडेपणासाठी योगी सरकारला आरोपीच्या पिंज-यात उभं करण्याची हिंमत तुझ्यात आहे का अभिसार शर्मा? इतर बिगर भाजप राज्यांप्रमाणं इथंसुद्धा मोहीम चालवणार की ३० तासांत गप्प होऊन जाणार?

काही वेळासाठी कल्पना करा की, जर ही घटना एखाद्या भाजपचं सरकार नसलेल्या राज्यात घडली असती तर ही नकली आणि राष्ट्रवादी चॅनल्स गप्प राहिली असती?

कारण यांचा आक्रोशसुद्धा संधिसाधू आहे. आता तर बिहारमधून जंगलराज नष्ट झालंय. नीतिश कुमार लालूप्रसाद यादवांच्या कडेवरून भाजपच्या पदराखाली गेले आहेत. सगळी पापं धुवून गेली. आता कुणाची बिशाद आहे बिहारसाठी जंगलराज शब्द वापरण्याची? ही गोष्ट वेगळी की बिहारमध्येही आता गोरक्षकांनी आपल्या लीला दाखवणं सुरू केलंय आणि सुशासनबाबूंनीही आपण गोरक्षण करणार असल्याची घोषणा केलीय.

ही गोष्ट वेगळी की आरजेडी नेत्याच्या हत्येला जंगलराजच्या श्रेणीमध्ये समाविष्ट नाही केलं जाणार. हिंमत आणि धैर्य गोळा करून ठेव अभिसार. कारण आपल्या मुलांवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस, गोरखपूरच्या अपराधामुळं शोकसंतप्त होईल. जो माणूस म्हणू शकतो की आम्ही वंदे मातरमची चर्चा करतोय आणि तुम्ही गोरखपूरच्या मृत मुलांबद्दल बोलताय, तो रानटी पशूच असू शकतो. माणूस नाही. अपेक्षा बाळगू शकतो की तू माणूसकी आणि रानटीपणा यातला फरक समजून घेशील अभिसार शर्मा. अपेक्षा आहे, मुलांबद्दलची तुझी वेदना यावर अवलंबून नसेल की राज्यात कुणाचं सरकार आहे. मी अपेक्षा बाळगतो की, तू गोरखपूरच्या हॉस्पिटलमध्ये मुलांच्या आरोग्याशी जो खेळ चाललाय त्याविरुद्ध तू मोहीम चालवशील.

आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, देशाचे प्रधानसेवक आणि राष्ट्रऋषींनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ख-याखु-या मुद्दयांवर बोलावं यासाठी दबाव निर्माण करशील अशीही अपेक्षा आहे. शेतकरी, दलित, सामाजिक न्याय, मुसलमानांमध्ये असुरक्षिततेची भावना आणि आरोग्याशी संबंधित संकटांवर ते बोलतील. रोज घरी येणा-या सैनिकांच्या पार्थिव देहांबद्दल बोलतील. नोटबंदीमुळं शेवटी काय साध्य झालं हे समजून घेण्यासाठीही दबाव निर्माण करशील. जीएसटीमुळं व्यापा-यांमध्ये एवढा गोंधळ का आहे? अस्थिरतेची भावना का आहे?

अपेक्षा करतो की, मोदीजी गोरखपूरमध्ये पसरलेल्या मृत्यूच्या भीषण शांततेबद्दल बोलतील आणि अभिसार शर्मा, मला अपेक्षा आहे की तू त्यांच्यावर त्यासाठी दबाव निर्माण करशील.

कारण काँग्रेस सत्तेत असताना तू हेच केलं होतंस. तेव्हा तू आणि तुझ्या बिरादरीतले अनेक पत्रकार अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाला होता. तेव्हा कुणी तुला देशद्रोही म्हटलं नव्हतं. तेव्हाही पंतप्रधान कार्यालयातून फोन आले होते पण तुझ्या कुटुंबाला कुणी टार्गेट केलं नव्हतं.

यावेळी असं होतंय. पण अपेक्षा आहे की तू विचलित होणार नाहीस. कठीण आहे. पण गोरखपूरमध्ये मरण पावलेल्या मुलांच्या आई-वडिलांइतकं अवघडही नाही. त्यांचा विचार कर, अभिसार शर्मा. तुझी वेदना, तुझा त्रास शून्य आहे त्यांच्यासमोर… एक मोठ्ठं शून्य. आणि हेच शून्य त्या आई-वडिलांचं वास्तव आहे, ज्यांना आयुष्यभर आपल्या मुलांशिवाय जगावं लागणार आहे.

रात्रभर अस्वस्थ होतो. याआधी पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी शाळेत घुसून नरसंहार केला होता, तेव्हा अशी अस्वस्थता, बेचैनी अनुभवली होती. पण गोरखपूरची साठ मुलं तर आपली आहेत, हो ना? का त्यांनाही यासाठी विसरून जावं आपण की इथं एक राष्ट्रवादी सरकार आहे. इथं रामराज्य आलं आहे.

(फेसबुक लाइव्हवरून साभार. लेखक एबीपी न्यूजचे पत्रकार आहेत आणि लेखातील मते त्यांची व्यक्तिगत आहेत.)प्रतिक्रिया द्या2547 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Pravin Mahajan - सोमवार , १४ ऑगस्ट, २०१७
केवळ गोरखपूर च्या बालमृत्यू चा प्रश्न महत्वाचा वाटतो म्हणून कोणत्याही मुद्द्यावरच्या चर्चेत तो आलाच पाहिजे हा कुठला पोरकट हट्ट? ते ही केवळ नावडत्या वाहिणीवरच्या नावडत्या व्यक्तीचा उल्लेख एकेरी आणि गल्ली मधल्या दादाच्या भाषेत करून वागळे कोणत्या बिगुलाची पिपाणी वाजवायचा प्रयत्न करताय? उद्या गोरखपूर वरच्या चर्चेत जर कुणी वंदे मातरम बद्दल बोलायला लागला तर ते मान्य होईल? किमान सज्जन पंडितांच्या चर्चेत किंवा वादविवादात हे मान्य होणार नाही. उद्या असाच सवाल उलटा केला तर... मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ऐशी तैशी होते म्हणून परत शंख करायला बिगुलबुवा मोकळा!

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर