एसटीत दिवाकर रावतेंची एकाधिकारशाही
शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७ जयप्रकाश छाजेड

अत्यंत तुटपुजे वेतनामुळे मेटाकुटीस आलेल्या एसटी कर्मचा-यांनी आत्महत्येसारखे टोक गाठूनही त्याकडे कुणाचे लक्ष नाही. त्यात परिवहनमंत्री रावते यांच्या हस्तक्षेपामुळे अधिकारी त्रस्त आहेत.

देशातल्या अन्य राज्यातल्या परिवहन सेवेतल्या आणि राज्यातल्या अन्य महामंडळांच्या तुलनेत राज्यातल्या एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांना अत्यंत कमी पगार आहेत. महामंडळाने अलीकडेच मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला शेतक-यांसाठी पाच कोटींची मदत दिली. परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या या मदतीला आमचा विरोध नाही. कारण महामंडळात ९० टक्के शेतक-यांची मुले कामाला आहेत, पण महामंडळाला एसटी कर्मचा-यांचाही कळवळा यावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसची (इंटक) अपेक्षा आहे.

सातव्या वेतन आयोगासाठी आम्ही संपाची हाक देणारच आहोत, त्यासाठी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेसोबत आमची चर्चा होणार असून १७ ऑगस्टला निर्णय घेण्यात येणार आहे. संपासाठी मान्यताप्राप्त संघटनेने घेतलेल्या मतदानात ९० टक्क्यांहून आधिक कामगारांनी संपाचा कौल दिला आहे. तुटपुंज्या वेतनामुळे महामंडळातील कामगार मेटाकुटीस आला आहे. या तुटपुंज्या पगारात कर्मचारी कुटुंबांचे पोषण नीट करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे, यामुळेच राज्यातील नऊ  एसटी कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशातल्या सगळ्या राज्यातील परिवहन सेवेतील कर्मचा-यांना चांगले वेतन मिळते. केवळ महाराष्ट्रात परिवहन सेवेतील कर्मचारी हलाखीचे जीवन जगत आहेत. वेतनवाढीची वेळ आली की महामंडळ तोट्याचे कारण पुढे करते. खरे तर महामंडळाने एसटी नफ्यासाठी सुरू केलेली नाही, सुरक्षित प्रवासी वाहतूक या उद्देशाने कायदा करून सरकारने एसटी सुरू केली, असे असताना महामंडळ तोट्याचे कारण पुढे करते.

खासगीकरणाकडे वाटचाल

शिवशाही योजनेसाठी महामंडळाने १५०० गाड्या भाड्याने घेतल्या आहेत. या गाड्यांवर चालक - वाहक म्हणून ठेकेदारांची माणसे आहेत. प्रवासी मात्र महामंडळाच्या बसस्थानकातून गोळा केले जातात. याचा अर्थ महामंडळच खासगी वाहतुकीला प्रोत्साहन देते आहे. असा उफराटा कारभार सध्या महामंडळात सुरू आहे. महामंडळाने नुकत्याच चालक-वाहकांच्या परीक्षा घेतल्या. या परीक्षा घेण्याची जबाबदारी ज्या कंपनीवर सोपविली होती, त्या कंपनीकडे यंत्रणा नव्हती. त्यामुळे परिक्षेत गोंधळ निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की आली.

परिवहनमंत्रीच अध्यक्ष होण्याची पहिलीच वेळ

परिवहनमंत्री दिवाकर रावते हेच महामंडळाचे अध्यक्ष झाले असून मंत्र्याने महामंडळाचे अध्यक्ष होण्याचा प्रकार महामंडळाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच घडत आहे. परिवहनमंत्र्यांनी त्यांच्या पक्षातील कुणालाही अध्यक्षपद द्यावे, त्याबाबत आमचे काही म्हणणे नाही. परिवहन मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे अनेक आधिका-यांच्यावर  दबाव येत आहे. कर्मचा-यांच्या बदल्यांपासून ते दैनंदिन कामकाजातही अधिका-यांवर परिवहन मंत्र्यांची दहशत आहे.

(लेखक महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे अर्थात इंटकचे अध्यक्ष आहेत.)प्रतिक्रिया द्या1402 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर