निंबाळकरांच्या फलटणमध्ये रावणराज
शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७ बिगुल न्यूज नेटवर्क

विधानपरिषदेचे सभापती रामराजे-नाईक निंबाळकर यांच्या फलटण शहरात गुंडाने पोलिस ठाण्यातच वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर हल्ला केल्याच्या प्रकारामुळे शहरातील गुंडगिरी चर्चेत आली आहे. 

सातारा जिल्ह्यातील फलटण शहर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्यावर गुंड कुमार गौतम रणदिवे याने पोलीस ठाण्यातच हल्ला केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. धस यांचा शुक्रवारी, ११ ऑगस्टला वाढदिवस होता, त्याचबरोबर पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात बदली झालेली ऑर्डर त्यांच्या नुकतीच हातात पडली होती. त्यामुळे  त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. अनेकांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या होत्या. या आनंदात असतानाच त्यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या कुमार गौतम रणदिवे याने हल्ला केला आणि फलटण शहर परिसरात वाढलेले 'रावणराज' पुढे आले. एका गुंडाची मजल पोलीस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत जाते याचा अर्थ काय लावावा, असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. पोलीस ठाण्यातच झालेला हा हल्ला फलटण परिसरातील माजलेल्या गुंडशाहीची साक्ष आणखी बळकट करतो.

नेमकी काय आहे घटना?

फलटण म्हणजे सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे शहर. विधानपरिषदेचे विद्यमान सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे हे गाव. येथील पोलीस ठाण्यात प्रकाश धस वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात मलठण येथील महात्मा फुले चौक परिसर येतो. पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, या चौकात अमोल डोंबाळे यांचा वडापावचा गाडा आहे. येथे संशयित कुमार रणदिवे याने वडापाव खाल्ला. त्याचे पैसे मागितले म्हणून चिडलेल्या रणदिवेने डोंबाळे याच्यावर चाकूहल्ला केला आणि अंगावर कढईतील गरम तेल ओतण्याचा प्रयत्न केला. खंडणीही मागितली. त्यामुळे डोंबाळे यांनी फलटण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक धस यांनी दोन पोलिसांना पाठवून रणदिवेला पकडून आणले. डोंबाळे याचवेळी पोलीस ठाण्यात आल्याचे पाहून रणदिवेने शिवीगाळ सुरू केली. धस त्यांच्या कक्षातच बसले होते. त्यांच्या कक्षात रणदिवेला आणल्यानंतर पोलिसांना धक्काबुक्की झाली. यावेळी धस पुढे आले असता रणदिवेने अचानक त्यांच्यावरच हल्ला केला. त्यांच्या तोंडावर जोरात ठोसे मारल्याने ते खाली पाडले. त्यांचे तीन ते चार दात पडले. दरम्यान हा गोंधळ बाहेर समजल्यानंतर पोलीस कर्मचारी आत आले. धस बेशुद्ध पडले होते. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

झुंडशाहीने फलटणकर त्रस्त

फलटणमध्ये गुंडशाही, झुंडशाही वाढत आहे. दिवसेंदिवस येथील सामाजिक वातावरण दूषित, गढूळ होत चालले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची तर वाट लागली आहे. यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे. काही वाळू ठेकेदार, अनधिकृत खासगी सावकारांची दहशत, लहान मोठ्या गुंडांच्या टोळ्या, काही सटर-फटर सामाजिक संघटनांचा आधार घेत तर कधी माहिती अधिकाराचा आधार घेत अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याची सुरू झालेली परंपरा आणि त्यातून स्वतःची आर्थिक उन्नती तसेच जोडीला कोणत्या तरी राजकीय नेत्यांचा आधार अशी एक साखळी फलटण तालुक्यात तयार झाली आहे. या साखळीतील एका घटकानेच पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्यावर हल्ला केला आहे.

गुंडगिरीला राजकीय आश्रय

फलटण तालुक्याच्या विविध भागात गुंडगिरी वाढली आहे. अर्थातच याला राजकीय पाठबळ आहे ही बाब कधी लपून राहिलेली नाही. कोणाला पकडून आणले अथवा कारवाई केली तर लगेच दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो. येथील गुंडशाही, झुंडशाही राजकीय आश्रयाखाली वाढत चालली आहे. ती काही कमी होण्याचे नाव घेत नाही. गुन्हेगारीतून राजकारण आणि राजकारणातून दहशत आणि त्यातून पुन्हा समाजकारण असे सूत्र अलीकडच्या काळात वाढत चालले आहे. फलटण तालुकादेखील त्याला अपवाद नाही. येथील वाळू ठेकेदारांची आणि खासगी सावकारांची दहशत तर विचारायलच नको, अशी आहे. काही वर्षांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला वाळू ठेकेदारांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. अनधिकृतपणे फोफावलेली खासगी सावकारी तर फलटण तालुक्यासाठी शाप आहे.प्रतिक्रिया द्या1424 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर