फेबुगिरी
शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७ टीम बिगुल

ताज्या घडामोडींबाबत किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्यक्त होणा-यांची संख्या मोठी आहे. यातल्या काही निवडक खास पोस्ट्स ‘बिगुल’च्या वाचकांसाठी...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. भीमराव गस्तींचं परवा निधन झालं.

'बेरड'नंतर केव्हातरी साताठ वर्षांनी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'आक्रोश'च्या निर्मितीचं काम करण्याचा योग आला होता. (साल १९९१). संबंधित लोकांनी त्यांच्याकडून आक्रोश लिहून घेण्यासाठी पुण्यातील एका नामांकित शाळेच्या अतिथिगृहात त्यांची राहण्याची सोय केली होती. जवळपास दोनेक महिने ते तिथे राहिले होते. पुस्तकनिर्मितीच्या निमित्ताने गस्तींना भेटण्याचा दोनचारदा योग आला होता. त्यावेळी त्यांच्या बोलण्या-वागण्यातून त्यांच्यावर संघाच्या विचारांचा पगडा असल्याचं जाणवायचं. त्याच लोकांच्या गराड्यात ते वावरायचे. त्या काळात त्यांना समकालीन असणार्‍या, शोषितांमधल्या आणि शोषितांसाठी काम करणार्‍या-लिहिणार्‍या बहुतेकांचं स्कूल वेगळं होतं. त्यांना आपापल्या परीनं मानसन्मान मिळत गेले. पण डॉ. गस्तींच्या कार्याचं, त्यांच्या लिखाणाचं यथोचित मूल्यमापन झालं नाही. एखाद्या गटात वावरल्याने माणसाच्या सिद्धी-प्रसिद्धीवर कसे चांगले-वाईट परिणाम होतात, याचं मूर्तिमंत उदाहरण डॉ. भीमराव गस्ती होते.

त्यांचं कार्य खूप मोठं आहे. संघाशी जवळीक म्हणून त्यांना न स्वीकारणं ही इतर गटांनी पाळलेली अस्पृश्यताच म्हणावी लागेल.

- मृदुला देशपांडे

..............

ज्या प्रकारे सरकारला आधारमॅनिया झाला आहे, प्रत्येक गोष्टी आधार सक्तीचे करत आहे, लवकरच सुलभ शौचालात जाण्यासाठीही आधार कार्ड दाखवावे लागेल.

- उदय कुलकर्णी

...............

आजच्या मराठी दैनिकातील पहिल्या पानावरील गृहप्रकल्पाची जाहिरात

'पुर्णत्वा पलीकडचे जीवन'

म्हणजे काय रे भाऊ ???

- विकास परांजपे

..............

'टॉयलेट' (एक प्रेमकथा) (बघाय)ला सकाळी जावं, की कधी?

- अभिजीत पेंढारकर

..............

गुरमेहर कौर (उद्विग्नतेमुळे): युद्ध हा पर्याय नाही...(देशद्रोही ठरली)
सुषमा स्वराज (भीतीमुळे): युद्ध हा पर्याय नाही. (देशभक्त आहेच)

- शंतनु पांडे

..............

पांढर्‍या डागांवर उपचार आणि टकलावर केस उगवायच्या फ्रॉड जाहिराती बहुतांशी मुगलसराय ह्याच भागातून यायच्या. ह्याशिवाय पेपरातले सोपे कोडे सोडविल्यानंतर 'टू इन वन', कॅमेरा आणि रंगीत टीव्ही जिंकल्याच्या व्हीपी स्कॅमचेही मूळ ठिकाण मुगलसरायच आहे. एखादे सोपे कोडे पेपरमध्ये किंवा मग छापील आंतर्देशीय कार्डावर छापून तुम्हाला पाठविले जायचे. साधारण चौथी पास मुलाला ते सोडविता यायचे आणि कुतूहुल म्हणून ते पोरगं ते कार्ड पोस्टात टाकायचं. मग महिन्याभराने त्याने टिव्ही किंवा ट्रान्सिस्टर किंवा कॅमेरा जिंकला आहे अशा आशयाचे पत्र त्याला यायचे. त्यात बक्षीस क्लेम करण्यासाठी त्याकाळचे शंभर वा एकशेपस्तीस रुपयांची व्हीपी पाठवा असे सांगितलेले असायचे. व्हीपी आल्यानंतर आणखी काही पैसे भरून ती वस्तू तुम्हाला मिळणार असायची. व्हीपीची प्राथमिक मनीऑर्डर पाठवून लोक स्वप्न पहात बसायची, बर्‍याच लोकांना हा फ्रॉड असल्याबद्दल इतर लोक सांगायचे त्यामुळे लोक व्हीपी शक्यतो सोडवून घेत नसत. ह्याने स्कॅम करणार्‍यांना फायनल पैसे मिळत नसले तरी शेकडो लोकांच्या व्हीपीच्या मनीऑर्डरमुळे अगोदरच बरेच पैसे जमा झालेले असायचे. एखादा फारच आशावादी माणूस व्हीपीदेखील सोडवून घ्यायचा. बॉक्समध्ये मूळ वस्तू सोडून गवत, दगड, रद्दी किंवा अशा काहीही गोष्टी असायच्या. अपेक्षाभंग झालेले लोक शक्यतो आपण फसविले गेलो आहोत ही माहिती खाजगी ठेवायचे, पण पोस्टमनला माहिती असायचे आपल्या बीटमध्ये किती अकलेचे कांदे रहातात ते. काही वाईट लोक खाजगीत अनुभव घेतल्यानंतर ह्या प्रकाराबद्दल जनजागृती करण्याऐवजी हे खरेच असते आणि वस्तू खरेच मिळते अशा अफवा पसरवायचे. काही लोक सामायिकपणे कोडे सोडवून सामायिकपणे बक्षिसाच्या आशेत वाट पहात रहायचे अशीही उदाहरणे आहेत.

आपल्या देशात 'अच्छे दिन'ची प्रारंभिक संकल्पना सर्वप्रथम मुगलसराय ह्या शहरात जन्माला आली त्यामुळे त्याचे नाव बदलण्याचा पूर्ण हक्क 'अच्छे दिन'वाल्यांना आहे.

- राहुल बनसोडे

..............

"माझी काँग्रेसच्या विचारांवर श्रद्धा आहे" असं म्हणणाऱ्या किती जणांच्या तोंडी पी व्ही नरसिंह राव यांचं नाव असतं? 
भारतीय आर्थिक स्वातंत्र्याचा महानायक.

#25years_of_8th_five_years_plan

- सौरभ गणपत्ये

..............

मिसळ हा चौदाव्या शतकापासून प्रसिद्ध असलेला खाद्यपदार्थ आहे.

पुराव्यादाखल ही ओवीच पहा ना:
"तर्री न्यून ते पुरतें.."
म्हणजे आणखी वाढ, 
मिसळीत तर्री कमी पडतेय!

- अमर पोवार

..............

पुढल्या वर्षापासून एकादशी, चतुर्थी, प्रदोष आणि श्रावणी सोमवारी शाळांमधे टिफिन आणण्यास बंदी घालणार म्हणे?

- नंदकुमार देशपांडे

..............

आज कई अख़बारों में राष्ट्रपति अंगरक्षक की भर्ती की सूचना है।
यह सेना की एक यूनिट है।
सरकार ने साफ़ कहा है कि हिंदू राजपूत, हिंदू जाट और जाट सिख ही अप्लाई कर सकते हैं।
यह परंपरा आज़ादी के समय से जारी है।
लेकिन उन अंगरक्षकों के घोड़ों की देखभाल और उनकी लीद उठाने का काम हर कोई कर सकता है। बल्कि लीद उठाने के काम में आरक्षण भी दिया गया है।–

- दिलीप मंडल

..............

मी 'दिल चाहता है ' बघून भारावलेल्या अवस्थेत बाहेर पडलो. मित्रांसमोर त्याच्या स्तुतीचे पूल बांधत असताना एकाने मला विचारले की हे बाकी सगळं ठीक आहे पण पिक्चरची स्टोरी काय आहे? आणि मी अडखळलो. मला साक्षात्कार झाला की सुरुवात , मध्य आणि शेवट या सरधोपट कथानकशैलीला 'दिल चाहता है'ने मोडीत काढले. चित्रपट 'भारी', कडक असायलाच हवा असं नाही तो 'कुल'पण असू शकतो ह्याची जाणीव पहिल्यांदाच झाली. नंतर 'दिल चाहता है' कसा तितकासा क्रांतिकारी सिनेमा नाही ह्यावर बरंच वाचनात आलं. समर नखातेंनी त्याची केलेली क्रूर चिरफाड पण ऐकली. पण दिल चाहता है त्याच्या 'ताज्या' दिग्दर्शकीय दृष्टिकोणामुळे कायम आवडता चित्रपट राहील. आज 'दिल चाहता है'च्या प्रदर्शनाला पंधरा वर्ष पूर्ण झाली. तरी पण हा सिनेमा लोकांच्या लक्षात आहे . आज ट्विटरवर ट्रेंड पण चालू आहे. फरहान अख्तर सारखा अतिशय हुशार लेखक -दिग्दर्शक अभिनय आणि 'डॉन' सारख्या रद्दड चित्रपटमालिकेत अडकून पडला आहे ही खंत मात्र जाता जात नाही. Thank you, Akash , Sid , Sameer and Yes Farhan for such a superb movie.

- अमोल उदगीरकर

..............

'ते'. . . समारोपात म्हणाले -

"असुरक्षित वाटतंय!!"

'यांनी' लगेच . .

त्यांची. . आयबहीण काढली, देशद्रोही किताब दिला, कुठे भेटलात तर तुडवू अशा धमक्या दिल्या, वर . . पाकिस्तानात जा असे सल्ले दिले .

आणि मग प्रश्न विचारला .

कसं . . असुरक्षित वाटतंय ते सांगा?

- पराग वडके

..............

आता पुण्यात परतलो. अगदी सकाळी गर्दीत चपला तुटल्या, अनवाणी मोर्चा पूर्ण केला. पाय सुजलेत, चालवेनासे झालेत. ठणकतायत, भर उन्हात डांबरीने पायाची परीक्षा पाहिली, कातडी सोलवटली आहे, झालं.

दुपारी मराठा क्रांती मोर्चाची सलग किमान १७ भाषणे ऐकली, त्यानंतर आझाद मैदानात सुरू असलेली इतर आंदोलक कार्यकर्त्यांना भेटलो, थकलो होतो, एका ठिकाणी आंदोलनकर्त्याने मला झोपायला ओसरी व बसायला खुर्ची दिली.

त्यापूर्वी अत्यन्त भंकस, मराठा मोर्चाची किळस यावी, अशी अतिशयोक्त मांडणी, तोच तोच पणा, लहान लहान मुलींच्या मार्गदर्शनाने व त्यातील टोकाच्या तीव्र विरोधाची, त्याला मिळणाऱ्या आसुरी प्रतिसादाने मोर्चाची दिशा स्पष्ट दिसली. मग सोमेगोमे, अमुक महाराज, तमुक बादशाह, फलना डॉन, ढिमका पाटील आणि असे अनेक भडँग जमले, त्यांची आवेशपूर्ण भाषणे झाली.
त्यात तद्दन खोटारडा आवेश, खोटा विश्वास, खोटी व मराठा समाजाची दिशाभूल करणारी विधाने करण्यात आली. तरुण मुलं काही चेकळली काहींनी या नेत्यांनाच जाब विचारला. जरा बरा झालो की सिरीज लिहिणार आहे, मराठा क्रांती मोर्चाची "रामलीला", ढोंग आणि एकूण बकवासगीरीवर.
मराठा क्रांती मोर्चा हा भाजप - सेना प्रणित इव्हेंट होता, असे वाटावे इतकी भीषण परिस्थिती होती. मराठा क्रांती मोर्चा हे सामान्य, गरीब घरातील मराठा मुलांसाठी आशेचे स्थान वाटले नाही. एका खूप मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे मराठा मोर्चा, असेही वाटून गेलं. नियमित सविस्तर लिहितो.
सत्य असत्यासी मन केले ग्वाही। मानियले नाही बहुमता।। 
- संत तुकाराम

- हर्षल लोहोकरे

..............

शाळेत असताना तासांची सुरुवात जनगणमनने व्हायची आणि शेवट वंदे मातरमने. वंदेमातरमसाठी कुणी फतवे काढत नव्हते आणि आम्ही ते म्हणणार नाही, अशी भूमिकाही कुणी घेत नव्हते.

शाळेत माझ्या शेजारी एक मुसलमान मुलगा बसायचा. त्याचा धर्म मला किंवा माझा धर्म त्याला कधीच आड आला नाही. मी त्याच्या डब्यातील तिखट भाजी खायचो, तो माझ्या डब्यातील कोकणस्थी गोड भाजी खायचा.

सगळेच सहजव्यवहार होते. बोलण्यातले, खाण्यातले, वागण्यातले...हे सहजव्यवहार कधी बिघडले कळत नाही.

- राजीव काळे

..............

पोष्टsssमन !
एकेकाळी हा आवाज कानावर पडला की ऐकणा-याचे कान टवकारायचे. लगभगीन घरातून ऐकणारा बाहेर यायचा. आपल एखादे कार्ड ,एखादे आंतरदेशीय पत्र अथवा पाकीट तर आलं नाही ना याची खातरजमा करायचा. त्या काळी सगळ्यात लोकप्रिय व्यक्ती बहुदा पोष्टमनच असेल यात तीळमात्र शंका नाही .
"माँ मुझे नोकरी लग गई, पुरे तीनसो रूपयेकी." 
अशी गोड बातमी आपल्या माँला सागणारा हिरो, पोष्टमनने आणलेल्या लखोट्यातूनच हिंदी सिनेमात हटकून दिसे. मराठी नाटकात दु:खद बातमी घेऊन येणारा पोष्टमन हुकमाचा एक्काच असे. तात्पर्य काय? तेव्हा असा एक ही सिनेमा अगर नाटक पोष्टमन या पात्राशिवाय बनतच नसे. 
इन्टरनेट युग अस्तित्वात येण्याअगोदर या पोष्टमनला एक वेगळा दर्जा एक वेगळाच मान होता. पंधरा पैशाचे पोष्टकार्ड ,पस्तीस पैशाचे आंतरदेशीय पत्र आणि साठ पैशाचे पोष्ट पाकीट आठवले की आता भारतीय पोष्ट खात्याचे अस्तित्व किती धोक्यात आहे ते लक्षात येते. पोष्ट ऑफिसात सदैव टिकटीक करणारी "तार"सुद्धा अलीकडे इतिहास जमा झाली . त्या काळी पोष्टमनने आणलेल पत्र पाहून आनंदी न झालेला माणूस विरळाच. 
शाळेत असताना विद्यार्थ्यांना पोष्टासंबधी इत्यंभूत माहिती ठेवावीच लागत असे. कार्ड कितीला मिळते? आंतरदेशीय पत्राचे मूल्य काय? किंवा पोष्ट पाकीट किती पैशाला मिळते असे प्रश्न परिक्षेत हमखास असत.

आता पोष्टासंबधी विद्यार्थ्यांना शिकवले जाते का? पोष्टाचा इतिहास त्यांना शिकवला जातो का? सारं सारे काही न समजण्या पलीकडचे.

सहावी- सातवीत असेन मी तेव्हा मला पोष्टखात्यातर्फे पहिलं पत्र मिळालं होतं. संपूर्ण रात्र ते पत्र छातीशी कवटाळून मी झोपलो होतो. (खरे सांगायचे म्हणजे मी जागाच होतो पहाटेपर्यंत.) त्या काळी चाळीसगाव, जळगाव येथून "जीवन प्रकाश" या नावाच्या ख्रिस्ती प्रश्नावलीचा एक लखोटा येत असे. बायबलमधील उता-यावर काही प्रश्न सोडवल्यावर बक्षीस रुपात पुस्तकं मिळत असे. आज आपण फेसबुकवर जशी फ्रेंड रिकवेस्ट करतो अगदी तशीच रिकवेस्ट तेव्हा सुध्दा असायची आणि मग नकळत आपण टपाल प्रेमी होत असू.

तेव्हा पोष्टमनच्या खांद्याला गच्च भरलेली बॅग, कुशीत भल्लेमोठ्ठे टपालाचे गाठोडे दिसायचे. या पोष्टमनदादाची वाट न पाहणारा विरळाच. चालत नाही तर सायकलच्या पायडलला हाकणारा पोष्टमन पाहीला की सारेच एकदम खुश होऊन जात. सुख-दु:खाच्या बातम्या आणणारा, नोकरी लागल्याची गोड बातमी देणारा, गावाकडची आजी गेल्याची बातमी तेराव्याला का होईना अचूक देणारा हा पोष्टमनच होता.

काळ बदलला, तारेची खडखड कायमची थांबली. कार्ड, आंतरदेशीय पत्र, पाकिटे काळाच्या ओघात नष्ट झाली. करोडोनी संपणारी कार्डे शेकड्याच्या घरात परत आली. नव्या पिढीला पोष्टमन फक्त गोष्टी पुरता मर्यादित झाला. हळुहळू टपाल सेवा बंद होण्याच्या मार्गाकडे वाटचाल करते आहे .
"चिठ्ठी आई है ..." असे गाणारा पुढे कुठले गाणे गाणार आहे? 
"ये मेरा प्रेमपत्र पढकर ...." आपल्या प्रेयसीला प्रियकर कसा बरे आळवणार आहे? 
"मामाच पत्र हरवलं, ते मला सापडलं" असे म्हणत मुलं कधी फेर धरून खेळतील का? 
"आपका खत मिला, आपका शुक्रिया" असे म्हणून प्रेयसी प्रियकराला पुन्हा कधी धन्यवाद देईल का? 
अजून धुगधुगी आहे पण मरणासन्न अवस्थेत असलेल्या या मेलेल्या पोष्टाची जिवंत कथा तुम्हाला व मला निश्चित व्यथित करणारी अशीच आहे.

- सिरील मिनेझिस

..............

ब्लू व्हेल -- ५० दिवसांत 'निकाल' लावणारा भयानक खेळ

२०१३ साली फिलिप बडीकीन या २१ वर्षांच्या रशियन मुलाने हा खेळ प्रचारात आणला. तो म्हणतो, "काळजी नका करू -- मी फक्त इथला निरुपयोगी, शून्य किंमतीचा शारीरिक कचरा घालवतोय!" मोबाईलवर डाऊनलोड करून घेऊन हा खेळ खेळायचा असतो. त्याच्या या खेळासाठी मुलांचे समूह तयार केले जातात. ही मुले कशी, कोणती निवडली जातात तर ज्यांना हे पटते की तू कुणाला नको आहेस, तुझ्यासाठी कुणाला वेळ नाहीय, या जगात तुझी काहीच योग्यता नाहीय -- मी फक्त तुझा आहे -- तुम्हा सर्वांना मी स्वर्गात नेईन! त्यासाठी हा खेळ खेळावा लागेल. यात तुम्हाला दिलेल्या गुरूच्या आज्ञेप्रमाणे रोज एक अशी कामगिरी तुम्हाला ५० दिवस पार पाडत जावे लागेल आणि शेवटची कामगिरी असेल ती, तो सांगेल तशी आत्महत्या करण्याची! मग तो तुम्हाला सर्वांना स्वर्गात घेऊन जाईल! पटतेय का ? काही मुले, मुली 'हो' म्हणतात आणि खेळ सुरू होतो! कधी रात्रभर जागे राहणे, कधी पहाटे चारला उठून तो गुरू सांगेल ते करणे, स्वतःला जखमा करून घेणे -- अशा एकाहून एक सनसनाटी कामगिऱ्या मिळत जातात -- आणि सोबत प्रेम, आपुलकी! अशा प्रत्येक कामगिरीचा फोटोपुरावा संबंधित सभासदाने त्याच्या त्या गुरूकडे पाठवावा लागतो. काही मुले मधेच गळतात -- मग, शेवटी काही निवडक मुलांचा ग्रुप उरतो जो शेवट गाठायला उत्सुक असतो !

या खेळामुळे जगात अनेक देशांत मुलांच्या आत्महत्या घडलेल्या आहेत! आता भारतातही हा खेळ पसरू पाहतोय!

मुले जन्माला घालणाऱ्यांनी त्यांच्यासाठी रोज थोडा वेळ देणे अति-महत्त्वाचे आहे. नुसतेच आपापल्या मौजमजा, पार्ट्या आणि राजकीय वितंडवाद आणि उपरोधिक टवाळ्या यांतच रममाण राहून चालणार नाही -- कारण अशाच वातावरणातली, एकटी पडलेली, कंटाळलेली मुलेच प्रामुख्याने या खेळाला बळी पडत आहेत!

मुलांचे काही प्रेम, महत्त्व वाटत असेल तर वेळीच जागे व्हावे, हे बरे!

- चं. प्र. देशपांडे

..............

समीक्षकांना कलाकृतीकडे तटस्थपणे पाहता यायला हवं. मग तो दिग्दर्शक आधी कोण होता? अभिनेत्यांनी आधी काय केलं? यावर लिहिण्यापेक्षा फक्त आणि फक्त त्या कलाकृतीबद्दल चांगलं आणि वाईट तितक्याच मनमोकळेपणाने लिहायला हवं. चांगल्या गोष्टींचा उल्लेख केवळ दोन वाक्यात आणि स्वतःच्या नकारात्मक दृष्टिकोनाचा पाढा संपूर्ण समीक्षेभर वाचण्यापेक्षा.. तो अधिकार प्रेक्षकांना द्यायला हवा. नाहीतर मग अशा समीक्षकांना प्रेक्षकांनी "कच्चा लिंबू" ठरवून सिनेमा पाहायला "काहीच प्रॉब्लेम नाही"...

- महेंद्र कदम

..............

एक खूपच छान मित्र आहे माझा, पण बिचारा हिंदुत्व, मर्हाटीबाणा वगैरे कल्पनांना बळी पडलेला आहे. तो सतत तशा पोस्ट्स मला फॉरवर्ड करत असतो.
आता हे काही नवीन टुमणे आलेय वाटते की, इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास वगळा. मग ते मुघलांनी किती अत्याचार केले, अकबराचे गोडवे, येथल्या देवळांची नासधूस वगैरे वगैरे ... आणि मराठ्यांचा पराक्रम, अटकेपार झेंडे वगैरे वगैरे नेहमीची कौतुके असा सगळा तो मसाला होता.
थोडी खुजली आलीच म्हणा, म्हणून त्याला खालील उत्तर दिले आणि म्हटले दे आता पाठवून सर्व दिशांना. काही वावगे असेल तर कळवा.

'मुळात इतिहास हा इतिहास असतो, शिकण्याचा विषय असतो. ती भूतकाळातल्या घटनांची माहिती असते. मला काय आवडते आणि पाहिजे त्याप्रमाणे ती बदलू शकत नाही कारण होऊन गेलेल्या घटना वर्तमानात बदलता येत नसतात. अभ्यास हा नेहमीच नि:पक्षपातीपणे करायचा असतो म्हणून इतिहाससुद्धा.

मी फक्त वैदिक गणितच शिकेन असे आपण का म्हणत नाही? असे जर सर्व विषयांच्याबाबतीत केले तर आपली शाळा कदाचित पाचवीतच संपेल कारण शिकण्यासारखे काही उरणार नाही, वेदांच्या पारायणांशिवाय. मग, अमेरिकेत सेटल व्हायची स्वप्ने धुळीस मिळतील.

इतिहास ऐच्छिक विषय करता येईल पण इतिहास ऐच्छिक होऊच शकणार नाही.

आम्ही मराठे का व कोणाशी लढलो हे समजून घेण्यासाठी तरी मुघल अभ्यासावेच लागतील. मुघलांचा उल्लेख काढून टाकला तर मराठे उठसुठ तलवार चालवणारे कत्तलखोर ठरतील. शिवाजी महाराज चलाख सेनानी ठरतात याचे श्रेय औरंगजेबालाच जाते कारण तो तुल्यबळ शत्रू समोर उभा होता. मुघल नसते तर मराठ्यांची तलवार गाजवण्याची (आज वाटणारी) खुमखुमी कशी पूर्ण झाली असती? मुघलांना गाळले पुस्तकांच्या पानांतून तर नुकसान मराठ्यांचेही तेवढेच होणार आहे, हे कळायला या वेड्यापीरांना महाराज सुबुद्धी देवोत.'

- संतोष शेलार

..............

आज बाजारात लोखंडी औजारे आलीत, ती तेवढी असरदार नाहीत. अगोदर जी लाकडी औजारे होती त्याला तोड न्हवती. गॉट करार आणि मुक्त अर्थव्यस्थेने ग्रामीण भागाचे चित्र बदलत गेले त्याची सुरुवात तिथे होती. साधारण ८७ला पुण्यात आमच्या गावातला मी एकटाच होतो, आज पुण्यात कोणत्याही भागात गेले तर आमच्या गावातील एकतरी माणूस भेटतोच. हे का झाले? डॉ द्वारकदास लोहिया यांनी "गावातला पैसा गावात" ही संकल्पना मांडली होती ती जर अंगिकारली असती तर तेल्याचा घाणा चालू राहिला असता, सुताराच्या आडीवर गर्दी राहिली असती, तांबोळ्याची पानाची गादी माणसांनी फुलली असती, लोहाराचा भाता फुसफूस करत जाळ ओकत असला असता. पण असे झाले नाही, घरात खाणारी तोंडे वाढत गेली आणि शेती आणि शेतीशी संबंधित ही सगळी मंडळी रोजगारासाठी शहरांकडे वळली. आमच्या गावातील सुताराची पोरं टमटम चालवतात, लोहार सुदैवाने पोस्टात चिटकलाय, मराठे पुण्यात नवीन मशीनच्या सहाय्याने प्लायवूडचे फर्निचर विकत आहेत. सांगायचे तात्पर्य जो जिकडे गेला त्यात पुढे सरकत गेला. म्हणून मोर्चा मराठा जातीचा नसून तो शेतकरी जातीचा होता हे आवर्जून सांगावेसे वाटते. इथे "मी जात सोडली" म्हणणारेच खरे जातीयवादी आहेत. इथून शहरात स्थायिक झालेल्या पोरांनी मोर्चाला थोडं ग्लॅमर आणलं पण जो आक्रोश होता तो खरा होता. आज तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करीत असाल तर प्रगती करा, तुम्हाला यशच मिळो या सदिच्छा पण शेतात जो आपला बाप/आई/भाऊ राबतोय त्यालाही थोडी मदत करा. मदतही गुंतवणूक म्हणून करा कारण आज तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात ती शाश्वत नाहीत. तंत्रज्ञानाचा विकास एवढ्या झपट्याने होत आहे की अख्खी बँक एका पानटपरीच्या खोक्यात बसेल अशी चिंता आमचा एक कॉम्रेड व्यक्त करत होता. विकास आता जवळजवळ कुंठित अवस्थेला आलेला आहे मग गरज उरते ती एकच, ती आहे भूक. अन्न तयार करणारा कारखाना अजून तरी विकसित झाला नाही आणि तशी शक्यताही दिसत नाही.म्हणून गावाकडे थोडी गुंतवणूक करण्याची विनंती. कुण्यातरी MIDC साठी अधिग्रहित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत दिली हे वाचले. अर्थात ते काही तांत्रिक कारणामुळे झाले असले तरी येणाऱ्या काळात मोठमोठ्या कंपन्या पाडून ती जमीन परत शेतीसाठी दिली जाईल ही माझी Fantasy आजही कायम आहे.

- अशोक पवार

..............

उल्टी खोपडी.
......
माझी पुस्तक वाचण्याची पद्धत जरा वेगळी आहे.
मुखपृष्ठ बघून मी मलपृष्ठापासून सुरुवात करतो. डायरीच्या, वहीच्या, पुस्तकाच्या शेवटच्या पानावरच असते भरपूर खाडाखोड, फुल्याफुल्या, वेण्या, पारंब्या, जटा, झेंडे, रस्ते,
नद्या, नाले, पहाड, पक्षी, नक्षी आणि उरलेले कोरेपण...
......
म्हणून...
प्राथमिक परिक्षेत नापास होते,
उल्टी खोपडी !
........

म्हणून....
कवटी फुटल्या शिवाय जात नाही आपण...
स्मशाना बाहेर...
खोपडीत.
.........

दफना दो दिमागको दो गज़ ज़मीमें
कितांबे वही से शुरु होती है..
उल्टी खोपडी !

- शिवराम भोंडेकर

..............

मंगळवारी एक मित्र मुलीला भेटायला गेला होता. फेसबुक चॅटवरून प्रकरण बरच गंभीर झालेलं होतं. पहिल्यांदा भेटायला चाललाय म्हणून त्यानं कळवलं होतं. मी ऑल द बेस्ट म्हणून शुभेच्छा ही दिलेल्या. नंतर बळंच विचारून पहावं म्हणून फोन केला तर म्हणतो... भावा जाऊदे रे.. मी म्हटलं सांग तर... 
तो बोल्ला.. 
अरे तिला भेटलो, आलिशान घर आहे, तिला नोकरीही चांगली आहे. 
ओके, मग प्रॉब्लेम काय? 
अरे तिच्या घरी टीव्ही म्यूट होता..
मी म्हणालो... कानांचा काही प्रॉब्लेम आहे का? 
तो बोल्ला.. दादा, कानांचा नाही, मेंदूचा प्रॉब्लेम आहे, ती 'पहरेदार पिया की'चा रिपिट टेलिकास्ट पाहत होती, मी आल्यावर तिनं म्यूट केला टीव्ही. पण एपिसोड संपेपर्यंत टीव्ही चालूच होता. एपिसोड संपल्यावर बोलली की क्यूट लवस्टोरी आहे ही.

मी नाद सोडला दादा..

- वैभव छाया

..............प्रतिक्रिया द्या2799 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
मृदुला देशपांडे - शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७
श्री. मुकेश माचकर सर, नमस्कार, माझ्या पोस्टचा आवर्जून समावेश केल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! माझ्या पोेस्टपेक्षा इतरांच्या पोस्टस खरंच खूप छान आहेत.

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर