पश्चात्तापाचं बळ.. बायकोच्या कह्यात.. स्पप्नाची समाप्ती
शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७ मुकेश माचकर

बोधकथा, बिरबलाची कथा आणि मार्मिक विचार असा दमदार, कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून...

एका जहाजावर एक संत प्रवास करत होते आणि पापकर्माबद्दल शिक्षा झालेला एक पापी माणूसही जहाजावर होता.

ते जहाज भरसमुद्रात वादळात सापडलं.

सगळी माणसं परमेश्वराची करुणा भाकू लागली, प्रार्थना करू लागली.

संत मात्र उभेच होते. पापी माणसाला त्यांनी आपल्या मागे दडवलं होतं.

पापी माणूस म्हणाला, महाराज, तुम्ही प्रार्थना का करत नाही? तुम्ही तर संत आहात. इतरांची प्रार्थना देव ऐकेल, न ऐकेल. तुमची प्रार्थना मात्र तो नक्की ऐकेल.

संत म्हणाले, सध्या तुला झाकणं अधिक महत्त्वाचं आहे माझ्यासाठी.

पापी माणूस म्हणाला, महाराज, तुम्ही मला कितीही झाकलंत तरी परमेश्वराच्या नजरेपासून तर मी लपून राहणार नाही. माझ्या पापाची सजा तो सर्वांना देणार असेल, तर त्यापेक्षा मी आपणहून समुद्रात उडी मारेन. मला का झाकताय?

संत म्हणाले, जिवाचीच भीती निर्माण झालीये म्हणून आता या सगळ्यांना तुझा विसर पडलेला आहे आणि ते एकाग्रतेने देवाचा धावा करताहेत. आयुष्यात कधीही साधलं नाही, असं ध्यान त्यांना साधलं आहे. तू दिसलास की त्यांचं ध्यान विचलित होईल. आपणही कमीअधिक प्रमाणात पापं करतोच, आपली पापं उघडकीला येत नाहीत, तोवर आपल्यावर तो शिक्का बसत नाही, एवढाच तुझ्यात आणि त्यांच्यात फरक आहे. तुला पाहिलं की त्यांना त्याचा विसर पडेल आणि ते तुला समुद्रात फेकायला धावतील आणि आत्मघात ओढवून घेतील. कारण, आज हे तारू सुरक्षित राहणार आहे ते 
तुझ्या निखळ पश्चात्तापाच्या बळावर याची त्यांना कल्पनाही नाही. म्हणून तुला झाकणं आवश्यक आहे.

.....................................

अकबराच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी एका सरदाराची पत्नी त्याला म्हणाली, जगातले सगळे नवरे बायकोपुढचे नंदीबैलच असतात. काही मान्य करतात, काही मान्य करत नाहीत, इतकंच.

त्या सरदाराने एकदा दरबारात हा विषय काढला. त्यावर दुसरा सरदार म्हणाला, तुमची बायको असं बोलूच कशी शकली? एक लगावून द्यायची खणखणीत.

तो सरदार म्हणाला, तुमच्या बायकोला तुम्ही लगावून देता का खणखणीत?

हा सरदार म्हणाला, माझी बायको असला अगोचरपणा करतच नाही...

खूप चर्चा झाल्यानंतर सगळ्या दरबाराच्या असं लक्षात आलं की आपल्यापैकी प्रत्येकजण या ना त्या प्रकारे बायकोच्या कह्यात आहे, तिच्या मर्जीनुसार वागतो आहे. मग प्रश्न आला की बायकोचा नंदीबैल नसलेला एक तरी नवरा असेल का राज्यात?

शोधायची जबाबदारी अर्थात बिरबलावर आली. तो म्हणाला, मला दोन अबलख घोडे द्या. एक पांढरा. एक काळा. मगच हा शोध शक्य होईल.

बिरबल ते घोडे घेऊन राज्यभर फिरला. दवंडी पिटवली गेली. आपण बायकोच्या मर्जीला जुमानत नाही, असं बोलण्याची हिंमत असलेला एकही नरपुंगव पुढे आला नाही. राजमहालाकडे परतताना बिरबलाला एक अगडबंब पैलवान घरासमोर बाजेच्या खाटल्यावर पसरलेला दिसला, दोन मालिशवाले त्याच्या अंगाला मालिश करत होते. आत एक बारकुडी बायको स्वयंपाक करत होती. बिरबलाने पैलवानाला विचारलं, बाबारे, तू तुझ्या बायकोच्या हुकुमाचा ताबेदार आहेस का?

पैलवान म्हणाला, आधी हातात हात द्या, परिचय तरी करून घेऊयात.

बिरबलाने हातात हात दिला आणि पैलवानाने तो असा दाबला की हाडांचा चक्काचूरच होईल, अशी भीती बिरबलाला वाटू लागली. पैलवान म्हणाला, आता तुम्ही वेदनेने रडू लागाल आणि माझ्याशी असं औद्धत्य करण्याची हिंमत दाखवल्याबद्दल माफी मागाल, तेव्हाच मी हात सोडेन तुमचा. माझ्याकडे पाहून तुम्हाला असा प्रश्न विचारण्याची बुद्धी तरी कशी झाली?

बिरबलाने माफी मागून हात सोडवून घेतला आणि म्हणाला, राज्यात एक तरी बहाद्दर नवरा भेटला म्हणायचा. आता यातला कोणता घोडा तुम्हाला हवा, ते सांगा आणि मला मोकळं करा.

पैलवान काही बोलणार तोच आतून त्या बारकुड्या देहातून गर्जना झाली, काळा अशुभ रंग असतो. तो घोडा निवडाल, तर त्याच्याआधी तुमचा तोबरा बंद करीन.

पैलवान म्हणाला, पांढरा घोडा द्या.

बिरबल म्हणाला, एकही मिळणार नाही.

दोन्ही घोडे घेऊन तो आपल्या वाटेने चालू लागला.

.........................................

एका माणसाला- बहुदा स्वप्नांनी बरंच छळलं असणार त्याला- गुर्जीएफने सांगितलं, तू हात उचलून वर करत जा. जेव्हा जेव्हा जिथे जिथे आठवेल तिथे हे करायचं आणि प्रत्येक वेळेला मनात म्हणायचं, स्वप्नातही मी हे करणार. असे तीन महिने गेले. त्या माणसाने तीन महिने जमेल तिथे हा एक्सरसाइझ केला आणि अखेर एके रात्री चमत्कार घडला… स्वप्नात तो रस्ता क्रॉस करत होता. प्रचंड ट्रॅफिक. कोलाहल. इतके दिवस घटवलेली सूचना अंतर्मनाने त्या दिवशी ऐकली असावी… स्वप्नात त्याने 'जाणून बुजून' हात वर केला आणि स्वप्न तत्क्षणी थांबलं…

……………………………………

तुम्ही अमृततुल्य नियमित वाचता?

मग इथे प्रसिद्ध होणाऱ्या कथांपैकी निवडक १०० कथांचा अक्कलझाड हा दोन भागांचा पुस्तकसंच तुम्हाला नक्कीच आवडेल.

तो खरेदी करण्यासाठी ‘इंद्रायणी साहित्य, २७३, शनिवार पेठ, पुणे ३०’ येथे ०२०-२४४५८५९८ किंवा ०२०-२४४८१८६७ या क्रमांकावर किंवा ९३७१०४३७८१ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

हा संच पुढील ठिकाणी ऑनलाइनही उपलब्ध आहे. फक्त क्लिक करा आणि घरपोच मिळवा.

इंद्रायणी साहित्य: http://bit.ly/IndrayaniSahityaAkkalJhad

बुकगंगा: http://bit.ly/BookGangaAkkalJhad

अमेझॉन: http://bit.ly/AmazonAkkalJhadप्रतिक्रिया द्या2984 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर