वैदेही!
शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७ ‎हर्षद शामकांत बर्वे

लग्न केले म्हणजे एका माणसाच्या दावणीला आयुष्य बांधले अशा गैरसमजात मन मारून जगणा-या स्त्रियांतील एक न होता वेगळा पर्याय स्वीकारणा-या कॉलेज मैत्रिणीबद्दल सांगणारा हा ब्लॉग.

पुण्यनगरीशी माझे विशेष संबंध आहेत. काका, आत्या आणि अगणित मित्रमंडळी पुण्यात राहतात. आफ्रिकेच्या ग्रेट मायग्रेशनसारखी यातील काही लोकं कामानिमित्त पुण्यात जवळपास पाव शतकाअगोदर गेली आणि आता पुणेकर बनून राहिली. अस्सल पुणेकर यांना पुणेकर मानतो की नाही ते माहीत नाही पण ही सगळी मंडळी आता स्वतःला पुणेकर समजतात. अनेक कथा, जोक्समधून लोक पुणे आणि पुणेकरांवर टीका करतांना आढळतात पण माझे स्वतःचे पुण्याचे आणि पुणेकरांचे अनुभव अतिशय चांगले आहे. अट्टल पुणेकर चक्क झेड ब्रिजचा देखील जाजज्वल्य अभिमान बाळगू शकतो आणि त्यावर माझ्यासारख्या माणसांनी ऑब्जेक्शन घेण्याचे काहीच कारण नाही. पण पुणे हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे शहर आहे आणि त्याची काही कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या भूतकाळातील काही पात्रे मला पुण्यात भेटतात आणि तीही नकळत. एफसी रोड किंवा डेक्कनला फिरत असतांना “अबे बर्व्या, तू इथे काय करतो आहेस” अशा हाका मला अनेक वेळा ऐकू आल्या आहेत. काही लोकांना भेटायचे असते पण त्यांच्याकडे वेळ नसतो. काही लोकांना भेटून मला काही मर्मबंधातल्या आठवणी जाग्या करायच्या असतात पण आता त्यांच्या भाळी सिंदूर आणि गळी मंगळसूत्र पडल्यामुळे माझीच इच्छा होत नाही. पण इन एनी गिव्हन केस, कोणी ना कणी पुण्यात इंटरेस्टिंग भेटत असत आणि माझी पुण्याला जाण्याची ओढ जागवत असत.

या वेळेसची ट्रिप पण अशीच काहीशी होती, पण या वेळेस भेट डेक्कनला नाही तर शिवाजीनगर स्टॅन्डला झाली. मी आपला सर्वात स्वस्त आणि सर्वात जलद एसटीची चौकशी करत होतो आणि कानावर शब्द पडले “अमरावतीला जाणारी बस किती वाजता आहे”. तो स्वर माझ्या ओळखीचा होता. यस, तो आवाज वैदेहीचाच होता. मी चमकून मागे बघितले आणि माझा अंदाज चुकला नाही. ऐन तारुण्यात ऐकलेले काही आवाज कानात घर करून जातात. काही नकोसे सूर कानात असतात पण वैदेहीचा सूर मात्र नेहमीच हवहवासा वाटणारा, वारंवार ऐकावासा वाटणारा होता.

-वैदेही राजपाठक ?

-हो, आपण कोण?

आपण कोण हे शब्द माझ्या कानात गरम शिशासारखे पडले पण हा तर पहिलाच वार होता, इतक्यात हार मानणारा मी कधीच नव्हतो.

- अहो, मी हर्षद बर्वे, आपण कॉलेजात एकत्र होतो

- बर्वे तू, किती बदलला आहेस, त्या काळी किती थकेला होतास तू

- बाप रे, अजूनही आठवते तर तुला माझे ते बावळट ध्यान

- अर्थात, बर थांब मला जरा चौकशी करू दे मग निवांत बोलू

- चालेल

मला घरी परतायची घाई नव्हतीच, मी शांतपणे एक बाक शोधून बसलो, बाजुच्या रिकाम्या सीटवर माझी बॅग ठेवून वैदेहीसाठी जागा पक्की केली. पाठमोरी वैदेही चौकशी करत होती आणि माझे मन वाऱ्याच्या वेगाने नव्वदच्या दशकात धावले. मी सेकंड इयरला असताना वैदेहीने आमच्या कॉलेजात प्रवेश घेतला होता. काही चेहरे असतात जे आपल्या मनात पहिल्याच नजरेत घर करून जातात, त्यातलाच हा एक चेहरा. कदाचित ही एकच पोरगी असावी जिची कोणीही रॅगिंग घेतल्याचे माझ्या तरी आठवणीत नाही. टिपिकल सोज्वळ टाइपची ही पोरगी. फ्रेशर्स पार्टीमध्ये कोणीतरी सांगितले की वैदेही अफाट गाते आणि मग तिला गाण्याचा आग्रह झाला. कोणतेही आढेवेढे न घेता तिनी आशाबाईंचे दैया मै कहाँ आ फसी हे गाणे गायले आणि काही मिनिटांतच त्या हॉलमध्ये असलेले सगळे तिचे दिवाने झाले. मी सेकंड इयरला असलो तरी अभियांत्रिकीचे संपूर्ण वारे प्यायलेला नव्हतो. थोडासा बिचकतच मी तिला विचारले,

- छान गातेस, आवाज तयारीचा वाटतो तुझा

- छान न गायला का झाले, बारा वर्षाची साधना आहे

- अरे वाह

हा संवाद इथेच संपला. तीपण तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात सामील झाली आणि मी पण टगेगिरी करत चोरून का होईना तिला बघायला लागलो. अर्थात हे काही लव्ह फव्ह नव्हते पण या पोरीत एक विलक्षण मॅग्नेटिझम होते. कुठेतरी मनात साल वाटून गेले होते, अशी मुलगी आपली मैत्रीण असावी. फ्रेशर्स पार्टी आणि नव्याचे नऊ दिवस संपले आणि तमाम कॉलेजला अभ्यास नावाच्या भुताने ग्रासले, दुसऱ्या वर्षाचे पहिले सेमिस्टर तसेही जीव घेणार आणि वरतून अस्मादिकांनी पहिल्या वर्षातले काही विषय हातचे आणलेले. मान मोडून अभ्यास करणे हा एकाच पर्याय होता आणि त्यात वैदेही कुठेतरी विस्मृतीत गेली असे म्हणायला हरकत नाही. बघता बघता सेमिस्टर संपले आणि वार्षिक संमेलनाची घोषणा झाली. अभियांत्रिकीचे संमेलन जसे अफाट होते तसेच झाले पण गाजवले ते वैदेहीने. सोलो परफॉर्मन्समध्ये दम मारो दम गायली होती वैदेही आणि तब्बल पाच वेळा वन्स मोअर देखील मिळवला आणि वैदेही संपूर्ण कॉलेजची रॉकस्टार झाली.

पहिल्या वर्षाचे हातचे राहिलेले कसेबसे काढून मी तिसऱ्या वर्षात प्रवेश घेतला. वैदेहीचा एम-वन राहिला आहे ऐकून मला का ते माहीत नाही पण प्रचंड दुःख झाले होते. साला एम-वन होताच राहूसारखा. मला चार वेळा पेपर द्यायला लावला होता एम-वननी. एक दिवस मी असाच कट्यावर काही टोळभैरव मुलांसोबत टवाळक्या करत असताना वैदेही आली होती.

- बर्वे, बोलायचे आहे तुझ्याशी

- बोल

- एम-वनच्या टिप्स पाहिजेत

- अग मला काय विचारतेस, माझाच मोठ्या मुश्किलीने चवथ्या प्रयत्नात निघाला आणि तोही बॉर्डरवर, शंभर पैकी एक्केचाळीस आहेत फक्त

- म्हणूनच तुला विचारते आहे, हुशार लोक ऐंशी मार्क कसे आणायचे ते सांगतात आहेत, मला एक्केचाळीस बस झाले

झाले हे की कारण बस होते. मी माझ्या काही टिप्स दिल्या तिला आणि तिचा पण एम-वन निघाला. एम-वन निघण्याच्या आनंदात तिनी चक्क चहा सामोसे पार्टी दिली होती मला. दिवस जात राहिले. अस्मादिकपण फायनलला आले. मैत्री वाढत गेली पण ही मैत्री निखळ मैत्री होती. तिला माझ्यात इंटरेस्ट नव्हता आणि मी पण “तू नही तो और कोई” या वयात होतो.

फायनल इयरला आम्हाला जबरदस्त सेंड-ऑफ देण्यात आला आणि नेहमीप्रमाणे मैफिल गाजवली ती वैदेहीनेच.

- खरे तर तू गाण्यात करियर करायला हवे, अभियांत्रिकी काय करत बसलीस

- गाण्यात नाव कमवणाराच आहे मी पण पोटा-पाण्यासाठी काहीतरी करायला हवे की नाही

- बरोबर आहे, पण मार्क माय वर्ड्स, गाण्यात मोठे नाव कमावशील तू

-असो, पुढे काय एमबीए की एम-टेक

- अजिबात नाही, झाला तेवढा अभ्यास बस झाला, आता कामाधंद्याला लागणार मी

- हम्म, असो, कीप इन टच

आमचा संवाद इथे संपला असे नाही म्हणणार मी. कारण दोन वर्षातच तिच्या लग्नाची पत्रिका घरी आली. कॉलेजचे अनेक मित्र मैत्रिणी त्या सोहळ्याला जमले होते. लग्नात नववधू काहीच्या काही बेफाट दिसत होती आणि त्या मानानी तिचा होणारा नवरा थोडा डावाच होता. असो, आपल्याला काय म्हणून आम्ही जेवणावर ताव मारला आणि नंतर कळाले की ही आता अमेरिकेस जाणार आहे. भारतातल्या किती सुंदर मुली अमेरिकेने न्याव्या यावर काहीतरी नियंत्रण असायला हवे असे उगाच मला वाटून गेले.

असेच सगळे आठवत होते आणि परत तो आवाज कानावर आला.

- कुठे असतोस रे आजकाल

- मी आपला औरंगाबादलाच आहे पहिल्यापासून, तू अमेरिका की भारत

- मी ह्युस्टनला असते, कामानिमित्त पुण्यात आली आहे

- अमेरिकन लेडी शिवाजीनगरला काय करते आहे

- अरे अमरावतीला पार्सल पाठवायचे आहे, बसच्या ड्रायवरकडे दिले की लगेच मिळेल बाबांना

- हो, ही चांगली सोय आहे, बाकी काय म्हणतात तुझे पतीदेव, तू गेली ते तिकडचीच झाली, सोशल नेटवर्कवर पण नसतेस

- अरे वेळच मिळत नाही, बारा बारा तास ऑफिसात मान मोडल्यावर कसले सोशल नेटवर्क

- तेही बरोबरच आहे म्हणा

- तू काय करतोस रे आजकाल, फोटोग्राफर झाला आहेस म्हणे

- नॉट रियली, माझे सोड, तू सांगितले नाहीस, पतीदेव कसे आहेत, बच्चे मंडळी

- आम्ही कधीच चान्स नाही घेतला, जेव्हा घ्यायला हवा होता तेव्हा करीयरमध्ये बुडालो होतो आणि नंतर पतीच नाही राहिला, आता मला इंटरेस्टपण नाही

- व्हॉट डू यू मीन, पती नाही राहिला

- जिवंत आहे तो पण आम्ही एकत्र नाही आता

- अरेरे, सो सॉरी

- व्हाय सॉरी, वुई डोन्ट फील सॉरी

- अरे पण असे काय झाले, आय मीन, तू कसली खुश होतीस

- होते रे, पहिली काही वर्षे छानच गेली, आम्ही दोघेही मस्तपैकी काम करत होतो आणि अमेरिकेत आमचे छान चालले होते, बाय द वे, आय एम यूएस नॅशनल नाऊ

- अरे वाह, चिंता नाही मग तुला आता काही, पण मग बिनसले कुठे

- अरे, हा लग्नाच्या दहा बारा वर्षानंतर वाहवतच गेला

- गोरी ललना की काय

- छे छे रे

- मग

- एक दिवस याने नोकरीच सोडून दिली, काय तर म्हणे मी बर्न आउट झालो आहे, ब्रेक हवा आहे, पैसे साठवलेले असल्यामुळे चिंता नव्हती, दोन महिने घरीच बसून राहिला, काय काय वाचत होता इंटरनेटवर, मग एक दिवस महागडा कॅमेराच घेऊन आला आणि साठवलेले सगळे पैसे संपवून आला

- अरे रामा

- मग काय तर, मग बसला वर्ष दोन वर्ष फोटोग्राफी करत, बरे त्यात तरी काही राम हवा की नाही, तद्दन फुटकळ फोटो काढायचा, त्या फोटोंना कोणी काळे कुत्रेदेखील विचारात नव्हते, सगळे पैसे पाण्यात

- अगं होत असं कधी कधी, व्यवसाय म्हटले कि चढणे आले आणि उतरणेदेखील

- मान्य आहे पण व्यवसाय म्हणून केला तर न, मग एक दिवस बँकेत गेला आणि भले मोठे कर्ज घेऊन आला, शेती घेतली लीजवर, यांच्या अख्ख्या खानदानात कोणी शेती केलेली नाही, मी नको नको म्हणत असताना

- ओह

- मग तेही बुडाले आणि बँकेने याचे सर्वकाही जप्त केले, तरी बर घर माझ्या नावावर होते आणि मीच घेतले होते

- ओह

- अरे तिकडे परदेशात आम्ही, ना कोई आगे ना कोई पीछे, कोणाच्या भरवश्यावर करायचे असले उद्योग

- हेही बरोबर आहे

- तरी मी याला सांभाळून घेतले पण एक दिवस हा मला दारोदार पैसे मागत फिरतो असे कळाले आणि माझा कडेलोट झाला

- अरेरे

- मग मात्र त्या दिवशी मी माझा ठाम निर्णय घेतला आणि आय डिसाईडेड टू गेट सेपरेशन

- तू टोकाची भूमिका घेतली असे वाटत नाही का तुला

- अजिबात नाही, सहन करण्याची एक मर्यादा असते आणि मुख्य म्हणजे याच्या तापापाई मी माझे गाणे हरवून बसले होते चार वर्षे

- गाणे मात्र तू सोडू नकोस, दैवी आहे ते तुझ्याकडे

- अर्थात, म्हणूनच मी हा निर्णय घेतला. मी खुश आहे, तो त्याचे भिक्कारडे जीवन जगतो आहे

- परत दुसरे लग्न करण्याचा विचार नाही केलास का

- अजिबात नाही,

- का बरे

- हे बघ हर्षद, या जगात सात अब्ज माणसे आहेत मैत्री करायला, मला अजिबात एकटेपणा जाणवत नाही, मला भरपूर काम करून पैसे जमवायचे आहेत, जग फिरायचे आहे, मनसोक्त गायचे आहे, उंडारायचे आहे, हे सगळे मला माझ्या लाईफ-पार्टनर सोबत करायचे होते पण लाईफ-पार्टनर नव्हता नशिबात. एक लाईफ-पार्टनर सोडला तर ईश्वराने मला सगळे काही कोणाचीही नजर लागेल असे दिले आहे, मग जे नाही त्यावर रडण्यापेक्षा जे आहे त्याचा आनंद मी घ्यायला हवा.

- हे मात्र बरोबर आहे तुझे, आयुष्य माणसाला एकदाच मिळते

- अरे पुल म्हणायचे न, लग्न म्हटले की व्यवहार आला आणि व्यवहार म्हटला की दुःख हे आलेच

- बायो, ते पुल नाही वपु म्हणायचे

- हा हा, तेच ते रे, असो मी सध्या प्रचंड खुश आहे आणि माझ्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे आहे

इतक्यात तिला हवी असलेली बस आली, वैदेहीनी तिचे पार्सल ड्राइवरकडे दिले आणि माझ्याजवळ येत तिचे कार्ड दिले.

- कधी आला अमेरिकेत तर ये घरी

- नक्की, नक्की, तसा योग दिसत नाही आहे पण यु नेव्हर नो

- परफेक्ट, चल बाय रे

झपझप पावले उचलत वैदेही निघून गेली आणि मला मनात कुठेतरी बरे वाटले. एका अतिशय टॅलेंटेड स्त्रीनी आपले आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवले होते. नाहीतर आपण मन मारून जगणाऱ्या स्त्रिया रोजच बघतो. लग्न केले म्हणजे आपले आयुष्य आपण एका माणसाच्या दावणीला बांधून दिले आहे ही संकल्पना माझ्या एका मैत्रिणीने मोडली होती.

ब्लॉग हर्षद बर्वेची मुक्ताफळे: लिंक http://https://harshadbarveblog.wordpress.com/

(लेखाला जोडलेले छायाचित्र प्रातिनिधिक असून ते दुर्गा आजगावकर यांचे पेण्टिंग आहे.)प्रतिक्रिया द्या4443 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Rajendra - रविवार, १३ ऑगस्ट, २०१७
मस्त , अप्रतिम, भारी लिहलात
Nilesh Dhadbale - शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७
हर्षद भांऊचा जलवा तर सगळीकडेच आहे. अप्रतिम👌👌
Prachi - शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७
Apratim likhan 👌👌👌
sanjay patil - शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७
sndar lihile aahe. avadale......mazyakade pan ek ashich mlgi aahe. tichehi mat asech aahe. tila lagna karnyachi echa nahi. aani tilahi asech paisa kamvn bharpr firayache aahe..........
Ganesh Patil - शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७
खूपच छान, हर्षदजींचा मी खूप चाहता आहे त्यांची लेखणी हि खूप सरळ आणि साधी असल्याने एकदम मनाला लागते.

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर