वैयक्तिक गुगल
शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७ सुषमा शितोळे

अडचण आली की 'गुगल'कडे धावण्यापेक्षा कुटुंब-मित्रांच्या गोतावळ्याकडे जाणं कसं अधिक सुखाचं आहे याचा जाहिरातविश्वातील दिग्गज पीयूष पांडे यांच्या आत्मकथनाच्या संदर्भाने घेतलेला वेध..  

भारतीय जाहिरातविश्वातलं सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व  (कॅडबरी, फेव्हिकॉल, एशियन पेंट्स अशा अनेक भन्नाट जाहिरातींमागचे किमयागार, ८००पेक्षा जास्त पुरस्कार मिळवलेले ) पीयूष पांडे यांनी लिहिलेल्या 'पांडेपुराण: जाहिरात आणि मी' या पुस्तकाला वाचकांचा छान प्रतिसाद आहे. अमिताभ बच्चन यांची खास प्रस्तावना या पुस्तकाला आहे. 'हे एक अमूर्त आणि अनादि काळ टिकेल असं पुस्तक आहे. जेवढं जास्त तुम्ही त्याच्या खोलात जाल तेवढं ते अधिक अर्थवाही होईल'  असं त्यांनी त्यात म्हटलंय व ते खरंय. मला आत्ता इथं क्लिक करावासा वाटणारा या पुस्तकातला शब्द म्हणजे - 'वैयक्तिक गुगल'. तो नुसता शब्द नाही, अर्थपूर्ण जगण्याच्या ध्यासातून आलेला हुंकार आहे, ज्यात मूर्त, अमूर्त व अमर्याद असा ज्ञानसाठा आहे. पहिल्याच प्रकरणात तो आलाय. त्यात ते म्हणतात, 'माझं कुटुंब हेच माझं गुगल आहे.'

पीयूष पांडे यांचं कुटुंब भलंमोठं आहे. आई, वडील, सात बहिणी, एक भाऊ व ते मिळून अकरा जणांचं. त्यांची आई फक्त आठवी शिकलेली. लग्नानंतर तिला जेव्हा पीयूष यांच्या बाबांनी पहिली भेटवस्तू आणली, तेव्हा त्या पाकिटात साडी किंवा दागिना नसून दोन पुस्तकं आहेत हे पाहून रुसून रात्रभर त्या रडत होत्या पण नंतर ती पुस्तकं तर त्यांनी  वाचलीच, शिवाय त्यानंतरही हाती येईल ते त्या वाचत राहिल्या. त्यातूनच त्यांनी आपल्या मुलांनी कला व साहित्यात प्रावीण्य मिळवावे म्हणून ध्यास घेतला व अख्खे कुटुंबच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय  स्तरावर नेऊन ठेवले. पीयूषांच्या या पहिल्या प्रकरणाचे नाव आहे- सर्जनाच्या कारखान्यातच जणू माझा जन्म झाला होता. ते त्यात म्हणतात की, आमची आई आमच्या या कारखान्यातली 'क्रियेटिव्ह डिरेक्टर' होती. त्यामुळे या कुटुंबातील या सर्व उच्चशिक्षित व आपापल्या क्षेत्रातील बापमंडळींचा उल्लेख ते 'वैयक्तिक गुगल' असा करतात. कारण त्यांना कोणताही प्रश्न पडला तर त्याचं उत्तर त्यांच्या या वैयक्तिक गुगलकडं तयार असतं.

गुगलसारखंच ते नेमकं कोणाकडं, कुठं शोधायचं हे त्यांना माहीत असतं. असं कला-ज्ञानसंपन्न कुटुंब असणं व कुटुंबियांत स्नेहबंधाचे धागे कायम घट्ट असणं हे प्रत्येकाच्याच मनातलं हवंहवंसं चित्र असतं, ते कसं चितारावं हे पीयूषांच्या आईवडलांकडून शिकण्यासारखं आहे, तर गोतावळ्याची आवड असणं व तो मोठा करत जाणं हे पीयूषांकडून शिकण्यासारखं. ते म्हणतात, माझं कुटुंब मोठं आहे हे मी माझं नशीब समजतो. याचा अर्थ असा नाही, की प्रत्येकाचं कुटुंब मोठं असावं. ते शक्य नाही. पण वेगवेगळे गुण असणा-या मित्रपरिवाराचा गोतावळा आपल्या अवतीभोवती निर्माण करणं ही आपली गरज आहे. ज्यांच्याकडून काही शिकता येईल, जे रचनात्मक टीका करतील, खरंखुरं कौतुक करतील. मग त्यांचं क्षेत्र कुठलं का असेना. ती आपल्या आसपासची कुणी का असेना. फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचता यायला हवं.

पीयूष यांच्या यशामागचं खूप मोठं सूत्र इथं सापडतं. त्यांच्या मते, तुमच्या या वैयक्तिक गुगलकडे मतंमतांतरं असतील, छोट्यामोठ्या किरकोळ, निरर्थक वाटणा-या गोष्टीही असतील पण माहिती, ज्ञान व इतिहासाचं असं भांडारही असेल जे डिजिटल गुगलवर शोधण्याची तुम्ही कल्पनाही नाही करू शकणार किंवा कधीकधी तुम्ही न विचारलेल्या व उगाचच वाटणा-या प्रश्नांची उत्तरंही इथं तुम्हाला मिळतील पण त्यांचं रुपांतर उद्याच्या सुंदर ज्ञानात करता येऊ शकेल. पीयूषांच्या बाबतीत तसं खूप वेळा झालं आहे. मुळात पीयूषांची गोतावळ्याकडे बघण्याची ही जी दृष्टी आहे नं ती आजच्या काळासाठी फार महत्त्वाची आहे. कारण आपण असं बघणं विसरलोय बहुदा. आपण लेबलं लावून टाकतो पटकन. संयम तर खूपच कमी असतो. कोणाचंच ऐकण्यासाठी वेळ नसतो. स्वत:चंही ऐकत नाही. काही अडलं की आपण माणसांकडे नाही, डिजिटल गुगलवर उत्तरं शोधतो. कारण 'वैयक्तिक गुगल' आपल्याकडं नसतो, जो आपल्याला जास्त सुटेबल डाटा देऊ शकतो, पण त्यासाठी वेळ काढणं म्हणजे डिजिटल गुगलपासून थोडंसं दूर जावं लागेल. ओहो, तो दुरावा मात्र सोसवत नाही...पण ते थोडं सोसणं व आपल्या कुटुंबाचा विस्तार करत 'वैयक्तिक गुगल' शक्तीशाली बनवत जाणं जबरदस्त फायद्याचं ठरू शकतं. जे अडीअडचणीला सपोर्ट सिस्टीम म्हणून कामाला येऊ शकतं.

पीयूष सांगतात, मित्र जोडत जाणं आवश्यक आहे. मला खूप चांगले मित्र आहेत. यांतल्या काही नात्यांचा अंदाज तुम्हाला असतो; तर काही मात्र अतिशय आश्चर्यजनक असतात पण आपल्याला हे प्रॅक्टिकल वाटत नाही. आश्चर्यजनक होऊ शकणा-या या नव्या नात्यांसाठी आपल्याकडं तेवढं प्रेम नसतं. वेळ वाया जातोय हा फील अधिक असतो. उत्तम कार्य हे परस्परसंवाद, वादविवाद व दावे- प्रतिदावे यातून सिध्दीला जाऊ शकतं हे काही आपल्याला माहीत नसतं. पीयूषांना हे बाळकडू कुटुंबातच मिळालं. त्यांच्या मते, मैत्रीत सगळं जुळलंच पाहीजे असं नाही. त्यांचा पाचवीचा मित्र विजय व त्यांच्यात कोणतेही साम्य नव्हते. ते सांगतात, मी मागच्या रांगेत बसणारा एक वांड मुलगा, तर विजय हा प्रत्येक परीक्षेत पहिला येणारा अभ्यासू मुलगा होता. त्याला क्रीडा प्रकारात अजिबात रुची नव्हती, तर क्रिकेट हे माझं सर्वस्व होतं पण तरीही दोघांची मैत्री कायम राहिली. मित्राविषयी ते लिहितात,  तो माझ्यासारखा कधीच नव्हता पण आज मी जो काही आहे त्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. किती वेगळं वाटतं हे वाचतानाही! म्हणजे सर्वांना नव्हे, मात्र जे फक्त मैत्रीतल्या साम्यावरच भर देतात त्यांना नक्कीच असं वाटू शकतं पण किमान जेवढं जुळतं त्यावरही बेस्ट रिलेशनशिप तयार करता येऊ शकते, हा पीयूष यांचा नित्याचाच अनुभव आहे. ते आपल्या पत्नीमध्येही हा गुण असल्याचे सांगतात.

एकत्र कुटुंबात बाहेरून आलेल्या सुनांनी सर्वांशी जुळवून घेणं, उत्तम नातेसंबंध निर्माण करणं व ते जपता येणं हे कायमच कसब राहिलेलं आहे. त्यातल्या त्यात त्यांच्या पत्नी महाराष्ट्रीय तर पीयूष यांचं कुटुंब राजस्थानी. त्यामुळं स्वभाव, सवयी यांसोबतच सांस्कृतिक फरकही भरपूर पण असे असूनही त्या पीयूषांच्या कुटुंबाशी एकरूप झाल्या. ते कशामुळं हे समजून घेण्याचा पीयूष जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्यामागचं एक अतिशय साधं उत्तर त्यांना मिळतं, ते सांगतात की 'एकमेकांमध्ये काय वेगळं आहे हे शोधायच्या ती भानगडीतच पडत नाही; तर एकमेकांमध्ये काय समान आहे हे ती शोधते.' वाह.. आणि हे फारच सुंदर आहे. घेण्यासारखं नक्कीच आहे. मला हेच  वाटतं आणि यासाठीच मी हे सारं लिहिलंसुद्धा की पीयूष यांच्या कुटुंबाचे हे गुण जर आपणही स्वत:त आणू शकलो तर आपलाही 'वैयक्तिक गुगल' तयार होऊ शकतो. कुटुंबासह त्यात विस्तार होऊ शकतो...आणि मग नेमकं उत्तर शोधण्यासाठी हक्कानं आपल्याला तिथं जाता येईल. त्यांनाही आपली मदत मिळेल. म्हणजे पीयूष म्हणतात तसं की कस्तुरी आपल्याजवळच असते पण आपण जंगलातील कस्तुरीमृगाप्रमाणे इकडे तिकडे शोधत भटकत असतो. मग ते भटकणं नक्कीच थांबेल.

हे भटकणं थांबवणं तसं सोपं आहे का...तर नक्कीच आहे. फक्त सुरुवातीला स्वत:ला सतत रिकॉल करत रहावं लागेल, की उत्तर वैयक्तिक गुगलकडेच आहे. मग वैयक्तिक गुगलवर वारंवार क्लिक करत रहावं लागेल, ते लगेच अक्सेस होणार नाही. कारण त्याला आपली सवय नसेल. पण एकदा ती झाली की मग ओपन व्हायला किंचितसाही वेळ लागणार नाही.पीयूषांना ते सहज जमलं मग आपल्याला का नाही? :)

 प्रतिक्रिया द्या1736 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
sushma Shitole - बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७
Yes... Vijayji 👍
Vijay Kanagi - शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७
A very innovative way of finding analogy for keeping good relations in the family , with neighour and friends. These cordial relations will provide required information with emotions. Daughter in law getting adjusted with new family is paramount condition for a successful husband. Piyush Pande is a successful adman. His sister is Ila Arun.

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर