'चले जाव' ते वर्मी लागलेला घाव!
शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७ सचिन गुंजाळ

१९४२च्या लढ्यातील हिंदुत्ववाद्यांचे योगदान (?) हा विषय भाजपच्या एवढा वर्मी का लागतोय? इतिहासाची पाने उलटून हिंदुत्ववाद्यांचे सध्याचे दावे, त्यातल्या विसंगती तपासणारा हा लेख..

भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील निर्णायक लढा ठरलेल्या 'चले जाव' चळवळीबद्दल वाद असण्याचे काहीच कारण नाही, हा लोकलढाच होता. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपेयींच्या इतिहासातील ती दुखरी जखम आहे हे मात्र सत्य. चले जाव चळवळीतील योगदानाचा विषय निघाला की भाजपच्या वर्मी घाव बसतो, त्याची प्रचिती संसदेत या लढ्याच्या आठवणींना उजाळा देताना सोनिया गांधी यांनी भाजप आणि संघावर केलेल्या आरोपांतून दिसून आली. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी तात्काळ उत्तर देत सोनियांना 'इतिहासाचा अभ्यास' करण्याचा सल्ला दिला, दुसरीकडे  माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ‘२०१४च्या पराभवातून सोनिया गांधी हे बोलत आहेत’ असा आरोप केला.

संघाच्या मते 'चले जाव' चळवळ विस्कळीत

मात्र या आरोप-प्रत्यारोपांनी इतिहास बदलता येणार नाही. सत्य इतिहासाच्या पानांवर शाबूत आहे, त्याचा शोध घेतलाच पाहिजे. खरेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा आणि इतरही या विचारांनी चालणार्‍या संघटनांची चले जाव आंदोलनातील भूमिका नक्की काय होती?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच भूमिकेपासून सुरुवात करू. http://mahashivshakti.org या संघाच्या संकेतस्थळावर '१९४२चे अांदोलन आणि संघ' असा एक लेख आहे. संघ, चले जाव चळवळीत सहभागी नव्हता हे स्पष्टपणे येथे कबूल करण्यात आलेले आहे. याच संकेतस्थळावर चले जाव चळवळीत काँग्रेसच्या सर्वच नेत्यांना अटक झाली होती, त्यामुळे आंदोलनास नेतृत्वच राहिलेले नव्हते, असे नमूद करण्यात आले आहे. मग प्रश्‍न पडतो, आंदोलनाला नेतृत्व नव्हते तर, संघाने त्यावेळी का पुढाकार घेतला नाही? अरुणा असफअली आणि इतर कार्यकर्त्यांनी गवालिया टँकवर जमून अंदोलनाला सुरुवात केली त्यावेळी त्यांना नेतृत्वाची चिंता का भेडसावली नाही? त्याच ठिकाणी ब्रिटिशांनी गोळीबार केला, त्यात कित्येक भारतीय जखमी झाले. त्यांना हे अांदोलन का निस्तेज वाटले नाही? याच संकेतस्थळावर चले जाव चळवळ ही अत्यंत विस्कळीत होती, सात-आठ जिल्ह्यांपलिकडे ती पोहोचलेली नव्हती. त्यामुळे या अांदोलनामुळे इंग्रज निघून जातील अशी शक्यताच नव्हती, अशी टिप्पणीही केलेली आहे.

मुळात नऊ जुलै रोजी चले जाव चळवळीचा गुप्त मसुदा सेवाग्राम, वर्धा येथे तयार केलेला होता. यात संविधान निर्मितीपासून ते राज्यकारभारापर्यंतच्या सर्वच मुद्दयांचा परामर्ष घेण्यात आला होता. याच मसुद्यात जनअांदोलनाचे नियम, कार्यपद्धती, स्वातंत्र्याची आवश्यकता आदी बाबीही नमूद होत्या, हस्तेपरहस्ते तो लोकांपर्यंत पोहोचविण्यातही आला होता असे असतानाही संघाला हे अांदोलन विस्कळीत का वाटते हा संशोधनाचाच भाग आहे.

याच लढ्यातून भारतीय असंतोषाचा स्फोट झाला. नऊ लाख लोकांनी स्वत:हून अटक करून घेतली. ५३८ वेळा पोलिस व लष्कराने ठिकठिकाणी गोळीबार केला. २६ हजार लोकांना शिक्षा ठोठावण्यात आली. १८ हजार लोकांना तात्पुरते ताब्यात घेण्यात आले. अडीच कोटी रुपयांचा दंड त्यावेळी सरकारी तिजोरीत जमा झाला होता. हजारो लोकांनी हसत हसत मृत्यू कवटाळला. सातारा हे लढ्याचे मुख्य केंद्र होते. बिहार, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांत सकाळ झाली की ब्रिटिशांच्या विरोधात फे-या निघायच्या, लढ्याला सुरुवात व्हायची आणि महत्त्वाचे म्हणजे हे रोजचेच झाले होते. तरीही हे अांदोलन सात-आठ जिल्ह्यांपलिकडे गेले नव्हते असे म्हणणे किती असंयुक्तिक आणि अतार्किक आहे.

चले जाव चळवळ आणि तिचे यश याबाबतीत वाद असण्याचे काहीच कारण नाही. कारण याच आंदोलनामुळे इंग्रजांना ‘भारतावर फार काळ राज्य करणे शक्य नाही’ याची जाणीव झाली. याच अांदोलनानंतर प्रथमच स्वातंत्र्याच्या वाटाघाटींवर ब्रिटिशांकरवी चर्चा सुरू झाली. हा स्वातंत्र्याचा निर्णायक लोकलढा होता, त्यात नेतृत्व म्हणून, लढ्याला दिशा देणारी संघटना म्हणून काँग्रेसचे योगदान होतेच. तरीही या लढ्याला नेतृत्वहिन म्हणणे किती धाडसाचे आहे. विशेष म्हणजे हिंदू महासभाही या आंदोलनात सहभागी नव्हती.

संघ चळवळीच्या विरोधातच

आणखी एक संदर्भ या अनुषंगाने महत्त्वाचा आहे. १९४२ साली कडव्या क्रांतीकारी आणि स्वातंत्र्यप्रेमी विचारांनी प्रेरित असलेल्या राष्ट्र सेवा दल, काँग्रेस सेवा दल आणि काँग्रेसबरोबर असलेल्या इतरही अनेक संघटनांना ब्रिटिशांनी बेकायदा ठरविले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मात्र ब्रिटिशांचे धोरण मवाळ होते. त्यांनी या संघटनेवर कोणतीही बंदी घातलेली नव्हती. श्रीपाद केळकर लिखित छोडो भारत : १९४२ या पुस्तकातील पान क्र. १४४वर या संदर्भाने सविस्तर वर्णन आलेले आहे. 

भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ब्रिटिशांना पत्र लिहून 'चले जाव चळवळीला आपण कसा विरोध केला पाहिजे, प्रांताचे प्रशासन अशा पद्धतीने चालविले पाहिजे की चळवळ गती पकडता कामा नये, भारतीयांनी ब्रिटिशांवर विश्‍वास दाखविला पाहिजे' अशी भूमिका या आंदोलनाविरोधात घेतली होती हे जगजाहीर आहे. याला चले जाव चळवळीतील सहभाग म्हणणार का? राष्ट्रभक्तीच्या कोणत्या व्याख्येत हे पत्र बसते, याचाही खुलासा आवश्यकच ठरतो.
प्रतीसरकारमधील क्रांतीसिंह नाना पाटील यांचे जिवाभावाचे सहकारी आणि क्रांतीकारक नागनाथ अण्णा नाईकवाडी यांना२९ जुलै १९४४ रोजी चले जाव चळवळीदरम्यानच अटक झाली होती. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी पाळत ठेऊन त्यांना पकडून दिले होते. सुटकेनंतर एका मुलाखतीत नागनाथ अण्णांनीच याचा खुलासा केला.

संघ भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनाच एकमेव पोलादी पुरुष मानतो. त्याच वल्लभभाई पटेल यांनी १४ नोव्हेंबर १९४८ रोजी आपल्या अखत्यारीत असलेल्या गृहमंत्रालयामार्फत काढलेल्या एका पत्रात संघाला राष्ट्रविरोधी म्हटले होते. हे वास्तव अव्हेरून कसे चालेल. १९५० साली संघावर घालण्यात आलेली बंदी उदार दृष्टीकोनातून उठविण्यात आली. मात्र त्याहीवेळी ‘संघाने आपल्या कृतीतून राज्यघटना आणि राष्ट्रध्वज यावरील बांधिलकी दाखवून दिली पाहिजे’ अशी अट वल्लभभाई पटेलांनीच घातली होती, हे सत्यही नाकारून चालणार नाही. संघाला हा राष्ट्रभक्तीचा डोस पाजणे पटेलांना का भाग पडले, याचे समाधानकारक उत्तर संघ देईल का?

२५ जानेवारी २०१७ रोजी तरुणभारत या वृत्तपत्रात डॉ. मनमोहन वैद्य यांनी ‘स्वातंत्र्य आंदोलनात संघाचे योगदान’ या शीर्षकाखाली लेख लिहून भूमिका स्पष्ट केली होती. त्या लेखात संघाचे कार्यकर्ते कसे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते याचे दाखले दिलेले आहेत. याच लेखात वैद्य म्हणतात- चले जाव चळवळीमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले हे म्हणणे हास्यास्पद आहे. त्यांनी त्यासाठी काही संदर्भांचीही पुष्टी लेखात जोडली आहे. याच लेखात संघाचा १९४२च्या लढ्यातील सहभाग दर्शविताना वैद्य यांनी केलेला खटाटोप काही केल्या पटत नाही. १९४२चा लढा स्वातंत्र्य आंदोलनातील निर्णायक पडाव होता हे आजही संघ खुल्या दिलाने मान्य करत नाही, हे कबूल करायला इतिहास कशाला पाहिजे. 

चले जाव चळवळीने स्वातंत्र्य आंदोलनाला एक धार दिली. आंदोलन सुरू झाल्यानंतर कोणाला आणि किती ठिकाणी अटक करावी हे ब्रिटिशांना सुचेनासे झाले. अशावेळी संघ, हिंदू महासभा आणि इतरही बर्‍याच संघविचारांना मानणार्‍या संघटना मात्र या अंदोलनात कुठेही दिसल्या नाही. संत तुकारामांनी ज्याप्रमाणे ‘छत्रपती शिवरायांच्या कार्यात वाहून घेणारे लोक तयार करण्याचे काम केले’ असे कोणतेही कृत्य संघाकडून त्या काळात का झाले नाही. हे धर्मकार्य नव्हते का? स्वातंत्र्य हे आमच्यासाठी महत्त्वाचे नव्हते का? भारत पारतंत्र्यात असतांना धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य वेगळे कसे ठरू शकते. ‘संघाचे काम हे नव्हतेच, संघ सशक्त पिढी घडवत होता’ असे म्हणणार्‍यांनी मग 'चले जाव'च्या स्मृती तरी कशाला जागवाव्यात? संघाने घडविलेल्या त्या तत्कालीन सशक्त पिढीला राष्ट्रकार्य हे देवकार्य वाटू नये, हे गंभीर नाही का?

छोडो भारत आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा, मुस्लिम लीग या संघटना सहभागी नव्हत्या. याउलट त्यांनी या अांदोलनाला खडा विरोधच केला होता. या अांदोलनानंतर हिंदुस्तान हे हिंदूराष्ट्र होईल अशी भीती मुस्लीम लीगला वाटत होती, तर सत्तेचा दोर काँग्रेसच्या हाती जाईल असे भय हिंदू महासभादी संघटनांना भेडसावत होते. याचे ढीगभर पुरावे आजही इतिहासाच्या पानांवर आहेत, त्याचा अभ्यास कोण करणार?

राहिला प्रश्‍न काँग्रेसचा, स्वातंत्र्याच्या त्याच पराक्रमावर तुम्हीही किती दिवस मते मागणार? २०१४च्या निवडणुकीत दारूण परभाव झालेल्या पक्षाला स्वातंत्र्यानंतरच्या योगदानावर बोलता येऊ नये, राष्ट्रीय एकतेवर एल्गार करता येऊ नये, ही शोकांतिका नाही का? ७० वर्षांत या देशाला ओळख मिळवून देण्यात केलेले योगदानही लोकांपर्यंत पोहोचवावेसे वाटत नाही, ही काँग्रेसची निष्क्रियता नाही का? ताठ मानेने आणि स्वाभिमानाने जगणारा भारतीय आम्ही गेल्या ७० वर्षात घडविला हे सांगण्याचीही ज्यांची तयारी नाही, त्यांच्याकडून भविष्याबद्दलच्या काय अपेक्षा ठेवायच्या?

असो 'चले जाव'चा वर्मी लागलेला घाव भाजपलाही विसरता येणे शक्य नाही. इतिहास बदलून कदाचित ते साध्य करण्याचा प्रयत्न पुढील काळत होईल. मात्र त्याने इतिहासाच्या पानांवर कोरला गेलेला तो दाहक इतिहास थोडाच बदलेल? कारण इतिहास पुराव्यांवरच मांडता येतो, नाही तर ती भाकडकथा ठरते.

(लेखाला जोडलेला फोटो काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी १९४२च्या लढ्याला ७५ वर्षे झाल्यानिमित्त भाषण करतानाचा आहे.)

 प्रतिक्रिया द्या1462 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
भीमराव बनसोड - शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७
उत्कृस्ट
हर्षल पाटील - शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७
हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवे....

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर