फेबुगिरी
शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७ टीम बिगुल

ताज्या घडामोडींबाबत किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्यक्त होणा-यांची संख्या मोठी आहे. यातल्या काही निवडक खास पोस्ट्स ‘बिगुल’च्या वाचकांसाठी...

व्हेनेझुलापासूनचा धडा
-----------------------------
(व्हॉट्सअॅपवरून साभार)

आरक्षण, मोफत, सवलत या विषयावरून व्हेनेझुएलाचे पतन हा भारतासाठी मोठा धडा आहे.

आपल्याला तेल म्हटलं की आठवतात ते फक्त अरब देश पण त्याच्या कितीतरी आधी म्हणजे १९२०/३० साली व्हेनेझुएलामध्ये तेल साठे सापडले. दुसऱ्या महायुद्धात तेलाच्या भासणाऱ्या गरजेमुळे व्हेनेझुएलात सोन्याचा धुर निघू लागला. याला खिळ बसली ते अरबस्तानात तेल साठे सापडल्यावर. अरबांच्या आडमाप उपशामुळे तेलाचे भाव कोसळू लागले त्यामुळे व्हेनेझुएलाच्या पुढाकाराने तेल संपन्न राष्ट्रांची OPEC ही संघटना स्थापन झाली. (हा सगळा इतिहास बाजूला ठेवतो.)

१९९९ला भारत-चीनने तेलाची प्रचंड आयात केल्यामुळे कोसळलेले तेलाचे भाव अस्मानात गेले. तेलसंपन्न राष्ट्रांची पुन्हा चांदी झाली त्यात व्हेनेझुएला आघाडीवर होता. डॉलर्सची बरसात व्हेनेझुएलावर झाली.

त्याचवेळी व्हेनेझुएलामध्ये ह्युगो चावेझ सत्तेवर आला. कुठल्याही सत्ताधाऱ्याला सत्तेवरच आरूढ असावे असं वाटणं साहजिकच आहे. त्यासाठी जनतेला खुश ठेवणे क्रमप्राप्त आहे. कारण मतं त्याशिवाय मिळत नाहीत.

चावेझने सत्तेवर आल्यावर बघितलं की लाखो लोकांना कामधंदा नाही. त्याने व्हेनेझुएलाचा सगळा तेल कारभार बघणाऱ्या म्हणजेच उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या सरकारी कंपनीची बैठक घेऊन लोकांना नोकरीवर घेण्यासाठी राजी केले. आवश्यकता नसताना सरकारी खजिन्यात फक्त पैसा भरभरून आहे म्हणून लाखो लोकांना नोकरी दिली गेली आणि त्यांना काम एकच कपडे घालून कामावर जाणे निवांत बसणे आणि महिन्याला पगार घेऊन घरी येणे. चावेझने शिक्षण, वैद्यकीय, निवारा, मनोरंजन प्रत्येक क्षेत्रात सवलत, मोफत या गोष्टींची जनतेवर खैरात केली. चावेझ जनतेच्या गळ्यातला ताईत बनला.

आज चावेझ जगात नाही. तेलाचे भाव कोसळलेत. लाखो लोकांना सुविधा मोफत , सवलतीत देऊन देऊन व्हेनेझुएलाची सरकारी तिजोरी रिकामी आहे त्यांचे दिवाळे निघाले. एक ब्रेडच्या लादीसाठी व्हेनेझुएलन जनतेला दंगल करावी लागते. एकेकाळी डॉलरने सिगरेट पिणारे लोक अक्षरशः भिकारी झाले आहेत.

भारतीय यातून काय शिकणार? आठ आण्याचा केसपेपर बनवून एक गरीब जेव्हा ससून, जे.जे.मध्ये मोफत उपचार घेतो तेव्हा त्या उपचाराचा खर्च दहा आर्थिक सधन भारतीय अप्रत्यक्षपणे उचलत असतात. परंतु जात, धर्म यांच्या आधारावर जेव्हा मोफत, सवलतीत सुविधा, नोकऱ्या, वस्तू मागण्यासाठी कोट्यवधी लोक रांगेत उभे राहतील तेव्हा या प्रचंड उपशामुळे सरकारी तिजोरी एक दिवस रिकामी होणार आहे आणि भारत दिवाळखोरीत जाणार हे निश्चित आहे कारण एवढा माज करण्यासाठी आपल्याकडे सोने आणि तेलाच्या खाणीसुद्धा नाहीत.

- तुषार दामगुडे 

..............

आईवडिलांच्या सुरक्षित घरट्यातून बाहेर झेप घेतो आपण; आणि चांगल्या वाईट अनुभवाच्या जोडीने आपली जगण्याची शाळा सुरू होते .
या वाटेवर भेटत जातात मित्र नावाची हक्काची विसाव्याची ठिकाणे...
प्रत्येकाची तऱ्हा न्यारी, प्रत्येकाचा बाज वेगळा; वेगवेगळे राग एकत्र येऊन एक अप्रतिम रचना तयार होते आणि आपल्या भोवताली आणि मनात एक सुरेल मैफल साकारू लागते..
प्रेम बांधून घेतं, प्रसंगी हक्क गाजवतं आणि तिसऱ्यासाठी जागा ठेवत नाही; मैत्री मात्र अनेकांशी तितकीच जिवाभावाची होते.. त्या अर्थाने मैत्री ही प्रेमाचीच उत्क्रांत अवस्था...
वयाच्या, जेंडरच्या, रंगरूपाच्या बंधनांना झुगारून फुलते, रुजते ती मैत्री ...
मैत्रीचे ही एकात एक असे परीघ तयार होतात; आणि सगळ्यात केंद्रस्थानी असतात अशी अतिशय मोजकी लोकं, ज्यांना तुमचे गुण- दुर्गुण, यश-अपयश, सगळच माहीत असतं आणि त्या सगळ्या सकट त्यांनी तुम्हाला स्वीकारलेलं असतं..
आयुष्यात जोडीदाराची साथ अर्थात सगळ्यात महत्त्वाची असतेच; पण हे जिवलग मैत्र जगण्याचे बळ देतात, कितीही निराशेच्या क्षणी ओठांवर हसू फुलवतात, समजून घेतात, आणि स्वीकारतातही. ...
मैत्री नावाचे oasis तयार करणाऱ्या विधात्याला सलाम...

- शीतल पाटील श्रीगिरी

..............

स्कूटर कॅनोपी. दहा-बारा दिवसापूर्वी, ऑनलाइन वेबसाइट्सच्या जाहिरातींना भुलून आणि प्रॉडक्ट कुचकामी असल्याचं आमच्या कुटुंबाचं मत डावलून, अॅक्टिवासाठी चौदाशे रुपयाला भगव्या फ्लुरोसेंट रंगाची सुंदर स्कूटर कॅनोपी (छत्री) घेतली. आमचं नशीब असं थोर की त्या दिवसापासून पाऊस गायब. आज सकाळी रिमझिम पाऊस पडत होता म्हणून सहज कॅनोपीवाल्या स्कूटरवरून एक चक्कर मारली... चिंब भिजून घरी आलो. अंग पुसायला टॉवेल देत बायको बोलली, कशी काय आहे तुमची नवी स्कूटर कॅनोपी? मी म्हटलं... "सुंदर तर आहेच, हवेशीरदेखील आहे. आपण गाडी चालवत असताना जर पाऊस रिमझिम असेल, रस्त्यावरून दुसऱ्या कुणाच्या गाड्या जात नसतील, वाऱ्याचा वेग कमी असेल आणि वाऱ्याची दिशा (आपण कुठेही कसेही वळलो तरी) आपल्या पाठून पुढे अशीच असेल तर पावसाचा एक टिपूससुद्धा अंगावर येणार नाही. आणि हो, एक महत्त्वाचं तुला सांगायचंच राह्यलं, अगं, उन्हाळ्यात या कॅनोपीच्या छतामुळे कातडी टॅन करणारं त्रासदायक ऊन अडकून राहतं आणि केवळ व्हिटॅमिन-डी युक्त चांगलं ऊन आत येतं...." कोपरापासून हात जोडत बायको बोलली "नमो नमः धन्य आहे तुमची! आपल्याला गंडवलं गेल्याचं कळल्यावरही, न ढळणाऱ्या तुम्हा भक्तांच्या भक्तीला त्रिवार वंदन!!!"

- सॅबी परेरा

..............

१५/०८/२०१५ – हिंदुस्थान–पाकिस्तान संबंध हा एक अत्यंत संवेदनशील विषय आहे. माझा त्यावर अभ्यास नाही पण दुबईला आल्यापासून बऱ्याच पाकिस्तानी नागरिकांशी संपर्क आला. त्यामध्ये Taxi Drivers, इंजिनीअर, ड्रायव्हिंग स्कूलचा उस्ताद अशा समाजातल्या वेगवेगळ्या पातळ्यांवर असणारे लोक भेटले. तिघे-चौघे चांगले मित्र बनले. आजही अशाच एका पाकिस्तानी व्यक्तीची ओळख झाली. आज सुट्टी असल्यामुळे सकाळी लवकरच नाश्ता करून आलो पण घरी बसून काय करायचे हा यक्षप्रश्न होता, व्हॉक्स सिनेमाचे वेळापत्रक पाहिले तर जवळच्या बुर्जूमान मॉल आणि देअरा सिटी सेंटरचे शो मिळण्याची काहीच शक्यता नव्हती म्हणून मॉल ऑफ द एमिरेट्स ला जाण्याचा निर्णय घेतला, वेळ थोडा होता मग मेट्रोने जाण्याऐवजी Taxiला हात केला. गाडीत बसलो आणि ड्रायव्हरने अत्यंत आनंदात सलाम आलेकुम जनाब, कैसे हो आप? खैरीयत हैं म्हणत दिलखुलास स्वागत केले आणि भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. चेहरा ओळखीचा वाटला पण लक्षात येत नव्हते, त्यांनीच आठवण करून दिली, जनाब, पहचाना मुझे? जुमेरात (उर्दू भाषेत गुरुवार) को मैनेही आपको बुर्जुमान स्टेशन छोडा था, और उतरते वक्त आपने कहा था के दुनिया छोटी है, कही न कही मुलाकात जरूर होगी. अब मुझे आपके बात का यकीन हो गया कि दुनिया सही में छोटी है. मग माझ्या घरापासून ते मॉल ऑफ द एमिरेट्स येईपर्यंत भाईजानच्या तोंडाची टकळी अव्याहत चालू होती. शहाब खान नाव त्यांचं, पाकिस्तानमधील पेशावरचे राहणारे. अत्यंत दिलखुलास व्यक्तिमत्व होते, कसलाही आडपडदा न ठेवता गप्पा मारत होते. बोलता बोलता म्हणाले, जनाब ये कैसी दुश्मनी पाल रखी है? हम दोनों के मुल्क के सियासतकारोने, क्या मिलता है इन्हे? ये कश्मीर का मसला मुझे आजतक समझ में आया नही है, क्यों पाकिस्तान को कश्मीर चाहिये? पाकिस्तान के अंदरुनी इलाकों के हालात वैसेही खराब है, वो सुधारने के बजाय हमारे सियासतकार और फौज हिंदुस्थानसे बेकार लडाईमें लगे हैं. अंग्रेज जाते जाते दो टुकडे कर गये और दुश्मनी कि चिंगारी जलाकर गये और हमारे मुल्कों के सियासतकार और फौज उस चिंगारी कि आग बनाकर मासूम और मजलूम अवाम कि जान के साथ खिलवाड कर रहे हैं. हम दोनों के मुल्कों का रहनसहन एक जैसा हैं, खाना भी एक जैसा हैं, जुबान भी एक बोलते हैं. जैसे पाकिस्तान कि अवाम को हिंदुस्थानसे कोई दुश्मनी नहीं हैं, हिंदुस्थान के अवामको भी पाकिस्तान से दुश्मनी नहीं होगीं. हम दोनों कें मुल्क एक दिन के अंतर से आजाद हुए हैं, लेकीन आज पाकिस्तान कितना पीछे रह गया हैं और हिंदुस्थान ने कैसी तरक्की कि हैं. कभी कभी हमें लगता हैं के बटवारा होना नहीं चाहिये था. और आपको बताऊ जनाब मेरे गाडी में जितने भी हिंदुस्थानी भाई बैठते हैं, मुझे बहोत अच्छा लगता हैं क्योंकी हिंदुस्थानी भाई बहोत अच्छे से बातचीत करते हैं, हसी मजाक करते हैं तो सफर अच्छा गुजर जाता हैं. एवढ्यात आम्ही मॉल ऑफ द एमिरेट्स ला पोहोचलो होतो, निरोप घेताना शहाबभाईनी प्रेमभराने हातात हात घेतले आणि स्वतःच बोलले, चले भाईजान, दुनिया छोटी हैं, फिर मिलेंगे.

– किरण अरुण पंदारे

..............

मागच्या आठवड्यात मी रात्री दहा वाजता सारस बागेजवळ ट्राफिक जॅममध्ये तुफान अडकलो. तिथून हळूहळू लक्ष्मी नारायण थिएटर जवळ पोहोचून वाहतुकीचा तिढा सुटण्याची वाट पाहत होतो. अचानक माझ्या दरवाजावर टकटक ऐकू आली. मी काही विचारायच्या आत त्या माणसाने कारचा दरवाजा उघडला आणि म्हणाला "सर, प्लीज पद्मावती कॉर्नर छोड दिजीए ना" मी म्हणालो "मित्रा, मी उजवीकडे नाही वळणार, तर सरळ जाणार आहे." तर म्हणाला "सर, हेल्प किजिए. साथ मे पेशंट आदमी है"

त्याने दाखवलेल्या दिशेने बघितल्यावर मला एक पायाला प्लास्टर घातलेला वॉकर घेऊन माणूस दिसला. साथीच्या माणसाने परत एकदा अजीजी केल्यावर मी दोघांना गाडीत घेतलं.
तर स्टोरी अशी होती की दोन दिवसांपूर्वी रशीदचा वाघोलीत अॅक्सिडेंट झाला होता. हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन रशीद त्याच्या गावी, म्हणजे बडोद्याला जाण्यासाठी पद्मावती कॉर्नरला त्याच्या मित्राबरोबर रिक्षाने चालला होता. स्वारगेट ओलांडल्यावर लक्ष्मीनारायणच्या चौकात रिक्षावाल्याने ट्राफिक जाम बघून त्या दोघांना सांगितलं, हाच पद्मावती कॉर्नर आहे आणि लक्ष्मीनारायणच्या समोर सना कोंडुसकर स्टॅन्डला त्याची बस मिळेल असं सांगितलं. कारमध्ये बसल्यावर हेही कळलं की त्यांची बस सुटली होती.

रशीद मला ड्रायव्हरशी बोलायला सांगत होता. मी रशीदला म्हणालो "पहिले ह्या राड्यातून बाहेर निघू. मग मी बोलतो." पंधरा मिनिटे तो खिंड लढवत होता. अॅक्सिडेंट झाल्यामुळे त्याचे घरचे परेशान होते आणि त्याची नऊ वर्षाची मुलगी लवकर घरी या म्हणून अब्बाला फोन करत होती.
त्याच्या साथीदाराला सांगून मी पोलिसांद्वारे रस्ता काढण्याच्या प्रयत्नात होतो. तिथून बाहेर पडल्यावर सीन असा झाला होता की बसने कात्रज स्टॉप सोडला होता आणि ड्रायव्हरने रशीदला बसचा नाद सोडायला सांगितला.

मग मी फोन घेतला. ड्रायव्हर मराठी आहे हे बघून, त्याला सगळी परिस्थिती सांगितली. मी बोललो "गुरु, जिथं आहेस तिथं थांब. मी रामटवतो गाडीला." तो म्हणाला, नवले ब्रिजला थांबतो. पण फक्त दहा मिनिटे.

आणि मी न भूतो न भविष्यती अशी गाडी हाणली. दहाची बारा तेरा मिनिटे झाली, पण ती जीजे डीवाय ७ नंबरची व्हॉल्वो थांबलेली दिसली. मी गाडीतून उतरलो आणि पहिले ड्रायव्हरला धन्यवाद दिले. परत आलो तर रशीद डोळे पुसत उभा होता. त्याची गळाभेट घेत त्याला म्हणालो "जा भेट तुझ्या मुलीला उद्या सकाळी".

या सगळ्या घटनेत माझं दुःख वेगळंच होतं. लक्ष्मी नारायणच्या समोर त्या ट्राफिक जाममध्ये एक जण कर्णकर्कश्श डॉल्बीच्या भिंतीवर "पप्पी दे, पप्पी दे पारू ला" या गाण्यावर शर्ट काढून नाचत होता. मलाही तसंच विचित्र अंगविक्षेप करत नाचायचं होतं. पण थोडे दिवसात ती इच्छा पूर्ण करू या भावनेने मी रशीदला घेऊन बाहेर पडलो.

नवले ब्रिजवरून कोंढवा मार्गे मी रात्री साडेअकरा ला घरी पोहोचलो. माझी स्टोरी झोपेत ऐकत वैभवी म्हणाली "या फेसबुकवर पोस्ट जमवण्यासाठी तू अजून काय काय उद्योग करणार आहेस देव जाणे."

- राजेश मंडलिक

..............

आम्हालाही तुमची लाज वाटते!
~~~~~~~~~~~~~~
..राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात मुख्यमंत्री जेवढे प्रामाणिक आहेत तेवढेच मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेबाबत आहेत..! नजीकच्या काळात ते लक्षात येईलच.बस..यापेक्षा अधिक याबाबत मला काही बोलायचे नाही..!

मुद्दा वेगळा आहे..

मराठा क्रांती मोर्चाचे जे कोणी समन्वयक, आयोजक होते त्यांनी अत्यंत हुशारीने सर्वसामान्य माणसाच्या मनातील प्रस्थापित राजकारण्यांविषयीच्या सुप्त नाराजीला सतत हवा घालून त्या नाराजीचं रूपांतर तिरस्कारात करण्यात यश मिळवलं आणि त्यानंतर साहजिकच मोर्चातील संघटित जनतेने महाराष्ट्रातील तमाम राजकीय पुढारी, नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आदी सर्वांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यांना मोर्चात शेवटची रांग,स्टेजवर प्रवेश नाही, त्यांनी मोर्चाच्या भूमिकेविषयी काहीही बोलायचे नाही अशा विविध प्रकारे अपमानित करण्यात आलं.. (काल दोघांच्या बाबतीत अपवाद केला गेला. का..? कळायला मार्ग नाही..!)

मला आश्चर्य आणि दुःख या बाबीचं वाटलं की, महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शेकडो आमदार, खासदार, प्रमुख राजकीय नेते, पदाधिकारी यापैकी एखाद्यानेही या मोर्चेकऱ्यांना या जाहीर अपमानाचा जाब विचारू नये..? या समाजाची सध्याची जी काही अवस्था आहे त्याला पूर्णपणे फक्त राजकारणीच कसे काय जबाबदार.. या समाजाचा काहीच दोष नाही का, असा प्रश्न विचारण्याची ताकद एकाही राजकारण्याने दाखवू नये..? शैक्षणिक विषयांसंदर्भातील प्रश्न योग्यच, परंतु जातीय अस्मितेचा अंगार फुलवणं, जातीय विद्वेषाला खतपाणी घालणं हे चूक आहे, असं स्पष्टपणे सांगण्याची धमक एकही लोकप्रतिनिधी आणि नेत्यामध्ये असू नये..? स्टेजवरून भाषणं करणाऱ्या त्या मुलींच्या मेंदूवर, मनावर फक्त कोपर्डीची घटना सतत हॅमर करून जातीय विद्वेषाची खदखद किती प्रचंड प्रमाणात त्यांच्यात पेरली गेलीय ते स्पष्ट होतंय. परंतु अशा प्रकारच्या अस्वस्थ करणाऱ्या आणि संतापजनक अनेक घटना कोपर्डीपूर्वीही महाराष्ट्रात घडल्यात आणि नंतरही.. त्यातील आरोपी अनेकदा आपल्याच समाजाचे होते, हे वास्तव या मुलींना समजावून सांगून समस्त महिलांवरील अत्याचाराचा निषेध करा,असं या मुलींना परखडपणे सांगणारा एकही आमदार, खासदार, नेता नसावा..!

आणि मग जर तुमचा सगळ्यांचाच कणा मोडलेला असेल.. मतांच्या लाचारींपुढे तुम्ही सगळ्यांनी तुमचा स्वाभिमान गहाण टाकला असेल.. तुम्ही या समाजाचं आणि राज्याचं वाटोळं केल्याचा आरोप तुम्हाला मान्य असेल.. संघटित जनशक्तीने केलेला तुमचा अपमान तुम्हाला डाचत नसेल.. सर्वच समाजांचा जातीय अहंकार वाढावा, फुलावा अशीच तुमचीही आंतरिक इच्छा असेल.. नैतिकता, चारित्र्य तुमच्यात शिल्लक राहिलेच नसेल तर..

तर.. हे महाराष्ट्रातील तमाम विद्यमान राजकारण्यांनो, लोकप्रतिनिधींनो..

कोणत्याही जातीय, धार्मिक, प्रादेशिक अस्मिता-अहंकाराच्या आहारी न गेलेल्या आमच्यासारख्यांनाही तुमची लाज वाटते..!!

- रवींद्र पोखरकर

..............

थोडे मराठा मोर्चाबद्दल

मी यातल्या एकही मोर्चात सहभागी झाले नव्हते. जेव्हा पुण्यात मोर्चा झाला तेव्हा मैत्रिणीचा फोन आला होता येतेस का म्हणून, ही मैत्रीण आणि नवरा दोघेही आर्ट ऑफ लिविंगची सदस्य आहेत. जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनात, आंदोलकांची निवासाच्या व्यवस्थेपासून ते आंदोलनाचे पद्धतशीर मॅनेजमेंट करण्यामध्ये आर्ट ऑफ लिविंगवाल्यानी सिंहाचा वाटा उचलला होता. हिने जेव्हा सांगितले की यांचा आर्ट ऑफ लिविंगचा ग्रुप पाणीव्यवस्था वगैरे करणार आहे तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली होती. हळूहळू मोर्चे हायजॅक होत आहेत हे लक्षात येत होतं. एक इव्हेंट बनवली जाते, त्याचे मूळ शोधण्याच्या भानगडीत न पडता लोकं प्रचंड संख्येने त्यात सामील होत राहतात. याच उत्साहाचे रूपांतर हळूहळू उन्मादात होत गेले. मूळ मुद्दे बाजूला पडले आणि बरेच मुद्दे त्यात जोडण्यात आले. मागण्यांमधील कायदेशीर अडसर काय, ते दूर करण्यासाठी काय उपाययोजना लागतील याबद्दल फार कमी विचार केला गेला. मूळ जोर शक्तिप्रदर्शन आणि संख्या वाढवणे यावर केंद्रित केला गेला. कोणत्याही समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण मिळण्यासाठी बाकी कोणालाही अजिबात आक्षेप नाहीये, पण जेव्हा इथे त्यासाठी घटनेतच तरतूद नाहीये, तर हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. एकीकडे केंद्राचा कल सगळीच आरक्षणे काढून घेण्याकडे असताना या आरक्षणाचा कितपत फायदा होईल या मुद्दयाचाही विचार व्हावयास हवा.

मी वैयक्तिक रीतीने केलेला विरोध हा उघडउघड हायजॅक केल्या गेलेल्या मोर्चाला होता, मागण्यांना नाही, हे किती जणांनी विचारात घेतले हा एक संशोधनाचा विषय होईल. आता ज्या मुद्द्यांची तड लावायची आहे, त्यासाठी मुद्देसूद कायदेशीर लढा आणि त्याला आंदोलनाची साथ अशी दुहेरी फळी सांभाळण्याची गरज आहे. मोर्चा शेतकऱ्यांचाही आहे म्हणून गाजावाजा करण्यात आला पण शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या किती मुद्दयांवर अभ्यासू मत मांडल्या गेले? विरोधच नको असे करून सगळीच कवाडे बंद करण्यात येत आहेत. याउपर विरोधाची टिंगलटवाळी करायची आहे की आम्ही जी निरीक्षणे नोंदवतो आहोत त्यावर विचार करून त्यावर कार्यवाही करायची आहे यावर विचार केलात तर खरेच उपयोग होईल. कित्येक हुशार तरुण मुले मी या निमित्ताने भावनेच्या भरात वहावत जाताना पाहते आहे. काही लढे हे भावना बाजूला ठेवून, मागण्यांमध्ये सुसूत्रता ठेवून लढायचे असतात, विद्यार्थी होऊन सगळ्या बाजूने विचार करून एक फुलप्रूफ प्लॅन ऑफ अॅक्शन बनवून लढायचे असतात, याबद्दल कधी समज तयार होणार आहे? राजकारणी आणि बाकी बरेच जण टपलेले आहेतच तुमच्या शक्तिप्रदर्शनाचा वापर करून स्वतःची पोळी भाजून घ्यायला.... तूर्तास इतकेच.

- दिशा गावडे

..............

सेनेने विस्तव कॉँग्रेसने खवा मनसेने वेलची आणि राष्ट्रवादीने साखर दिली तर गाजर हलवा करीन म्हणते!!

- वैशाली प्रसाद पराडकर जोग

..............

आरक्षणावर आपला स्टँड बिलकुल क्लियर आहे. त्यासाठी मी तर नवीनच मागणी करणार आहे.

ना आर्थिक निकषावर ना जातीआधारित, आरक्षण हवे बौद्धिक निकषावर. म्हंजे ज्याचा आयक्यू कमी, त्यांना आरक्षण. तरच समुचित समाजाचे उच्चाटन होइल. गणपतीत ढोल वाजवणारांना सगळ्यात जास्त आरक्षण. डॉल्बी डिजे वाजवणारे त्यानंतर. मग लग्नात ट्राफिक जाम करून नाचणारे, पिऊन धिंगाणा घालणारे, वाहतुकीचे नियम न पाळणारे, पच्याक् कन मावा गुटखा खाऊन थुंकणारे कोब्रा, मणभर सोनं गळ्यात हातात बोटांत कमरेत आणि कुठे कुठे घालणारांनाही आरक्षण.

दहीहंडीवाल्यांना फक्त पास झाले की डायरेक्ट सीट आणि देवावर अपार श्रद्धा असलेल्या, खंडीभर उपास तापास करून काही फरक पडतो असे समजणारांना , राशीभविष्य, वास्तुशास्त्र घंटाशास्त्र वगैरेचे सल्ले घेऊन निर्णय घेणारांना घरबसल्या डिग्री आणि प्रमोशनची व्यवस्था.

निर्मल बाबा, श्री रव्या, आसाराम , गिरमीट राम रहीम आणि धार्मिक गुरूंच्या कट्टर भक्त/शिष्यांना बिना डिग्री कुठेही एमडी, सीईओ पदांवर बढती. आणि वार्षिक एक कोटी रुपये सरकारतर्फे बौद्धिक भत्ता. व्हाट्सअॅपवर दिसलं की मार फॉरवर्ड, गुडमॉर्निंग-गुडनाईटचा रतीब घालणारे यांना वरील सर्व सुविधा, अधिक एक पेट्रोलपंप किंवा गॅस एजन्सी.

- प्रशांत गणेश

..............

"सर, ह्ये घ्या तुमचे पैशे परत."
"पण तू चार हजार घेतले होतेस ना?"
"व्हय. चारहज्जारच द्याला आनले हुते. निम्मे वैनींनी घेतले. म्हनल्या अर्धवटावर माजा हक्क हाय."
"अर्ध्यावर म्हणाल्या असतील रे. बरं, तरी हे दोन हजार असायला हवेत. फक्त पाचशेच कसे?"
"तुमीच वळका बगू हे पाश्शेच कसे ते?"
"मी कसा ओळखणार? जर हे ओळखता आलं असतं तर ऑफिसात सर होण्याऐवजी तुझ्यासारखा ऑफिसबॉय होऊन निवांत राहिलो नसतो का?"
"सायेब, ही नवीन इंटेलिजंट नोट हाय. हिच्यात बशिवलेली चीप इक्ती हुशार हाय की ही नोट छद्मवेष धारण करून 'मी दोन हजाराची न्हाय, पाश्शेची नोट हाय' अशी थाप मारून त्ये लोकांना पटवूनबी देते."
"चल. काहीतरी थापा नको मारुस."
"बगा, तुमालाबी फशीवलं का न्हाय नोटंनं? अवो, बाजारात ही नोट चार हजाराखाली न्हाय भेटत. तुमाला म्हनून अडीजहजारात द्याला आनली."
"असं म्हणतोस? मग हे घे आणखी पाचशे."
(मी सुदामाला कसं फसवलं त्याची गोष्ट)

- ज्युनियर ब्रह्मे

..............

जातीअंत, जात निर्मूलन, सर्वधर्मसमभाव, उदारमतवाद, या वाटेनं निघालेला किंवा जाणं अपेक्षित असणारा आपला समाज जातप्रबलता, जातसर्वश्रेष्ठता, धर्मवर्चस्ववाद या दिशेनं निघणं अस्वस्थ करणारं आणि भयावह आहे.

- मेघना ढोके

..............

गुजरातमध्ये अमित शहा यांचे नाक कापले ही चांगली गोष्ट झाली, पण अहमद पटेल निवडून आले म्हणून आनंद मानण्यात काही अर्थ नाही. अहमद पटेल हे दहा जनपथसाठी पेटीखोका घेणारे काँग्रेसचे मधले एजंट होते। अमित शहा यांची तडीपारी फार जुनी नाही। तर अशा दोघांमधली ही लढाई होती। त्यात सत्तेच्या उन्मादाला तडाखा बसला।

- विजय चोरमारे

..............

इथे लेहमध्ये बरीच तरुण मंडळी बुलेट मोटर सायकल भाड्याने घेऊन भटकताना दिसतात, पण त्यातले 'मोटर सायकल डायरीज' लिहिणारे किती असतील? हा प्रश्न पडला आहे।

- महेश पवार

..............

मराठा मोर्चा निमित्ताने माझ्या ज्या मराठा मित्र मैत्रिणींना उगीचच (इच्छा नसतांना) त्याच्याशी निगडीत ग्रुप मध्ये अॅड केले गेले, किंवा मेसेजेस पाठवले गेले, फेसबुकवर टॅग केले गेले वगैरे त्यांच्यासाठी माझी ही एक जुनी कविता:

फोटोशॉप

मी म्हणालो, 'सहा डिसेंबरनंतर शिवाजी पार्क फार अस्वच्छ होते!'

ते म्हणाले, 'हं... पाठक ना तू...'

मी म्हणालो, 'फुलेंनी पहिली शाळा भिडे यांच्या वाड्यात काढली'

ते म्हणाले, 'शेणही तसलेच मारत होते, बरंका, पाठक'!

मी म्हणालो, 'पेशवाई बुडाली ती भाऊबंदकीने'

ते म्हणाले, 'अरे पाठक ना तू?'

मी म्हणालो, 'मी प्रथमेश'

ते म्हणाले, 'नमस्कार पाठक'

मी म्हणत गेलो वास्तव,

ते जोडत गेले त्याला अवास्तव...

मी नसतोच कधी जातीच्या कॅमेरातून काढलेल्या फोटोत,
पण
पूर्वग्रहदूषितांच्या फोटोशॉपच काय करू?

- प्रथमेश किशोर पाठक

जय जिजाऊ ! जय शिवराय !

..............

संघ विचारसरणीला कसून विरोध करणार्‍यांत केवळ लालू प्रसाद यादव हा एकच नेता आजमितीला प्रामाणिक राहिला आहे. कितीही भ्रष्ट असला तरीही हे निर्विवाद आहे. राजदच्या जनाधारामुळेच महागठबंधन यशस्वी होऊ शकले होते. नितीशकुमारांचा स्वत:चा असा निवडून आणेल असा जनाधार नाही ही बाब त्यांच्या राजकारणातील सूरपारंब्या मोजताना लक्षात ठेवली पाहिजे.

- प्रशांत निल्कुंद

..............प्रतिक्रिया द्या1416 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर