रयोकान अन सम्राट.. मुल्ला अन गाढव.. रोमन परंपरा
शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७ मुकेश माचकर

बोधकथा, मुल्ला नसरुद्दीन कथा आणि मार्मिक विचार असा दमदार, कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून...

चोराला चांदणं देता आलं नाही म्हणून हळहळणारा रयोकान हा झेन साधू निबीड अरण्यात राहात होता. पशुपक्ष्यांच्या, वृक्षवल्लींच्या सहवासात.

एक सम्राट त्याचा भक्त होता. पण, तो भक्त कमी, सम्राट अधिक होता. त्यामुळे अधून मधून रयोकानला तद्दन निरुपयोगी अशा शाही भेटवस्तू पाठवायचा. पक्वान्नं, जडजवाहीर, रत्नमाणकं, मोहरा नि काय काय!

रयोकान ती तबकं पाहायचा, हसायचा आणि शाही दूतांकडे परत द्यायचा.

सम्राटाला फार वाईट वाटायचं. आपले गुरू आपली एकही भेटवस्तू कशी स्वीकारत नाहीत, याचं वैषम्य वाटायचं. एकदा त्याच्या प्रधानाने त्याला सांगितलं, महाराज, तुम्ही कधी रयोकानची झोपडी पाहिलीत का? तिथे एकही वस्तू नाहीये. संपूर्ण रिकामी आहे ती झोपडी. तो जंगलात राहतो. 
कंदमुळं, फळं खाऊन जगतो. त्याला ऐहिक गरजाच नाहीत. त्याच्या अंगावर फक्त एक कांबळ्याचा पोषाख असतो. तेवढीच त्याची संपत्ती. त्याला तुम्ही या वस्तू का पाठवता? त्याच्यासाठी निरुपयोगी आहेत त्या.

सम्राट एकदम चमकला. रयोकानला देण्याजोगी एक भेटवस्तू असू शकते, हे त्याच्या लक्षात आलं.

काही दिवसांनी सम्राट स्वत: तबक घेऊन रयोकानच्या झोपडीत हजर झाला.

रयोकान म्हणाला, तू काही हार मानत नाहीस. आता काय आणलंस?

सम्राटाने तबकावरचं वस्त्र दूर केलं. आत एक झगमगीत पोषाख होता. रंगबिरंगी, रत्नंमाणकंखडे जडवलेला, सोन्याचं जरीकाम केलेला. सम्राट म्हणाला, भगवन्, तुमच्याकडे फक्त एकच पोषाख आहे. तोही जाडाभरडा. किमान हा पोषाख तरी स्वीकारा.

सम्राट कधी सुधारत नाहीत, रयोकान म्हणाला, तुझ्या भावनेची मी कदर करतो. पण, इथे मी जंगली पशुपक्ष्यांमध्ये, झाडंवेलींमध्ये राहतो. इथे हा झगमगीत पोषाख, त्याची श्रीमंती दाखवू कोणाला? तिचं प्रदर्शन मांडता आलं, कौतुक झालं, तर तिचा उपयोग? इथे माकडंही हसतील मला या वेषात पाहून. अरे, मी कांबळं पांघरतो म्हणून मला आजही हे प्राणीपक्षी बुजतात, मला आपला मानत नाहीत. हे कांबळंही त्यागण्याच्या विचारात आहे मी. तू हा रंगबिरंगी पोषाख आणलास. इथल्या माझ्या निसर्गातले रंग बघ, पावसाच्या टपकत्या थेंबांमध्ये, दवामध्ये सूर्यप्रकाशाने आणलेली 
झळाळी बघ. त्या रत्नमाणकांपुढे हा पोषाख किती दरिद्री वाटेल, तूच विचार कर.

सम्राट नेहमीप्रमाणे द्यायला आला होता... आणि नेहमीप्रमाणे घेऊनच निघाला.

........................................

माजुद्दीनला काही कामासाठी मुल्ला नसरुद्दीनचं गाढव हवं होतं.

मुल्लाला ते त्याला द्यायची इच्छा नव्हती. म्हणूनच माजुद्दीनने जेव्हा मुल्लाला थोड्या वेळासाठी गाढव मागितलं, तेव्हा मुल्ला मानभावीपणे म्हणाला, अरे, मला काल बोलायचं होतंस ना? ते फक्रुद्दिनला दिलं नसतं आज. सकाळीच घेऊन गेला तो. एरवी माझं गाढव ते तुझंच की. ते न्यायला परवानगी कशाला विचारायला हवी?

मुल्ला हे बोलत असताना नेमकं गाढव आतून खिंकाळलं.

ते ऐकून माजुद्दीन म्हणाला, आतून गाढवाचा आवाज आला की रे. तू खोटं बोलतोयस धडधडीत.

मुल्ला म्हणाला, कलियुग कलियुग म्हणतात ते हेच असावं. इथे माझ्यासारखा माणूस सांगतोय, एक मुल्ला सांगतोय, त्यावर तुझा विश्वास नाही आणि एका गाढवावर विश्वास ठेवतोयस?

.........................................

प्राचीन काळात रोममध्ये एक विलक्षण परंपरा होती.

कोणीही जगज्जेता वीरपुरुष, योद्धा एखादी लढाई जिंकून, शत्रूला नेस्तनाबूत करून रोममध्ये परत यायचा, तेव्हा त्याचं वीरोचित भव्य स्वागत व्हायचं. सगळे रस्ते माणसांनी फुलून निघायचे. त्याच्या जयजयकाराच्या घोषणांनी आकाश दुमदुमून जायचं, त्याच्यावर सुंदर रमणींच्या सुकोलम हातांनी पुष्पवृष्टी केली जायची, लोक चीत्कारत असायचे, बेधुंद आरोळ्या ठोकत असायचे…

…अशा गर्वोन्नत करून टाकणाऱ्या वातावरणात सम्राटाच्या मागे एक नोकर, एक गुलाम सावलीसारखा चालत असायचा आणि तो त्याच्या कानात सांगायचा, या मूर्खांकडे लक्ष देऊ नका, या जयजयकाराला भुलू नका, या जनसागराच्या लाटांमध्ये फसू नका. सावध राहा, सावध राहा, नाहीतर वेडे व्हाल… वेडे व्हाल…

काही परंपरा आजही चालू असायला हव्या होत्या ना… सर्वत्र.

........................................

तुम्ही अमृततुल्य नियमित वाचता?

मग इथे प्रसिद्ध होणाऱ्या कथांपैकी निवडक १०० कथांचा अक्कलझाड हा दोन भागांचा पुस्तकसंच तुम्हाला नक्कीच आवडेल.

तो खरेदी करण्यासाठी ‘इंद्रायणी साहित्य, २७३, शनिवार पेठ, पुणे ३०’ येथे ०२०-२४४५८५९८ किंवा ०२०-२४४८१८६७ या क्रमांकावर किंवा ९३७१०४३७८१ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

हा संच पुढील ठिकाणी ऑनलाइनही उपलब्ध आहे. फक्त क्लिक करा आणि घरपोच मिळवा.

इंद्रायणी साहित्य: http://bit.ly/IndrayaniSahityaAkkalJhad

बुकगंगा: http://bit.ly/BookGangaAkkalJhad

अमेझॉन: http://bit.ly/AmazonAkkalJhadप्रतिक्रिया द्या1160 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर