रोझीपासून काल्पनिक रोझीपर्यंत
गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७ गायत्री चंदावरकर

'गाईड'च्या रोझीपासून सुरू झालेला हिंदी चित्रपटातील स्त्रीवादाचा प्रवास 'लिपस्टिक...'मधल्या काल्पनिक रोझीपर्यंत आलाय. या प्रवासाचा अधल्यामधल्या पल्ल्यांसह घेतलेला हा आढावा.  

“काटों से खिचके ये आंचल तोडके बंधन बांधी पायल” म्हणत नर्तकी रोझीने (वहिदा रहमान), पुरुषसत्ताक परंपरेला आणि जाचक व्यवस्थेला आव्हान दिलं ते ‘गाईड’ (१९६५) या चित्रपटातून. स्त्रीमुक्तीचा झंझावात खूप आधीच जगभर जरी सुरू झाला होता तरी हिंदी चित्रपट सृष्टीत तो कधी सुरु झाला होता, याचा शोध घ्यायला सुरुवात केली. फारसे संशोधन न करता, माहीत असलेल्या, मी पाहिलेल्या चित्रपटांतून स्त्रीमुक्तीवादी चित्रपटांचा अवकाश कधी सुरू झाला आणि कसा आहे हे जाणणं मला फारच इंटरेस्टिंग वाटलं आणि ते मी या लेखातून नोंदवते आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत स्त्रीमुक्तीवादी चित्रपटांची सुरुवात विजय आनंद यांच्या गाईडपासून झाली असे धरायला हरकत नसावी. तोपर्यंत अनेक उत्तम स्त्रीप्रधान भूमिका असणारे हिंदी चित्रपट येऊन गेले होते. त्यातील महत्त्वाचा चित्रपट म्हणजे मदर इंडिया (१९५७). मदर इंडिया या चित्रपटात एका अतिशय सक्षम आणि धीराच्या स्त्रीभोवती फिरणारा असला तरी रूढार्थाने त्याला स्त्रीमुक्तीवादी चित्रपट म्हणता येईल की नाही याबद्दल मी साशंक आहे. कारण त्यातील आई तिच्या गुंड मुलाला मारते आणि त्याने पळवून नेलेल्या मुलीला तिच्या वडलांकडे सुपूर्द करते. यात ती मुलाच्या पुरुषसत्ताक वृतीला ती आव्हान देते आणि त्याला ती त्याला गोळी घालते. मात्र ती व्यवस्थेला आव्हान देत नाही किंवा ती मोडू शकत नाही.

माझ्या मते, हिंदी चित्रपट सृष्टीतील स्त्रीवादाचा आणि पुरुषप्रधान संकृतीला आव्हान देण्याचा जो प्रवास सुरू होतो तो ‘गाईड’ (१९६५) मधील रोझी या नायिकेपासून तो अगदी अलीकडचा स्त्रीवादी चित्रपट ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा' (२०१७) मधील काल्पनिक रोझी पर्यंत येऊन पोचतो.

गाईडमधे मार्को नावाच्या नवऱ्याने मुस्कटदाबी केलेली, पिचलेली सुंदर रोझी (वहिदा रहमान), जी एक उत्तम नर्तकी आहे ,मात्र एका वारांगानेची मुलगी असल्याने तिला तिचा नवरादेखील मानाचे स्थान देत नाही. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करायला निघालेल्या रोझीला जीवनदान आणि स्फूर्ती देतो तो राजू गाईड. छळणाऱ्या आणि एका दुसऱ्या स्त्रीच्या नादाला लागलेल्या नवऱ्याला सोडून रोझी राजूचा आसरा स्वीकारते. पितृसत्ताक वातावरणात बंड करणारी ती हिंदी चित्रपटातील पहिली नायिका आहे. लोकापवाद आणि घरच्यांचा विरोध पत्करून तिची नृत्यकला राजू नावारूपास आणतो; ती स्टार बनते आणि त्याला दुर्दैवाचे दशावतार बघावे लागतात. गुंतागुंतीचे, दुर्दैवी आणि कारुण्याने ओथंबलेले कथानक, अप्रतिम संगीत आणि नायक-नायिकेचा अभिनय याने हा सिनेमा एक मैलाचा दगड न ठरला असता तरच नवल.

त्यानंतर माझ्या मते जवळजवळ दोन दशकं वाट बघावी लागली पुढचा स्त्रीमुक्ती वादी चित्रपट यायला. तो चित्रपट होता ‘अर्थ’ (१९८२) महेश भट यांनी दिग्दर्शित केलेला. यात पूजा (शबाना आझमी) नावाची बाई नवऱ्याला सोडते कारण त्याने दुसऱ्या एका स्त्रीशी कविता (स्मिता पाटील) संधान बांधले असते. स्वाभिमानी पूजा स्वत:च्या पायावर उभी रहाते, घरी काम करणाऱ्या सहकारी स्त्रीच्या गरजू मुलीला पोटच्या मुलीसारखे वाढवते आणि कुणाही पुरुषाच्या आधाराने जगायला नकार देते.

त्याच साली मराठीत, एक स्त्रीवादी चित्रपट आला आणि गाजला. त्याचं नाव उंबरठा! जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला. स्मिता पाटील यांची शुभा महाजन यांची भूमिका प्रचंड गाजली. परित्यक्ता स्त्रियांसाठी काम करत असताना, व्यवस्था आणि हितसंबंध जपणारे काही तिला अडचणीत आणतात. तिला तिचे काम सोडावे लागते. ती घरी परत येते तेव्हा तिला आपला नवरा हा दुसऱ्या स्त्रीबरोबर आहे हे लक्षात येते. तीही मग घराचा उंबरठा ओलांडते, तो कायमचाच!

त्यांनंतर आला तो ही एक कलात्मक आणि मैलाचा दगड ठरलेला ‘मिर्च मसाला’ (१९८७) केतन मेहता यांनी दिग्दर्शित केलेला. स्वातंत्र्यपूर्व काळात घडणारा हा सिनेमा. सुभेदार (नसिरुद्दीन शाह) नावाचा शेतसारा गोळा करणारा जाचक आणि बायकांवर डोळा असणारा लोचट माणूस. गावातील मुखियादेखील (सुरेश ओबेरॉय) त्याला घाबरतो. गावातले वातावरण जुनाट, बायकांना कसलीही मुभा, स्वातंत्र्य नसलेले. त्या शिक्षणापासून वंचित. कामी सुभेदाराची नजर तरुण, सुंदर आणि तेज असणाऱ्या सोनबाईवर (स्मिता पाटील) पडते. त्याच्यापासून पळण्यासाठी ती एका मसाला बनवणाऱ्या हवेलीत आसरा घेते. तेथील विश्वासू दरवान हवेलीचे दार बंद करतो आणि आत असणाऱ्या स्त्रियांना अभय देतो. इकडे सोनबाई मिळावी म्हणून सुभेदार मुखियावर दबाव आणतो. पंचायत ठरवते की गावतील इतर बायकांना कायमचे वाचवण्यासाठी सोनबाईने सुभेदाराला शरण जावे. ती नकार देते. इकडे मुखियाची बायको (दीप्ती नवल) आवाज उठवते- तवा-लाटणं घेऊन. सुभेदार हवेलीवर हल्ला करतो. सगळ्या बायका एकत्र येऊन तिखट-मिरचीच्या धुराळ्याचा हल्ला करतात सुभेदारावर. बायकांनी असे एकत्र येऊन एका जुलुमी माणसाला धडा शिकणारा हा पहिलाच चित्रपट!

त्यानंतर आला अरुणा राजे यांचा ‘रिहाई’ (१९८८). गुजरातमधील एक छोटे खेडे. इथे सगळ्या बायकाच आहेत. कारण घरातील पुरुष मंडळी देश-विदेशात गेली आहेत कमवायला आणि त्यांच्या येण्याचा पत्ताच नाही. एकटेपण, मिलनाची असोशी आणि इतर दुःखांनी ग्रासलेल्या या स्त्रिया. या परिस्थितीला गावातील पंचायतीचा प्रमुख बायकांनाच जबाबदार धरतो. जेव्हा मनसुख परत येतो तेव्हा त्या आनंदून जातात. मनसुख सुखी (नीना गुप्ता) आणि टाकु (हेमा मालिनी) दोघींशी अफेअर करतो. गावातील पुरुष आणि स्त्रियांची दांभिकता आणि दुटप्पी धोरण दाखवणारा हा चित्रपट समाजातील काही मूलभूत धारणा आणि धोरणांवर प्रश्न विचारतो. तसेच बायकांनाही सगळ्या बाबतीत समान संधी हवी हा मुद्दा अधोरेखित करतो.

१९९० मध्ये मराठी नाट्यसृष्टीत एक क्रांतिकारी नाटक आले. प्रशांत दळवी यांनी लिहिलेलं हे नाटक- ‘चारचौघी’ नावाचे. विवाहित पुरुषाबरोबर आलेल्या संबंधातून तीन मुलींना जन्म देणारी आई. स्वत: आणि मुलींना घेऊन सन्मानाने जगणारी. रूढार्थाने समाजमान्य नसलेले तिचे समर्थ पण जरा वेगळे कुटुंब आणि तिच्या तीन मुलींच्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांवर बेतलेले हे नाटक. बंडखोर आई. तिच्या पहिल्या दोन मुली समाजमान्य पद्धतीने लग्न करतात आणि राहतात. मात्र तिसरी तरुण मुलगी दोन मुलांच्या प्रेमात पडते आणि मला दोघांबरोबर राहायला आवडेल असा यक्षप्रश्न आणि धर्मसंकटात टाकणारा मुद्दा मांडते. स्त्रियांच्या बाबतीत समाजाने घालून दिलेल्या रूढी, परंपरा, मर्यादा आणि नैतिकतेला अनेक तडे देत काही मूलगामी प्रश्न उपस्थित करणारे हे नाटक अतिशय गाजले.

फुलन देवीवर १९९४ साली बॅण्डिट क्वीन नावाचा शेखर कपूर दिग्दर्शित हिंसक आणि हृदयद्रावक सिनेमा आला. खालच्या जातीची म्हणून तरुण फुलनवर वरच्या जातीच्या ठाकुरांकडून अनन्वित अत्याचार करण्यात येतात. तिने नकार दिला म्हणून तिला तडीपार करतात. चुलतभावाकडे काही दिवस राहून ती त्याचे घर सोडते. तडीपार होण्याचा आरोप रद्द करायला गेलेल्या फुलनला मारझोड होते आणि पोलीस ठाण्यात तिच्यावर बलात्कार होतो. पुढे या टोळीकडून त्या टोळीकडे असा तिचा प्रवास. त्यात अत्याचार. तिथेच तिला विक्रमकडून जरा प्रेमाचा ओलावा मिळतो पण तो मारला जातो. पुन्हा ठाकुरांची टोळी तिला पळवून आणते, अत्याचार करते आणि अक्षरशः नग्नावस्थेत तिची धिंड काढते. कारण काय तर आधी तिने त्यांच्या शरिरसुखाच्या मागण्या धुडकावल्या असतात म्हणून. त्रासलेली, छळाने चाळण झालेली फुलन पुन्हा भाऊ कैलाशच्या आसऱ्याला येते. तिथे तिला मानसिंग भेटतो. दुसऱ्या मोठ्या टोळीकडून शस्त्रे घेऊन ते नवीन टोळी उभी करतात. हळूहळू दस्यूसुंदरी (Bandit Queen) म्हणून तिचा लौकिक वाढतो. पुढे ती ठाकुरांच्या एका लग्नात जाऊन अतिशय violent बदला घेते. त्यामुळे देशभर तिची प्रसिद्धी होते आणि तिला सरकार पकडायचे ठरवते. चंबळ खोऱ्याची राणी असेलेली फुलन शरण जाते. मात्र त्याआधी तिच्या साथीदारांसाठी अभय मागते.

झुंडशाही आणि तिचे बळी हा विषय नवीन नाही. बिलासपुरमधील बायकांची स्थिती दाखवणारा प्रकाश झा यांचा ‘मृत्युदंड’ (१९९७). सामाजिक अन्याय आणि महिला म्हणून दडपशाही यावर भाष्य करणारा हा चित्रपट बायकांच्या परिस्थितीचं भीषण वास्तव दाखवतो. सुखी संसाराला ग्रहण लावणारा अत्याचारी, दारुडा आणि स्वार्थी नवरा घरादाराची वाताहत कशी करतो याचं करुण चित्र या सिनेमात आहे. मात्र या सगळ्या विपरीत परिस्थितीशी झगडणारी एक जबरदस्त स्त्री म्हणून माधुरी दीक्षित ने उत्तम काम केलं आहे.

लग्नाच्या नवऱ्यांनी जर रतिसुख नाकारलं तर बायकांनी काय करायचं असा प्रश्न विचारणारा Fire नावाचा दीपा मेहता यांनी दिग्दर्शित केलेला एक महत्त्वाचा चित्रपट १९९६/९७ साली आला. दोन भाऊ आणि त्यांच्या पिचलेल्या, खच्चीकरण करण्या आलेल्या बायका. पुरुषी वर्चस्वाचा अतिरेक असलेलं हे घर. शेवटी त्या दोघी एकमेकींच्या स्पर्शात, संबंधात मिळत नसलेले सुख शोधतात. घर सोडून निघून जाण्याचा पर्याय दाखवणारा हा चित्रपट. संस्कारी सेन्सॉर बोर्डाला घाम आणणारा, त्यांचा दांभिकपणा आणि double standards उघड करणारा हा मला वाटतं पहिला चित्रपट असावा. सेन्सॉर बोर्ड काय पण समाजातसुद्धा याने दोन तट पडले. या चित्रपटाची जाहीरपणे खिल्ली उडविण्यात आली, दुर्दैवाने.

पुरुषांने अनेक बायकांशी संबंध ठेवले तर ते समाजमान्य असतात. मात्र स्त्रीचा तोल ढळला तर तिला समाज माफ करत नाही तसेच तिच्या घरचेही तिला स्थान देत नाहीत हे अन्यायी वास्तव दाखवणारा महेश मांजरेकर यांचा ‘अस्तित्व’ (२०००) हा चित्रपट. स्वतःच्या करिअर मध्ये रमलेला नवरा श्रीकांत (सचिन खेडेकर). बायकोने (अदितीने) नोकरी करू नये पण छंद जोपासावेत म्हणून तिला संगीत शिकायला प्रोत्साहन देतो. एकटेपणाला आणि रतिसुखाच्या अभावाला कंटाळलेल्या अदितीचा संयम मनाच्या एका नाजूक अवस्थेत सुटतो. तिला संगीत शिकवणाऱ्या मल्हार कामत यांच्यापासून तिला दिवस जातात. तिला हे सगळं सांगायची संधीच मिळत नाही. २५ वर्षांनी ती मिळते जेव्हा मल्हारने सगळी संपत्ती तिच्या नावे केली असते. श्रीकांत संतापतो आणि मुलगाही आपले वडील कुणीतरी दुसरेच आहेत हे वास्तव स्वीकारू शकत नाहीत. ती दोघांना कळकळीने विचारते ते तिच्या आयुष्यातील एका नाजूक क्षणी आलेला परपुरुषाशी संबंध हा व्यभिचार ठरतो पण तेच एका पुरुषाने असे केले तर तो व्यभिचार ठरत नाही असे का? तिच्या श्रीकांतवरील प्रेमाची कबुली देत ती त्याचे घर कायमचे सोडते.

लग्नाळू मुलीने अगदी संस्कारी मुलीसारखे वागावे या नियमाला तडा देणारा हा ‘तनु वेड्स मनु’ (२०११) हा आनंद राय यांचा चित्रपट. तनु (कंगना राणावत) या बिनधास्त मुलीचा बॉयफ्रेंड आहे आणि तो तिला बघायला येणाऱ्यात मुलावर मनुवर (आर. माधवन) गुंड सोडतो. पुढे अनेक विनोदी आणि थोडसे धक्के देत, वळणे घेत हा चित्रपट शेवटी तनु आणि मनुचं लग्न दाखवतो. लग्न ठरताना मुलगा-मुलगी यांच्याकडील लोकांचे दृष्टीकोन, त्यांचं पुरुषप्रधान संस्कृती लादणारं वागणं आणि एकंदरीत तसेच लग्न संस्थेवर विशेषत: त्यातील व्यवहाराचा दांभिकपणा, दुटप्पीपणा आणि अन्याय यावर खमंग टीका आणि त्याचा उपहास करणारा हा चित्रपट एक मैलाचा दगड नक्कीच आहे.

लग्न ऑलमॉस्ट लागताना ऐनवेळी नवऱ्यामुलाने नकार दिला तर रूढार्थाने मुलीला बोल लावला जातो आणि तिच्यावर ‘नाकारलेली’ असा एक शिक्का बसतो. मात्र तसं काही वाटून न घेता, मुलगी- राणी (कंगना राणावत) तिच्या आवडत्या पॅरिस या शहरात एकटीच हनिमूनला जाते अशी भन्नाट कथा असणारा हा तरुण मुलींना आत्मिक बळ देणारा आणि त्यांचे सक्षमीकरण करणारा, क्वीन हा विकास बहल यांचा चित्रपट. एका बुजऱ्या, आत्मविश्वास नसलेल्या मुलीचे एका सुंदर, आत्मनिर्भर मुलीमध्ये रुपांतर या प्रवासात दाखवणारा हा रम्य चित्रपट. तिचा जरा बोल्ड फोटो ती चुकून तिच्या नकार देणाऱ्या नवऱ्याला पाठवते आणि तो बदलतो. तिला परदेशात भेटायला येऊन लग्नाची गळ घालतो. भारतात परत येऊन ती त्याला नकार देते. ठरलेले लग्न मोडले म्हणून काही बिघडत नाही, उलट आत्मनिर्भर व्हा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास सुरु करा असा संदेश देणारा हा चित्रपट खूपच गाजला.

२०१४ साली ‘हायवे’ नावाचा असाच एक मुलींना आत्मविश्वास देणारा चित्रपट आला. एका श्रीमंत मुलीला पळवून नेणारा माणूस. त्याच्या सहवासात तिला कधीही न मिळालेलं स्वातंत्र्य अनुभवते. त्याला, ती तिच्यावर तिच्या काकानेच केलेले अत्याचार सांगते आणि तोही तिला त्याच्या वडलांनी केलेला अन्याय सांगतो. हळूहळू ते प्रेमात पडतात पण नियतीला ते मान्य नसतं. घरचे तिला परत आणतात. काकांना ती जाब विचारते आणि घरातून बाहेर पडते. होणाऱ्या नवऱ्याला नाकारून आणि तिच्या स्वप्नातील डोंगरावरील घरात राहायला जाते, कायमची.

राजस्थानातील एका छोट्या खेड्यातील, व्यवस्थेत पिचलेल्या तीन तरुण बायका-विधवा राणी (तन्निष्ठा चटर्जी), तथाकथित वांझ लज्जो (राधिका आपटे) आणि वारांगना बिजली (सुरवीन चावला) यांच्या मुक्तीची ही अतिशय संवेदनक्षम, धारदार आणि सार्मथ्यपूर्ण कथा दाखवणारा लीना यादवांचा ‘पार्च्ड’ (२०१५) . तिघीही पुरुषप्रधान संस्कृतीच्या बळी. तिघीही पिचलेल्या, त्यांच्या आयुष्यातील पुरुषांचा अन्याय सहन करणाऱ्या. तिघीही पुरुषांच्या जाचाविरुद्ध एकमेकींच्या मदतीने बंड करतात आणि चक्क गावातून निघून जातात त्याची ही हृद्य कथा सांगणारा हा चित्रपट त्यातिघींची खरीखुरी मुक्ती दाखवतो म्हणून फार महत्वाचा आहे.

‘पिंक’ (२०१६) या अनिरुद्ध रॉयचौधरी यांच्या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांनी वकिलाच्या भूमिकेतून बायकांच्या होणाऱ्या पुरुषप्रधान व्यवस्थेत होणाऱ्या मुस्कटदाबीवर, जाचक-अन्यायी नियमांवर आणि आक्षेपार्ह दृष्टिकोनावर कोरडे ओढले आहेत आणि ती परिस्थिती सुधारावी महणून काही नियमही सुचवले आहेत. तीन तरुण, नोकरी करणाऱ्या आधुनिक मुलींची ही कथा. रात्री एका रेस्तोरौमधे काही मुलांशी मोकळेपणी बोलणाऱ्या, ड्रिंक्स घेणाऱ्या या मुलींचा, जेव्हा ती मुलेच गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यातील एक मुलगी एका मुलावर हल्ला करते, तो जखमी होतो आणि त्यांना कुठल्या अग्निदिव्यातून जावे लागते यावर हा सिनेमा आहे. मुलींचे, स्त्रियांचे नाकारलेले अधिकार आणि त्यांच्यावर ठेवला जाणारा ठपका यावर हा चित्रपट आहे. हा चित्रपट लोकप्रिय झालाच पण बरीच जागृती त्याने केली असे म्हणायला हरकत नाही.

नुकताच आलेला, अलंकृता श्रीवास्तव यांचा हृदयद्रावक लिपस्टिक अंडर माय बुरखा (२०१७). सगळा समाज दांभिक आहेच. मात्र पुरुषप्रधान संस्कृतीत अनेक अधिकार आणि स्वातंत्र्य नाकारले गेलेल्या स्त्रिया ‘बुरखा’ (façade) पांघरून त्यांना जे हवं आहे ते मिळवत असतात, मात्र ते उघडकीस आल्यावर पुरुषप्रधान व्यवस्था त्यांना दोषी ठरवून पुन्हा त्याच चाकोरीत, चरकात (नरकात?) कशी पाठवते या विषयावरील हा सुन्न करणारा कारुण्यपूर्ण सिनेमा.

या चित्रपटात ‘रोझी’ नावाचे काल्पनिक पात्र आहे. तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्ने, रतीसुखाची असोशी आणि fantacies या चित्रपटातील सूत्रधाराच्या भूमिकेत आहे. यातील नायिका अगदी “चारचौघीं” सारख्या आहेत. आहेत ५५ वर्षांच्या विधवा बुआजी – उषा, शिरीन अस्लम नावाची टॅलेण्टेड सेल्सलेडी, लीला नावाची ब्युटिशियन आणि रिहाना अबिदी नावाची रॉक सिंगर होऊ पाहणारी एक कॉलेजकन्या. चौघीही दांभिक आहेत कारण त्या समाजातील ‘याच’ व्यवस्थेचा एक भाग आहेत. त्यामुळेच बुरख्याआड त्या आपल्याला हवे ते करत आहेत कारण त्यांना समाजव्यवस्था ते उजळ माथ्याने करू देत नाही. काल्पनिक रोझीच्या निवेदनातून या चारचौघींच्या इच्छा, आकांशा, स्वप्ने आणि असोशी समजते. लैंगिक गरज ही तर नर आणि मादी यांची basic instinct आहे. मात्र या चित्रपटात, ती उषाला नाकारली जाते, शिरीनवर रोज नवरा अत्याचार करतो तर लीला तिच्या प्रियकराकरून ते सुख मिळवत असते. पुढे यावरून, या तिघींचा ढवळून काढणारा संघर्ष आपण बघतो आणि शेवटी पुरुषप्रधान व्यवस्थेतील त्यांची असहायता, मुस्कटदाबी चटका लावून जाते.

'पिंक'प्रमाणेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी झाला. त्यामुळे समाजमनात चांगला बदल होईल, अशी आशा ठेवायला हरकत नाही. मात्र पार्च्डसारखा खरी मुक्ती दाखवणारा path breaking चित्रपट मात्र फारसा गाजला नाही.

खरे तर, गाईडमधील रोझीपासून सुरू झालेला आणि काल्पनिक रोझीपर्यंत पोहोचणारा हा चित्रपटातील प्रवास, बायकांचं तहानलेपण, पीडित स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार आणि सगळ्या प्रकारच्या मुस्कटदाबी दाखवतात. त्यांचे दाहक, पीडित आणि हृदयद्रावक वास्तव दाखवतात. अजूनही स्त्री एक भोग्य वस्तू मानणारी तसेच तिचे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचे अधिकार नाकारणारी आपली व्यवस्था यावर हे सगळे चित्रपट भाष्य करतात. पुरुषी अन्याय, अत्याचार, मुस्कटदाबीशी निकराने केलेला संघर्ष; तसेच मुक्ती आणि अधिकार मागणारे हे सगळे अतिशय संवेदनशील तसेच अंतर्मुख करणारे हे चित्रपट आहेत. स्त्रियांच्या लैंगिक गरजा, त्यांची प्रेमाची, सुसंकृत संवादाची, सन्मानाने जगणायची गरज आणि भूक तसेच त्याचं व्यक्तीस्वातंत्र्य हे चित्रपट अधोरेखित करतात.

चित्रपट हेही समाजाचा, व्यवस्थेचा भाग आहेत आणि ते यांचा आरसाही आहेत. यातील काही चित्रपट हे अनेक त्रासदायक, अन्यायकारक बाजूही दाखवतात. ते चांगलेच आहे. सामाजिक-राजकीय-मानसिक घुसळण सुरू आहे. त्यातून अनेक जाचक, रूढी आणि परंपरांना तडे जातात आहेत किवा त्या गळून पडतात आहेत. अनेक चांगले बदल होतात आहेत.

खरे तर स्त्री हे शक्तीचं रूप आणि पुरुष हे शिवाचं, दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. समान हक्क, अधिकार, सांमजस्य, आनंद आणि चांगुलपणा यात खरे तर हे नाते फुलायला, बहरायला हवे. सुरुवात तर झालेली आहे मात्र अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे.

 प्रतिक्रिया द्या1674 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
shoeb sayed - शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७
मला लिपस्टिक उंडर हा चित्रपट आवडला. उगाचच आमचे मुस्लीम बांधव विरोध करीत होते. खूपच छान चित्रपट आहे
Chaitanya Kale - गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७
Should have been in detail alas film Lajja of Madhuri Dixit and Pinjar are worth mentioning
Pallavi - गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७
Awesome and path taking article

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर