मराठा समाजाचा भरकटलेला लढा
गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७ विशाल बागल

सुरुवातीला ऐतिहासिक भासणा-या मराठा मोर्च्यातून काहीच हाती का आलं नाही? आक्रमक वाटणारी समिती मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मवाळ का झाली? एका मोर्चेक-याला पडलेले प्रश्नं..

मागील वर्षभर महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधे मराठा क्रांती मोर्चे निघाले. या सर्व मोर्चांची फायनल मुंबईत होणार होती. वर्षभर मीडियामधून, मित्रमंडळींकडून या मोर्चाबद्दल बरंच ऐकून असल्यामुळे या मोर्चामधे सामील होण्याची इच्छाही होतीच. त्यातच मोर्चा घराच्या अगदी जवळून सुरू होणार होता. त्यामुळे सुटी टाकून आज सकाळी चार मित्रांसोबत मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलो.

मोर्चा सुरू झाला. रस्त्यावर जिकडे नजर जाईल तिकडे फक्त भगवे झेंडेच दिसत होते. वातावरण संपूर्णपणे भारावलेलं होतं. आपण एखाद्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत अशी साधारण भावना सर्वांमधे जाणवत होती. जागोजागी मोर्चेकऱ्यांसाठी पाण्याची/नाश्त्याची सोय विविध संस्थांद्वारे केली होती. यामधे अनेक मुस्लिम संघटना आघाडीवर होत्या. मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर सर्व राजकीय पक्षांनी पाठिंब्याचे/स्वागताचे बॅनर लावले होते. परंतु मोर्चाला सुरुवात होण्याआधीच मराठा समन्वयकांनी या बॅनरवरील नेत्यांचा उल्लेख फाडून टाकला होता. ही गोष्ट बऱ्यापैकी आश्वासक वाटली. शांतपणे मूकमोर्चा मार्गक्रमण करत होता. मधूनच काही युवकांचा समूह घोषणा देण्याचा प्रयत्न करत होता. मोर्चातील इतर सहभागी त्यांना शांत राहण्याची सूचना देत होते. दुपारी एकच्या सुमारास आझाद मैदानातील सभेला सुरुवात झाली. सभेला सुरुवात झाली तरी तिकडे भायखळ्याला आणखी मराठा बांधव मोर्चामधे सामील होतच होते. भायखळा ते आझाद मैदान हा मार्ग अद्यापही मोर्चेकऱ्यांनी भरलेला होता.

मराठा युवतींची आक्रमक भाषणे सुरू झाली. मोर्चाच्या मार्गावर लाऊड स्पीकरद्वारे ही भाषणे ऐकण्याची सोय करण्यात आली होती. उपस्थितांकडून या भाषणांना जोरदार प्रतिसाद मिळत होता. आझाद मैदान- सीएसटीचा संपूर्ण परिसर भगवा झाला होता. याआधी इतकी गर्दी या परिसराने अपवादानेच अनुभवली असावी. दुपारी दोन वाजता एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. भाषणे सुरूच होती. अडीच-पावणेतीन वाजता आम्ही सर्व मित्र आझाद मैदानाहून निघालो आणि सीएसटीला आलो. संपूर्ण स्टेशन मोर्चेकऱ्यांनी भरून गेले होते. ट्रेन पकडून आम्ही घरी निघालो. आझाद मैदान आणि परिसरात अजून तितकीच गर्दी होती. एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार बनून दुपारी साडेतीन वाजता घरी पोहोचलो.

मोर्चावरून घरी आलो. टीव्हीवर मोर्चाचे अपडेट्स घेतच होतो. सरकार मागण्या मान्य करत नाहीये अशा काही बातम्या फ्लॅश होत होत्या. तिकडे विधिमंडळात या विषयावर गरमागरमी सुरू होती. आझाद मैदानावरील मंडळी सरकारच्या अधिकृत निवेदनाची वाट पाहत होते. व्यासपीठावर युवतींची भाषणे सुरू होती. अचानक भाजपचे खासदार संभाजीराजे मंचावर आले आणि माईकचा ताबा घेतला. राजकीय मंडळी मंचावर आल्याने गर्दीमधे गोंधळ सुरू झाला. तशातच संभाजीराजांनी सरकारने अधिकांश मागण्या मान्य केल्याची घोषणा केली आणि त्याची माहिती देण्यासाठी माईक पुन्हा मंचावरील युवतींकडे दिला. (संभाजीराजे अजूनही व्यासपीठावर उपस्थित होते.) या युवतींनी सरकारने अधिकांश मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले. राष्ट्रगीताने मोर्चाची समाप्ती झाली.

यादरम्यान पुन्हा मी सकाळपासूनचा घटनाक्रम आठवू लागलो. मोर्चामधे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज सामील झाला होता. या मोर्चामधून समाजाच्या हाती भरभरून काहीतरी लागेल अशी अपेक्षा या सर्वांनाच होती. प्रत्यक्षात या मोर्चाविषयीची चर्चा मराठा आरक्षण या विषयावरच केंद्रित केल्याचे जाणवत होते. परंतु ती सत्यपरिस्थिती नव्हती. शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिकाला हमीभाव या अतिशय महत्त्वाच्या मागण्या मोर्चेकऱ्यांच्या होत्या ज्यावर म्हणावी तशी चर्चा झालीच नाही आणि फडणवीसांनी त्यांची खासियत असलेले "गाजर" मोर्चेकऱ्यांना दिले. सर्वाधिक आश्चर्य वाटते ते संयोजन समितीचे. मोर्चाच्या सुरुवातीला अतिशय अग्रेसिव असलेली संयोजन समिती मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर इतकी मवाळ का झाली असावी. प्रत्यक्षात मोर्चेकऱ्यांची एकही मागणी पूर्णपणे मान्य झाली नसतानाही संयोजन समितीने तसे का जाहीर केले या प्रश्नावर येणाऱ्या दिवसांमधे चर्चा होईलच. सरकारने मराठा मोर्चा सध्यातरी पद्धतशीरपणे गुंडाळला आहे. यातून कोणताही ठोस निर्णय समाजाच्या हाती आलेला नाहीये. या मोर्चाद्वारे सरकारच विरोधकांची स्पेस स्वत: ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी शंका सतत मनात येते. जी गत शेतकरी संपाची झाली तीच गत मराठा मोर्चाची होत आहे.

मराठा समाजाला जर खरंच हा लढा पुढे न्यायची इच्छा असेल, तर संयोजन समितीचं जोखड खांद्यावरून फेकून देण्याची गरज आहे. या लढ्याला गरज आहे चेहऱ्याची. (उदा. हार्दिक पटेल) अशा चेहऱ्याची ज्याची पार्श्वभूमी, राजकीय भूमिका जगजाहीर असेल. ज्याच्या आडून कुणालाही आपले छुपे अजेंडे राबवता येणार नाहीत. सध्यातरी मराठा समाजाचा हा लढा भरकटला आहे किंवा जाणीवपूर्वक भरकटवला जात आहे. जितक्या लवकर या लढ्याला निश्चित नेता आणि कार्यक्रम मिळेल त्यावर या लढ्याचे यशापयश अवलंबून असेल.

 प्रतिक्रिया द्या1485 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
ravindra malsare - गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७
"मोठा हत्ती दाखवून सर्कशीचा खेळ संपवला जातो"...अशी एक प्रचलित म्हण कोल्हापुरात प्रसिद्ध आहे असे म्हणतात....मुंबईच्या मराठा मोर्चाबाबत असेच काही घडले नसावे ना ? याचे उत्तर आगामी काळात 'फडणवीस नीतीच' देऊ शकेल.

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर