फेबुगिरी
गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७ टीम बिगुल

ताज्या घडामोडींबाबत किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्यक्त होणा-यांची संख्या मोठी आहे. यातल्या काही निवडक खास पोस्ट्स ‘बिगुल’च्या वाचकांसाठी...

1. संख्येने एकत्र आल्याने मुद्द्याची वैधता बदलत नाही.
2. ठरवून, मोठ्या संख्येने मोर्चा काढण्यामुळे रस्ता अडवला जाणे हा वाहनचालकांच्या संचार स्वातंत्र्याचा अधिक्षेपही आहे.

हे आक्षेप मराठा मोर्चाविषयी खरे आहेत तसेच ते विज्ञान मोर्चाविषयीही खरे आहेत.

विज्ञान मोर्चाच्या मागण्यांमध्येही, संशोधन आणि शिक्षणावरील अर्थसंकल्पीय तरतूद वाढवण्याची मागणी थोडी विचित्र आहे, आयोजकांच्या व्यावसायिक फायद्याची आहे, नेमके किती टक्के खर्च संशोधनावर करणे रास्त आहे ते ठरवणे अवघड आहे. 'शासकीय धोरणे विज्ञानाला अनुसरून असावीत' आणि 'अवैज्ञानिक संकल्पनांना विज्ञानाच्या नावाखाली प्रोत्साहन मिळण्यास आळा घालावा' या मागण्या महत्त्वाच्या आहेतच. परंतु, सध्याचे सरकार या अपेक्षांची कशी पायमल्ली करते ते सोदाहरण दाखवल्याशिवाय या मागण्या पोकळ बुडबुडे राहतील. कोणतेच सरकार 'आम्ही विज्ञानविरोधी आहोत' असे अभिमानाने सांगत नाही. मुळात, ट्रंप सरकारच्या ढोंगी आणि लोकानुनयी धोरणांना विरोध म्हणून सुरू झालेले मोर्चे अर्थातच भारतात मोदी सरकारच्या धार्मिकतेविरुद्ध असायला हवेत. त्याऐवजी, आयोजक बोटचेपी आणि मोघम भूमिका घेऊन हा मोर्चा 'अ-राजकीय' असल्याचे सांगत आहेत. आयोजकांपैकी अनेक सरकारी नोकरीत असावेत. ब्रेकथ्रू इंडिया या संस्थेच्या काही भूमिका (उदा., जीएम मोहरीला विरोध) संशयास्पदही आहेत.

तरीही मी बंगलोर येथील विज्ञान मोर्चाला उपस्थित राहतो आहे. माझ्यावर तटस्थतेचा आरोप होऊ नये, म्हणून.

- निखिल जोशी

.............

इतिहासातून मुघल काढले तर मग... 
शिवाजी महाराज कोणाच्या विरोधात लढले?
काँग्रेसच्या?

- समीर सामंत

.............

इतिहासातला भूतकाळ कितीही ठरवले तरी बदलता येत नाही! कारण काळ एकदिशीय असतो!

- राजन साने

.............

बऱ्याच अमराठी मित्रमैत्रिणींना आजचा मोर्चा म्हणजे नेमकं कायेय, कशासाठीय, ते कळेना झालंय. कसं समजवावं बरं? मुळात मराठा आणि मराठी यातलाच फरक कळत नाहीये त्यांना.

- मृण्मयी रानडे

.............

एका दृष्टीने पाहता सगळेच राजे, सम्राट, सुलतान, बादशहा लुटारू. मुसलमान असणे, यापेक्षा वेगळ्या कोणत्या मुद्दयावरून मोगलांना वेगळं काढता येईल?

मराठ्यांचा दरारा भारतभर होता पण मराठे 'बाहेरच्या' प्रदेशाला 'दौलत' म्हणत. जी लुटून आणायची. बंगाल आणि ओरिसा प्रांतात आक्रमक मराठे हे लुटारू, अत्याचारी, बलात्कारी म्हणून प्रसिद्ध होते. पेशव्यांनी कधीही उर्वरित भारताला आपलं मानलं नाही. मोगलांनी किमान लहानमोठे अधिकारी नेमून कारभाराची जबाबदारी घेतली.

तरी मोगल लुटारू! असं म्हणण्यात केवळ द्वेष व्यक्त होतो.

- हेमंत कर्णिक

.............

#मराठामोर्चा 

मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेपेक्षा 
फेसबुकवरील (विरोधी) मत-मतांतरं 
अधिक अर्थपूर्ण आहेत!

- कीर्तीकुमार शिंदे

.............

हनुमान

त्याची गदा होती प्लॅस्टिकची
मुकूट होता प्लॅस्टिकचा
शेपटी होती प्लॅस्टिकची
चड्डी होती नायलॉनची
पाय होते अनवाणी
अंग होतं रापलेलं
तोंडाला होता चमचमणारा रंग
त्या अंजनीनं दाखवला होता सूर्य
ही अंजनी दाखवत होती बोट
सिग्नलला थांबलेल्या गाडीकडे
पदराखाली बाळ घेऊन 
हाही होता तितकाच उत्साही
हाही मारत होता उड्या
या गाडीसमोरून त्या गाडीसमोर
आपटत होता गदा रस्त्यावर 
आणि कारच्या बंद खिडकीच्या काचेवर 
छातीवर चिकटवला होता राम
मनात होता की नाही रामालाच ठावूक
एका हातात होती प्लॅस्टिकची गदा
दुसरा हात पसरला होता
भिक मागण्यासाठी !

- चिन्मय पाटणकर

..............

मराठा मोर्चा हा जातीचा नाही किंवा कोणत्याही जातीविरोधात नाही.

मराठा समाजातील बहुतांश वर्ग हा शेतकरी आहे, एकीकडे शेती उद्योगातून येणारी दुर्बलता आणि दुसरीकडे प्रचंड पटीने महाग झालेले शिक्षण व त्यानंतरही बेरोजगारी... ही अस्वस्थतेची मुख्य कारणे आहेत. यामुळे तरुण-तरुणींची घुसमट होतेय.

राहिला मुद्दा कोपर्डीचा, कोणत्याही जातीतील मुलीवरचा/बाईवरचा अत्याचार खपवून घेतला जाऊच शकत नाही...

त्यामुळे या मोर्चाला पाठिंबा...

शांततेच्या मार्गाने इतक्या मोठ्या प्रमाणात काढलेल्या मोर्चाचे कौतुक...

- सोनाली शिंदे

.............

जातींना ‘समाज’ 
व प्रतिष्ठेच्या प्रश्नांना ‘सामाजिक’ प्रश्न 
म्हणणे बंद केले पाहिजे

- राजीव साने

.............

काल डॉ. भीमराव गस्तींच्या घरी त्यांचे विविध पुरस्कार आणि मानपत्रं बघत होते.एका स्मृती चिन्हावर लिहिलं होतं "आम्ही तुम्हाला गौतम बुद्धांपेक्षा जास्त महत्त्वाचे मानतो. कारण तिथे ऐश्वर्यातून आलेलं वैराग्य होतं आणि तुम्ही पिढ्यान पिढ्या आलेलं दारिद्रय आता संपेल आणि संपन्नता येण्याची शक्यता आहे अशा क्षणी सगळ्याकडे पाठ फिरवून बेरड समाजासाठी, देवदासींसाठी वंचितांसाठी दुःखितांसाठी लढत राहिलात. त्यांच्यासाठी जिवाचं रान केलंत."
माझ्या डोळ्यासमोर एक वाचलेला प्रसंग उभा राहिला. (डॉक्टरेट असूनही मशीनवर कपडे शिवून ते चरितार्थ चालवत.) एकदा संघटनेची मीटिंग आटपून ते दुपारी घरी आले तर घरी काहीही खायला नव्हतं. शेजारी भावांच्या घरीही काय मिळालं नाही. बायको आठवडा बाजाराला काही किडुक मिडुक विकायला घेऊन गेली होती. पाणी पिवून तिची वाट बघत बसले. ती आल्यावर तिच्या बुट्टीतली भजी आणि चुरमुरे खाल्ल्यावर जिवात जीव आला. मग मशीन वर कपडे शिवायला बसले.
कपडे बेतून शिवणारा हा माणूस बेतलेलं आयुष्य जगला नाही. संघर्षाची वाट चोखाळत गेला.

- सई लळित

..............

मंदिरही 'तिथेच' नको...
***************

आता परीक्षेची वेळ कट्टर हिंदुत्ववाद्यांची आहे. अनेक लोक समजतात की भाजपाने राममंदिराचा मुद्दा केला तो सत्तेसाठी. ती प्राप्त झाली आहे. तो उद्देश असेल तर, साध्य झाला. देशावर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्यांचे राज्य आले, जिकडे तिकडे भगवा पसरला.

दुसरा उद्देश पाचशे वर्षांपूर्वीच्या आपल्याच दुर्बलतेने ओढविलेल्या पराभवाचा सूड घेण्याचा. ते दुःख कमी करण्याचा उपाय म्हणजे आपण मुस्लिमांना नमविणे. लोकसत्तेची ही आताची बातमी पाहिलीत तर मुस्लिम नमले असे म्हणता येईल.

मी म्हणेन की मुस्लिमांनी काळवेळ ओळखली आहे आणि मनाचा मोठेपणा दाखविला आहे. आता परीक्षा त्यांची आहे ज्यांनी हा लढा दिला. त्यांना कळावे की आपल्याला हवे ते मिळाले - आता आपणही थांबू या.

आता हिंदूंनी म्हटले पाहिजे की ...

आम्हाला 'त्याच जागी' राममंदिर नको. तुमची मशीद तुम्ही तुम्हाला हवी तिकडे बांधा - आम्हाला हवे तसे राममंदिर आम्हीही दुसरीकडे बांधू.

आता आमचा तुमच्यावर राग नाही. झाले गेले विसरून जाऊ आणि हा देश पुढे नेऊ.

असे न म्हणतील तर हिंदू या प्रकारात असे हरतील की त्याची भरपाई कधीही कशानेही होणार नाही!

- राजेंद्र मधुकर मणेरीकर

.............

गचांडी धरून अखेर त्यांनी स्वत:ला मागास ठरवण्याकडे एक पाऊल टाकलं! ज्या देशातील ८०% लोकांची मागास ठरणे हीच महत्त्वाकांक्षा असते तो महासत्ता होणार!

- अरुण ठाकूर

..............................

आदरणीय आगरकर,

पाचवी सहावीत असताना कधीतरी तुमचा एक लेख वाचला होता मराठीच्या पुस्तकात- 'आमचे ग्रहण अजून सुटले नाही' नावाचा! अंधश्रद्धेवर घणाघात करणारे तुमचे शब्द , मेंदूला झिणझिण्या आणणारे! काय गरज होती हे सगळं लिहून बुद्धिप्रामाण्याचे हे अगम्य थोतांड आमच्या सडक्या मेंदूत उतरवायची? आम्ही इतके निर्बुद्ध आहोत की १८८८ पासून तुम्ही जिवाच्या आकांताने ओरडत आहात अंधश्रद्धा सोडा म्हणून आणि आज ७ ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी एक वाजता ग्रहणाचा सुतक काळ सुरू झाला, म्हणून फ्लॅट संस्कृतीतल्या पांढरपेशा मॉमपासून शेतात राबणाऱ्या आयांपर्यंत आमच्या सगळ्या बायकांनी आपापल्या गर्भार पोरीसुनांना एक जागी बसवून ठेवलंय- हालायचं नाही, झोपायचं नाही, पाणीदेखील प्यायचं नाही. dehydration होऊन गर्भाला नि आपल्याला त्रास होऊ शकतो, इतकाही common sense नसणाऱ्या आणि स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या आमच्यासारख्या निर्बुद्धांना सुधरवायला निघाला होतात तुम्ही! आगरकर, तुम्ही चुकलात! आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा या विषयावर लोकमान्यांशी वाद घालून चुकलात तुम्ही! लिंबूमिरची, आडव्या गेलेल्या मांजरात अडकलेल्या आणि अजूनही गोमूत्रात औषध शोधणाऱ्या आमच्याकडून सुधारण्याची अपेक्षा केलीत तुम्ही. इथेच चुकलात. 'सत्यम ब्रूयात , प्रियं ब्रूयात, न ब्रूयात सत्यमपि अप्रियम्।' ही आपली संस्कृती विसरलात तुम्ही. लोकांना अप्रिय असलेलं सत्य बोलू नये इतकं साधं गणितही कळालं नाही तुम्हाला? Consent age चा मुद्दा घेऊन भांडलात सर्वांशी. स्त्रियांच्या पोशाखावर logical आणि rational बोललात; पण माणसाचा पेहराव बदलला तरी मेंदूतल्या टाकाऊ कल्पना बुद्धिरंजनानेही बदलत नाहीत हे सत्य तुम्ही जाणलं नाही. "द्रष्टा" म्हणतात माझ्यासारखी काही वेडी लोकं तुम्हाला. १८८८पासून मृत्यूशय्येवर जाईपर्यंत जे काही तुम्ही लिहिलं, आज तुम्ही असता तर थोड्याफार फरकाने तेच लिहावं लागलं असत तुम्हाला! मग सांगा कुठं गेलं तुमचं द्रष्टेपण? विचारकलह हा समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक आहे असं म्हणायचात तुम्ही; पण तुम्ही हे नाही मान्य केलं की विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येतो, यावर विश्वासच नाहीय मुळी आपल्या समाजाचा! जिवंतपणी तुमची प्रेतयात्रा काढली तेव्हाही नव्हता आणि आज कुणाला ठेचून मारलं, गोळ्या घातल्या तेव्हाही नाहीय. मग कुठे आहे तुमचा बुद्धिप्रामाण्यवाद?

तुमच्या रूपातील धगधगता वैचारिक सूर्य जीवन क्षितिजावरून अस्तंगत झाला तेव्हापासून ग्रंथप्रामाण्यरुपी ग्रहणाच्या दुष्ट चक्रात अडकलेले आम्ही, आज १२२ वर्षे होत आली; परंतु 'आमचे ग्रहण अद्यापही सुटलेच नाही'! आणि इथली सगळी परिस्थिती पाहता ते तूर्तास सुटेल याची सुतराम शक्यता वाटत नाही. म्हणूनच जिथे व्यक्तिस्वातंत्र्यापेक्षा व्यक्तिपूजेला अधिक महत्त्व दिले जाते, अशा महामूर्ख आणि अल्पमती असणाऱ्या आम्हाला सुधारण्याचा वसा घेऊन तुम्ही 'सुधारक' कार झालात आणि म्हणूनच शेवटी आगरकर तुम्ही चुकलात!

- नंदिनी देशमुख

.............

भूमिहीनांनी उद्या मुंबईत दोन कोटींचा मोर्चा काढला तर ज्यांच्याकडे जमिनी आहेत त्या घेऊन त्यांना देईल का शासन ?

- लहानु बारकु बोंबिलहाके

.............

सत्ता-पैसा-प्रसिद्धी यासह अनेक शक्तींसाठी गर्दी म्हणजे सुवर्णसंधीच. आयत्या गर्दीचा फायदा कसा घ्यायचा? ती आणखी कशी वाढवायची,हाताळायची याचं कसब या शक्तींकडे पुरेपूर असतं. गर्दीत सामील बहुतांशजण, सगळं आपल्यासाठीच चाललंय या प्रामाणिक भाबडेपणानं यात सहभागी असतो.

या गर्दीवर आपल्या सोयीनं कौतुक, टीका करून फायदा पदरात पाडून घेतला जातो. फारच मोठी गर्दी असेल तर चुचकारून शरण गेल्याचं चित्र उभं करायचं. वातावरण निवू द्यायचं. थंड. थंड. थंड. येत्या काळात सगळं शांत होऊन जातं. तपासून बघा इतिहास. लोकांना काही देऊन, बळ देत, कुठल्या शक्ती ताकदवान राहू शकतात काय?

एका मोठ्या गर्दीचे आपण साक्षीदार होतो, ही एकच चमकदार आठवण, सहभागी वैयक्तिकाला मोहरायला भविष्यात कायम उपयोगी होते इतकंच.

- विनायक घोडे

.............

ओबीसींची शिष्यवृत्ती ५०० कोटींवरून सरळ ५४ कोटी केलीये. ४४६ कोटींची कपात करण्यात आलीये. कोणाकोणाला पुरणार आणि कशी देणार शिष्यवृत्ती? अध्यक्ष महोदय सांगता का जरा? किती येडा बनवणार?

- अश्विनी सातव डोके

.............

ITI स्थापन होऊन जमाना झालाय. वर्षानुवर्षे प्रशिक्षण चालूच आहे. लाखो विद्यार्थी दरवर्षी बाहेर पडतात. अन सुशिक्षित बेरोजगारांच्या यादीत भर घालतात. आता हे म्हणतायेत, तीन लाख शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार. अन त्यांना नोकऱ्या कोण तुमचा बाप देणार का?

- सूरज मोटे

.............

#आभार
"अहमद पटेल निवडून येण्यात आणि ती दोन मतं अवैध होण्यामागे मोदीजी, अमीतश्याजी आणि अजित डोभल (किंवा डोवल किंवा डोवाल किंवा डोभाल) यांचा काहीतरी जबरदस्त मास्टरस्ट्रोक आहे" असं विधान/पोस्ट/शक्यता/खात्री/विश्वास/शंका/निष्कर्ष अजूनपर्यंत कुणीही न काढल्यामुळे मला प्रचंड चुकल्यासारखं वाटू लागलंय, सोशल मीडिया सुधारू लागल्याची ही लक्षणे आहेत का? जाणकारांनी यावर प्रकाश (मेहता नव्हे साधा) टाकावा, विनोद (तावडे नव्हे साधे) करण्यासही हरकत नाही.

- सुहास नाडगौडा

.............

मराठा हीच जात, मराठा हाच धर्म अशा घोषणा दिल्या जात आहेत. ज्यांना मराठा धर्म वाटतो, त्यांचा संविधानावर विश्वास असेल का?

हा मूक मोर्चा आहे असं बातम्या सांगतात. पण सगळीकडे घोषणा, शक्तीप्रदर्शन जोरात सुरू आहे.

- अनुजा मेस्त्री

.............

चाणक्य जिंकूनही हरतो तेव्हा...

अखेर अहमद पटेल जिंकले. अमित शहांचाही विजय झाला. काँग्रेसच्या चाणक्यासाठी अखेरच्या काही तासात काँग्रेस धुरीणांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अत्यंत सफाईदारपणे भाजपच्या चाणक्याला असमान दाखविले गेले. मोदी, शहा आणि वाघेला या त्रिकुटाची रणनीती सपशेल फसली. या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेचा जो दुरुपयोग झाला, त्याची नोंद भारताच्या लोकशाहीत काळ्या अक्षराने करावी लागेल. मदमस्तपणे काँग्रेसचे आमदार फोडले गेले, त्यांना दिलेल्या ऑफरही लपून राहिलेल्या नाही. काँग्रेसच्या काही आमदारांनी मीडियासोबत बोलताना या लालच आणि दबावाचा उल्लेखही केला. हा सत्तेचा गैरवापर भविष्यातही असाच सुरू राहिला, तर मात्र ते महात्मा गांधींच्या विचारांचे भर दरबारातील वस्त्रहरण ठरेल.

मुळात ही निवडणूक अनेक अर्थाने हाय व्होल्टेज ठरली, काँग्रेसला नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपने साऱ्या मर्यादा सोडल्या, संघ, अटलजी, अडवाणी यांनी उभी केलेली Party With a Difference या निवडणुकीत कोठेच दिसली नाही. विजयासाठी आसुसलेली, साम-दाम-दंड भेदाचा कोणत्याही अडथळ्यांशिवाय मुक्तपणे वापर करणारी, राजकीय संकेत आणि तत्वांना पायदळी तुडविणारी मोदी आणि शहा संस्थापित भाजप या निवडणुकीत सातत्याने डोकावत होती. दुसरीकडे कायम पराभवाच्या छायेत, हतबल आणि निष्प्रभ काँग्रेसही अनुभवायला मिळाली.

मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर भाजपने घातलेला तमाशा संपूर्ण देशाने बघितला, अमित शहा आणि टीमला निवडणूक आयोगाचा निर्णय हा एकप्रकारे अनपेक्षित धक्का होता त्यामुळेच रात्री साडेअकरा ते दीड असे तब्बल दोन तास पुन्हा नवे नाट्य मतमोजणी केंद्रावर बघायला मिळाले. खेळातील एखाद्या आडदांड स्पर्धकासारखे मतमोजणी होऊच देणार नाही असा हट्ट सुरू होता, आमच्या प्रश्नांचे समाधान करा, सीडी सार्वजनिक करा यासाठी रिटर्निंग ऑफिसला वाकवण्याचा प्रयत्न तेथे सुरू होता. देशाच्या मुख्य निवडणूक आयोगाने भाजपच्या तक्रारींवर निर्णय घेऊनही भाजपचे नेते मात्र आपल्या हटवाडी भूमिकेवर अडून बसले होते. रात्री दीड वाजता भाजपने काँग्रेसच्याही दोन आमदारांचे मत रद्द करण्याची तक्रार केली, यातून भाजपला हा पराभव किती जिव्हारी लागला याची जाणीव होत होती. एका अर्थाने व्यवस्थेची थट्टाच मांडली होती. सत्ता असेल तर काय काय होऊ शकते याची झलकही या निमित्ताने गुजरातमध्ये बघायला मिळाली, जे निकोप समाजाचे लक्षण नाही.

मात्र सशक्त लोकशाहीसाठी सत्ता स्पर्शाने मदोन्मत्त प्रवृत्तीचा निःपात ही काळाची गरज ठरली आहे. आज अहमद पटेल यांच्यापेक्षाही हा निकोप व्यवस्थेचा विजय ठरला.

मुख्य निवडणूक आयुक्तांचे अभिनंदन, कदाचित यानंतर त्यांनाही एखाद्या चौकशीत दोषी ठरवून घरी पाठवले जाईल, कारण दिल्लीच्या राजा आणि प्रधानाचे नाक कापण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे, असा जावई शोध भक्तमंडळी लावतील बहुदा...

गुजरातच्या राज्यसभा निवडणुकीने मात्र अनेक शक्यतांना जन्म दिलाय, स्वतःहून भाजपने काँग्रेसला ही चाल दिली. शांत असलेल्या खेम्याला चैतन्य दिले, कदाचित ही भाजपच्या आजवरच्या राजकीय वाटचालीतली सर्वात मोठी चुकही ठरू शकते.

अहमद पटेल यांनी हा निकाल गुजरातच्या येणाऱ्या निवडणुकीची नांदी असेल असे सूतोवाच केले, अहमदभाई हे आता शांत बसणार नाही, आपल्याला कराव्या लागलेल्या संघर्षाची वसुली ते गुजरातमध्ये आगामी निवडणुकीत व्याजासकट करतील अशीही शक्यता वर्तवली जाते आहे. अमित शहांसारख्या चाणक्याला मात्र हा पराभव असहनिय ठरलाय, त्यांची अवस्था 'आ बैल मुझे मार' अशीच झाली. भाजपचे कार्यकर्ते खासगीत ही निवडणूक कारण नसताना प्रतिष्ठेची केल्याचे कबूल करू लागले.

ता.क. - अशोक गेहलोत जे गुजरात काँग्रेसचे प्रभारी आहे ते राजस्थानातील आगामी निवडणुकीत काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, अहमद पटेलांकडून ते गेहलोतांना रिटर्न गिफ्ट असेल असे बोलले जाते आहे, दुसरे म्हणजे दिल्लीच्या दरबारात आता अहमद पटेल विरुद्ध अमित शहा ही नवी लढाई बघायला मिळाली तर नवल वाटायला नको.

- सचिन गुंजाळ

.............

मी काय 'देतो' आहे?

मी जगात काय व्ह्यॅल्यू अॅडिशन करतो आहे किंवा जगाला काय देतो आहे हा प्रश्न स्वतःला विचारला आहे का कधी? नाही, म्हणजे मला हे हवं, ते हवं या मागण्या आणि हे मिळत नाही, ते मिळत नाही अशा अनंत तक्रारी आपण सतत करत असतोच... पण आपल्याला काय हवंच्या मागण्या आणि मिळत नाहीच्या तक्रारी करण्याआधी हा प्रश्नही विचारला पाहिजे... जगाला नाही... स्वतःला... मी नेमकी काय व्ह्यॅल्यू अॅडिशन करतो आहे या जगात हा...

आपण आपल्यापाशी जे आहे आणि आपल्याला जे शक्य आहे ते देतो आहोत का? जे देतो आहोत ते भरभरून, समरसून, मनापासून देतो आहोत का? मग आपण निवडलेला जगण्याचा मार्ग आपली नोकरी असो, व्यवसाय असो किंवा घरकाम... जो मार्ग असेल, जे करायचं हे ठरवलं, निवडलं असेल तर आपण झोकून देऊन करतो आहोत का? त्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे का? केवळ पैसा, प्रसिद्धी किंवा कर्तव्यपूर्ती यासाठी काम न करता आपण आपल्याला भरभरून समाधान वाटतं म्हणून आपलं काम करतो आणि या जगाला 'देतो' आहोत का? हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत...

एकदा या प्रश्नांचा वेध घ्यायला लागलो आणि आपण काय 'देतो' आहोत हे प्रामाणिकपणे तपासून बघायला लागलो की आपल्याला त्या बदल्यात काय मिळतं आहे याची उत्तरं तरी मिळायला लागतात... किंवा ते कमी महत्त्वाचं वाटायला लागतं...!

बघा हे प्रश्न कधीतरी स्वतःला विचारून! आधी खूप त्रास होतो... नंतर फार बरं वाटतं!!

- प्रसाद शिरगांवकर

.............

गोडसे भटजींचे "माझा प्रवास अथवा सन १८५७ च्या बंडाची हकीकत" हे पुस्तक अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. गोडसे भटजी अयोध्येला गेले होते. त्यांनी जी रामजन्मभूमी पाहिली, दर्शन घेतले ती व आता ज्या बाबरीर मशिदीच्या जागेला रामजन्मभूमी समजण्यात येते तिच्यात कसलेही साधर्म्य दिसत नाही. गोडसे भटजींनी म्हटलेय,

"नवमीचे दुपारी शरयूचे स्नान करून रामजन्म झाला त्या भूमीचे दर्शन घेतले. या दर्शनास लाखों लोक आले, त्यांनी तुळशी व सुपारी हातात आणली होती. जन्माची जागा मैदान असून पन्नास हात लांब व चाळीस हात रुंद अशी आहे. पक्का चुना ओतून कंबरभर उंचीचा चबुतरा केलेला आहे. " (पान १९२, प्रकाशक :- दामोदर सावळाराम आणि मंडळी, मुंबई, प्रकाशन वर्ष :- १९०७, संपादक :- श्री. चिंतामण विनायक वैद्य)

१८५७ साली राममंदिर मोकळ्या जागेत दाखवले जात होते असे यावरून दिसते. त्या जागेवर मशीद नव्हती असेही दिसते. संजय क्षीरसागरांनी माझ्या लक्षात ही बाब आणून दिली. गोडसे भटजींना खोटे लिहिण्याचे काही कारण तर दिसत नाही. भविष्यात पुढे रामजन्मभूमी एवढ्या मोठ्या वादाचे कारण बनेल असे स्वप्न काही त्यांना पडले नसणार!

सोचो....

- संजय सोनवणी

.............

मी काय म्हणतो

हे पॅनकार्ड व आधारकार्डाचं असंच चालत राहिलं तर
भविष्यात 
.
.
.
.

ऐका हातावर पॅननंबर आणि दुस-या हातावर आधार नंबर

गोंदूनच घेऊया का? 

- संदेश कामेरकर

.............

गाजरेंद्र दाखवणीस

- अविनाश पवार

.............

जो काम करत नाही त्याला पक्ष बिक्ष न बघता एकमताने पाडा.
नेते सामान्य लोकांच्या मोर्चाला घाबरत नसतात मग तो कितीबी मोठा असू द्या.
नेते फक्त आणि फक्त निवडणुकीला घाबरतात.

- निरंजन माने

.............प्रतिक्रिया द्या2738 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर