छपरावरचे ऊंट.. ध्यानस्थ मुल्ला.. डॉक्टरांच्या पोटासाठी
गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७ मुकेश माचकर

बोधकथा, मुल्ला नसरुद्दीन कथा आणि विनोद असा दमदार, कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून...

इब्राहीम नावाचा एक राजा होता.

भयंकर घाबरट वृत्तीचा. अतिशय दु:खी असायचा. त्याला सतत भीती वाटायची. आपलं राज्य जाईल. आपल्याला कोणीतरी मारेल. त्याने राजवाड्यावर कडक पहारे लावले होते.

एके रात्री त्याला छपरावर खुडबुडीच्या आवाजाने जाग आली. त्याच्या शयनकक्षाच्या वरच खुडबुड होत होती. तो उठून पलंगाखाली लपला. तिथून त्याने चाचरत विचारलं, कोण आहे तिथे? काय करतोयस तिथे? शिपायांना बोलावू का?

वरून एक जरबदार आवाज उत्तरला, माझा ऊंट हरवलाय तो शोधतोय.

ऊंट? छपरावर?

राजाने बोंब ठोकली, अरे धावा धावा, छपरावर कोणीतरी वेडा चढलाय.

शिपाई धावले, छपरावर दडदड आवाज आला. शिपायांनी खूप प्रयत्न केला, पण, छपरावर ऊंट शोधायला चढलेला माणूस काही त्यांच्या हाती लागला नाही.

राजा भयंकर बेचैन झाला. हे नक्कीच आपल्याला मारायचं कारस्थान असणार. यात नक्कीच काहीतरी अपशकुन दडलेला असणार, असं त्याच्या मनाने घेतलं आणि तो आणखी चिंतित झाला.

दुसऱ्या दिवशी दुपारी महालाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बरीच गडबड उसळल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने शिपायाला बोलावून विचारलं. शिपाई म्हणाला, बाहेर एक वेडा माणूस आलाय. तो म्हणतोय की या धर्मशाळेत मलाही राहायचंय. आम्ही त्याला सांगितलं, ही धर्मशाळा 
नाही, राजवाडा आहे, पण तो ऐकतच नाही. तुम्ही चिंता करू नका. आम्ही त्याला आता आमच्या पद्धतीने धर्मशाळा दाखवतो.

तेवढ्यात राजाच्या कानावरही तो ओरडा आला आणि त्यातला तो आवाज… ती जरब… काल रात्रीच ऐकलेली.

भूल पडल्यासारखा राजा शिपायाला म्हणाला, त्याला हुसकावू नका. इकडे घेऊन या.

शिपायांनी मुसक्या बांधून आणलेला माणूस एक फकीर होता. राजा त्याला म्हणाला, महाराज, तुम्ही तर चांगले परमज्ञानी फकीर दिसताय. तुम्हाला राजवाडा आणि धर्मशाळा यांच्यातला फरक समजू नये?

फकीर म्हणाला, तू कोण?

राजा म्हणाला, मी इब्राहीम. मी राजा आहे आणि या राजवाड्याचा मालक.

फकीर म्हणाला, मी याआधीही इथे आलो होतो. तेव्हाही तुझ्यासारखाच दिसणारा एक माणूस इथे मला भेटला होता. तो तर म्हणत होता की तो राजा आहे, हे त्याचं सिंहासन आहे आणि हा राजवाडा त्याच्या मालकीचा आहे!

राजा म्हणाला, म्हणजे तुम्ही माझ्या वडिलांना भेटला होतात. ते आधीचे राजे होते ना!

फकीर म्हणाला, पण, त्याआधीही मी आलो होतो. तेव्हा एक पार पिकलेला म्हातारा या राज्यावर आणि राजवाड्यावर मालकी सांगत होता.

राजा म्हणाला, तुम्ही माझ्या आजोबांना भेटले असणार.

फकीर म्हणाला, आता तूच मला सांग. इथे कोणी चार वर्षं राहतो आणि कोणी चाळीस वर्षं राहतो. पण, इथून प्रत्येकाला जावं तर लागतंच ना कधी ना कधी? मग ही धर्मशाळा नाही का?

इब्राहीमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि तो साधूच्या पायावर लोळण घेत म्हणाला, तुम्ही माझे गुरू. मला शिष्य म्हणून स्वीकारा. या धर्मशाळेत हवा तेवढा काळ राहा. नंतर एकत्रच निघू. फक्त मला एकच विचारायचंय. तुम्ही छपरावर ऊंट शोधत होतात, ते का?

फकीर म्हणाला, छपरावर कधी ऊंट हरवू शकत नाही, ते अशक्य आहे, हे तुला कळतं. पण, मग सिंहासनात, संपत्तीत, स्त्रीसहवासात सुख कसा काय शोधत फिरतोस तू? तेही सगळे छपरावरचे ऊंटच ना? सगळा आनंद, सगळं सुख हे तुझ्या आत आहे, तिथे शोध.

....................................

मुल्ला नसरुद्दीन एका झाडाखाली ध्यानस्थ बसला होता.

त्याचा शेजारी त्याला शोधत धावत पळत त्याच्यापाशी आला आणि उत्तेजित स्वरांत म्हणाला, मुल्लाजी, मुल्लाजी, लवकर चला. तुमच्या घराला आग लागलीये.

मुल्ला म्हणाला, मला माहिती आहे.

चक्रावलेला शेजारी म्हणाला, मग तुम्ही इथे काय करताय?

मुल्ला सात्विक संतापाने म्हणाला, इथे काय करतोय म्हणजे? घराला आग लागली, तेव्हापासून मी इथे एकाग्रचित्ताने ध्यान लावून बसलो आहे आणि देवाने ती आग विझवण्यासाठी तात्काळ पाऊस पाडावा, म्हणून प्रार्थना करतोय.

.....................

आपण जेवढं जेवतो, त्यातल्या निम्म्यानेच आपलं पोट भरतं

आणि उरलेल्या निम्म्याने डॉक्टरचं पोट भरतं.

......................................

तुम्ही अमृततुल्य नियमित वाचता?

मग इथे प्रसिद्ध होणाऱ्या कथांपैकी निवडक १०० कथांचा अक्कलझाड हा दोन भागांचा पुस्तकसंच तुम्हाला नक्कीच आवडेल.

तो खरेदी करण्यासाठी ‘इंद्रायणी साहित्य, २७३, शनिवार पेठ, पुणे ३०’ येथे ०२०-२४४५८५९८ किंवा ०२०-२४४८१८६७ या क्रमांकावर किंवा ९३७१०४३७८१ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

हा संच पुढील ठिकाणी ऑनलाइनही उपलब्ध आहे. फक्त क्लिक करा आणि घरपोच मिळवा.

इंद्रायणी साहित्य: http://bit.ly/IndrayaniSahityaAkkalJhad

बुकगंगा: http://bit.ly/BookGangaAkkalJhad

अमेझॉन: http://bit.ly/AmazonAkkalJhadप्रतिक्रिया द्या5077 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर