मला अजूनही आत्मक्लेश झालेला नाही! (उत्तरार्ध)
बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७ बिगुल न्यूज नेटवर्क

पक्षविरोधी कृत्यांचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीने ठेवल्यानंतर सदाभाऊ खोतांनी आपल्याला अजून 'आत्मक्लेश' झालेला नाही अशी ठाम भूमिका घेतली. (उत्तरार्ध)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी होण्यापूर्वी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पक्षाच्या चौकशी समितीने एक प्रश्नावली दिली होती. या प्रश्नांना सदाभाऊंनी दिलेली उत्तरेच पक्षाचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांच्या जिव्हारी लागल्याने सदाभाऊंची पक्षातून गच्छंती झाली अशी चर्चा आहे. या प्रश्नोत्तरांचा पूर्वार्ध यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला आहे. आता हा उत्तरार्ध:

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नोव्हेंबर 2016 मध्ये जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेण्यात आली होती. त्याच्या पूर्वतयारीसाठी आपण कोणताही प्रयत्न अथवा एखादी सभा का घेतली नाही?

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर यापुढे सदाभाऊ सभागृहातली लढाई लढतील आणि मी रस्त्यावरची लढाई लढेन, असे मा. खा. राजू शेट्टी सातत्याने म्हणत होते. त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रश्नांवर रस्त्यांवरील आंदोलन सुरू होती, तर मी शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून सभागृहात लढत होतो. याबाबत आपण अनेकदा पाठीवर थापही टाकली आहे.

ऊस परिषदेनंतर कोल्हापूर येथे शासकीय विश्रामगृहात ऊसदराबाबत बैठक बोलाविण्यात आली होती. सदर बैठक अतिशय महत्त्वपूर्ण असताना या बैठकीत अंतिम निर्णय घेताना आपण अनुपस्थित का राहिलात?  याउलट, यावेळी आपण इस्लामपूर येथे सरकारची भूमिका मांडत होतात याचा खुलासा करावा.

ऊस परिषदेच्या निमित्तानं पूर्वतयारीचा भाग म्हणून मी वाळवा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्याशिवाय मी ज्या ज्या ठिकाणी जात होतो, त्या ठिकाणी मी ऊस परिषदेचे निमंत्रण देत होतो. मी स्वतः ऊस परिषदेला हजर राहिलो होतो. त्याशिवाय ऊस परिषदेत भाषणही केले होते. जर पक्षाकडून मला सूचना केल्या असत्या अथवा सभा दिल्या असत्या तर मी तसे नियोजन केले असते. ऊसाचा तोडगा काढण्याच्या पहिल्या बैठकीला मी उपस्थित राहिलो. मात्र दुसऱ्या बैठकीला मा. खा. राजू शेट्टी यांच्या परवानगीनेच गैरहजर राहिलो.

आपण मंत्री झाल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढीसाठी कोणते प्रयत्न केले याची सविस्तर माहिती द्यावी.

मंत्री झाल्यापासून मी ज्या ज्या जिल्ह्यात दौऱ्यावर जात आहे, त्या त्या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन कार्यक्रम करत असतो. जिल्ह्यातील कार्यकर्ते माझ्यासोबत असतात. त्यांचे प्रश्न समजून सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. संघटनेच्या कार्यकर्त्यांना अनेक पदांवर व कमिट्यांमध्ये शासकीय सदस्यांच्या ज्या नियुक्त्या केलेल्या आहेत, त्या सर्व कामांची यादी देतो व शेतकऱ्यांच्या हिताचे व फायद्याचे प्रश्न सोडवल्यामुळे ते लोक संघटनेचे हितचिंतक व नवीन कार्यकर्ते घडविण्यात मदत झाली आहे, असे मला वाटते.

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोणकोणत्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गेलात तसेच स्वाभिमानी पक्ष भाजपाविरुद्ध निवडणूक लढवत असतानादेखील तसेच पक्षाने मनाई केली असतानासुद्धा आपण भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी का गेलात, याचा खुलासा करावा.

मी शिरोळला प्रचाराचा शुभारंभ करायला आलेलो होतो. त्यानंतर मी विकास देशमुख आणि संदीप राजोबाच्या प्रचाराला सांगली जिल्ह्यात गेलो होतो. सांगली जिल्हाध्यक्ष, विकास देशमुख भाजपच्या चिन्हावर लढत होते तर संदीप राजोबा यांनी स्वतंत्रपणे भाजपशी आघाडी केली होती. जर आपण भाजपच्या विरोधात लढत होतो, असे आपल्याला वाटते तर पक्षनेतृत्व या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला व बैठका घ्यायला का गेले? कारण भाजपबरोबर आपली अधिकृत युती आहे. शिवाय भाजपच्या प्रचाराला न जाण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची सूचना पक्षाकडून नव्हती. मी रयत विकास आघाडीच्या माध्यमातून वाळवा तालुक्यात आघाडी करून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस आपण एक सभा वगळता इतर सभांना आला नव्हता. मी माझ्या विभागात प्रचाराचा वेळ कमी असल्याने ताकद लावून काम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इतर ठिकाणी मला फारसा वेळ देता आला नाही.

नगरपालिका निवडणुकीमध्ये जयसिंगपुर व कुरुंदवाड नगरपालिका या दोन सभा वगळता आपण कोठेही सभा घेतलेली नाही. स्वाभिमानी पक्षाने राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले असताना आपण कुठेही प्रचार केला नाही याचा खुलासा करावा.

नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं मला ज्या ज्या ठिकाणी बोलावले, त्या ठिकाणी मी जायला उत्सुक होतो. मात्र मला दोनच ठिकाणी बोलवले. मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी सभा घेतल्या. त्याशिवाय मला पक्षाकडून सूचना दिल्या असत्या तर मी निश्चितच इतर  ठिकाणी गेलो असतो.

विविध वृत्तपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांवरून पक्षश्रेष्ठींवर अविश्वास दाखवत माझी वाट वेगळी, माझा आता संबंध नाही त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही, अशी अनेक वेगवेगळी वक्तव्ये आपण केलेली आहेत. याचा खुलासा करावा.

गेली ३० वर्षे मी चळवळीत कार्यरत आहे. मात्र नवीन आलेल्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने टीकाटिप्पणी करण्यात आली. पक्षातल्याच काही निवडक हितचिंतकांनी माझ्यावर आरेाप प्रत्यारोप केले आहेत. त्याचे पुरावे आपल्या माहितीसाठी सोबत जोडलेले आहेत. केवळ हितचिंतकच नव्हे तर पक्षश्रेष्ठीसुध्दा टीका करत होते. या टीकेसंदर्भात त्या त्या वेळेला स्पष्टीकरण दिले नसते तर कदाचित गैरसमज झाला असता. चळवळीत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःची वाट निर्माण केलीय. मी तळागाळातून गेली तीस वर्षे चळवळीत काम करत पुढे आलेलो आहे. मी माझ्या वाटेवरून प्रवास करतोय अशी माझी मते ठामपणे मी मांडली. त्याचा राजकीय अर्थ काढण्यात अर्थ नाही, असे मला वाटते.

नुकतेच झी २४ तास या वृत्तवाहिनीवर बोलताना आपण खासदार राजू शेट्टी व त्यांचे कार्यकर्ते शासकीय अधिका-यांच्या बदल्या करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकतात व माझ्याकडून कोणतेही काम करून घेतात असे आपण बोललात. याचा पुराव्यासह खुलासा करावा.

जे लोक माझ्याबद्दल टीका-टिप्पणी करत आहेत, त्यांच्या माझ्याकडून वेगवेगळ्या ज्या काही अपेक्षा होत्या, त्या कायद्याच्या चौकटीला धरून नव्हत्या आणि त्या मी पूर्ण करु शकलो नाही, या अनुषंगाने मी त्याठिकाणी बोललो. समोरून काही प्रश्न आल्यानंतर त्याच्या उत्तरादाखल काही गोष्टी बोललो असलो तरी त्या तेवढ्या प्रश्नापुरत्याच मर्यादित होत्या.

भाजपची सत्ता आल्यावर मंत्री व आमदारांचे पगार वाढविले. एका बाजूला शेतकरी आत्महत्या करीत असताना विधानसभेतील सर्व पक्षांच्या आमदारांनी एक मताने हे पगार वाढविण्यास संमती दिली. शेतकरी प्रतिनिधी म्हणून हे आपणास योग्य वाटते काय? योग्य वाटले नसले तर सभागृहात याला तुम्ही विरोध केला काय?  किंवा या विरोधी आपल्या अंतरात्म्याचा आवाज म्हणून प्रसारमाध्यमांकडे या संबंधीच्या भावना आपण जाहीरपणे व्यक्त का केल्या नाहीत. आपण संघटनेचे नेते म्हणून सरकारमध्ये आहात. सरकार व संघटना यांच्यामधील दुवा म्हणून आपण भूमिका कराल अशी अपेक्षा संघटनेने व कार्यकत्यांनी ठेवली तर ही भूमिका पार पाडण्याच्या दृष्टीने सरकारमध्ये सामील झालेनंतर आपण काय काय प्रयत्न केले. उदा. कर्जमाफीच्या आंदोलनात हे आंदोलन व्यापक होण्याचे आत स्वाभिमानी संघटनेच्या एखाद्या शिष्टमंडळाला बोलावून मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा घडवून आणावी असे दोघांमधील दुवा म्हणून आपणास वाटले नाही काय? वाटले असल्यास तसा काही प्रयत्न आपण केला काय? विधानसभा व लोकसभा या लोकशाहीच्या मंदिरांमधून शेतीमालाच्या भावाच्या ‘सीतेचे’ अपहरण करण्या-या रावणांच्या हातून सुटका करण्यासाठी आमच्या ‘मतां’च्या आधारे आमचे हनुमान म्हणून आमदार खासदारांना आतापर्यंत आम्ही निवडून दिले. परंतु हे यातील हनुमान प्रत्यक्षात माकडे निघाली. अशी भाषणे आपण करत होतात. आपणास शेतक-यांचे हनुमान म्हणून पाठविल्यानंतर शेतमालाच्या भावाच्या सीतेची सुटका करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले? महाराष्ट्राच्या विधिमंडळात शेतीमालाचे भाव ठरविण्यासाठी काही प्रक्रिया सुरु झाली आहे काय? असल्यास ती सांगावी.

आमदार व मंत्र्यांचे पगार वाढले त्या पगारवाढीला मी विरोध करायला पाहिजे होता, अशा पद्धतीच्या सूचना काही आपल्याकडून माझ्याकडे आलेल्या नव्हत्या, तशा आल्या असत्या तर निश्चितपणाने त्याला मी विरोध केला असता. सरकारमध्ये असताना सरकारच्या निर्णयाला विरोध करणे इष्ट नाही म्हणून त्या विषयावर शांत राहिलो.

ज्या ज्या वेळी संघटनेचे कार्यकर्ते काही सार्वजनिक कामे किंवा तक्रारी घेऊन येत असतील, त्या त्या वेळी मी अधिकारी पातळीवर बैठका लाऊन कामे पूर्ण करण्याचा किंवा तक्रारींचे निवारण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. संघटनेनेदेखील काही कामांबद्दल सूचना दिल्या असल्या तर निश्चितपणानं त्याची अंमलबजावणी केली असती. शेतकऱ्यांचं आंदोलन हे त्यांचे अंतिम ध्येय असत की सरकारनं चर्चेला बोलविणे आणि मार्ग त्यातून काढणे. जर हे सरकार चर्चा करायला आणि मार्ग काढायला तयार असेल तर आपण उगीचच आडमुठी भूमिका घेऊन, शेतकऱ्यांचे रक्त सांडण्यामध्ये कोणत शौर्य आपण मिळवणार होतो. जनतेच्या हितासाठी आंदोलनाचा उपयोग व्हावा, ही भूमिका ठेऊन संपावर गेलेल्या पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना चर्चेसाठी बालावलं आणि नंतर सुकाणू समितीलाही चर्चेसाठी बोलावले, ज्यामध्ये आपले मा. खा. राजू शेट्टी यांचा समावेश होता.

मी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढीलप्रमाणे काम केले आहे-

 • भाजीपाला नियमन मुक्तीचा निर्णय घेतला- शेतकऱ्यांच्या पायातली बेडी तोडली.

 • संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार सुरू केला. सध्या मुंबईसह वेगवेगळया शहरामध्ये  ९५ आठवडे बाजार नियमितपणे भरतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यास बाजारपेठ व रास्त भाव मिळण्यास मदत झाली.

 • देशात पहिल्यादांच महाराष्ट्रात ६६ लाख क्विंटल इतक्या मोठ्या प्रमाणात तूर खरेदी करण्यात आली. त्याचा फायदा  शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यामध्ये झाला.

 • डीबीटीच्या माध्यमातून शेतीची औजारे शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे खरेदी करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळवून दिला. तर डीबीटीच्या माध्यमांतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याचा फायदा झाला.   

 • कर्जमाफीवर योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला.

 • दुधाचे दर प्रति लिटर तीन रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला गेला- दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला.

 • राज्यकृषी मूल्य आयोग निर्माण करण्याची शासनांस विनंती केली. त्यामुळे पाशा पटेल यांच्या रुपाने शेतकरी चळवळीतला हाडामांसाचा एक कार्यकर्ता राज्यकृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष झाले.

 •  बजेटमधून ऊसखरेदी करमाफ  करण्याचा निर्णय  घेतला, हे इतिहासात पहिल्यांदाच घडले.

 • राज्यभरात हवामानावर आधारित २०६५ स्वयंचलित केंद्रे उभा करण्याचा निर्णय घेतला.

 • ऊस पीकासाठी नाबार्ड अंतर्गत २६०० कोटी रुपये किंमतीची ठिबक सिंचन योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

 • POCRA अंतर्गत नानासाहेब कृषी पदथदर्शक प्रकल्प विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशासाठी राबविण्याचा निर्णय घेतला.

राज्यमंत्री म्हणून मला जे अधिकार आहेत, त्या अधिकाराचा वापर करून ही सर्व कामे व इतरही कामे शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मला निश्चितपणे माहीत आहे की, इतर राज्यमंत्र्यांच्या कामाची  आणि सदाभाऊ खोत यांच्या कामाची तुलना केली तर मी केलेली कामे निश्चितच इतरांपेक्षा उठावदार दिसतील.

काँग्रेसच्या घराणेशाहीवर कठारे टीका आपण वारंवार केलेली आहे. या पार्श्वभूमीवर आपण आपल्या मुलाला निवडणुकीच्या राजकारणात आणण्यासाठी जी घाई केली त्याचा विचार करता स्वत:च्या बोलण्याविरुद्ध आपल्या घरातच घराणेशाही आणून शेतकरी चळवळीच्या संस्कृतीलाच बाधा आणण्याचा प्रयत्न आपण केला आहे. याबद्दल आपले मत काय?

मी माझ्या मुलाला निवडणुकीला उभे राहण्यास अजिबात प्रोत्साहन दिलेले नव्हते. त्यासंदर्भात मा. खा. राजू शेट्टी यांच्याशी सविस्तर चर्चा झालेल्या होत्या. शेवटच्या क्षणी आघाडीच्या माध्यमातून तो निर्णय घेण्यात आला आणि आघाडीचा उमेदवार म्हणून तो त्या ठिकाणी उभा राहिला होता. कार्यकर्ता सक्षम असेल तर घराणेशाही हा एखाद्याच्या प्रगतीच्या आड यायला नको, अशी माझी भूमिका आहे. पक्षाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश परीट यांच्यानंतर त्यांच्या धर्मपत्नीला तिकीट दिले होते, उल्हासदादांच्या नंतर त्यांच्या धर्मपत्नीला आपण तिकीट दिले होते. ही काही वानगीदाखल उदाहरणे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष पदाला आपल्या पक्षाने जो पाठिंबा दिला, तोही घराणेशाही राजकारणाचाच भाग आहे आणि पक्षाने माझ्या मुलाला उमेदवारी देण्यास नकार दिला असता तर मी त्याला उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली असती.  

वरील सर्वच चळवळीविरोधी केलेली कृत्ये हे वास्तव तर प्रामाणिकपणे आपण अंतरात्म्याला स्मरून तपासले तर चळवळीतला एक लढाऊ पार्श्वभूमी असलेला कार्यकर्ता व नेता म्हणून आपल्याला या कृत्यांचा पश्चाताप होत आहे काय? व होत असल्यास त्याचे पापक्षालन करावे असे वाटते काय?

मला अजूनही आत्मक्लेश झालेला नाही, कारण मी इथे चांगल्या पद्धतीने शेतकत्यांच्या प्रश्नावर काम करीत आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि ज्या दिवशी माझ्या हातून हे काम होणार नाही, त्यादिवशी मी आपल्याला कल्पना देऊन निश्चितपणाने आत्मक्लेशाचा मार्ग पत्करेन.

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक वर्षांची पापी काँग्रेसवाल्यांची सत्ता घालवून भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन केले. परिणामी सत्ता बदलली. यांना सत्तेवर येऊन तीन वर्ष झाली, निवडणुकीनंतर सत्तेवर आल्यानंतर एवढा प्रदीर्घ काळ यांना संधी देऊनही त्यांनी जो भ्रमनिरास केला आहे, तो विचारात घेऊन जर आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळेच मंत्रिमंडळात आहात असे मानत असाल तर संघटनेने भाजप सरकारबरोबर राहावे की बाहेर पडावे याबद्दल आपले मत काय? संघटनेने जर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर आपली भूमिका काय राहील?

काँग्रेस पापी होती म्हणून जर आपण भाजपला पाठिंबा दिला, असे जर आपण म्हणत असाल तर, स्वामिनाथन आयोग हा काँग्रेसच्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच आला आहे. त्या काळामध्ये आपल्या पक्षनेत्यांनी कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस बरोबर युती करून, बांधकाम कमिटीचे सभापतीपद संभाळले होते. गेली तीन वर्षे आपण भाजप बरोबर काम करीत आहोत. आपला जर भ्रमनिरास झाला असे पक्षाकडून मानले जात असेल, तर मग कोल्हापूर जिल्हा परिषद, सांगली जिल्हा परिषद याठिकाणी आपण भाजपला पाठिंबा दिला आहे. केंद्रात राष्ट्रपती निवडणुकीलाही आपण भाजपला पाठिंबा दिला. याचा अर्थ काय? यासंदर्भात पक्षाने देशाच्या आणि राज्याच्या पातळीवर काही निर्णय घेतला तर त्या निर्णयानंतर त्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करणे मला योग्य वाटते.

(समाप्त) या लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा... http://www.bigul.co.in/bigul/1341/sec/8/sadabhau%20answersप्रतिक्रिया द्या2056 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर