मै खडा तो सरकारसे बडा!
मंगळवार, २५ जुलै, २०१७ विजय चोरमारे

खा. उदयनराजे हे सतत वादात राहिलेलं व्यक्तिमत्व. अर्थात साता-याच्या राजघराण्याचा इतिहास समजून घेतल्याशिवाय त्यांचं व्यक्तिमत्व उलगडणार नाही. (पूर्वप्रसिद्धी: कालनिर्णय)

श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह भोसले!

साताऱ्याचे छत्रपती !

‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’ नावाचा एक सिनेमा पूर्वी येऊन गेला. तेव्हापासून साताऱ्यातल्या कुठल्याही वेगळ्या गोष्टीला तऱ्हा असंच म्हटलं जातं. तऱ्हा शब्दाला अनेक अर्थछटा आहेत. चांगल्या, वाईट आणि गंमतीदार.

त्याअर्थानं पाहिलं तर या छत्रपतींची तऱ्हा काही वेगळीच आहे!

या छत्रपतींबद्दल प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत.

कुणी म्हणेल छत्रपती कसे नसावेत, तर उदयनराजेंसारखे!

कुणी म्हणेल छत्रपती कसे असावेत, तर उदयनराजेंसारखे!

सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टीच्या उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व राजेशाही आहे. एखाद्या माणसानं किती बेफिकीर असावं, याचे उदाहरण म्हणूनही उदयनराजेंकडं बोट दाखवतात. ही बेफिकीरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून ठळकपणे दिसत असते. त्याचवेळी आपल्या आजुबाजूच्यांची, गोरगरीब लोकांची फिकीर, काळजी कशी करावी, तर उदयनराजेंसारखी असंही त्यांचे चाहते म्हणतात…

नेमका हा माणूस आहे तरी कसा, याचा थांग कुणालाच लागत नाही. केवळ वरवरची माहिती, सार्वजनिक ठिकाणचं वर्तन लोकांसमोर असतं. त्यावरूनच त्या माणसाची प्रतिमा बनवली जाते. ती फसवी असते. उदयनराजेंच्या संदर्भानं अनेक दंतकथा तयार केल्या जातात. त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जातात. सतरा-अठरा वर्षांच्या राजकीय आयुष्यात उदयनराजेंबद्दल अनेक दंतकथा प्रचलित झाल्यात. त्यातल्या खऱ्या कोणत्या आणि खोट्या कोणत्या हे नेमकं कुणीच सांगू शकत नाही. खुद्द उदयनाराजेही सांगू शकणार नाहीत. खऱ्या नसलेल्या अनेक गोष्टी सतत ऐकून ऐकवून खऱ्या असल्याचं त्यांनाही वाटत असावं. इतकं हे सगळं खऱ्या खोट्याचं बेमालूम मिश्रण बनलंय.

उदयनराजेंना समजून घ्यायचं तर केवळ त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचा राजकीय प्रवास, त्यांनी लढवलेल्या निवडणुका एवढ्यावरून त्याची कल्पना येणार नाही. त्यासाठी साताऱ्याच्या राजघराण्याचा इतिहास समजून घ्यावा लागेल. साताऱ्याचा राजकीय इतिहास समजून घ्यावा लागेल. इतकं सगळं समजून घेतल्यानंतर लक्षात येईल की, उदयनराजे हे बदलत्या काळाचं, बदलत्या राजकीय संस्कृतीचं प्रॉडक्ट आहे. लोकप्रतिनिधी म्हणून सगळी प्रतिष्ठा, मानमरातब हवे आहेत. परंतु त्यासाठी आवश्यक जबाबदारी त्यांना घ्यायची नाही. स्टंटबाजी, बेधडक विधानं, सार्वजनिक ठिकाणी आक्रमकता, काही दिखावू गोष्टी त्यासाठी पुरेशा आहेत, असं त्यांना वाटतं.

राजकारणात यायचं त्यांनी ठरवलं असेल नसेल, परंतु राजकारणात येण्यावाचून त्यांच्याकडं पर्यायही नव्हता. राजकारणात येण्याआधी म्हणे फॉर्म्यूला वन रेसमध्ये भाग घ्यायचं त्यांचं स्वप्नं होतं. त्यातच करिअर करायचं होतं, पण ते काही जमून आलं नाही. साताऱ्यातल्या रस्त्यावरून किंवा सातारा-पुणे हायवेवर वेगवान ड्रायव्हिंग करून ते आपली फॉर्म्यूला वनची हौस भागवून घेतात. एकदा सातारा एसटी स्टँडच्या परिसरात दोन तरुणांना त्यांनी आपल्या गाडीत घेतलं आणि पुण्याला ‘जोधा अकबर’ सिनेमा बघायला निघाले. सिनेमा बघितल्यावर फाइव्ह स्टार हॉटेलात नेऊन त्या मुलांना जेवायला घातलं. आणि परत साताऱ्यात आणून सोडलं. महाराजांच्या पाहुणचाराचं ठीक पण त्यांच्या गाडीत बसल्यामुळं त्या पोरांची पाचावर धारण बसली होती. कारण सातारा-पुणे अंतर त्यांनी अवघ्या पाऊण तासात पूर्ण केलं होतं असं सांगतात. त्यांच्या वेगाच्या अशा अनेक कथा तेल-मीठ लावून सांगितल्या जातात. त्याबद्दल त्यांना कुणी, ‘हे खरंच का’ म्हणून विचारलं तर ते लगेच म्हणतात, ‘चला गाडीत बसा. दाखवतो.’

असे हे उदयनराजे.

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सातारा जिल्हा नेहमीच अग्रभागी राहिला. त्यामुळं इथं काँग्रेसची सत्ता होती. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखं जाणतं नेतृत्व सातारा जिल्ह्याला लाभलं होतं. काँग्रेसमध्येही गट-तट होते. आणि राजकारण चालायचं तेही काँग्रेसच्या गटा-तटांतच. नाही म्हणायला साताऱ्यात कम्युनिस्टांची थोडीफार ताकद होती. व्ही. एन. पाटील यांच्यासारखे कम्युनिस्ट नेते होते. कराडजवळच्या वडगाव हवेली गावचे दादासाहेब जगताप हे यशवंतरावांचे साडू. ते आमदार आणि पुढे मंत्रीही झाले. दरम्यानच्या काळात काँग्रेसच्या अंतर्गत गोटात मतभेद झाले. किसन वीर आणि दादासाहेब जगताप यांच्यातले हे मतभेद टोकाला गेले. या वादात यशवंतराव चव्हाण मित्रप्रेमातून किसन वीरांच्यासोबत राहिले. त्यामुळं दादासाहेब जगताप दुखावले गेले.

मधल्या काळात प्रतापसिंह भोसले म्हणजे उदयनराजेंचे वडिल साताऱ्याचे नगराध्यक्ष होते. बंधू अभयसिंहराजे यांच्यासह सगळ्या राजघराण्याचा त्यांना त्यावेळी पाठिंबा होता. निवडणुकीनंतर निघालेल्या जंगी मिरवणुकीत राजघराण्यातले सगळे लोक सहभागी झाल्याच्या आठवणी सांगितल्या जातात.

प्रतापसिंह महाराजांचं अकाली निधन झालं आणि राजघराण्याचा राजकारणाशी असलेला संबंध तुटला.

दरम्यानच्या काळात जिल्हा काँग्रेसमध्ये जी दुफळी निर्माण झाली होती, ती राजघराण्याच्या पथ्यावर पडली. आणीबाणीनंतर अभयसिंहराजे जनता पक्षातून विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिले. त्यांना उभं करण्यात दादासाहेब जगताप यांचा पुढाकार होता. त्यावेळी यशवंतरावांनी गेस्ट हाऊसला बैठक घेऊन जगतापांच्या निकटवर्तीयांच्या खूप विनवण्या केल्या. यशवंतरावांचे राजघराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. परंतु राजघराण्यातल्या लोकांना राजकारणात आणल्याचा भविष्यातला धोका काय असू शकतो, हे जाणण्याची दूरदृष्टी फक्त यशवंतरावांकडेच होती. राजघराण्यातली मंडळी राजकारणात आली तर सामान्य माणूस राजकारणातून हद्दपार होईल, हे त्यांनी लक्षात आणून दिलं. अभयसिंहराजेंना निवडणुकीला उभं करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अनेक संबंधितांनाही यशवंतरावांनी परोपरीनं समजावून पाहिलं. परंतु संपूर्ण क्रांतीचं भूत डोक्यात शिरलेल्या लोकांनी यशवंतरावांचं ऐकलं नाही. अभयसिंहराजे जनता पक्षाकडून उभे राहिले. त्यांच्याविरोधात बाबूराव घोरपडे यांच्यासारखे स्वातंत्र्यसैनिक असलेले जुनेजाणते अनुभवी कार्यकर्ते उभे होते. ते राजकारणातलं बडं प्रस्थ होतं. ते आमदार होते, त्याचवेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. जिल्हा बँकेचेही अध्यक्ष होते. अशा उमेदवाराचा पराभव करून अभयसिंहराजे भोसले निवडून आले आणि साताऱ्याच्या राजघराण्याचा संसदीय राजकारणात प्रवेश झाला.

अभयसिंहराजे भोसले यांची ही निवडणूक उदयनराजे यांच्यादृष्टीनंही लक्षात राहण्याजोगी होती. कारण वडिल प्रतापसिंह महाराज हयात नव्हते. त्यांच्या पश्चात राजघराण्यातील व्यक्ती निवडणूक रिंगणात असल्यामुळं सगळं राजघराणे प्रचारात होतं. त्यावेळी पोरगेल्या उदयनराजे यांनाही गाडीच्या टपावर बसवून मुद्दाम फिरवलं जात होतं. त्यांना पुढं करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होता. त्याअर्थानं उदयनराजे यांची ही सार्वजनिक जीवनातली किंवा राजकीय मैदानातली पहिली झलक होती.

जनता पक्षाचं सरकार पडलं आणि निवडणुका लागल्यावर अभयसिंहराजे काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांचं पुरतं पानिपत झालं होतं. फक्त यशवंतराव चव्हाण यांनी साताऱ्याची जागा राखली होती. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी राजमाता सुमित्राराजे भोसले यांना यशवंतरावांच्या विरोधात उभं राहण्याबद्दल विचारणा केली होती. परंतु यशवंतरावांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधामुळं सुमित्राराजे यांनी त्या प्रस्तावाला नम्र नकार दिला. त्यामुळे तो विषय तिथंच संपला.

काळ बदलत गेला. राजघराणे राजकारणात आलं. त्यांना राजकारणाचे फायदे कळू लागले. अभयसिंहराजे भोसले काँग्रेसचे आमदार आणि नंतर मंत्री झाले. आधी केवळ राजवाड्यावर लोकांचे कोरडे मुजरे घेणं आणि प्रत्यक्ष सत्तेत असतानाची प्रतिष्ठा यातला फरक समजू लागला. राजकारणाच्या माध्यमातून अभयसिंहराजेंनी संस्थात्मक, रचनात्मक कामाला सुरुवात केली. सहकार चळवळीच्या माध्यमातून संघटन उभं केलं. कारखाना, दोन बँका उभ्या केल्या. नेमस्त स्वभावाचे अभयसिंहराजे हळुहळू राजकारणात पाय रोवत होते. आपल्या काकांचा हा राजकीय प्रवास आणि उत्कर्ष बघत बघत उदयनराजे मोठे होत होते.

एकीकडं सत्तेमुळं आणि सत्तेच्या वलयामुळं मिळणारी प्रतिष्ठा आणि होणारा उत्कर्ष तर दुसरीकडं केवळ राजघराण्याची खोटी प्रतिष्ठा असं चित्र समोरासमोर होतं. अभयसिंहराजे यांचा हा उत्कर्ष कल्पनाराजे भोसले यांना खुपत होता. राजकारणातली सगळी जागा यांनी व्यापली तर आपल्या मुलाचं काय, ही चिंता त्यांना सतावत होती. त्याच इर्षेतून त्यांनी १९८९ मध्ये निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली. महाराष्ट्रात हातपाय पसरू लागलेल्या शिवसेनेला साताऱ्यातून राजघराण्यातील व्यक्ती उमेदवार म्हणून त्यानिमित्तानं मिळाली. कल्पनाराजे शिवसेनेच्या उमेदवार म्हणून साताऱ्यातून अभयसिंहराजे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या. परंतु अभयसिंहराजे यांच्या संघटनापुढे त्यांचा निभाव लागला नाही.

पुढचं वर्ष उदयनराजे यांच्या राजकीय आयुष्यात महत्त्वाचं ठरलं.

सातारा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. त्यात उदयनराजे यांनी अभयसिंहराजेंच्या पॅनलच्या विरोधात स्वतःचं पॅनल उभं केलं. स्वतः उदयनराजे दोन ठिकाणाहून उभे राहिले. एक मतदारसंघ होता सामान्य मतदार असलेला. दुसरा होता थोडा मध्यमवर्गीयांचा आणि रास्वसंघाशी संबंधित मतदारांचा. या दोनपैकी सामान्यांच्या वॉर्डातून उदयनराजे निवडून आले आणि उच्चभ्रूंच्या वॉर्डातून जयवंत पवार नामक कार्यकर्त्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. उदयनराजे यांची राजकारणातली वाटचाल खऱ्या अर्थानं या नगरपालिका निवडणुकीपासून सुरू झाली.

लोकसभेची १९९६ ची निवडणूक उदयनराजेंनी लढवली होती. काँग्रेसनं विद्यमान खासदार प्रतापराव भोसले हे पवारांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक म्हणून परिचित होते. मधल्या काळात दिल्लीच्या राजकारणात पवार जम बसवू पाहात होते, पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आपली प्रतिमा तयार करीत होते त्यावेळी त्यांना दिल्लीत विरोध करणारांमध्ये प्रतापराव भोसले आघाडीवर होते. त्यांच्या जोडीला पृथ्वीराज चव्हाण, सुधीर सावंत वगैरे मंडळी होतीच. सातारा हा आधी यशवंतराव चव्हाण आणि नंतर शरद पवारांचे नेतृत्व मानणारा जिल्हा. विद्यमान खासदार असल्यामुळं प्रतापरावांची उमेदवारी कापणं शक्य नव्हतं.  परंतु प्रतापराव भोसले यांचा पराभव करण्याची व्यूहरचना आखण्यात आली होती असं म्हणतात. त्यासाठी काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी अनेक समविचारी उमेदवार उभे करण्याची खेळी करण्यात आली. उदयनराजे भोसले, पार्थ पोळके, कर्नल आर. डी. निकम शिवाय आणखी दोघे-तिघे तसे उमेदवार होते. त्याचा परिणाम असा झाला की, बारा हजार मतांनी शिवसेनेच्या हिंदूराव नाईक-निंबाळकर यांनी प्रतापराव भोसले यांचा पराभव केला. या निवडणुकीत उदयनराजेंना एक लाख १३ हजार ६५८ मतं मिळाली. पहिल्याच प्रयत्नात अपक्ष म्हणून मिळालेली ही मतं दखलपात्र होती. पवारांनी प्रतापराव भोसले यांचा गेम केलाच, परंतु उदयनराजेंनाही स्वतःची ताकद लक्षात आली. या निवडणुकीत उदयनराजे उमेदवार असतानाही अभयसिंहराजे यांनी पक्षशिस्त म्हणून प्रतापराव भोसले यांचा प्रचार केला. यावरून अभयसिंहराजे आणि उदयनराजे यांच्यात फूट पडली.

या मालिकेतील पुढील दोन भाग वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा...

(कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक २०१६मधून साभार)प्रतिक्रिया द्या3037 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
सुषमा शितोळे - शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७
लेखाची मांडणी खुप छान झालीये..:)
रवींद्र शिवाजी गुरव - बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७
चला गाडीत बसा नि बघा...राजे राजेच...
Nitin Sangle - मंगळवार, २५ जुलै, २०१७
Very good

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर