फेबुगिरी
सोमवार , १७ जुलै, २०१७ टीम बिगुल

ताज्या घडामोडींबाबत किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्यक्त होणा-यांची संख्या मोठी आहे. यातल्या काही निवडक खास पोस्ट्स ‘बिगुल’च्या वाचकांसाठी...

जै गोमाता..
काही प्रश्न गौरक्षकांना.
☆ समजा माझ्याकडे व्होस्टन(जरसी) गाय आहे.
आहेतच हे पण खरेय. ती व्यायली आणि तिला पाढा (बैल) झाला.. म्हणजे नर.
तर त्याचा काहीच उपयोग नसतो.
म्हणजे शेतीकामात वगैरे. आणि आता बैल वगैरे पाळून शेती करणे म्हणजे तोट्यात असतं.
मग मी तो पाढा कसा पाळायचा?

☆समजा माझ्या घरी एक गाय आहे. ती आता ना गाब (गरोदर)
राहते ना दूध देते. तिला संभाळायला मला रोज किमान २०० रुपये खर्च येतो. तर ती गाय मी पदरमोड करून का पाळायची?

☆ गेल्या महिन्यात आमच्या घरून एक गायीचे वासरू मावसभावाला पाळायला द्यायचे होते. त्यावेळेस ब-याच छोट्या टेम्पोवाल्यांना भाड्यासाठी विचारले. गोरक्षकांच्या भीतीने एकही टेम्पोवाला वासरू गाडीतून न्यायला तयार झाला नाही. शेवटी घरच्याच व्हॅनमधून ते वासरू पोहोचते केले.

☆ शहरी लोकांची फ्लॅट, ब्लॉक, एफडी, पॉलिसी वगैरे स्वरूपात संपत्ती असते, शेतक-यांच्या बाबतीत गाय, म्हैस, शेळी, कोंबड्या ही असते. अडीनडीला आपली गरज भागावी म्हणून तो यांना सांभाळत असतो. गाय हा शेतक-यांसाठी उपयोगी पशू असतो, गौमाता वगैरे नाही आणि तिचा सांभाळ तो पैसा राहत नाही पण गाय राहते व अडचणीच्या वेळी विकून आपली नड भागेल या दृष्टिकोनातून करतो.. गौरक्षकांच्या कृतीमुळे तसेच सरकारच्या कायद्याच्या स्वरूपातील पाठबळामुळे त्याच्या या संपत्तीची किंमत आता शून्य होत आहे. यामुळे लोक गायी पाळणेच सोडून देतील.. यांना गायी वाढवायच्यात की कमी करायच्यात?

या प्रश्नांची योग्य उत्तरे आली तर मी पण मग गौरक्षक होईन.

#जै_गोमाता.

- सर्जेराव जाधव

...........

एका मोठ्या एनजीओच्या मोठ्या मॅडम मैत्रकूलचं नाव ऐकून भेटायला यायचंय असं व्हाट्सपवर बोलल्या 
मैत्रकूलबद्दल व माझ्याबद्दल कुठून तरी त्यांनी ऐकले 
पण ते नेमकं काय आहे याबद्दल त्यांनी जरा चौकशी केली नाही. माझी अशी तशी ओळख आहे,
मी अशी तशी असे सांगून त्यांनी पार मारुतीच्या शेपटीप्रमाणे न संपणारे फोटोज मला पाठवले 
आणि शेवटी मला हळूच विचारले की मी तुम्हाला डोनेशन आणून दिले तर मला किती टक्के द्याल?
मी त्यांना म्हणालो साष्टांग दंडवत.
थोडे गरिबीत दिवस जातील जाऊद्यात.
पण तुम्ही तसदी नका घेऊ.

- किशोर पवित्रा भगवान जगताप

...........

मोठ्या बालवाडीत असताना पेन्सिल खाल्ली होती. आईनं लै फटकावलं होतं. दुसऱ्या दिवशी आज्जी तीच्या धाकट्या जावेशी बोलत होती... म्हतारा ईस वर्षे झाली पेन्शिल खातोय...

मला वाटलं पेन्सिल ही तंबाखूसारखी असेल. फक्त मोठ्या लोकांनी खायची असते. सहावीला गेल्यावर कऴलं... आज्जीला पेन्शिल नव्हे तर पेन्शन म्हणायचं होतं. तरी मनातल्या मनात म्हणायचो... म्हातारा वीस वर्षे पेन्शिल खातोय तरी त्याला कुणी का मारत नाही. असो...

हे आठवायचं कारण असं... आज आज्जी बोल्ली ...शारूकला लै दात असतात का? मला कळालं नाही. पुन्हा विचारलं. ती म्हणाली. शारूक रे. त्याला खूप दात असतात का?

मला वाटलं, आज्जीनं शाहरूखचा इंटरव्यू पाहिला असेल. जास्त बोलणाऱ्याला आजीच्या भाषेत जास्त दात आले आहेत असं म्हणतात. तरी उत्कंठा...

मग म्हटली शारूकनं त्या पोरीला चावून खाल्लं. दाताला खुप धार होती. मी ऐकून अवाक् पडलो. टीव्हीकडे नजर टाकली. स्टार मुव्हीज चालू होता ... मुव्ही होता शार्क अटॅक ...

मोठा मासा तिला शार्क वाटतो. ती शार्कला शारूक मासा बोलते हे आज कळालं...

द्रुपदाआई रॉक्स .. मी शॉक्स...

- वैभव छाया

............

संदीप येवलेंना अटक करा...

एक माणूस ४० लाखांची कॅश घेऊन सर्व स्टुडीओ फिरतोय. मोदींच्या कॅशलेस स्वप्नाला चॅलेंज करतोय. हे पैसे कुणी दिले सांगतोय, कशासाठी दिले सांगतोय, भाजपामधील कोण कोण यात सामील होते हेही सांगतोय.

हा माणूस घातक आहे. हा बाहेर राहिला तर हे सर्व मिळून त्याचा खून करतील. या संदीप येवलेला आधी अटक करा आणि जेलमध्ये टाका..

पण पोलिस त्याला अटक का करत नाहीत.. पोलिसांना कसली भीती आहे.. तो आपल्या पोलीटीकल बॉसेसना आत टाकायची व्यवस्था करेल म्हणून...?

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या एकूण कामांमध्ये पोलिसांची भूमिका अंडरवर्ल्डसारखी आहे. पोलिसांनी अनेकांच्या सुपाऱ्या वाजवल्यायत.. संदीप येवलेची सुपारीही पोलीस वाजवू शकतात. अपघातात मारण्याची मुंबई पोलीसांतील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांची मोडस् ऑपरेन्डी सर्वांना माहित आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांनी संदीप येवलेला अटक करून त्याचं म्हणणं रेकॉर्डवर आणलं पाहिजे...त्याला सुरक्षित केलं पाहिजे... नाहीतर ही सिस्टीम त्याला जगू देणार नाही.

- रवींद्र आंबेकर
............

घोषणा बदलायची वेळ आलीय ?

मराठी माणसा जागा हो ....

मराठी माणसा "जागा " घे ...
(नाही घेऊन दाखवच.. जमल्यास... पैसे असल्यास..."त्यांनी "घेऊ दिल्यास)

# उरलासुरला गिरणगाव 
# "मच्छीचं" खाणार त्याला घर नाही देणार!

कृपया अपवादांची उदाहरणे नकोत!

- स्वप्नील पाथरे

............

आज बहुचर्चित 'हृदयांतर' चित्रपट पाहिला. प्रोमो पाहून विषय कळला होताच तसा पण विख्यात डिझायनर विक्रम फडणीस दिग्दर्शनात उतरतोय आणि तेही मराठीत म्हणून चित्रपट पाहायची उत्सुकता होती.

पण चित्रपट पाहण्याचे मुख्य कारण आणि आकर्षण म्हणजे मुक्ता बर्वे अन सुबोध भावे... दोन्ही अतिशय उत्तम कलाकार, माझे अतिशय आवडते... आणि 'एक डाव धोबीपछाड'मधली त्यांची केमिस्ट्री तर इतकी मस्त होती. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी दोघे एकत्र येतायत म्हटल्यावर पिक्चर देखना तो बनता है बॉस... असा विचार करून गेले अन्.. भ्रमनिरास झाला!

चित्रपट तसा यथातथाच आहे. कहाणी तर आधीपासूनच माहिती, तशी सरधोपटच. फक्त प्रेझेंटेशन (?) उत्तम.... मोठ्ठालं घर, लॅव्हिश लाइफस्टाइल... थोडक्यात बॉलिवूडमध्ये, मुख्यत्वाने करण जोहर, सूरज बडजात्या यांच्या चित्रपटात जे राहणीमान दिसतं ते ते सगळं... पॅकिंग मस्त पण आतला माल यथातथाच! एक जोडपं, त्यांच्या मुली, जीवन, त्या जोडप्यातल्या कुरबुरी, मग त्यांच्यावर येणारं संकट आणि मग ते एकत्र त्याला कसे सामोरे जातात इत्यादी इत्यादी....

मी जेवढ्या वरवर लिहीलं आहे ना हे सगळं, तेवढ्याच वरवर हे चित्रपटातही दाखवण्यात आलेलं आहे... म्हणजे शेखर (सुबोध) आणि समायराचं (मुक्ता) का पटत नाही, १२ वर्षांच्या संसारानंतरही त्यांचं काय चुकतयं वगैरे, हे अगदीच वरवर दिसतं...एका टप्प्यानंतर भांडणाला वैतागून ते वेगळं व्हायचं ठरवतात, पण त्यांच्या मोठ्या मुलीला एक मोठ्ठा आजार होतो, ते खचतात म्हणून थोडावेळ एकत्र येतात... पण तिची ट्रीटमेंट सुरू झाल्यावर पुन्हा त्यांचे मार्ग वेगळे होण्याकडेच....?

अरे म्हणजे कमॉन, स्वत:च्या पोटच्या पोरीला एक दुर्धर आजार झालाय आणि तुम्ही डिव्होर्सबद्दल काय बोलताय, म्हणजे एकत्र राहणं शक्य नसेल हे मान्य, पण प्रायॉरिटी काय आहे ते तर ठरवा. मध्येच भांडतात काय, मग परत एकत्र येतात, मध्येच दिवाळीचा सीन? (साजरी करण्याबद्दल आक्षेप नाही, पण मुलगी पूर्णपणे बरी झालेली नसतानाही एवढं सेलिब्रेशन? मला तरी खटकलं)... कन्टिन्युइटी (सलगता) मला तरी दिसली नाही, तुकड्या तुकड्यातला पिक्चर पाहण्यात कोणाला इंटरेस्ट?

मुलीचे केस गेल्यानंतर तिला धीर देण्यासाठी वडिलांनीही केस काढून टाकणं... (अचाट आणि अतर्क्य... ख-या आयुष्यात करत असतीलही पण तरीही मला जरा जास्तच वाटलं) तो सीन पूर्पणणे गंडलेला आहे... सर्व प्रकारच्या भावभावना दाखवण्यात (अभिनयात) मुक्ता आणि सुबोध कुठेच कमी पडत नाहीत, पण म्हणून इतका अतिरेक? इतर (सह!) कलाकार जाम म्हणजे जाम गंडलेत...

मनीष पॉल, हृतिक रोशन, शामक दावर वगैरे मोठमोठाली मंडळी घेऊन उगाच वाया घालवली आहेत. (नावापुरतीच घेतली आहेत खरंतर असं वाटतं).. त्यातल्या त्यात हृतिकचा क्रिशवाला सीन बरा जमला आहे, पण त्यातही आई एकटीच..

वडील कुठे जातात मध्येच? मुलीच्या महत्त्वाच्या ऑपरेशनच्या वेळेसही तीच परिस्थिती, आई ऑपरेशन थिएटरबाहेर अस्वस्थपणे येरझारा घालते, अन् पिताश्री कुठेत? तर बाहेर सिगरेटी फुंकतायत... आय मीन सीरियसली?

कठीण परिस्थितीत बायकोला धीर देण्याऐवजी सिगरेट? नक्की काय दाखवायचंय बॉस?

सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे गाणी, पार्श्वसंगीत.. इमोशनल करण्याच्या नादात एवढ्या मोठयामोठ्याने रडण्यात काय हाशील? त्याने प्रेक्षकांना बिलकूल रडायला येत नाही, उलटपक्षी इरिटेट जास्त होतं...

थोडक्यात काय, तर मुक्ता-सुबोधचे फॅन आहात (माझ्यासारखेच!) म्हणून (आणि अपेक्षा ठेवून..) चित्रपट बघायला जाणार असाल तर भ्रमनिरास करून घेण्याची तयारी ठेवा ( माझ्य़ासारखीच..!)
कारण फक्त कलाकार चांगले आहेत म्हणून चित्रपट चांगला असेलच असं नाही.. त्यासाठी इतर गोष्टींचीही ( दिग्दर्शक, सहकलाकार.. मुख्य म्हणजे कथा) गरज असतेच... अन्यथा चित्रपट नाही बघितला तरी नुकसान नाही... दोन-चार महिन्यांत एखाद्या मराठी चॅनेलवर 'वर्ल्ड प्रिमिअर' पार पडेलच.

'हृदयांतर' पाहून माझं हृदयांतर बिलकूल झालेलं नाही, त्यामुळे विक्रम फडणीस आणि तथाकथित प्रभृतींचा चित्रपट पाहण्याचे धाडस पुन्हा करणे नाही..! कानाला खडा...!

- मीनाक्षी कुलकर्णी

............

राजनाथ सिंहांना गृहमंत्रीपदावरून का हटवू शकत नाहीत मोदी..

एकापेक्षा एक दहशतवादी हल्ले होत आहेत आपले जवान शहीद होत आहेत. अशातच अमरनाथ यात्रेला गेलेल्या काही यात्रेकरूंना दहशतवाद्यांनी जिवानिशी मारलं. काश्मीरमध्ये भारताच्या लोकांनी मरणं ही हल्ली ‘आम बात’ होत चालली आहे पण तरीसुद्धा आदरणीय गृहमंत्री राजनाथ सिंह भारतीयांच्या मरण्यावर चिंता दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या बाजूला मनमोहन सरकार असताना ‘आतंकवाद से लढणे के तरीके’ ट्वीटरवर सांगणारे मा. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होताच ते सगळे ‘तरीके’ विसरून गेले आहेत.

हल्लीच ट्वीटरवर राजनाथ सिंह यांना एका महिलेने दहशतवादाशी लढण्यासाठी कडक पाउले उचलली पाहिजे असं काहीसं ट्वीट केलं,राजनाथसिंह या गोष्टीमुळे नाराज झाले आणि आपल्या ट्रोल नामक जमातीला कामाला लावून त्या महिलेला आपल अकौंट बंद करण्यास भाग पाडलं. राजनाथसिंहानी आपल्या आपण करत असलेली ‘कडी निंदा’ ही मनमोहन सिंह यांच्यापेक्षा चांगली असल्याचे सांगत आपल्या ‘कडी निंदेत’ शुद्ध हिंदीचा वापर करत असल्याचे पुरेपूर सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ती महिला काहीएक ऐकण्याच्या स्थितीत न्हवती.

नरेंद्र मोदीजी यांनी निंदेच्या धंद्याला वाढवत मागच्या वेळी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून इंग्रजीमध्ये निंदा केली होती, त्यांच्या इंग्रजीच्या असलेल्या अगाध ज्ञानाला पाहून हा दहशतवाद्याच्या चेह-यावर ‘करारा तमाचा’ असल्याचे काही वृत्तवाहिन्यानी म्हणले आहे. नरेंद्र मोदींनी आपल्या कॅबिनेटच्या बैठकीत कमिटीला सूचना देताना म्हटलं की राजनाथ सिंह यांच्यासारखा दुसरा हुशार, अभ्यासू व माझ्यासारखा ‘बातो का राजा’ मंत्री नसल्यामुळे मी त्याना या पदावरून हटवू नाही.

त्यातच एका माजी भक्ताने राजनाथजींना ट्वीटरवरच सांगितल, "सर यदि निंदा करने से काम चल जाता तो मनमोहन सिंह आपसे अच्छी आवाज और अंग्रेजी में निंदा कर लेते थे”

- सचिन गवळी

............

राहुल गांधी, आता का गप्प ?
-------------
इंदु सरकारला विरोध करताहेत काँग्रेसजन. सिनेमा पहिल्या आणीबाणीविषयी आहे. आजच्या दुसऱ्या आणीबाणीविषयी हिरीरीने बोलणा-या काँग्रेसचा हा दुटप्पीपणा नाही काय? सिनेमा आताच का प्रदर्शित केला वगैरे प्रश्न फिजूल आहेत. मधुर भांडाकरची ही 'फॅशन' आहे वगैरे म्हणून विरोध करणं याला 'पेज 3' न्यूजहून अधिक महत्त्व नाही.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसने केलेला हा निवडक विरोध चुकीचाच आहे.

आणीबाणीचे समर्थन करणं तर त्याहून चुकीचे आहे. स्वतः इंदिरा गांधींनी आपल्या चुकीची कबुली दिली. भारतीय जनतेने ती स्वीकारली म्हणून तर १९८०ला त्या बहुमताने सत्तेत आल्या.
राहुल गांधी, या निवडक विरोधावर तुम्ही गप्प का?

- श्रीरंजन आवटे

............

गुंडागर्दी, शिवीगाळ, असंसदीय शब्द वापरणे, दादागिरी करून बुद्धीवंत, चित्रपट यांचा विरोध करणे ही खास उजव्यांची मक्तेदारी आहे .आता हाच च्यूतियापा काँग्रेस ही करत असल्याचे आगामी इंदू सरकार चित्रपटानिमित्ताने दिसून येत आहे ..

आणीबाणी लावणे चुकीचे होते व खुद्द लोकांनी काँग्रेसचा दणदणीत पराभव करून हे सांगितलेले असतानाही त्यावरून आलेल्या चित्रपटास विरोध करणे हास्यास्पद आहे. बरं आणीबाणी व सदरील कालखंडातील घटनांनवर भरपूर लिटरेचर उपलब्ध आहे. त्यामधून नेमके काय घडलेले हे काचेइतके स्वच्छ झालेले आहे.. ते राजकीय दृष्टिकोनातून जागृत असलेल्या प्रत्येक नागरिकास माहितीही आहे. बरं त्यानंतरही काँग्रेस अनेकदा सत्तेवर आलेली आहे.. त्यामुळे या चित्रपटात आणीबाणीचे कसेही चित्रण केलेले असले तरीही त्याचा वर्तमानकाळातील राजकारणावर कुठलाही प्रभाव पडण्याची अजिबात शक्यता नाही पण तरीसुद्धा ही लोक या चित्रपटास विरोध करत आहेत..

याउलट चित्रपट विनाविरोध प्रदर्शित होऊ देऊन काँग्रेसला नैतिक बळ तरी मिळवता आले असते. जे तिला भविष्यकाळात कामी आले असते. पण ते म्हणतात ना'ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही मात्र गुण लागला..'

- शिवराज दत्तगोंडे

............

........#घटस्फोट_.....#तो_ही_दीर्घ_चुंबनाने!!#

कालच्या घटस्फोटातीत मुलींच्या घटनेवरून मी विचार करू लागले आणि मला वाटलं,'खरचं लग्न आनंददायी ठरू शकले नाही, म्हणून काय घटस्फोटही आनंददायी ठरू नये? नेहमी सुख आणि आनंदाच्या शोधात फिरणाऱ्या माणसाने प्रत्येक क्षण मग तो कितीही दुःखाचा असो, तो आनंददायी बनवण्याचा प्रयत्न केला तर... म्हणूनच मला महारुद्र मंगनाळे यांच्या 'माती आणि नाती' या पुस्तकात उलखलेल्या स्वित्झर्लंडमधील चर्चची आठवण झाली. त्यांनी घटस्फोटाला आनंदी सोहळ्याचे स्वरूप देण्याचा फतवा काढला आहे. यानुसार स्वित्झर्लंडमध्ये विवाहाप्रमाणेच घटस्फोटाचाही एक विधी निश्चित केला आहे. ज्या जोडप्याला एकमेकांपासून घटस्फोट घ्यायचा आहे, त्यांनी आपल्या नातेवाईक व मित्रांसह चर्चमध्ये जमणे आवश्यक आहे. सर्व उपस्थितांसमोर घटस्फोट घेऊ इच्छिणाऱ्या नवरा-बायकोने एकमेकांचे दीर्घ चुंबन घेतल्यानंतरच त्यांच्या घटस्फोटाला चर्चची मान्यता मिळते. हा नियम करणाऱ्या चर्चेचे खरोखरच मनापासून कौतुक केले पाहिजे. कारण एकमेकांपासून या पद्धतीने विभक्त होणारी जोडपी, एकमेकांचा द्वेष न करता, प्रेमाचे शेवटचे चुंबन अनुभवत विभक्त होतील. कदाचित हा शेवटच्या चुंबनाचा क्षणच त्यांच्या उर्वरीत आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असेल. ज्या आनंदाने व प्रेमाने ती एकत्र आली, त्याच प्रेमाने ती विभक्त झाली, तर त्यापेक्षा आनंदाची बाब ती कोणती? भारतात एकमेकांवर दोषारोप करत व शिव्याशाप देत अतिशय कटू मन:स्थितीत घटस्फोट घेणाऱ्यांना स्वित्झर्लंडच्या उदाहरणातून धडा घेता आला तर दुःखातही आनंद शोधण्याची प्रचिती येईल. 

- वृषाली_बर्गे

............

समाजमाध्यमं जन्माला यायच्या कित्येक दशकं आधीपासून, महात्मा गांधी आणि पंडित नेहरू, त्यानंतर इंदिरा गांधी व सोनिया गांधी यांची यछेच्छ बदनामी करण्यात आली आहे. अजूनही केली जाते. समाजमाध्यमं अस्तित्वात आल्यानंतर/विस्तारल्यावर राहुल गांधींची कशी प्रतिमा करण्यात आली आहे हे सर्व सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. तरीही त्याविरोधात काँग्रेसवाले कधी आवाज उठवताना दिसत नाहीत. खरी बाजू काय आहे ते मांडण्यासाठी मेहनत घेताना दिसत नाहीत. सर्वात अलिकडे म्हणजे postcard या वेबसाईटवर इंदिरा गांधींच्या चारित्र्यावर मनसोक्त चिखलफेक सुरू आहे. तरीही काँग्रेसवाले ढिम्म आहेत. आणि हे कशासाठी निदर्शनं करताहेत तर 'इंदू सरकार' या सिनेमाला विरोध करण्यासाठी. बावळटपणाचा कहर आहे.

- निमा पाटील

............

बाईच्या नजरेतून बाईच्या भावना मांडणं आणि पुरुषाच्या नजरेतून बाईच्या भावना मांडणं यात फरक असतो हे मांडणारा सुंदर किस्सा.

गझलेत गुरू शिष्याच्या रचनेत तपासून ज्या सुधारणा करतो त्याला इस्लाह म्हणतात.

एकदा मिर्ज़ा सुलेमानजाह 'अंजुम' आपले उस्ताद हैदरअली तबातबाई 'नज्म' यांच्याकडून इस्लाह झालेली गझल घेऊन घरी निघाले. वाटेत नवाब अख्तर महल बेगमची हवेली पाहून आत शिरले. बेगम काही शायरा नव्हती पण अव्वल दर्जाची रसिक, दर्दी होती. नवीन ताजं काही तरी ऐकवा फर्माइश आल्यावर गुरूची सर्टिफाइड गझल ऐकवायला सुरुवात केली.

दम मेरा निकला तेरे वादे के साथ
तेरी घबराई हुई हाँ की तरह -

क्या आपने गर्दन पर खंजर रखकर हाँ कहलवाया था, उसने घबराकर हाँ जो कहा।

बेगमनी इस्लाह केलेला शेर असा बदलला.

दम मेरा निकला तेरे वादे के साथ
तेरी शरमाई हुई हाँ की तरह-

(स्रोत. मजरूह सुलतानपुरीची आकाशवाणीवरची मुलाखत
अभिव्यक्ति २००४ अंक
गझल पृ. ११४.
देवेंद्र मांझींचा ब्लॉग.)

- स्वाती ठकार

............

माझे बाबा हिशेब लिहीत रोजचा. त्यांचं हिशेब विचारणं आणि आम्ही दोघी मायलेकींनी त्यांना उत्तरं, स्पष्टीकरणं देणं हा रोजचा संध्याकाळचा कार्यक्रम असे. जेवायला बसण्याआधी डायरीत अगदी बारीक अक्षरांत एका कोपऱ्यात दैनंदिन खर्च असा कॉलम करून ते लिहीत. बस- किराणा- भाजी- मासे- अशी सदरं असत त्यात. मग आई योगासने शिकवायला लागली तेव्हा तिचा प्रवास खर्च वेगळा लिहिला जाऊ लागला. मी कॉलेजमध्ये जायला लागले तेव्हा माझा प्रवासखर्च त्यातच उप-रकाना करून मांडू लागले.

१९७७ साल. रोज ते दोन रुपये मला देत. त्यातून गिरगाव ते म्युझियम पन्नास पैसे बसचं तिकिट येऊनजाऊन. उरलेला दीड रुपया चहा, वडापाव, कधी म्युझियमचं तिकिट. रोज या दोन रुपयांतले किती पैसे वाचलेत ते सांगावे लागे आणि मग त्याता पूरक असे पैसे ते देत असतं. मग एकदा आईच त्यांना ओरडली, त्यानंतर रोज दोन रुपये देऊ लागले. पण हिशेब द्यावाच लागे. तो लिहिणं हे त्यांचं व्यसनच होतं. (नंतर कधीतरी मीच ते मोडून टाकलं. नाही देणार हिशेब म्हणून... आईही पार वैतागली होती त्या हिशेब प्रकरणाने. हिशेब लिहिण्यात जाणारा वेळ आणखी वाचण्यात घालवा म्हणून सांगितलं. पट्टीचे वाचणारे होते ते. वैतागले पण थांबलेही हिशेब लिहायचे.)

विद्यार्थी चळवळीत असताना चहा पिणेच जास्त होत असे. एल्फिन्स्टन कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चाळीस पैसे चहा होता, तर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या कॅन्टीनमध्ये पंचवीस पैसे. मग त्यालाच पसंती. बेस्टच्या स्टॉलवरचा वडापाव मोठ्ठा असे पण एक रुपयाचा. आणि आर्मी-नेव्ही कॅन्टीनजवळचा रस्त्यावरचा वडापाव पन्नास पैशाला. नुसता वडा पंचवीस पैशाला. मग त्यालाच पसंती. कधीकधी येतानाचे बसचे पैसे चालत जाऊन वाचवायचे...

रोजच्या दोन रुपयांतले पंचवीस पैसे पन्नास पैसे बाजूला टाकत थोडे पैसे साठले तर त्यातून कधीतरी कॉलेजच्या मागच्या मिल्कबारमध्ये काहीतरी खायचं.

धनंजय आणि मी- मैत्री झाल्यानंतर बरेचदा इन्स्टिट्यूटच्या कँटीनमध्ये चहा घेत असू. त्याची जेआरएफ सुरू झाल्यानंतर तंगी कमी झाली. पण त्याआधी, किंवा नंतरही पैसे प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत माझा दोन रुपयांचा हिशेबबद्ध पॉकेटमनीच चहा आणि प्रेमाचे कौतुक पुरवत असे.

मस्तच चहा असे तो- आणि वडापावही.

आणि अव्हल मैदान ओलांडून, चर्चगेटच्या बाजूने समुद्रावर पोहोचून थोडावेळ बसून मग चालतचालत समुद्राच्या काठाने... मग चर्नीरोड क्रॉस करून केळेवाडीतून घरी परतणं...
मस्त होतं.

- मुग्धा कर्णिक

............

माझी नात्यातली एक बहीण फॉरेन्सिक सायन्स एक्स्पर्ट आहे, सख्खी बहीण सुवर्णपदक विजेती डॉक्टर आहे. माझे तसेच वडिलांचे बरेच मित्र डॉक्टर आहेत. वडील मागील ३० वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलात वडिलांचे बरेच बालपणीचे मित्र विविध खात्यात कार्यरत आहेत. हे सगळं मी का सांगतोय?

तर बुधवारी नागपूरला सलीम गो दहशतवादाचा बळी ठरला. नागपूर पोलिसांनी दहशतवाद्यांना अटक तर केली परंतु सोबतच सलीमकडे गोमांस होते हेदेखील जाहीर केले. हे काय आहे समजून घेण्यासाठी थोडं उदाहरण देऊन चर्चा करावी लागेल.

स्त्री आणि पुरुष दोन स्वतंत्र अस्तित्व असले तरी दोघांची प्रजाती एकच आहे, मानव. एखाद्या ठिकाणी मानवाचे केवळ मांस आढळून आले तर त्या मांसावरून हे अजिबात ठरवता येत नाही की हे मांस स्त्रीचे आहे की पुरुषाचे. जगाकडे असे कोणतेही साधन नाही ज्याच्या आधारे या प्रश्नाचे उत्तर देता येईल. हेच गोमांसाच्या बाबतीत आहे. गाय आणि बैल एकच प्रजाती असल्याने यांच्या मांसात फरक करताच येत नाही. हो परंतु म्हशीचे मांस वेगळे आहे हे सांगता येते. ते देखील केमिकल टेस्टने नव्हे तर खाऊन सांगावे लागते. चव घेतल्याने फरक कळतो.

उद्या जर का तुम्ही मांस विकत घेतले आणि तुम्हाला अडवून चोपले गेले आणि घोषित केले गेले की तुमच्याकडे गोमांस होते तर तुम्हाला कोणीही निर्दोष सिद्ध करू शकत नाही, परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे. आणि हो खाटीकाच्या दुकानाचे केवळ ३५-४० टक्के ग्राहक मुस्लिम असतात.... बाकीचे कोण असतात सांगायची गरज नाही.

- मुजाहिद शेख



प्रतिक्रिया द्या



2969 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर