बोधिधर्माचा धडा.. नजमाचा हनीमून.. रक्त स्वत:चंच!..
सोमवार , १७ जुलै, २०१७ मुकेश माचकर

बोधकथा, मुल्ला नसरुद्दीन कथा आणि मार्मिक विचार असा दमदार, कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून...

आपल्या राज्यात बोधिधर्म आले आहेत, म्हटल्यावर चीनचा सम्राट वू याला खूप आनंद झाला. त्याने बोधिधर्माची खूप ख्याती ऐकली होती. त्याने अत्यंत प्रेमाने आणि सन्मानाने बोधिधर्माला राजदरबारात येण्याचं निमंत्रण पाठवलं. दरबारातल्या सगळ्या मंत्र्यांना, सहकाऱ्यांना, शाही पाहुण्यांना बोलावून घेतलं.

सगळे उत्कंठित मनाने वाट पाहात असताना बोधिधर्माचं आगमन झालं आणि त्यांना पाहून सगळे चकितच झाले.

बोधिधर्माने एक चप्पल पायात घातली होती आणि दुसरी डोक्यावर घेतली होती.

ते पाहून दरबारी हसू दाबत एकमेकांपाशी कुजबुजू लागले. राजाला फारच अपमानित आणि लज्जित झाल्यासारखं वाटू लागलं.

त्याने विचारलं, महाराज, भारतातून लांबचा प्रवास करून आल्यामुळे तुम्हाला काही थकवा वगैरे आलाय का? थोड्या विश्रांतीची गरज होती का तुम्हाला?

बोधिधर्माने विचारलं, का बरं? असं का वाटतंय तुला?

सम्राट म्हणाला, महाराज, पायातली चप्पल आपण डोक्यावर घेतली आहे, म्हणून हा प्रश्न पडला.

बोधिधर्म हसून म्हणाले, माझं डोकं फिरलंय की काय असं तुला आणि तुझ्या दरबाराला वाटलं, हो ना? चप्पल पायाच्या संरक्षणासाठी बनली आहे खरी. पण, ती डोक्यावर ठेवल्याने कशात काय फरक पडतो? डोकं डोकंच राहतं, पाय पायच राहतात, चप्पल चप्पलच राहते. तरीही माणूस रागावला की 
दुसऱ्याच्या डोक्यात चप्पल मारतो. का मारतो? खरंतर त्याला त्या माणसाच्या डोक्यावर लाथ हाणायची असते, त्याचं डोकं पाताळात गाडून टाकण्याची इच्छा असते. ते शारीरिकदृष्ट्या आणि व्यवहारत: अशक्य असतं, म्हणून माणूस दुसऱ्याच्या डोक्यावर चप्पल मारतो. पायातली 
वहाण पायातच बरी, हे सगळ्यांना कळतं. पण, रागाला मात्र लोक डोक्यावर चढवून घेतात. आश्चर्य तर त्याबद्दल वाटायला हवं, नाही का?

बोधिधर्माच्या एकेका शब्दाबरोबर राजा खजील होत गेला.

आदल्याच रात्री त्याने क्षुल्लकशा कारणावरून एका सेवकाच्या डोक्यात चप्पल हाणली होती, ते त्याला आठवत होतं.

.....................................

चटपटीत, चुरचुरीत नजमा म्हणजे मुल्ला नसरुद्दीनची बायको आता हिल स्टेशनवरच्या बहुतेक दुकानदारांच्या ओळखीची झाली होती. इतर अनेक टुरिस्टांप्रमाणे नजमाही इथे हनीमूनला आली आहे, हेही त्यांना कळलं होतं. फक्त जेव्हा पाहावं तेव्हा ती एकटी दिसायची. तिचा नवरा काही सोबत दिसायचा नाही.

शेवटी एका दुकानदार आज्जीने तिला विचारलंच, बेटा, तेरा शौहर कभी दिखता नहीं. एकदा भेटव की त्यालाही.

नजमा म्हणाली, मुल्लाजी?… वो तो नहीं आये हैं… ते तर गावी आहेत, घरी.

दुकानात जमलेल्या सगळ्या साळकाया-माळकाया चमकल्या, बाप्येही थबकले…

आज्जी म्हणाली, अगं हनीमूनला एकटीच आलीस? नवऱ्याला आणायला पाहिजे ना सोबत?

नजमा म्हणाली, आणि तिकडे गावी दुकान कोण सांभाळणार? ते बंद ठेवायचं का पंधरा दिवस?

…………………………..

मेरी रगोंमें आपकाही खून दौड रहा है…

किंवा

तुम्हारी रगों में मेरा/हमाराही खून दौड रहा है…

ही दोन्ही वाक्यं साफ चूक…

गर्भावस्थेत आईचं रक्तही मूल विघटित करून स्वीकारतं आणि आपलं स्वत:चं वेगळं रक्त तयार करतं…

नाहीतर प्रत्येक आई आणि मुलाचा रक्तगट एकच नसता झाला!!!

………………………………………

तुम्ही अमृततुल्य नियमित वाचता?

मग इथे प्रसिद्ध होणाऱ्या कथांपैकी निवडक १०० कथांचा अक्कलझाड हा दोन भागांचा पुस्तकसंच तुम्हाला नक्कीच आवडेल.

तो खरेदी करण्यासाठी ‘इंद्रायणी साहित्य, २७३, शनिवार पेठ, पुणे ३०’ येथे ०२०-२४४५८५९८ किंवा ०२०-२४४८१८६७ या क्रमांकावर किंवा ९३७१०४३७८१ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

हा संच पुढील ठिकाणी ऑनलाइनही उपलब्ध आहे. फक्त क्लिक करा आणि घरपोच मिळवा.

इंद्रायणी साहित्य: http://bit.ly/IndrayaniSahityaAkkalJhad

बुकगंगा: /http://bit.ly/BookGangaAkkalJhad

अमेझॉन:http://http://bit.ly/AmazonAkkalJhadप्रतिक्रिया द्या1658 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर