एकेका गावाचा अजब सिंड्रोम
रविवार, १६ जुलै, २०१७ अमोल उदगीरकर

अमोल उदगीरकरांनी पॅरिस सिंड्रोमची माहिती देणारी पोस्ट फेसबुकवर टाकली आणि कमेंटींमधून वेगवेगळ्या गावांचे सिंड्रोम बाहेर पडले... ही पोस्ट आणि तिच्यावरच्या निवडक कमेंट्स यांचं हे संकलन...

अमोल उदगीरकरांनी पॅरिस सिंड्रोम आणि जेरुसलेम सिंड्रोमची माहिती देणारी पोस्ट फेसबुकवर टाकताना शेवटी पुणे, पिंपरी चिंचवड यांचे झकास सिंड्रोम आपल्या मनाने जोडले आणि या पोस्टच्या कमेंटींमधून वेगवेगळ्या गावांचे मजेशीर सिंड्रोम बाहेर पडले... ही पोस्ट आणि तिच्यावरच्या निवडक कमेंट्स यांचं हे संकलन... खास संडे स्पेशल वेगळा प्रयोग...

एक 'पॅरिस सिंड्रोम' नावाचा मजेशीर सिंड्रोम आहे. पॅरिसला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये तो आढळतो. काही पर्यटक पॅरिसबद्दल खूप वाचून आणि ऐकून असतात. त्यांच्या या शहराबद्दलच्या अपेक्षा अतिप्रमाणात उंचावलेल्या असतात. इतक्या अपेक्षा घेऊन ते पॅरिसमध्ये येतात की ते सुंदर शहरपण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. आपल्या उंचावलेल्या अपेक्षांना हे शहर उतरत नाही हे कळल्यावर त्यांना मानसिक धक्का बसतो. मग त्यांच्यामध्ये या धक्क्यामुळे घाम येणे, चक्कर येणे, बीपी वाढणे वगैरे प्रकार घडायला लागतात. काही लोकांना तर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागतं. काही अनाकलनीय कारणांमुळे जपानी पर्यटकांमध्ये 'पॅरिस सिंड्रोम' मोठ्या प्रमाणात आढळतो. तो इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की पॅरिसमधल्या जपानी दूतावासाने आपल्या पर्यटकांसाठी विशेष हॉटलाईन तयार केली आहे. 'जेरुसलेम सिंड्रोम' हा अजून एक शहराच्या नावाने असलेला सिंड्रोम. जेरुसलेम शहराला अनेकधर्मीयांच्या दृष्टीकोनातून महत्त्व आहे. जेरुसलेमला येणारे अनेक पर्यटक विचित्र वागायला लागतात. त्यांना असं वाटायला लागतं की आपण काही विशेष धार्मिक मिशनसाठी जगात आलो आहोत. अनेकांना असं वाटायला लागतं की आपण देवाचे लाडके पुत्र आहोत आणि ते आपल्या सोबतच्या लोकांना धार्मिक उपदेश करायला लागतात. काही ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्तासारखी वेशभूषा करायला लागतात. विशेष म्हणजे शहरातून बाहेर पडलं की लोकांची वागणूक पूर्ववत होते. असेच आपल्याकडच्या शहरांचेपण सिंड्रोम आहेत.

पुणे सिंड्रोम- पुण्यात येणाऱ्या पर्यटकांना दुपारी बारा ते तीन आपसूक झोप यायला लागते. चितळेंची बाकरवडी हा जगातला सर्वोत्कृष्ट पदार्थ आहे असं त्यांना वाटायला लागतं.

मुंबई सिंड्रोम- या सिंड्रोमने ग्रस्त लोकांना लोकलचा प्रवास हा अतिशय सोपा आणि आरामदायी आहे असं वाटायला लागते. जितकी जास्त गर्दी आणि घाम तितका यांचा आत्मा थंड होतो.

पिंपरी चिंचवड आणि ठाणे सिंड्रोम - या शहरांना भेट देऊन गेलेले पर्यटक आपल्या गावी जाऊन आपण अनुक्रमे जरा पुण्याला आणि मुंबईला जाऊन आलो असं बळच दडपून सांगतात. असे उर्वरित शहरांचे पण सिंड्रोम उदाहरणार्थ असतीलच.

अमोल उदगीरकर

नाशिक: ह्या शहरात आल्यावर रात्री नऊ वाजता झोपून घेणे हा जगाने मान्य केलेला शिष्टाचार आहे असं पर्यटकांना वाटू लागतं.

संकेत लिमकर

...

गोवा सिंड्रोम- ह्या शहरात जाऊन त्या सिंड्रोमने ग्रस्त होण्यासाठी लोकांचा प्लॅन ठरतो आणि ऐनवेळी फिसकटतो.

सचिन झोरे

....

कोल्हापूर सिंड्रोमपण आहे ... या शहरात पाऊल टाकलं की रांडचे काखेत लिंबू ठेवल्यासारखेच चालायला लागतात.

मिलिंद पी. शिंदे

....

कोल्हापुर सिंड्रोम- या सिंड्रोमने ग्रस्त लोक, दरवेळी मुख्यत: कोल्हापुर बाहेर राहुन आमची मिसळ, आमचा तांबडा पांढरा, असे बोलत राहतात. कोल्हापुर हे एक परीपूर्ण असे एकमेकाद्वितीय जग समजले जाते.

साहिल्याव वगैरे

....

फेसबुक सिंड्रोम... आपण सेलेब्रिटी आहोत आणि आपण काय खातो, काय पितो, कुठे जातो, कसे दिसतो? या साऱ्याबद्दल संपूर्ण जगाला प्रचंड उत्सुकता आहे असा समज होतो.

आनंद मोरे

...

सोलापूर सिंड्रोम जडला की लोक एकमेकांना 'भय्या' म्हणायला लागतात.
(तो मी आहेच!)

रोहित शांघवी

...

भय्या हे उस्मानाबादी सिंड्रोम आहे, नॉट सोलापुरी... सोलापूर सिंड्रोममध्ये आपोआप शर्टचे वरचे बटन निघते अन छाती पुढे येते...

देवेंद्र जोडमोटे

...

डोंबिवली सिंड्रोम: कितीही गर्दीच्या लोकल मध्ये, लोकल थांबायच्या एक्झॅक्ट ५ सेकंद आधी मुसंडी मारुन लोकल पकडाण्याची कला अवगत होणे.

आनंद चिरमाडे

...

पुण्यात सध्या एक नवीन रोग आलाय, दाढी वाढवायची आणि कानात बाळी घालायची..
आणि दोन दाढीवाले बाबा समोरासमोर आले की एकमेकांना "राजे" म्हणतात..
इथवर उर अगदी अभिमानाने भरून येतो पण, दोघेही एकाच पुडीतून गुटखा किंवा मावा खाऊन त्या दाढी मिशीच्या मधून लालेलाल पिचकाऱ्या मारतात आणि मग दाढीवर हात फिरवून थुंकीचे शिंतोडे पुसतात तेव्हा समजत नाही.. ह्याला काय म्हणावे..??

दीपक ठुबे

...

परभणी Syndrome~~~त्याना जर्मनीपेक्षा परभणी भारी वाटायला लागते!

सुनीती धारवाडकर

...

आमचा श्रीरामपूर सिंड्रोम श्रीरामपूर सोडल्यावर डोके वर काढतो. आम्हाला बाहेर गेल्यावर आपल्याकडे ह्याच्यापेक्षा भारी आहे किंवा मिळतं असंच वाटतं!

राहुल उदावंत

...

कोल्हापूर सिंड्रोम... मराठी भाषेमधील स्त्रीलिंगी वचन गाळून ही बोलू लागते.
मटण लोणचं, तांबडा-पांढरा थोडी दारू हे जणू रविवार किंवा अन्य प्रसंगीचे आनंदाने नेहमीच खायचे अन्न पदार्थ वाटू लागतात..

हिकडे आलो म्हणजे प्रत्येक वेळी पाहुण्याच्या घरी नाष्ट्याला मिसळच आणि तीही डबल कट व झणझणीत असेल/वाढली जाईल असे वाटत राहते..

मला स्वतःला कोल्हापूरला गेल्यावर असा सिंड्रोम झाला होता.

आशुतोष आशुतोष

...

जया दडकर यांनी खानोलकरांच्या कादंब-यांचा शोध त्यातील स्थळं, व्यक्ती इत्यादींना पाहून / भेटून घ्यायचं ठरवलं. पण 'कोंडुरा जसा वर्णन केलाय त्याच्या पासंगालाही पुरत नाही' आणि 'लक्ष्मीचं पात्र ज्या बाईवरून बेतलंय असं ऐकलं तिला जरा दुरून पाहून घेतली, तर ती एक साधी गोरीपिट्ट कोकणस्थ बाई निघाली.' अशा अर्थाचं सगळं लिहिलं होतं. तो अपेक्षाभंग वाचून हसू आलेलं. 
महानोरांच्या एका कवितेत त्यांनी पंखा असलेल्या वाचकबाईच्या भूमिकेतून लिहिलं आहे; त्यातल्या दोन ओळी अशा आहेत :
एकदा तिकडे पुण्याकडे जरूर जरूर जरूर या 
कविता नकोय राजे तुमचे डोळे तेवढे देऊन जा.

कविता महाजन

...

लोकसत्ता सिंड्रोम पण आहे, फालतु म्हणायचा नी त्या अग्रलेखाची चर्चा करायची.

कपिल निकम

...

शेगाव सिंड्रोम - शेगावची कचोरी खाल्यावर उसेन बोल्टला सुवर्ण पदक मिळते, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतात, ख्रिस गेल टी-20त शतक वगैरे झऴकवतो. वगैरे वगैरे (असे व्हिडिओ येतात बर का त्या त्या लोकांनी कबुली दिलेले) मात्र शेगावचा माणूस आयुष्यभर कचोरी खाऊन पण काहीच करू शकत नाही.

अमोल चंद्रकांत कदम

...

आमचा आपला लातूर सिंड्रोम.. कुठल्याही क्रियापदाच्या शेवटी "लालाव" प्रत्यय लावला की लातूरला आल्याचं समजतं. या वाक्यांवरून मी अनोळखी माणसांना "काय? लातुरचेआव का? " असं विचारून सलगी करायचो.

निखिल भोयरेकर

...

तसाच एक डोंबिवली सिंड्रोम पण हा इतर सिंड्रोम्सपेक्षा जरा वेगळा आहे. हा डोंबिवलीच्या बाहेरच्यांना होतो. त्यांना सतत भास व्हायला लागतात की डोंबिवलीत सतत डास चावतायत, लाईट जातायत, पाणी गेलंय. यावर उपचार म्हणजे बाधित लोक डोंबिवलीत आले की त्यांना कळतं की आपल्याला वाटतंय तसं काही नाहीये आणि मग ते बरे होतात

हेरंब ओक

...

नाशिक सिंड्रोम- अति धार्मिक होऊन लगेच सुलाची वाईन म्हणजे जागतिक दर्जाचे पेय आहे असे वाटायला लागते, उतरेपर्यंत माणूस मुंबई नाहीतर पुण्यात असतो...

विक्रांत टाकेकर

...

पॅरिसला गेलेल्या भारतीय माणसाला पहिल्यांदा ल चॅपेल नावाचा भाग आहे तिथे घेऊन जायचं.. (मेट्रो स्टेशन आहे) साधारण तुळशीबाग, चांदणी चौक किंवा किंवा कुठल्याही भारतीय शहरातल्या तत्सम भागात आलोय असे वाटून पॅरिस सिंड्रोम येण्याच्या सगळ्या शक्यता दूर होतात.. मग जे दिसेल ते चांगलेच वाटायला लागते!!!

संजय दाबके

...

यवतमाळ सिंड्रोम- इकडं आलेला प्रत्येकजण माझा चा खर्रा खातात की काय असं वाटतं.

मिलिंद आळशी

...

नांदेड सिंड्रोम : इथे आलेला पर्यटक कित्येक दिवस डोक्यावरचा रुमाल काढत नाही. हल्ली इथे आलेला माणूस स्वतः ला आदर्श समजू लागलाय.

अभिजीत लिगदे

....

muscat syndrome : Gulf आहे म्हणजे सगळीकडे वाळवंट, उंट, बुरखा compulsory, veg मिळणार नाही, देवाचै photo ठेऊ देत नाहीत etc etc गैरसमज असतात.

आल्यावर भरपूर हिरवळ , झाडं., indian hotels जे पाणीपुरी पासून कोथिंबीर वडी अळूवडी पर्यंत serve करतात.

रस्ता पायी cross करताना कारवाले गाडी थांबवतात.

आनंद पोरे

...

कणकवली सिंड्रोम--- कणकवली म्हटल्यावर लोकांना वाटतं की हे सतत राडे होत असलेलं गांव. इथं कायम पोलीस बंदोबस्त आणि संचारबंदी असेल असं वाटतं. मग जरा घाबरत घाबरत लोकं गावात प्रवेश करतात. पुढे राडा असेल पुढे राडा असेल असं म्हणता म्हणता एक किलोमीटमध्ये गांव संपतं आणि काहीतरी एक्सायटिंग राडा, दंगल वगैरे बघायला मिळेल अशी आशा घेऊन आलेल्यांचा पोपट होतो.

इंद्रजीत खांबे

....प्रतिक्रिया द्या2709 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर