शॉर्ट फिल्म्समधला 'गुंडा'
शनिवार, १५ जुलै, २०१७ डॉ. अमर पोवार

काही चित्रपट अत्यंत वाईट असूनही चांगल्या सिनेमाचे काही बेंचमार्क्स गाठतात. यासाठी हिंदी सिनेजगात गुंडा नावाच्या चित्रपटाचं उदाहरण दिलं जातं. लघुपटांत हे स्थान 'नॉक'ला मिळेल.

Some films are so bad that they are good असं म्हटलं जातं. म्हणजे चांगल्या सिनेमाचा एक बेंचमार्क असतो, तिथे काही वेळा वाईट सिनेमेही पोचतात. हिंदी सिनेमाच्या इतिहासात कांती शाह कृत 'गुंडा' या पद्धतीचं अढळपद राखून आहे. मनोजकुमारचा 'क्लर्क', शिरीष कुंदरकृत 'जोकर' ही आणखी काही उदाहरणं पण जो प्रतिसाद 'गुंडा'ला मिळाला (२००० सालाच्या आसपास काही 'आयआयटीयन्स'नी  रसग्रहण करणारे व्हिडीओ प्रसृत केल्यानंतर) तो केवळ अभूतपूर्व असाच!
यू ट्यूबच्या जगतात, 'नॉक' हा २०११ साली प्रदर्शित झालेला अवघ्या सात मिनिटं तेरा सेकंदांचा लघुपट असाच एक ध्रुवतारा आहे.

याची थोर कामगिरी बघा-
२,१४,६८३३ व्ह्यूज

२४९६ कमेंट्स

९२६७ लाइक्स

३७७० डिसलाइक्स

केसी (फेलिशिया डिनी) इतिहासाची विद्यार्थिनी आहे. परीक्षेच्या आदल्या रात्री व्हिडीओ कॉलवर आपल्या सीनियर डेरीकशी (डेरीक न्यूनेज) बोलत बोलत ती उजळणी करतेय. बोलता बोलता तो तिला 'डेट' वर नेण्यासाठी प्रस्ताव मांडतो. ती हसून परीक्षेचं निमित्त सांगते आणि व्हिडीओ कॉल बंद करते. ब्रश करताकरता तिला काही विचित्र आवाज येऊ लागतात..

ट्रोल्स ही संकल्पना आता आपल्याला नवी नाही. केवळ अफलातून असं यावरच्या प्रतिक्रियांचं वर्णन करता येईल.

एकूण २४९५ कमेंट्स. ट्रोल्सनी एकही सेकंद ठेवलेला नाही टीका करायचा. काही कमेंट तर इतक्या हास्योत्पादक आहेत की, या कमेंट्सना शंभरच्या वर लाइक्स आहेत!

उदाहरणादाखल या काही:
-- टूथब्रशची बेसबॉल बॅट बनवणारी जादू कोणती बरं?
-- ती मेकअप करून झोपते आणि उठते तेव्हा पिंपल्स दिसतात.
-- अशा चेहऱ्याने झोपेतून उठते तोच खरा हॉरर सीन आहे.
-- बाई गं, तो नळ बंद कर आधी! किती पाणी वाया घालवते??
-- कोण आहे, कोण आहे?
-- मी, जॉन सेना!
-- पिझ्झा डिलव्हरीसाठी आलो मॅडम..
-- मी ल्यूसिफर, तुमचा जीव घ्यायला आलो बरं का.
-- कोणत्या भुताकडे पोलोरॉईड कॅमेरा असतो?
काही कमेंट्स खरोखरच पटतात.
-- ती झोपली तेव्हा दरवाजा बंद होता, उठते तेव्हा उघडा!
-- घरात फ्लॅट स्क्रीन टीव्ही (आणि आयपॅडही!) असताना पुराणकाळचा टेलिफोन कसा काय?
-- ती टूथपेस्टशिवायच ब्रश करतेय.

शेवटी, तिचं जे काही प्राक्तन असतं तेही पोलोरॉईड कॅमेऱ्याच्या फोटोतून दाखवण्याची एक करामत सोडली तर हसून मुरकुंडी वळण्यासारखं टेकिंग, घसरत गेलेली कॅमेरा क्वालिटी आणि त्याहून भयंकर अभिनय यांमुळे हॉरर सिनेमा कसा असू नये, याचा 'नॉक' मैलाचा दगड ठरतो.

 प्रतिक्रिया द्या9055 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर