म्हातारा न इतुका.. लड्डूची ट्रॉफी.. देव भूकंप आहे..
शनिवार, १५ जुलै, २०१७ मुकेश माचकर

बोधकथा, विनोद आणि मार्मिक विचार असा दमदार, कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून...

म्हातारा न इतुका...

शरीर धनुष्याकृती झालेलं असताना, हातपाय थकून थरथरत असताना, डोळ्यांच्या खाचा झालेल्या असताना, सगळ्या शरीराचं मांस सुकून हाडांच्या सांगाड्यावर कातडी सुरकतून लोंबू लागलेली असताना त्या म्हाताऱ्याला ओझी उचलण्याचं काम करावं लागत होतं खपाटीला गेलेलं पोट भरण्यासाठी.

एकदा एक वजनदार गोणतं उचलून आणताना त्याच्या पाठीचा काटा असा काही ढिला झाला की ते गोणतं वाटेतच बाजूला टाकून तो कळवळून म्हणाला, देवा, अरे मरण देऊन सुटका तरी कर की रे माझी या नरकयातनांमधून!

देव नेमका त्यावेळी आकाशातून चालला होता. त्याने ही प्रार्थना ऐकली आणि मृत्युदूत खाली पाठवले.

म्हाताऱ्याच्या शेजारी ते दूत अचानक प्रकट झाले आणि म्हणाले, देवाने आम्हाला पाठवलं आहे तुमची हाक ऐकून. बोला, काय करू?

म्हातारा साळसूदपणे म्हणाला, बाकी काही नको. जरा त्या गोणत्याला हात देऊन माझ्या डोक्यावर चढवायला मदत करा.

................................

लड्डूरामची ट्रॉफी

लड्डूरामला एक ट्रॉफी घेऊन येताना पाहून चंदूलाल खूष झाला... त्याच्या मुलाने ट्रॉफी आणल्याचा हा पहिलाच प्रसंग होता... असा प्रसंग आपल्या आयुष्यात येईल, असं त्यानं स्वप्नही पाहिलं नव्हतं कधी?

लड्डूराम येताच त्याला प्रयत्नपूर्वक उचलून घेत, त्याची पापी घेऊन त्याने कौतुकाने विचारलं, बाळा, तुझ्या हातात ट्रॉफी? असा काय पराक्रम केलास शाळेत?

लड्डूराम म्हणाला, आज मी एका प्रश्नाचं उत्तर दिलं. मुख्याध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं.

चंदूलालने विचारलं, काय प्रश्न विचारला?

लड्डूराम म्हणाला, हत्तीला किती पाय असतात असं विचारलं त्यांनी. मी उत्तर दिलं, पाच.

चंदूलाल म्हणाला, गधड्या, हत्तीला पाच पाय असतात? अरे हत्तीला चारच पाय असतात. तू मूर्ख, तुझा मुख्याध्यापक शतमूर्ख. त्यांनी ट्रॉफी कशी दिली तुला?

लड्डूराम म्हणाला, पिताजी, बाकीच्यांनी सहा पाय, सात पाय, आठ पाय, दहा पाय अशी उत्तरं दिली होती. वस्तुस्थितीच्या सगळ्यात जवळचं उत्तर मीच दिलं... त्यामुळे ट्रॉफी मला मिळाली!!!!

......................

देव भूकंप आहे...

ओशो सांगतो,

ज्यूंची देवाची कल्पना लोकप्रिय कल्पनेला धक्के देणारी आहे.

त्यांच्या झोहर या ग्रंथात म्हटलंय, देव छान नाही, देव तुमचा काका नाही, देव भूकंप आहे. (God is not nice. God is not your uncle. God is an earthquake.)

कबिरानेही एका दोह्यात म्हटलंय,

ये तो घर है प्रेम का, खाला का घर नाहिं । 
सीस उतारे हाथि करे, सो बैसे घर माहिं॥

हे प्रेमाचं घर आहे, तुमच्या आत्याचं घर नाही. जो शिर उतरवून हातावर घेईल, त्यालाच इथे प्रवेश मिळतो.

..................................

आयुष्याची कुत्रागाडी

आयुष्य हे डॉगस्लेड म्हणजे बर्फात कुत्र्यांद्वारे ओढल्या जाणाऱ्या गाडीच्या पथकासारखं आहे. तुम्ही गाडी ओढणाऱ्या कुत्र्यांच्या त्या रांगेत पहिल्या क्रमांकावर नसाल, तर तुमच्या समोरचं दृश्य कधीच बदलत नाही.

- लुईस ग्रिझर्ड

..................................

तुम्ही अमृततुल्य नियमित वाचता?

मग इथे प्रसिद्ध होणाऱ्या कथांपैकी निवडक १०० कथांचा अक्कलझाड हा दोन भागांचा पुस्तकसंच तुम्हाला नक्कीच आवडेल.

तो खरेदी करण्यासाठी ‘इंद्रायणी साहित्य, २७३, शनिवार पेठ, पुणे ३०’ येथे ०२०-२४४५८५९८ किंवा ०२०-२४४८१८६७ या क्रमांकावर किंवा ९३७१०४३७८१ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

हा संच पुढील ठिकाणी ऑनलाइनही उपलब्ध आहे. फक्त क्लिक करा आणि घरपोच मिळवा.

इंद्रायणी साहित्य http://-http://bit.ly/IndrayaniSahityaAkkalJhad

बुकगंगा : http://bit.ly/BookGangaAkkalJhad

अमेझॉन :http://bit.ly/AmazonAkkalJhad

 प्रतिक्रिया द्या1472 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Shaukat Khan - सोमवार , १७ जुलै, २०१७
कबिराच्या दोह्याच्या भाषांतरात फक्त एक दुरुस्ती, खाला म्हणजे मावशी आत्या नव्हे.

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर