युरोपमधले 'ऑनर' किलिंग
शुक्रवार, १४ जुलै, २०१७ सविता कुऱ्हाडे

ऑनर किलिंगच्या घटना केवळ भारतातल्या ग्रामीण भागातच नाहीत, तर यूकेमध्येही होत आहेत. खोट्या प्रतिष्ठेपायी बळी गेलेल्या स्त्रियांचा स्मृतीदिन यूकेत १४ जुलै रोजी पाळला जातो.

मानसन्मानातून होणाऱ्या हिंसा व हत्येमध्ये कसला आहे मान?

There is no 'honour' in honour killing.

दरवर्षी १४ जुलै यूकेमध्ये हरवलेल्या महिलांच्या सन्मानार्थचा दिवस मानला जातो. शफिलिया अहमद या मुलीचा हा वाढदिवस. २००३ मध्ये तिच्या आई-वडिलांनी ती अवघी १७ वर्षाची असताना तिची हत्या केली. हत्येचं कारण होतं शफिलियाने तिच्या पाश्चिमात्य जीवनशैलीमुळे कुटुंबाची इज्जत/मान समाजामध्ये घालवला. हा तिच्या आई-वडिलांसाठी एवढा मोठा गुन्हा होता की तिला मारून टाकण्यामध्ये त्यांनी कसलीही दयामाया नाही दाखवली. (This was a case of honour based violence).

तिच्या आई-वडिलांना २०१२ मध्ये प्रत्येकी २५ वर्षांची कैद झाली.

आत्तापर्यंत यूकेमध्ये शफिलिया अहमदच्या केसनंतर १४१ मुलींची या व अशाच कारणांमुळे हत्या झाली आहे. जबरदस्तीने लग्न लावणे किंवा तशी धमकी देणे (forced marriage or threats of forced marriage) अशा प्रकारच्या साधारणत: १०,००० केसेस दरवर्षी यूके पोलिसांकडे नोंदवल्या जातात. तसेच १२ मुलींची दरवर्षी त्यांच्या नातेवाईकांकडून इज्जत/मान किंवा जबरदस्तीने लग्न अशा प्रश्नांमुळे हत्या होतात.

आपण जर खालील पाच शहर/विभागातील आकडे बघितले तर हेच निदर्शनास येते की यूकेसारख्या पाश्चिमात्य विकसित देशात होणाऱ्या या घटना ह्या महिला व मुलींवरील हिंसाचारातील गंभीर स्वरुपाच्या घटना आहेत.

१. लंडन - ४९५ घटना 

२. वेस्ट मिडलंडस - घटना ३७८

३. वेस्ट यार्कशायर - ३५० घटना                   

४. ल्यांकशायर - २२७ घटना                           

५. मँचेस्टर - १८९ घटना                         

इज्जत/अब्रू/मानावर आधारित हिंसा (Honour based violence) जबरदस्तीने लग्नास भाग पाडणे किंवा तशी धमकी देणे हे आता छोटे प्रश्न राहिले नाहीत. यूकेमध्ये त्यासाठी सरकारने स्वतंत्र forced marriages unit सुरू केले आहे. तसेच पोलिस, अनेक स्यंयंसेवी तसेच सरकारी संस्था त्यांचे प्रशिक्षित कार्यकर्ते यांवर काम करत आहेत.

इज्जतीच्या नावाखालील या हिंसा फक्त कुटुंबापुरत्याच मर्यादित न राहता तो तो समाजदेखील त्यात सामील होताना दिसतो. कुठल्याही जात/धर्म/देश/सामाजिक-आर्थिक स्तरापुरता हा प्रश्न मर्यादित नाही. स्वत:च्या जात/संस्कृती/धर्माचं रक्षण करत असल्याच्या या तकलादू दिखाव्यात माणुसकी तर हरवलेली आहेच पण हे मानवतेच्या हक्कांचे गंभीर स्वरूपात उल्लंघन होतं असते. याची मुळं आपल्याला आपल्या पितृसत्ताक समाजातूनच आलेली दिसून येतात.

यूकेमध्ये जून २०१४ पासून जबरदस्तीने लग्न लावणे, तशी सतत धमकी देणे हा कायद्याने गुन्हा आहे. जो कोणी हा गुन्हा करेल त्याला कमीत कमी सात वर्षांची कैदेची शिक्षा कायद्यात आहे. कोणत्याही जाती/धर्म/संस्कृतीतील या प्रथा कायद्याच्या वर नाहीत. तसेच कोणत्याही जातपंचायती, पालक हे कायद्याच्या वर नाहीत आणि नसावेत.

इज्जतीच्या नावाखाली आपल्या पोटच्या गोळ्याची हत्या तसेच हिंसाही कुणीसुद्धा उचीत ठरवू शकत नाही (किंवा justify करू शकत नाही). माणसाच्या जिवाची किंमत ही कुणाच्याही इज्जती पेक्षा जास्त महत्त्वाची आहे आणि इज्जत, सन्मान त्याचाच व्हायला हवा.
 प्रतिक्रिया द्या2514 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर