हे देअर! आय अॅम युजिंग व्हॉट्‌सअप...
शुक्रवार, १४ जुलै, २०१७ सुषमा शितोळे

इमोजीराव लय भारी हे खरंय पण त्याला आपल्या भावनांची सारी सूत्रं देऊन कसं चालेल? त्यानं व्हॉटसअपवर भावना व्यक्त करायला शिकवलं पण त्याबाहेरही आपण आलं पाहिजे.

एक वेळ आपल्याकडे काही विशेष कौशल्य नसलं, आपण अगदी बेरोजगार असलो तरी हरकत नाही पण व्हॉटसअप मात्र 'चालवता' आलं पाहिजे... हाहा.. बरोबर नं..?

काय बरं इतकं असतं व्हॉटसअपमध्ये की आपण ते सतत 'चालवत' असतो व 'बिझी' असतो? पोस्ट्स, जोक्स, फोटो, कोणाचा बदललेला डीपी, स्टेटस, व्हिडीओज, लिंक्‌स, गप्पा, कमेंटस, कोणाचे जन्मदिवस, कोणाचा लग्नाचा वाढदिवस, कोणाला मिळालेले यश असं बरंच काही.... मग साहजिकच आहे नं त्यात आपलं गुंतणं...! त्या प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देणं! कारण त्याशिवाय आपला 'सोशल टच' (?) तरी कसा रहाणार? त्यासाठी आपण काय नाही करत...? कोणाला लाइक कर, कोणाचं अभिनंदन कर, कोणाला गुलाब दे, कोणाला पुष्पगुच्छ दे, मत मांड, टाळ्या वाजव, नमस्कार घाल, स्माइल कर, हसून दाद दे, नव्हे डोळ्यांत पाणी आणून गडबडाटी हस, ढिश्युम कर, चीड-राग व्यक्त कर, भुतासारखा चेहरा कर, विदूषक बन, कोणाकडं प्रेमानं बघ, निरागस चेहरा कर, डोळा मार, वाकोल्या दाखव, जीभ काढ, तोंडाला पाणी सुटल्यासारखं दाखव...केवढ्या भावना आपण रोज व्यक्त करत असतो! अर्थातच प्रत्यक्षात नव्हे, तर इमोजीच्या आधारे व्हॉटसअपवर! ह्या सगळ्या इमोजी सिंम्बॉल्सच्या तर मी प्रेमात पडलेय खरोखर. त्याद्वारे व्यक्त होताना खूप मजा येते. आपण किती त-हेने व्यक्त होऊ शकतो याचा केवढा आनंद होतो! तो शब्दात नाही सांगता येणार...

हं...खरंच नाहीच सांगता येणार आता... कारण प्रत्यक्ष फोन करून, भेटून व्यक्त होणं होतच नाही नं आपलं हल्ली....मग?

हे इमोजी पण ना....!!

मुळात ह्या इमोजीरावांकडून शिकण्यासारखं खरंच खूप काही आहे. त्याला दोष का द्यायचा? किती क्युट व्यवस्था आहे ती व्यक्त होण्याची! कारण पुर्वी न व्यक्त होणारी, अबोल, शांत माणसंही त्यातून छान व्यक्त होऊ लागली आहेत.

फक्त तसं व्यक्त होणं हे व्हॉटसअप पुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात पण जमलं तर जास्त छान. नव्हे ते तसं असलं तरच माणसं जवळ येतील. आपलं यंत्रवत जगणं  थांबेल. आपली सर्व श्रीमंती दुखणी पळून जातील. इमोजीच्या लाइक्सचीच गोष्ट घ्या...कोणी काही छान पोस्ट केलं, कोणी छान डीपी टाकला, कोणाचे स्टेटस छान वाटले, आवडले की आपण लगेच टाळ्या वाजवून किंवा तर्जनी व अंगठा जुळवलेल्या दोन बोटांचे छान असे सिम्बॉल टाकून ते आवडल्याचे सांगतो. डोळ्यांत प्रेम असलेला किंवा प्रेमानं डोळा मारण्याचा सिम्बॉल टाकून प्रेम दर्शवतो. पोस्ट टाकणा-याला पण त्यामुळं बरं वाटतं, की आपण कोणाला तरी आवडतो. कोणीतरी आपल्यावर प्रेम करतं. आपली पोस्ट, स्टेटस कोणी तरी लाइक करतं किंवा त्याचा कोणाला तरी उपयोग होतोय पण प्रत्यक्ष जीवनात असं उस्फुर्तपणे कौतुक, प्रेम आपण किती करतो? नाहीच फारसं. त्याउलट दोष काढणं, चुका सांगणं, टीका करणं किंवा आवडलं, न आवडलं असं काहीच न सांगता तटस्थ, ढिम्म राहणं जास्त पसंत करतो. किंवा ब-याच वेळा  भोवतालच्या सुंदर गोष्टी आपल्याला दिसतच नाहीत! सोपं व जवळचंच उदाहरण, आईच्या हातचं जेवण. तेच ताट जर व्हॉटसअप वर आलं तर आपण जिभेला पाणी सुटलंय असं खूप छान पद्धतीनं लाइक करू, पण प्रत्यक्षात? आपलं लक्षही नसतं की तिनं ताटात काय वाढलंय व आपण काय खातोय? खोटी दाद अजिबात नको द्यायला पण आपल्याला काही सुंदर, छान वाटलं, फिल झालं तर ते सांगायला हवं. त्यासाठी आपले डोळे, आपल्या मनाच्या खिडक्या कायम खुल्या ठेवायला हव्यात ना? व्हॉटसअपवरून सतत लाईकस देऊन संपर्कात राहण्यापेक्षा प्रत्यक्षात त्या व्यक्तीला फोन करणं, भेटणं, एकत्र जेवणं, कॉफी, चहा घेणं, लाईव्हली तिची स्तुती करणं, विचारपुस करणं, मदत करणं, आपला एखादा छान अनुभव, विचार तिच्याशी शेअर करणं हे आपण करू शकलो तर! असं कौतुक, असं विचारणं, असं प्रत्यक्षातलं सुंदर विचारांचं शेअरिंग जर प्रत्येकाला प्रत्यक्षात मिळालं तर! तर...आपण खरंच चिरतरुण होऊ. कारण आपण कोणाला तरी आवडतो किंवा आपल्याला प्रत्यक्षातही  तेवढंच लाइक केलं जातं ही प्रत्येकालाच आवडणारी व तरुण करणारी भावना आहे. माणसं प्रेमासाठी, अशा प्रत्यक्षातल्या लाइक्ससाठी खरोखरच आतुर असतात. ती आतुरता जर  भागली तर  कल्पना करा, जीवनात किती बहार येईल...!  पण असं काही केलं तर तिच्या किंवा त्याच्या डोक्यात हवा जाईल किंवा तो स्वत: ला आपल्यापुढं जरा जास्तच शहाणा समजायला लागेल, कशाला उगाच भाव द्या, किंवा तो कुठं आपल्याला भाव देतो किंवा मीच शहाणा, माझंच इतरांनी कौतुक करायला हवं, मी कोणाचं करणार नाही किंवा कशाला लाइक करा, त्यात एवढं विशेष काय..असेच विचार प्रत्यक्षात जास्त केले जातात.  मनात, घरात, सोसायटीत, कॉलनीत, कॉलेजात, ऑफिसात, जॉबच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी. याला कुपमंडूक वृत्ती असंही म्हणतात. कौतुक केल्यानं कधीच कोणी लहान होत नसतो. उलट तो समोरच्याच्या मनात जवळिक व प्रेम निर्माण करत असतो. त्याचं जग उलट विस्तारतच जातं. असं प्रेम देणारी व प्रेम मिळवणारी माणसं कायम खुष असतात. त्यांना आनंदासाठी, उत्तम आरोग्यासाठी विशेष वेगळं असं काही करावं लागत नाही.

त्यांना माहीत असतं, की अशा खूप लाईक्सपेक्षा एकच फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून केलेला लाइक जास्त परिणामकारक ठरतो. वाढदिवसाला खूप सारे सिम्बॉलरुपी केक्स, आईस्क्रीम, फुगे पाठवण्यापेक्षा एकदा प्रत्यक्षच त्याला तो हे सगळं खरोखर देतो. मग पुन्हा तो कधीच व्हॉटसअप करणारही नाही कदाचित!  यशाचे अभिनंदन करतानाही  तो व्हॉटसअप वरून धडाधड फुलांचे गुच्छ पाठवून  ती गोष्ट सोप्पी करणार नाही. त्यातून आपल्या भावना खरंच पोहचतील का? याचा तो विचार करेल. मग  फोन करून शब्दांतून किंवा शक्य असेल तर भेटून आनंदानं त्याला गच्च मिठी मारून, हात हातात घेऊन, त्याला पेढा भरवून अभिनंदन  करेल...अन् त्यातून जे पोहोचेल ना ते कायमस्वरूपी असेल.

हे असं माणसांना भेटणं, प्रत्यक्षात भरभरून प्रेम करणं हे आपल्याला जमत नाही का...? जमतं. खूप छान जमतं. पण तरीही आपण इमोजीरावाला फॉलो करतो. नव्हे तोच आपल्या वतीनं सारं करतो व आपल्याला त्यात चुकीचं काही वाटत नाही. इमोजीराव लय भारी हे खरंय पण त्याला आपल्या भावनांची सारी सूत्रं देऊन कसे चालेल? तो भावना पोहचवतोय खरा पण किती प्रमाणात? त्यानं व्हॉटसअपवर भावना व्यक्त करायला शिकवलं हे खरंच महान आहे पण त्याबाहेरही आपण आलं पाहिजे. खरंखुरं, सहजपणे व तेवढ्याच सुंदरपणे व्यक्त केलं पाहिजे. सोशल मीडियामुळं आपले कॉन्टॅक्ट्‌स किंवा सर्कल खूप वाढलेय व त्यामुळे एवढ्या सा-यांशी प्रत्यक्ष संवाद साधता येणं कदाचित शक्यही होणार नाही हेही बरोबर...पण किमान जे अगदी कोअर मध्ये आहेत त्यांच्याशी तरी....? किमान जवळच्यांबाबत तरी आपल्याकडून होणारं असे दुर्लक्ष थांबवायला हवे. कोणीतरी वारतं, त्याची बातमी येते तिथंही आपण रडण्याचे इमोजी व पुष्पगुच्छ पाठवून दु:खात सहभागी असल्याचे पोस्ट करतो...किती अतिरेक करतो आपणही..!   कोणाच्या सुखात एक वेळेस ठिकये की सहभागी नाही होऊ शकलो पण किमान दु:खात तरी? तिथं आधाराची, शब्दांची, भेटीची अधिक व खरी गरज असते हेही आपण विसरतो. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी इमोजी वापरून कसं चालेल? हे सारंच थांबवूयात.....नाहीतर खरंच आपण व आपली पुढची पिढी ही संवेदनाहीन, माणुसकीहीन...यंत्रवत व्हायला वेळ लागणार नाही.....त्याची ही आपल्या बाजूनं जर कदाचित सुरवात असेल तर त्याला लगेचच आटोक्यात आणुयात.

आणि त्यात अवघड असं काय...अजिबातच नाही. :)प्रतिक्रिया द्या2131 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Uday - शनिवार, १५ जुलै, २०१७
अतिशय मार्मिक लेख।। कुजलेल्या मनाची,जिवंत हृदयाची एक online shokantika..... सुषमा ताई खूपच चांगआल्या विषयाला स्पर्श केलास।।।। मोबाइलला च्या टच मध्ये पण आपल्या लोकांचा टच तुटतोय।। सुंदर।।
Vijay khajagi - शनिवार, १५ जुलै, २०१७
The article is on contemporary burning issue. The write up, script and it's presentation is too good . It forced me to read from first to last sentence without hopping, which I generally do it. Emoji could make us emotionless going forward. Three message is loud and clear meet personally or talk over telephone to express feelings.
सचिन मालोजीराव भोसले - शुक्रवार, १४ जुलै, २०१७
इमोजी आणि आपल्या मनातील भावना तंतोतंत जुळतील. अस अनेकदा होत नाही. लेखातील आपण आणि आपली भावी पिढी संवेदनाहीन, माणूसकीहीन व्हायला वेळ लागणार नाही. असे म्हटले आहे. मी तर या पुठे जाऊन असे म्हणेन तशी सुरुवात झाली आहे. परंतु माणुसकी , संवेदना अजून ही आपल्या ग्रामीण भागात जिवंत आहे. लेखातून संवेदना, माणुसकी,आपुलकी या भावना कश्या कमी होत आहे. याची मांडणी सुंदर

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर