फेबुगिरी
शुक्रवार, १४ जुलै, २०१७ टीम बिगुल

ताज्या घडामोडींबाबत किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्यक्त होणा-यांची संख्या मोठी आहे. यातल्या काही निवडक खास पोस्ट्स ‘बिगुल’च्या वाचकांसाठी...

मृत्यूचा सुद्धा TRP साठी कसा उपयोग करावा हे ABP माझाने दाखवून दिलं.
नागपूरला वेणा तलावात बोट बुडून मित्र मृत्युमुखी पडले. त्यातला जो पोहत येऊन वाचला, तो अॅडमिट असताना त्याच्याजवळ एबीपी माझाचा प्रतिनिधी व कॅमेरामन जातो आणि विचारतो,
"मित्र गेले तुझी भावना काय आहे?
कधी वाटले होते सर्व मित्र असे एकदम निघून जातील?
नेमके काय झाले होते तिथे? तुला किनाऱ्यावर यायला किती वेळ लागला?
काय त्रास होतो असे झाल्यावर?"
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना तो तरुण अक्षरश: तोंड झाकून ढसाढसा रडतोय आणि हा निर्दयी पत्रकार एकामागे न थांबता एक प्रश्न विचारून त्याच्या तोंडाजवळ माईक नेतोय.
एखाद्याने किती निर्दयी असावे! त्या पत्रकाराच्या चेहऱ्यावर काहीच भाव नाहीत. फक्त वरून पाठवलेल्या एकामागे एक प्रश्नांची सरबत्ती त्याने लावलीय.
पत्रकारितेत 'संवेदनशीलता' हे मूल्य शिकवत नाहीत का?
TRP हवाच आहे तर एबीपी माझाने अशा जलाशयांजवळ जाऊन दाखवावी आपली पत्रकारिता.
सेफ्टी जैकेट्सचा उपयोग, वेव्ह जनरेशन, रिव्हर बॅँक आणि डेप्थ, सेडीमेंट्स, बोट्सचे प्रकार, त्यामागील विज्ञान, डिजास्टर मॅनेजमेंट इत्यादीवर माहिती द्यावी. मग होईल ना समाजजागृती.
असंवेदनशीलतेचा कळस केलाय या पेड न्यूज चॅनल्सनी.

- अमोल शिंदे

............

जीएसटीमुक्त चुंबन

न लगे मज व्हॅट न लगे जीएसटी
नाही एलबीटी लागे मला

परवडेना लिपस्टिक, डिओ, आय शॅडो
उत्कटपणे भिडो स्वच्छ स्वच्छ ओठ

दिल्या-घेतल्याविण मज घेता न ये 
मज देता न ये असे मी गुलाबी दान

पोटातले प्रेम आणि तसे ओठी
सारी ओठाओठी करमुक्त

मी बालकांना वत्सल, मी युवकांना इष्क
मी म्हाताऱ्यांना शुष्क भासतसे

- © विजय तरवडे

.............

प्रत्येक सलीममागे एक याकूब आणि अफझल लपलेला आहे, असे म्हणून तो माझ्याशी वाद घालू लागला. तू तुझ्या आयुष्यात किती याकूब आणि अफझल पाहिले, असे विचारल्यावर मात्र निरुत्तर झाला.

कोठून येते ह्या प्रकारची सडकी मानसिकता? समाजात एकमेकांप्रती विश्वास नसेल तर राहिलेच काय शिल्लक?

- मुजाहिद शेख

............

फेसबुकवरचा राजकीय कलगीतुरा म्हणजे महाराष्ट्रातील एका कुटुंबाचे भक्त, महाराष्ट्रातील एका व्यक्तीचे भक्त, देशातील एका कुटुंबाचे भक्त आणि देशातील एका व्यक्तीचे भक्त या लोकांनी एकमेकांना अंधभक्त म्हणून चिडवणे, आपल्या लोकांची मुसळ सांभाळून घेणे आणि दुसऱ्याची कुसळ सुद्धा शोधत बसणे.....

हा प्रकार अतीव मनोरंजक आहे. मार्क करो आणि हे मनोरंजन अखंड चालो....

- बिपीन कुलकर्णी

............

आत्ताच मी एका इंग्रजी कादंबरीत एक प्रसंग वाचला, ज्यात नायिका एका हातात दारुचा ग्लास आणि दुसऱ्या हातात सिगरेट धरून आहे. 
पानाच्या खाली हे आरोग्याला अपायकारक आहे (नॉट टु मेन्शन संस्कृतीला) अशी कोणतीही तळटीप नव्हती.

काय हा अनाचार!

मी आता प्रकाशकांना पत्रच लिहायला बसतोय की असली चावट पुस्तकं आमच्या संवेदनशील मनाला शोभत नाहीत, तरी भारतात विकायला एक सुसंस्कृत ऑल्टरनेट आवृत्ती काढा असं.

या सुशील आवृत्तीतील नायिका एका हातात धारोष्ण दुधाचा पेला अन दुसऱ्या हातात उदबत्ती धरून असेल.

- गणेश मतकरी

............

झाडं माणसापेक्षा अधिक येडी जमात आहे, तोब्बा नखरे करतात. एका जागेवर बसून काय कुचाळक्या करतील तो नेम नाही. त्यांना पाणी पाजायला आणि आंघोळ घालायला विसरलात की घरात इतकी चिलटे आणून सोडतील तुमच्या की पुरेवाट करून टाकतील, फुलांचे कोडकौतुक केलेत की जाम खुश करून टाकतात. कुठलं फुल वेचायचं अन कुठल्या वेळी बायकोच्या आंबाड्यात खोचायचं हे झाड तुमच्या मनात घुसून सांगतं. तुम्ही तेच फुल अचूक निवडता जे झाड तुम्हाला दाखवतं. बायको छान हसते आणि तिकडे झाड लाजून कुंद होते. देवपूजेला गेलेल्या फुलांबाबतही त्याची प्रतिक्रिया असते. पिकलेल्या एका पानाला आख्खे झाड गळण्याची अनुमती देते, हुंदका नाही की आकांड तांडव नाही, सहज गळून जाणे, मृत्यूभयाचे त्रांगडे नाही, हा उत्सव तर पाहण्यासारखाच असतो. तासभर पाहत राहावं, कुठलं पान कुठे गळालं समजतही नाही.पानगळीतही झाड स्वत:चं झाडपण अबाधित ठेवतं. दु:ख स्वत:शी ओठंगून ठेवतं. बहार मात्र रानभर सांगत सुटतं. माणसांना ही विद्या अजून शिकायचीये. झाडं माणसांपेक्षा अधिक प्रागतिक आहेत मानसिक स्तरावर. 

अगदी माणूस जे जे खातो ते ते आवडीने खातात. मांससुद्धा!! प्राणी कच्चे मांस खातात, आपण शिजवून खातो, झाडे वाळवून खातात. त्यांना आपली औषधेही चालतात, तीही आपल्याला औषधे देतात. सोयरिकीचे सगळे बंध झाडे पाळतात. आपण नाचतो तीही जागच्या जागी नाचतात. आपण कष्ट करून खातो तीही अन्नासाठी कष्ट करतात, त्यानाही उन- वारा-पाऊस यांना प्रतिक्रिया द्यायला आवडते. कधीकधी जखमी होतात तेव्हा त्या जागी चीक गाळून आपले लक्ष वेधून घेतात. अशावेळी तिथे फक्त गुळाची पट्टी बांधा. झाड खुसूखुसू हसू लागते. जखम भरूनही येते आठवड्यात!! झाडांच्या या गमती- जमती ज्याला समजून घ्यायच्या आहेत त्याने ज्ञानेश्वरी वाचावी, दीडशेपेक्षा अधिक झाडांचे स्वभाव आणि रंजक किस्से माऊलींनी दिले आहेत.

- गणेश दिघे

............

8.30 CST fast train ती पण ठाणे लोकल तरी ट्रेन पकडताना धक्काबुक्की इतकी की माझ्या आधीची मुलगी पडली मग मी पडले मग माझ्या मागची मुलगी पडली.. तरी उठून पटकन ट्रेन पकडली कारण उशीर होत होता... आजपर्यंत लोकल ट्रेन मध्ये चक्कर येणं, मोबाईल-पर्स चोरीला जाणं, हाताला ब्लेड लागून आयुष्यभरासाठी हातावर व्रण राहणं, ट्रेन पकडताना चप्पल track वर पडणं... ट्रेनमधली भांडण... सगळं झालं.. पण प्लॅटफॉर्मवर आजपर्यंत पडले नव्हते... तो ही कार्यक्रम आज पार पडलेला आहे.. एकूणच लोकल ट्रेन पकडणे आणि लोकल ट्रेनमधील प्रवास याचा 'साहसी' खेळात समावेश करावा असं पत्र मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांना देण्याचा विचार आहे.. धनंजय मुंडे आणि आशीष शेलार यांना पत्र लिहिण्याचा दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल... यांच्याच पत्रावर लवकर काय त्या कारवाया

होतात... #रोजमरेत्यालाकोणरडे#जीवघेणारीवाहिनी #सहनशक्तीवाढवण्यासाठीउपाय

- रश्मी पुराणिक

............

ठेकेदार आया हो ठेकेदार आया।

पहली पहली बार ऐसा ठेकेदार आया

56 इंच वाला सबको मित्रों बुलाने आया,

केक खाने वाला, दुनिया घूमनेवाला,

गाओ दमादम नाचो छमाछम
गाओ दमादम ओ हो ठेकेदार आया।

सारे देश की जनता तेरी हाय हाय गाए,
क्यों लाया तुझे चुनके ये सवाल उठाए,
जीवन भर न भूलेंगे हम तेरा ये हाहाकार,
अच्छे दिन लानेवाले तुझे जनता करे पुकार,

गाओ दमादम नाचो छमाछम,
गाओ दमादम ओ हो ठेकेदार आया।

पहली पहली बार ऐसा ठेकेदार आया,
56 इंच वाला सबको मित्रों बुलाने आया,

हातिम बनकर बैठा है जो ये तो है आवारा
नाकारा को समझ लिया क्यूँ अपनी आँख का तारा,
ये मतकर है ये गद्दार है रक्षक नहीं तुम्हारा
ये वो नहीं जो तुमने समझा ये तो है हत्यारा,

गाओ दमादम नाचो छमाछम
गाओ दमादम ओ हो ठेकेदार आया,

पहली पहली बार ऐसा ठेकेदार आया
56 इंच वाला सबको मित्रों बुलाने आया,

केक खाने वाला, दुनिया घूमनेवाला,
गाओ दमादम नाचो छमाछम
गाओ दमादम ओ हो ठेकेदार आया।

################
(टीप: संजय दत्तच्या (AK47 फेम) थानेदार चित्रपटातील गाण्यावरून प्रेरित! कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास, स्वतःच्या जबाबदारीवर अर्थ काढावेत, ही णम्र विनंती)

- कौस्तुभ खांडेकर

............

डाव्या वा डावेपणाचा आभास निर्माण करणाऱ्या प्रणाल्या आज तरी कालविसंगत झालेल्या आहेत. बीजेपीला हरवणे वा त्यांच्याशी स्पर्धा करणे यासाठी शून्य राजकीय अभ्यासातून सुचलेली दशपदी --
१. उजव्याच प्रकारची पण बीजेपीहून वेगळी काही प्रणाली लागेल.
२. सध्याच्या विरोधकांनी एकत्र येऊन तशी एखादी प्रणाली घडवावी लागेल.
३. नुसतेच घरगुती बोटे मोडत बसून काही उपयोग होणार नाही.
४. नुसतेच बीजेपीच्या वैगुण्यांवर आपण पोसले जाऊ, हा ऐदीपणा सोडावा लागेल.
५. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले -- ते सिद्ध झालेले नसले पण जनतेच्या सामान्य ज्ञानाप्रमाणे गॄहीत धरले जात असले -- तर अशांना बाजूला ठेवावे लागेल.
६.जनतेला भावनिकतेने बांधून ठेवणारे एखादे तत्त्व लागते -- तसे काही शोधून काढावे. उदा० गव्हाळ रंग किंवा साडेपाचच्या आसपास उंची असणे.
७. आपले जुने झालेले शहाणपण बासनात बांधून ठेवावे लागते याचा अपमान वाटून घेऊ नये.
८. नुसते उपरोधिक ऐकायचा लोकांना कंटाळा येतो -- साधे, समंजस बोलावे.
९. नवीन जन्माला येणाऱ्या पक्षात नव्या, तरुण नेत्यांना प्राधान्य द्यावे.
१०. आघाडी वा कडबोळे न करता नवा एकच मोठा पक्ष करावा.

- चं. प्र. देशपांडे

............

#खंत 
मोहनकाका काल म्हणले, "मोदींमध्ये बदल झालेला नाही. मुख्यमंत्री असताना ते जसे होते तसेच ते अजूनही आहेत" 
आम्ही तरी वेगळे काय म्हणतोय गेली तीन वर्षं? पण आम्हाला वेगळा न्याय आणि मोहनकाकांना वेगळा. असो.

- सुहास नाडगौडा

............

बर्‍याच वर्षांपूर्वीची घटना आहे. आम्ही एका नातेवाईकांकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत एका खेडेगावी गेलो होतो. यात्रांचा सीझन होता तो. आणि नेमका त्या गावात वगसम्राट गणपत व्ही. माने, चिंचणीकर यांचा तमाशा होता. तमाशाकलेबद्दल प्रचंड कुतूहल होते पण ते बघायचा कधी योग आला नाही. मला तो बघायचा म्हणून मी नातेवाईकांपाशी बोलले पण त्या गावात स्त्रियांना तमाशा बघता येत नसे. (स्टेजवर बाया नाचवतात पण प्रेक्षक म्हणून स्त्रियांना बंदी - आहे की नाही कम्माल!) तरीही आम्ही काहीजणी हट्टाने एका घराच्या खिडकीतून दूरवरून दिसणारं ते तमाशाचं दृश्य पाहत होतो. तो फिरता रंगमंच, रंगमंचावर एकेक छान छान चित्रे काढून रंगवलेले पडदे... वगैरे भारी वाटलं... गण-गवळण-बतावणी-रंगबाजी-वग या क्रमाने या तमाशातले कार्यक्रमाचे टप्पे असल्याचं कळलं. त्यातली गण-गवळण झाली आणि अचानक दर्शनी भागातला पडदा खाली पाडला. तमाशातल्या अनेक वाद्यांच्या आवाजामुळे नक्की काय झालं कळायला मार्ग नव्हता. पण एक अस्फुटशी किंचाळी आल्यासारखं वाटलं. पाच मिनिटे सगळं स्तब्ध झालं. सहाव्या मिनिटाला पूर्ववत तमाशा सुरू झाला. तमाशातल्या कोणीही काय घडलं याबद्दल अवाक्षरही काढलं नाही. नंतर पहाटे केव्हातरी तो संपलाही.

दुसर्‍या दिवशी सकाळी कळलं की, स्टेजवरच्या पडद्याचा एक रॉड नाचणार्‍या स्त्रीच्या डोक्यावर पडला. घाव वर्मी लागला होता. तिला मागच्या मागेच तमाशातल्या इतर कलावंतांनी तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात नेलं, पण वाटेतच तिचा मृत्यू झाला होता. एवढी भयानक घटना घडूनही त्या कलावंतांनी तमाशा थांबवला नाही की प्रेक्षकांना या प्रकारची घटना घडलीय याचा मागमूसही लागू दिला नाही. (मृत्यू पावलेली स्त्री तमाशा फडाचे मालक गणपत माने यांची पत्नी होती.) धन्य ते कलावंत नि धन्य त्यांची कलेवरची निष्ठा!

- मृदुला देशपांडे

............

माझे एक स्नेही आहेत. वयाने माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ पण आमचे बऱ्यापैकी जमते. तसं माझं पाणी रे पाणी तेरा रंग कैसा.. सारखं असल्याने कोणाशीही पटकन जमतं..

तर नेहमी पँट वापरणारे एकदा विजार घालून आले. 'काय मग आज काय विशेष?' म्हणून विचारले तर म्हणाले,  'असंच सहज.. ही माझी १७ वर्षांपूर्वीची विजार..'

विजारदेखील १७ वर्षांपूर्वीची असू शकते हे ऐकून माझा कंठ दाटून आला.

या स्नेह्यांचे घर एखाद्या पुराणवस्तु संग्रहालयापेक्षा कमी नाही.

त्यांच्या घरातील प्रत्येक वस्तु प्राचीन आणि ऐतिहासिक आहे. औत्सुक्याने विचारले की मेड, किंमत, कोठून घेतली वगैरे साद्यंत माहिती सांगतात. त्यांचा टीव्ही १८ वर्षांपूर्वीचा, सोनी कंपनीचा, पाच हजार रुपयांना घेतलेला, जपान मेडचा, मुंबई येथील एका मिलिट्री कॅँटिन मधून घेतलेला आहे. (हुश्श्)
त्यांचा व्हीसीआरदेखील १८ वर्षांपूर्वीचा. अजूनही भली मोठी व्हिडियो कॅसेट टाकून ते त्यावर जुने मूव्ही बघतात. 
त्यांचं घड्याळ २२ वर्षांपूर्वीचं आहे. 
त्यांची सायकल २० वर्षांपूर्वीची आहे.
त्यांनी बारावीचा पेपर लिहिलेला पेन २८ वर्षांपूर्वीचा आहे.
सगळ्या वस्तु-फर्नीचर असंच सम्राट अशोकाने कलिंग युद्ध जिंकले त्याच्या आसपासच्या काळात घेतलेल्या आहेत.
आणि वापर असा की.... त्यांचा मोबाईल १४ वर्षांपूर्वीचा नोकिया ११०० आहे. कव्हरमधून काढला की कालच आणला आहे असा दिसतो..
घासून पुसून लख्ख सगळं जागच्या जागी ठेवलेलं असतं.
..
असं काही दिसलं की आपण नकळत त्याची आपल्याशी तुलना करू लागतो.
मला रोज सकाळी घड्याळ, पेन, रुमाल आणि बाइकची चावी शोधायला सुमारे दोन तास लागतात. 
माझ्या पेनची रिफिल बालपणापासून आजवर एकदाही संपलेली नाही.
घड्याळाची काच अजून दोन वेळा फुटली की लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सर्वाधिक वेळा काच फुटण्याचा विक्रम माझ्या नावावर होणार आहे.
बाइक दोन चार वर्षाला बदलून ही ती अशी दिसते की हीरो कंपनीचा होंडाशी करार झाल्यानंतर बाहेर पडलेली पहिली ऐतिहासिक बाइक ती हीच.
गॉगल साधारण एक महिना हरवला नाही की दोन तारखेला मित्र कौतुकाने विचारतात 'अरे व्वा ..विस्मरणावर औषध योजना सुरू केलं वाटतं? '
घरातील ज्या वस्तु दणकट, पोलादी आहेत त्याच काहीशा जुन्या आहेत.
आणि ज्या अवजड आहेत, हलवता येत नाहीत त्याच वेळच्या वेळी सापडतात.

तर असो...
चालायचंच..
जग हे असंच विविधतेने नटलेलं आहे. माणसं अशी वेगवेगळी नसती तर काही मौज उरली नसती ......किनई ? 

- सुहास भुसे

............

#बदनाम_नेहरू
"ज्या पर्वतावर गवताचं पाते देखील उगवत नाही त्या जमिनीसाठी युद्ध कशाला करायचं?" असं नेहरू संसदेत म्हणाले होते. अशा आशयाचं एक वाक्य मी Avinash Dharmadhikari ( अविनाश धर्माधिकारी) यांच्या "भारत-चीन युद्ध" या विषयावरील एका भाषणात ऐकलं होतं.

माफ करा, सर मला तुमच्या बद्दल नितांत आदर आहे पण अर्धसत्य सांगून तरुणांची दिशाभूल करणं हे फार मोठं सामाजिक पातक तुम्ही केलं आहे. खोटं बोला पण रेटून बोला आणि आपल्या कर्तृत्वाने मोठं झालेल्या तुमच्यासारख्या लोकांच्या तोंडून #संघ आणि परिवार आपला प्रपोगंडा कसा राबवतो याचं हे तुमचं भाषण म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. (सदर भाषणाची लिंक कंमेन्ट बॉक्समध्ये) याच भाषणात अनेक धादांत खोटे आरोप केलेले आहेत.
नेहरू नेमके काय बोलले होते ते आता बघा.
" Now, it is a question of fact whether this village or that village or this little steip of territory is on their side or on our side. Normally, wherever these are relatively pretty disputes, well, it does seem rather absurd for two great countries... immediately rush to each other's throat to decide whether this two miles of territory are on this side or on that side, and especially two miles of territory, in the high mountains, where nobody lives.
But where national prestige and dignity is involved, it is not the two miles of territory, it's nation's dignity and self-respect that becomes involved. And therefore this happens."
Jawaharlal Nehru, in Loksabha, September 4th 1959
"आता हे गाव किंवा ते गाव किंवा जमिनीचा हा लहानसा तुकडा आपल्या बाजूचा की त्यांच्या बाजूचा इतकाच वादाचा मुद्दा आहे. शक्यतो जिथं असे किरकोळ विवाद असतात, तिथं लगेच एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी धावणे हे दोन महान देशांसाठी अतार्किक आहे. तेही अवघ्या दोन मैलांचा प्रदेश या बाजूला की त्या बाजूला हे ठरवण्यासाठी, तो ही असा प्रदेश की जो उंच पर्वतात आहे आणि जिथं कोणीही राहत नाही. (काहीही जगू शकत नाही)
पण जेव्हा राष्ट्राचा अभिमान आणि महानता यामध्ये विचारात घेतली जाते, तेव्हा प्रश्न फक्त दोन मैलांच्या प्रदेशाचा नसतो. तेव्हा राष्ट्राची महानता आणि स्वाभिमान यामध्ये गुंतलेला असतो आणि म्हणून अशी युद्धं होतात."
जवाहरलाल नेहरू, ४ सप्टेंबर १९५९ रोजी लोकसभेत दिलेलं भाषण

- © अभिषेक माळी

............

हायला ही SBI बँक हाय की लुटारुंची टोळी?

SBI मिनिमम बॅलन्स (रुपये ५०००/-) सरकारकडून सेवानिवृत्तीनंतर मिळणा-या पेन्शनच्या अकाउंटमधून बॅलन्स कमी झाला म्हणून ४२ रुपये दंडापोटी वसूल करायला लागली राव!! 
आता सांगा सेवानिवृत्त झालेवर पेन्शन मिळतं रुपये २२५४/ (मला तरी) आणि त्यात आता येप्रिल २०१७ पासूनच्या नवीन नियमांनुसार या खात्यात रुपये ५०००/ शिल्लक न ठेवल्याने प्रतेक महिण्याला येका खातेदाराकडून रुपये ४२/ - कपात करतेय. तशी माझे पेन्शन अकाउंटमधून रुपये १२६ /- कपात केली! म्हणजेच वार्षिक ५०४ रुपये दंड वसूल करणार 
असे असेल तर या बँकेचे सपूर्ण भारतात करोड पेन्शनर खातेदार मिळतील! 
आणि वादासाठी जरी यातील अर्ध्यांनी बॅंकेत ५०००/ - शिल्लक ठेवले तर बँकेला कायम मुदत ठेविपोटी करोडो रुपये निधी उपलब्ध होणार आणि सेव्हिंग रेटप्रमाणे खातेदारांना द्यावे लागणार मात्र ४ % प्रमाणे व्याज!

आता तुम्हीच विचार करा हा कायम ठेवीपोटी उपलब्ध होणारा पैसा हीच बँक ८ % ते ९ % दराने कर्जाऊ देऊन कर्जदाराकडून व्याजापोटी रक्कम मिळवणार तसेच आमच्या सारखे लाखो खातेदारांकडून मिळणा-या दंडा पोटी वसूल झालेली रक्कम किती!!

च्यामारी ही SBI भरपूर नफा कमावणार. 
मल्ल्यासारख्या खातेदाराकडून वसूल न झालेले नऊ हजार कोटी ही बँक या पेन्शनरांकडून वसूल करणारच असेच दिसतेय! 
म्हणजे मेहनत करे मुर्गा और अंडा खाये मल्ल्या!! 
हाय की नाय फंडा!!

टिप- पेन्शनरांनि जगावे की मरावे, हे कोणी तरी समजावून सांगा राव! 
म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठोपाठ पेन्शनर पण हे राम! करायला मोकळे? 
पटलं तर शेअर करा राव! 
पेन्शनरांच जीवन लय अडगळीचं अस्ते राजेहो!! 
#SBI-हायहाय???

- प्रकाश लक्षुमि भाऊसाहेब

.............

आपल्याकडून कुणाचे मन दु:खवू नये म्हणून काळजी घेऊन प्रबोधन करणारी मंडळी मला भयंकर लबाड वाटते....

कारण प्रबोधन करायचे झाल्यास मग ते कोणत्याही क्षेत्रात असो काही लोकांना राग येणारच ना..
त्याशिवाय प्रबोधन होऊ शकत नाही. सगळ्यांशी गोड गोड बोलणारे भयंकर लबाड आणि बदमाश असतात...

- विनायक लांडगे

............

#MNS नवी विटी, नवा दांडू..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही महिन्यांत फारसं बोलले नाहीएत. पण जे काही थोडं बोलले ते मार्मिक बोलले. 
पालिका निवडणकीच्या निकालानंतर ब-याच दिवसांनी, म्हणजे गेल्या महिन्यात - आता "नवी विटी, नवा दांडू" - असं राजसाहेब म्हणाले. त्याचा नेमका अर्थ काय, हे तेव्हा अनेकांना समजलं नाही. पक्षातल्या कार्यकर्त्यांना मात्र त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ पक्का समजला. "पक्षांतर्गत खालच्या आणि वरच्या अशा दोन्ही पातळ्यांवर नव्या चेह-यांना संधी", हा त्यांचा संदेश काम करणा-यांसाठी प्रेरणा देणाराच ठरणार, यात शंका नाही.
मला नेहमीच असं वाटतं की, मनसे संपली- मनसे संपली असं ओरडणा-यांना मनसेच्या सुप्त ताकदीचा पुरेपूर अंदाज आजही बांधता आलेला नाही. निवडणुकीच्या राजकारणात गेल्या तीन निवडणुकांमध्ये मनसेला अपयश आलं असलं तरी मराठी माणसाच्या मनातलं मनसेचं स्थान पक्कं आहे. राज ठाकरे यांनी गेल्या महिनाभरात विभागवार पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकांचा जो सपाटा लावला तेव्हा तिथल्या गर्दीवरूनच स्पष्ट होतं की, राजसाहेबांची लोकप्रियता अजिबात ढळलेली नाही. कार्यकर्त्यांनाच नव्हे तर सर्वसामान्यांना आजही त्यांच्याकडूनच फार मोठ्या अपेक्षा आहेत. म्हणून तर "नवी विटी, नवा दांडू" धोरणानुसार आपल्यालाही चांगली संधी मिळावी म्हणून शेकडो कार्यकर्ते तासनतास निवड प्रक्रियेला सामारे जाताना दिसताहेत.

याच संदर्भात गेल्या आठवड्यात अनेक दैनिकांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. बहुतेक पत्रकारांच्या मते, आता भविष्यात आधीचे नेते (एक प्रकारे पक्षांतर्गत प्रस्थापित नेते) पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून बाहेर फेकले जाणार आहेत. असं काही प्रमाणात होऊही शकतं. पण मला ते पूर्णपणे बाहेर फेकले जातील, असं वाटत नाही. कारण राजकारण ही एकाच वेळी अत्यंत वेगवान आणि अत्यंत हळूवार प्रक्रिया आहे. इथे म्हटलं तर प्रत्येकाला चुका सुधारायची संधी मिळते, आणि म्हटलं तर अजिबात नाही. त्यामुळे कुणी बाहेर फेकला जाण्याचा प्रश्नच येत नाही. हा, काहीजणांचा प्रभाव कमी-अधिक होऊ शकतो. असा प्रभाव कमी-अधिक होणं राजकारणात नेहमीच सुरु असतं. त्या अर्थाने गेल्या १० वर्षात अनेकांच्या प्रभावाचा आलेख चढला-उतरला आहेच की..

एक मात्र निश्चित की, नव्या चेह-यांना संधी मिळाल्यामुळे त्यांच्या ऊर्जेचा खूप सकारात्मक फायदा मनसेला होईल. नवीन माणसं नेहमीच नवीन विचार-आचार घेऊन येत असतात. त्यामुळे, सध्याच्या प्रक्रियेतून पक्षाचंच नवनिर्माण होणार आहे. इतरांचं माहित नाही, पण मनसेसाठी झटणा-या प्रत्येकाला- अनेकांना सध्या पक्षात सुरू असलेल्या या घुसळणीतून काहीतरी चांगलं, सकारात्मक बाहेर पडेल, याची खात्री म्हणूनच वाटते आहे.

- कीर्तीकुमार शिंदे

............प्रतिक्रिया द्या3062 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर