येशूची शिकवण.. लग्नेच्छु मुल्ला.. चांगला नेता
शुक्रवार, १४ जुलै, २०१७ मुकेश माचकर

बोधकथा, मुल्ला नसरुद्दीन कथा आणि मार्मिक विचार असा दमदार, कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून...

येशूची शिकवण

एका चांगल्या भरभक्कम माणसाला दुसरा शिवीगाळ करत होता.

दुसरा तसा किडकिडीत होता, पण, रागाच्या भरात त्याने तगड्याच्या कानफटात भडकावून दिली.

तगडा म्हणाला, मी येशू ख्रिस्ताची शिकवण मानतो. त्यामुळे दुसरा गाल पुढे करतो आहे.

त्याने दुसरा गाल पुढे केला.

कडक्याने आणखी एक सणसणीत भडकवून दिली आणि तो ख्या ख्या करून हसायला लागला...
...
...
पण, ते हसू मिनिटभरच टिकलं...

त्यानंतर तगड्याचा एक ठोसा त्याच्या तोंडावर बसला होता आणि तीन दातांनी आपलं स्थान कायमचं सोडलं होतं.

भयचकित रक्तबंबाळ चेहऱ्याने कडक्याने तगड्याला विचारलं, अरे, पण तू तर येशूचा अनुयायी आहेस ना?

तगडा नम्रपणे म्हणाला, हो रे. पण, मला तिसरा गाल नाही. दुसरा गाल पुढे केल्यानंतर त्यावरही थप्पड बसली तर काय करायचं, हे येशूने सांगितलेलं नाही. सगळं काही येशूनेच सांगावं, ही अपेक्षाही बरोबर नाही, आपले काही निर्णय तरी आपल्याला घेता यायला हवेत, नाही का?

.................................

लग्नेच्छु मुल्ला

मुल्ला नसरुद्दीनला लग्न करण्याची इच्छा झाली.

तो आजोबांपाशी गेला आणि म्हणाला, आता मी तारुण्यात पदार्पण केलंय. माझं लग्न व्हायला हवं, असं मला वाटतं.

आजोबा म्हणाले, नुसतं तरुण असून उपयोग नाही. बुद्धिमान पण बनायला हवं.

मुल्ला रागाने म्हणाला, पण, मी तर बुद्धिमान आहेच. त्याशिवाय का सगळा व्यवसाय सांभाळतोय. गावातले लोकही माझ्या बुद्धीची तारीफ करत असतात.

आजोबा म्हणाले, ते बरोबर आहे. पण, तेवढ्या बुद्धीने काम चालणार नाही. आणखी बुद्धी यायला हवी.

मुल्ला म्हणाला, आणखी किती बुद्धी हवी?

आजोबा म्हणाले, तू खऱ्या अर्थाने तेव्हाच बुद्धिमान होशील, जेव्हा, आता आपण लग्न करायला पाहिजे हा विचार तुझ्या डोक्यातून निघून जाईल. तेव्हा तू लग्न करायला पात्र बनशील.

............................

मूर्खाचा पत्ता

मीही आता दारावर 
'एकमेव शहाणा माणूस'
अशी पाटी टांगणार आहे...
...
...
...
म्हणजे लोकांना 
एकातरी मूर्खाचा पत्ता 
अचूक सापडेल!!!

.............................

चांगला नेता

जेव्हा एखादा नेता अस्तित्वात आहे, हे लोकांना जेमतेम माहिती असतं, तेव्हा तो नेता सर्वोत्तम असतो. जेव्हा लोक त्याच्या आज्ञा पाळत असतात आणि त्याचं नेतृत्व मान्य करत असतात, तेव्हा काही फारशी चांगली परिस्थिती नसते. लोक त्याचा तिरस्कार करतात, तेव्हा तर आणखी वाईट परिस्थिती असते. चांगला नेता त्याचं काम झाल्यानंतर, त्याचा उद्देश सफल झाल्यानंतरही कमी बोलतो. त्याचं काम झाल्यावर लोक म्हणतात, हे सगळं आमचं आम्हीच केलं.

-लाओ त्झू

.............................

तुम्ही अमृततुल्य नियमित वाचता?

मग इथे प्रसिद्ध होणाऱ्या कथांपैकी निवडक १०० कथांचा अक्कलझाड हा दोन भागांचा पुस्तकसंच तुम्हाला नक्कीच आवडेल.

तो खरेदी करण्यासाठी ‘इंद्रायणी साहित्य, २७३, शनिवार पेठ, पुणे ३०’ येथे ०२०-२४४५८५९८ किंवा ०२०-२४४८१८६७ या क्रमांकावर किंवा ९३७१०४३७८१ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

हा संच पुढील ठिकाणी ऑनलाइनही उपलब्ध आहे. फक्त क्लिक करा आणि घरपोच मिळवा.

इंद्रायणी साहित्य: http://bit.ly/IndrayaniSahityaAkkalJhad

बुकगंगा: /http://bit.ly/BookGangaAkkalJhad

अमेझॉन: http://bit.ly/AmazonAkkalJhadप्रतिक्रिया द्या2020 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर