मॉम: गाजर का हलवा ते पिस्तूल!
गुरुवार, १३ जुलै, २०१७ डॉ. अमर पोवार

आपल्या मुलांसाठी एक आई कुठपर्यंत जाऊ शकते, अशा आशयाची टॅगलाइन आणि श्रीदेवीची मुख्य भूमिका असलेला 'मॉम' कुठे उंची गाठतो, तर कुठे कमी पडतो याचा हा धांडोळा...

जगताला व्यापून दशांगुळं  उरणारं एक नातं.
आई आणि अपत्याचं.

कितीही मोठी झाली तरी आई नेहमीच मुलांसाठी स्पेशल असते. आईशी असणारं नातं भल्याभल्यांना भावनिक व्हायला भाग पाडतं. आई मुलाच्या नात्याची भूल भारतीय रजतपटाला पडली नसती तरच नवल.

टिपिकल हिंदी सिनेमातल्या 'माँ'चा गाजर का हलवा ते हातात पिस्तूल हा प्रवास लक्षणीय आहे. रवी उद्यवर दिग्दर्शित 'मॉम'मध्ये लेखक आणि पटकथाकार गिरीश कोहली यांच्यासोबत दिग्दर्शकाने सावत्र आई-मुलगी यांच्या नात्याचा वेध घ्यायचा प्रयत्न केला आहे. सावत्र आईची ओळख आपल्याला लहानपणीच होते, सिंड्रेला आणि तत्सम परीकथांमधली ठराविक साच्याची खलनायिका म्हणून.
पण वास्तव परीकथेपेक्षा वेगळं असतं. नायक-खलनायक कोणी नसतं हे हळूहळू उमगायला लागतं. परिस्थिती ठरवते, कोण कोणाच्या आयुष्यात कोणता रोल करणार ते.

'मॉम'मध्ये एक तणावपूर्ण नातं आहे, दिल्लीस्थित देवकी सबरवाल (श्रीदेवी) आणि आर्या (सजल अली) यांच्यातलं. आर्याचे वडील आनंद सबरवाल (अदनान सिद्दीकी) यांनी आर्याची आई निवर्तल्यानंतर देवकीशी दुसरं लग्न केलं आहे, आणखी एक छोटी गोड कन्यादेखील त्यांच्या (सध्याच्या नॉर्मनुसार छोट्याशा) कुटुंबात आहे. पहिल्यापासूनच आर्याला देवकीबद्दल घृणा आहे;

"माँ की जिंदगी में बेटी आती है,
बेटी की जिंदगी में माँ नहीं"
असं तिचं ठाम-आजच्या टीनेजरप्रमाणे-मत आहे. आनंदला अर्थातच तिला समजावण्यात अपयश आलेलं आहे पण त्याचं मत देवकीबद्दल अनुकूल आहे हे आर्याच्या लक्षात येतं.

देवकी पेशाने शिक्षिका आणि वृत्तीने कडक आहे.

काही कामानिमित्त आनंदला देशाबाहेर जावं लागतं आणि तत्पूर्वी टीनेजरपार्टीसाठी आलेलं निमंत्रण आर्या वडिलांना मस्का लावून स्वीकारते आणि तिथे तिला काही वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं.

न्यायव्यवस्थेकडून आलेल्या नकारात्मक अनुभवानंतर आनंद निराश होतो, तर देवकी स्वतः (भुरटे चोर असतात तसा) भुरटा डिटेक्टिव्ह दयाशंकर उर्फ डीके (नवाजुद्दीन सिद्दीकी) याच्या मदतीने संबधित खलनायकांचा काटा कसा काढते आणि हुशार इन्स्पेक्टर मॅथ्यू (अक्षय खन्ना) तिचा माग कसा काढतो याची कहाणी म्हणजे मॉम.

मॉममधली सर्वात मोठी गोची ही की, गोष्ट नक्की कोणत्या पद्धतीने narrate करायची ह्याबद्दल दिग्दर्शकाचा असलेला संभ्रम. सुरुवातीला (कुटुंबाचे क्षण असल्यामुळे की काय) अपरिहार्यपणे हळुवार असणारा सिनेमा एकेक प्रसंग घडत जातील तसा थ्रिलरच्या अंगाने जातो पण नवख्या ड्रायव्हरने दिशा बदलत जावी तसा दर वीस पंचवीस मिनिटांनी ट्रॅक बदलत राहतो; आई-मुलीचं हळुवार नातं एका कोपऱ्यात ढकलून अनेक स्टेशनं बदलत ही आगगाडी वैयक्तिक सुडाच्या, आकाराच्या तुलनेनं लहान स्टेशनवर थांबते.

बलात्कार, अॅसिड हल्ला यांसारख्या गंभीर धक्क्यांना सामोरं गेलेल्या मुलींना आजकाल victim न म्हणता survivor म्हणण्यात येतं. म्हणजे पीडित नव्हे तर वाचलेली . पुढे न्यायालयं आणि पोलिसी व्यवस्था ज्याप्रकारे सदर महिलेचे धिंडवडे काढतात, त्यातून यातला विरोधाभास लक्षात येतो.

एकंदर कथा आणि मांडणीबद्दल बोलायचं तर श्रीदेवी आणि अदनान यांच्यातले बाँडिंग दाखवणारे प्रसंग उकृष्ट झाले आहेत. काही ठिकाणी तर एकही संवाद नसताना केवळ हावभावांतून भावना पोचणं अगदी सहज आणि ठाशीव झालं आहे. देवकी जेव्हा त्याला शाळेत पाहिलं, असं आनंदला सांगते, तेव्हा आनंद विचारतो, "कोण तो?" उत्तरादाखल देवकीची मुद्राच सर्व काही सांगून जाते, हे जबरदस्त आहे. तिने फक्त माहिती हवीय, असं म्हणताच नवाजुद्दीनला सगळं काही समजून जाणं हाही सीन लक्षवेधी आहे. असाच subtle प्रसंग नवाजुद्दीन आणि त्याच्या कन्येचाही.

कठीण प्रसंगात आई आणि मुलींमधलं नातं , किंबहुना कोणतंही नातं कसं कसोटीला लागत असतं हे प्राधान्याने दिसणं अपेक्षित आहे. दुर्दैवाने, 'मॉम'मधला सर्वात कमकुवत धागा हाच आहे.
वाईट अनुभवानंतर, आर्या आणि तिच्या वडिलांमधलं कनेक्शन पूर्ववत होताना योजलेले प्रसंग ठाव घेणारे आहेत, परंतु शीर्षक भूमिकेतल्या मॉमची , तिच्यावरच्या अन्यायाबद्दल असलेली मतं, तिची भूमिका हे अत्यंत बटबटीतपणे समोर येतं. एखाद्या बलात्कारितेशी कसं वागायला हवं? केवळ स्वतः कुढत, रडत बसणं आणि वैयक्तिक स्तरावर त्याचा बदला घेणं यामुळे मध्यंतरापर्यंत असलेल्या संयत हाताळणीमुळे वाढलेल्या अपेक्षांवर (नेहमीप्रमाणे) बोळा फिरवितात.

मानसिकदृष्ट्या खचलेल्या मुलीला उभारी देण्यासाठी, इथे मॉम काही प्रयत्न करीत नाही, तर स्वतः कायदा हातात घेण्याची कृती करते. एका अर्थाने हे स्वतःला मुलीसमोर सिद्ध करणं आहे.

"पहा बरं मला तुझी किती काळजी आहे.." छाप वागणं.

'फॅमिलीसाठी काहीही करू शकतो' या दृश्यमच्या यशस्वी टॅगलाइनमुळे कदाचित दिग्दर्शकाने असा प्रयत्न केलेला दिसतो; पण स्वतंत्र विचारांच्या मुलीला हे मान्य होतं?

आताची पिढी इतकी बिनडोक खचितच नाही.

पार्टी, पार्टीतल्या आणि नंतरच्या दृश्यांवर 'पिंक' आणि सूडकथेवर 'दृश्यम', 'काबिल' या अलीकडच्याच चित्रपटांचा बराचसा भडक प्रभाव इथे दिसतो. पण कॉपी करण्याऐवजी, स्वतंत्र काही बनविणं निश्चितच वाखाणण्याजोगं ठरलं असतं . शेवटी शेवटी तर सरळसरळ साऊथचा भडक सूडपट पाहतोय असं वाटत राहतं.

ऐंशीच्या दशकातला मातब्बर निर्माता आणि ऐंशी नव्वदच्या दशकातली लोकप्रिय अभिनेत्री मिळून आपल्याला साक्षात्कार घडवतात की, अजून चालू शतक विसावंच आहे. सूडकथा सार्वकालिक नसतात, याचा प्रत्यय मॉम पाहताना येतो.

तिच्या पन्नासाव्या वर्षातला , श्रीदेवीचा तीनशेवा सिनेमा असलेला मॉम. चार भाषांत (हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम) रिलीज होण्याचाही प्रयोग होतोय.

हा खेळ शंभर टक्के श्रीदेवीचाच आहे, तिने तो जीव ओतून निभावलाही आहे. पण, सबरवाल असलेल्या देवकीचा दक्षिण भारतीय अॅक्सेन्ट खटकतो.

नवाजुद्दीन नव्या गेट अप आणि थोराड वयाच्या व्यक्तिमत्वात चांगले रंग भरतो आणि पूर्णपणे श्रीदेवीच्या असलेल्या सिनेमात भावही खाऊन जातो. अदनान सिद्दीकीही योग्य कास्टिंग. अक्षय खन्ना नसता तरी चाललं असतं!

एक निरीक्षण सजल अली, सान्या मल्होत्रा आणि जारा वसीम (दंगलमधल्या कुस्तीवीर मुली) यासारख्या मुलींबद्दल: जुन्या सुपरस्टार्सची पुढची पिढीची भूमिका म्हणून का होईना, यांना सशक्त रोल मिळत आहेत. सान्याला लुक्सवरून, वीसेक वर्षांपूर्वी केवळ एखाद्या बड्या सिनेमामध्ये छोटा , मैत्रिणीचा किंवा छोट्या सिनेमामध्ये हिरॉईनचीच भूमिका मिळाली असती. परंतु, दंगलमधल्या एकंदर भूमिकेचा आवाका (आणि तिचा वावर )पाहता तिच्यासाठी हा मोठाच ब्रेक आहे. हीच गोष्ट सजलसाठीही खरी आहे. मॉममधलं सरप्राइज पॅकेज म्हणजे सजल अली. Here is a girl to look out for.

संगीताच्या बाबतीत ए आर रहमान नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट. 'ओ सोना..' वगळता सर्व गाणी पार्श्वभूमीवर वाजतात. 'चल कहीं दूर चलें ..' श्रवणीय आहे. किंचितशी तू बिन बताए (रंग दे बसंती)ची आठवण करून देतो हा ट्रॅक. 'खाक बाकी..' डान्स फ्लोअर संगीत असूनही, डिस्टर्ब करणारं झालं आहे. 'बेनजारा..'  आणि ' मुआफी मुश्किल..' ही गाणी बॅकग्राऊंडला हरवून गेली आहेत.
पार्श्वसंगीत अत्यंत परिणामकारक झालं असून व्यक्तिरेखांना प्रदान केलेलं वैशिष्ट्यपूर्ण संगीत ही रहमानची स्पेशलटी इथेही दिसून येते.

'माई' नावाचा एक सिनेमा आला होता, हे दस्तुरखुद्द शीर्षक भूमिकेतल्या आशा भोसलेंच्याही विस्मरणातून गेलं असेल. परंतु, त्याचं पोस्टर आहे तसं उचलून मॉमची काही पोस्टर तयार करण्यात आली आहेत. 'पोस्टर आर्ट'चा खणखणीत इतिहास असलेल्या असलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही खरंच शरमेची बाब आहे.

थोडक्यात:

मॉम पाहिला.

आवडला आणि आवडला नाही.

आवडला यासाठी की,

मध्यंतरापर्यंतचा पहिला भाग प्रभावी आहे. पूर्णपणे विषयावर फोकस.

बाप- मुलगी नात्यातलं हळवेपण अगदी योग्य पद्धतीने मांडलं आहे.

'अवघडलेली सावत्र आई' म्हणून श्रीदेवी भरपूर फोकसमध्ये राहते.

कन्या आणि त्यांचं कुटुंबातलं स्थान छान , subtle पद्धतीने समोर येतं.

रात्री, दिल्लीच्या रस्त्यांवरून फिरत राहणारी एस यू व्ही ; कॅमेरा जेव्हा टॉप अँगलने दाखवतो तेव्हा खरंच अंगावर येतं हे दृश्य. या दृश्यासाठी रहमानला पार्श्वसंगीताचे १०० पैकी २०० मार्क.

असाच टॉप अँगल शेवटी मारधाडीच्या दृश्यातही छाप पाडतो.

रहमानचं घनगंभीर संगीत ही सर्वात उजवी बाजू.

नवाजुद्दीनने समजून उमजून केलेला, सामान्यच राहिलेला डिटेक्टिव्ह जबरदस्त जमला आहे. श्रीदेवीचा नवरा झालेला 'न-नायक' अदनान सिद्दीकी छोट्या भूमिकेत लक्षात राहतो.
करीनासारखी दिसणारी (पण सुदैवाने अभिनय करणारी) सजल अली उत्तम.

पुन्हा इस्टेब्लिश होणारं बाप-कन्या नातं अतिशय हळुवारपणे येतं.

आवडला नाही कारण :

मध्यंतरानंतर-

सगळ्याच हळुवार, subtle वगैरे गोष्टी बटबटीत होतात.

महत्त्वाचं म्हणजे 'मॉम' जिच्यासाठी सगळे उपद्व्याप करते त्या कन्येचं आणि तिचं नातं नीट प्रोग्रेस नाही होत.

जुनीच बदल्याची दारू, बाटली तर पुराणकाळातली.

कोर्टातले सीन फास्ट फॉरवर्ड केले आहेत.

अक्षय खन्ना या सिनेमात का आहे? खंबीर वगैरे असण्याच्या दृश्यात हा केविलवाणा कोवळेपणा डोळ्यांत दाखवतो!

'किती केलं तरी बाईला सपोर्ट लागतोच लागतो' छाप मेंटलिटी असणाऱ्या व्यक्ती सो कॉल्ड स्त्रीवादी सिनेमा काढण्याचं नाटक का करतात?

आणि शेवटी,

कमर्शिअल सिनेमात काहीही दाखवलं तरी चालतं हा प्रेक्षकाला गृहीत धरण्याचा मूर्खपणा कधी थांबणार??

ता. क. सरळसरळ चोरलेलं पोस्टर तर संतापजनक प्रकार आहे.

 

 प्रतिक्रिया द्या2724 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर