खरी संन्यासदीक्षा.. वांग्याची भाजी.. लोकशाही
गुरुवार, १३ जुलै, २०१७ मुकेश माचकर

बोधकथा, विनोद आणि मार्मिक विचार असा दमदार, कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून...

खरी संन्यासदीक्षा

एका राजामध्ये एकदा अचानक वैराग्य दाटून आलं. संसार असार आहे, असं वाटू लागलं. परमात्म्याची ओढ लागली. गावाबाहेरच्या एका साधुच्या आश्रमात तो गेला आणि संन्यासदीक्षा मागू लागला.

साधुमहाराज म्हणाले, सगळं काही सोबत घेऊन फिरतो आहेस. तू संन्यासी कसा होणार? आधी सगळं सोडायला शीक.

राजाने परत जाऊन राज्यत्याग केला. सगळी संपत्ती सोडली. अंगावरच्या दोन साध्या कपड्यांनिशी हात जोडून तो साधुमहाराजांसमोर हजर झाला, म्हणाला, तुमच्या आज्ञेप्रमाणे सगळं काही त्यागून आलो आहे. माझा स्वीकार करा.

साधुमहाराज म्हणाले, माझी खात्री होईपर्यंत आश्रमात राहून मी सांगेन ते काम करायला लागेल.

राजाने होकार दिला.

समोरून एक माणूस कचऱ्याची टोपली डोक्यावर घेऊन येत होता. साधुमहाराज म्हणाले, जा, त्याच्या डोक्यावरून ती टोपली आपल्या डोक्यावर घे आणि बाहेर टाकून ये. आजपासून हे तुझं काम.

आश्रमवासी हे ऐकून हबकले. पण, राजाने मान तुकवली, जाऊन कचऱ्याची टोपली डोक्यावर घेतली.

काही दिवसांनी आश्रमातले शिष्य गुरुदेवांना म्हणाले, राजा निमूटपणे कचरा डोक्यावरून वाहण्याचं काम करतोय. तो परीक्षा उत्तीर्ण झालाय, द्या त्याला संन्यासदीक्षा.

साधुमहाराज म्हणाले, अजून ती वेळ आलेली नाही. अजून त्याला खूप काही सोडायचंय. कालच आश्रमाबाहेर एक माणूस चुकून राजाला धडकला, तेव्हा राजा त्याला म्हणाला, पंधरा दिवसांपूर्वी तुझी माझ्यासमोर चालत येण्याचीही हिंमत झाली नसती.

त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तोच प्रसंग घडला.राजा धडक देणाऱ्या माणसाला काही बोलला नाही, पण, त्याच्या जळजळीत नजरेतूनच त्याला काय म्हणायचं होतं ते कळून गेलं.
हे साधुमहाराजांना समजलं, तेव्हा ते फक्त हसले.

आणखी काही दिवसांनी पुन्हा एक माणूस राजाला धडकला. राजाने त्याच्याकडे पाहिलंही नाही. खाली पडलेला कचरा निमूटपणे उचलला आणि पुढे निघून गेला. मात्र त्याच्या चेहऱ्यावर खेदाची भावना होती.तेही साधुमहाराजांना समजलं आणि ते हसले.

आणखी काही दिवसांनी आणखी एक माणूस राजाला धडकला. राजाने त्याच्याकडे पाहिलंही नाही, त्याच्या मनावर कसलाही तरंग न उमटल्याप्रमाणे त्याने कचरा भरला आणि तो पुढे निघाला.

काम करून परत येतानाच त्याला साधुमहाराजांचा भेटीचा निरोप आला.

साधुमहाराज म्हणाले, राजा, तू आता परीक्षा उत्तीर्ण झालास.

राजा म्हणाला, भगवन्, मला राजा म्हणू नका. मी आता मीही नाही, तर राजा कुठला असणार?

साधुमहाराज म्हणाले, तुला हे समजलं यात सगळं आलं. या वृत्तीने तू राज्य चालवशील तरी मनाने संन्यासीच असशील. सगळे छाटीधारी संन्यासी बनून बसले तर जग चालायचं कसं? तू आता 
परत जा. राज्यकारभार हाती घे. तुझं कर्तव्य निष्कामभावनेने पार पाडायला तू तयार झाला आहेस. हीच तुझी संन्यासदीक्षा आहे.

...............................

वांग्याची भाजी

मिथ्यानंद महाराज भोजनाला बसले... यजमानाने पानात वाढलेली वांग्याच्या भाजीची वाटी त्यांनी काढून बाहेर ठेवली.

चंदूलालने विचारलं, महाराज, वांग्याची भाजी आवडत नाही का तुम्हाला?

महाराज म्हणाले, श्रावण महिन्यात वांगं खाल्लं तर पुढच्या जन्मी माणूस वेडपटासारखं काहीही बरळू लागतो.

चंदूलाल म्हणाला, गेल्या जन्मी हे माहिती नव्हतं ना तुम्हाला??

.................................................

लोकशाही राज्यव्यवस्था

लांडगे आणि शेळ्या यांना एकत्र बांधून

दोघांना उत्कर्षाची 'समान' संधी देणारी व्यवस्था

लांडग्यांना खूप आवडते, यात नवल काय?

तुम्ही अमृततुल्य नियमित वाचता?

मग इथे प्रसिद्ध होणाऱ्या कथांपैकी निवडक १०० कथांचा अक्कलझाड हा दोन भागांचा पुस्तकसंच तुम्हाला नक्कीच आवडेल.

तो खरेदी करण्यासाठी ‘इंद्रायणी साहित्य, २७३, शनिवार पेठ, पुणे ३०’ येथे ०२०-२४४५८५९८ किंवा ०२०-२४४८१८६७ या क्रमांकावर किंवा ९३७१०४३७८१ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

हा संच पुढील ठिकाणी ऑनलाइनही उपलब्ध आहे. फक्त क्लिक करा आणि घरपोच मिळवा.

इंद्रायणी साहित्य http://-http://bit.ly/IndrayaniSahityaAkkalJhad

बुकगंगा :http://http://bit.ly/BookGangaAkkalJhad

अमेझॉन :http://bit.ly/AmazonAkkalJhadप्रतिक्रिया द्या2016 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर