रागावर उपाय.. पायजमा माझाच!.. आपलं सरकार
बुधवार, १२ जुलै, २०१७ मुकेश माचकर

बोधकथा, मुल्ला नसरुद्दीन कथा आणि मार्मिक विचार असा दमदार, कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून...

बंकेई नावाच्या एका गुरूकडे एकजण गेला आणि म्हणाला, मला फार राग येतो, त्यावर काहीतरी उपाय सांगा.

बंकेई म्हणाले, एकदम सोपी गोष्ट आहे. राग आला की धावत माझ्याकडे यायचं.

एकदा तो धावत आला बंकेईकडे.

बंकेई म्हणाले, हां, आता दाखव तुझा राग कुठे आहे तो?

तो म्हणाला, इकडे धावत येईपर्यंत तो गेला.

बंकेई म्हणाले, अर्रर्र, घोटाळा झाला. रागावर उपाय करायचा, तर तो असला पाहिजे ना. हरकत नाही. पुढच्या वेळेला राग आला की ये.

असं दोनचार वेळा झालं. राग आला की तो धावत यायचा.बंकेईंना भेटेपर्यंत राग निघून जायचा.

मग बंकेईंनी एक दिवस त्याला समोर बसवून सांगितलं, आतापर्यंतच्या आपल्या सगळ्या उपक्रमातून आपल्याला काय कळलं? राग हा काही तुझ्या आत नाहीये, तो बाहेरून येतो आणि बाहेर निघून जातो, बरोबर?

तो माणूस म्हणाला, बरोबर.

बंकेई म्हणाले, शिवाय तो आल्यावर त्याला काही करायला गेलं की तो त्याआत गायब होतो, बरोबर?

तो माणूस म्हणाला, बरोबर.

बंकेई म्हणाले, जेव्हा तो येतो, तेव्हा तो तुझ्या शरीराचा ताबा घेतो. तुझ्याकडून मारहाण, आरडाओरडा असे अनेक प्रकार करून घेतो. बरोबर?

तो माणूस म्हणाला, बरोबर.

बंकेई म्हणाले, मग आता एकच उपाय आहे. एक काठी घ्यायची. आपल्याला राग आला रे आला की स्वत:ला काठीने झोडपून काढायचं. बघ, त्या रागावर तुझ्या रागाची अशी दहशत बसेल की पुन्हा तुला कधीही राग यायचा नाही.

................................................

फजलू तीन वर्षांचा झाला, तेव्हाची गोष्ट.

त्याच्या जन्मानंतर पहिल्यांदाच तो आजोळी गेला होता. नजमाच्या घरी पोहोचताच मुल्ला नसरुद्दीनच्या सासरचे सगळे लोक गोळा झाले आणि फजलूकडे कौतुकाने पाहू लागले.

आजी म्हणाली, केस अगदी जावयबापूंचेच आहेत.

आजोबा म्हणाले, डोळे मात्र नजमाचे आहेत.

मामा म्हणाला, नाक मुल्लाजींच्या आईचंच घेतलंय अगदी.

मामी म्हणाली, रंग मात्र नजमाच्या आईचाच आहे हां अगदी पक्का.

मावशी म्हणाली, अंगाची चणही अगदी आमच्या अब्बाजानचीच घेतलीये.

या चर्चेने कावलेला फजलू म्हणाला, पण, हा पायजमा मात्र माझा आहे... फक्त माझा.

....................

आपलं सरकार

अमेरिका किंवा दक्षिण आफ्रिकेतला एखादा ज्यू जेव्हा दुसऱ्या ज्यू माणसाशी बोलताना 'आपलं सरकार' असं म्हणतो, तेव्हा तो सहसा इस्रायलच्या सरकारबद्दल बोलत असतो. विविध देशांमधले ज्यू नागरिक त्या त्या देशातल्या इस्रायली राजदूताला 'आपला प्रतिनिधी' मानत असतात.

इस्रायल सरकारचे इयरबुक, १९५३-५४, पान क्र. ३५

…………………………………….

नेतृत्व

लोकांच्या डोक्यावर फटके मारून तुम्ही त्यांचं नेतृत्व करू शकत नाही... हा हल्ला झाला, नेतृत्व नव्हे.

- डवाइट आयसेनहॉवर

..............................

तुम्ही अमृततुल्य नियमित वाचता?

मग इथे प्रसिद्ध होणाऱ्या कथांपैकी निवडक १०० कथांचा अक्कलझाड हा दोन भागांचा पुस्तकसंच तुम्हाला नक्कीच आवडेल.

तो खरेदी करण्यासाठी ‘इंद्रायणी साहित्य, २७३, शनिवार पेठ, पुणे ३०’ येथे ०२०-२४४५८५९८ किंवा ०२०-२४४८१८६७ या क्रमांकावर किंवा ९३७१०४३७८१ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

हा संच पुढील ठिकाणी ऑनलाइनही उपलब्ध आहे. फक्त क्लिक करा आणि घरपोच मिळवा.

इंद्रायणी साहित्य -http://bit.ly/IndrayaniSahityaAkkalJhad

बुकगंगा :http://http://bit.ly/BookGangaAkkalJhad

अमेझॉन :http://bit.ly/AmazonAkkalJhad

 प्रतिक्रिया द्या1811 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर