गुणांची 'शंभरी' विकासाला मारक
सोमवार , १९ जून, २०१७ निलेश फावडे

दहावीच्या निकालात १९३ मुलांना शंभर टक्के गुण मिळाल्यामुळे काही मूलभूत प्रश्न उभे राहिले आहेत. अंतर्गत परीक्षांतखैरात, भाषांमध्ये सरसकट गुण यांमुळे हा फुगवटा झाला आहे.

१३ जून रोजी एसएससी मार्च २०१७ परीक्षेचा निकाल घोषित करण्‍यात आला. विद्यार्थ्यांना मिळालेले घवघवीत यश पाहून खूप आनंद झाला. यंदाच्‍या परीक्षेत १९३ विद्यार्थ्यांना १०० टक्‍के गुण मिळाले, म्‍हणजे प्रत्‍येक विषयात पैकीच्‍या पैकी गुण. पण मनात काही शंका निर्माण झाल्‍या. आजचा विद्यार्थी १०० टक्‍के गुण मिळविण्‍याइतका सक्षम झाला आहे का? प्राप्‍त गुणांमधून त्‍याची गुणवत्‍ता सिद्ध झाली का? सरसकट गुण देऊन त्‍यांचा सर्वांगीण विकास साधता येईल का? इतर बोर्डांमध्‍ये सरसकट गुण दिले जातात म्‍हणून आपण सुद्धा द्यायचे का? भाषा विषयांमध्‍ये पैकीच्‍या पैकी गुण मिळतात, या मताशी मी सहमत नाही. असे वाटते की उत्‍तरपत्रिका तपासणारे परीक्षक, नियामक, प्रधान नियामक यांनी सरसकट गुणांचे वाटप केले आहे. भाषा विषयांच्‍या उत्‍तरपत्रिका तपासताना शब्‍दामधील –हस्‍व, दीर्घ, वेलांटी, उकार, काना-मात्रा यांची बारकाईने तपासणी केली का? भाषा विषयांसाठी यंदा कृतीपत्रिका दाखल करण्‍यात आली. म्‍हणजेच उता-यामधून उत्‍तरे शोधून लिहिणे. याकरिता विद्यार्थ्‍यांना धड्याखालील प्रश्‍नांची उत्‍तरे पाठ करण्‍याची गरज नाही, म्‍हणजेच धड्यांचे वाचन करण्‍याचीच गरज नाही. मराठी विषयामध्‍ये या विद्यार्थ्‍यांना पैकीच्‍या पैकी गुण मिळाले. पण, सव्‍वा लाख मुले अनुत्‍तीर्ण झाली. इतके गुण यापूर्वी कोणत्‍याच विद्यार्थ्यांला मिळत नव्‍हते. म्‍हणजे आजचा विद्यार्थी पूर्वीच्‍या काळातील विद्यार्थ्यांपेक्षा अधिक बुद्धिमान आहे का?

परीक्षा पद्धतीमुळे गुणांची खैरात

खरेतर, या प्राप्‍त गुणांमध्‍ये परीक्षा पद्धतीचा सुद्धा वाटा आहे. आज परीक्षेमध्‍ये अंतर्गत मूल्‍यमापन पद्धतीचा समावेश करण्‍यात आला आहे. अंतर्गत मूल्‍यमापन म्‍हणजे भाषा विषयांच्‍या तोंडी परीक्षा, गणित विषयाची बहुपर्यायी परीक्षा आणि त्‍यामध्‍ये विषयांच्‍या गृहपाठ वह्यांच्‍या गुणांचा देखील समावेश आहे. अंतर्गत मूल्‍यमापनामध्‍ये प्रत्‍येक विषयाची २० गुणांची परीक्षा घेतली जाते. म्‍हणजे १०० पैकी २० गुण शाळेकडून पाठविले जातात. या २० गुणांची बारकाईने तपासणी केली जाते का? तोंडी परीक्षेत श्रवण, वाचन, भाषण व संभाषण या विभागांमध्‍ये गुणांची विभागणी केली जाते. पण या सर्व क्षमता विद्यार्थ्यांना अवगत आहेत का? तसे पाहायला गेले तर शिक्षक येथे देखील सरसकट गुण देतात. यामधून विद्यार्थ्यांमध्‍ये गुणवत्‍ता निर्माण होईल का? १०० टक्‍के गुण हे खरचं विद्यार्थ्यांच्‍या योग्‍यतेला सिद्ध करतात का? असे सरसकट गुण देण्‍याने इतर विद्यार्थ्‍यांवर ताण निर्माण होऊ शकतो. कारण पालक नेहमी आपल्‍या पाल्‍यांची इतरांशी तुलना करत असतात. नेहमीच म्‍हणत असतात, त्‍याला १०० टक्‍के मिळाले, तू पण तेवढेच गुण काढायचे आहेस. सरसकट गुण देऊन विद्यार्थ्यांमधील स्‍पर्धा वाढवली जात आहे, जी जीवघेणी ठरू शकते.

विद्यार्थी बेफिकीर

प्रथम आठवीपर्यंत अनुत्‍तीर्ण न करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. ज्‍यामुळे विद्यार्थ्यांमध्‍ये अभ्‍यास करण्‍याची भीतीच राहिली नाही. विद्यार्थ्यांच्‍या मनात भावना निर्माण झाली की मी अभ्‍यास नाही केला तरी उत्‍तीर्ण होणार. तसेच, शाळेमध्‍ये तासिकादरम्‍यान शिक्षकांच्‍या शिकवण्‍याकडे दुर्लक्ष करू लागला. या निर्णयाचा परिणाम इयत्‍ता नववीच्‍या निकालावर दिसू लागला आणि नववीमध्‍ये अनुत्‍तीर्ण होण्‍याचे प्रमाण वाढू लागले. काही शाळा शाळेचा निकाल १०० टक्‍के लागावा, म्‍हणून अभ्‍यासात कमी असलेल्‍या विद्यार्थ्यांना नववीतच अनुत्‍तीर्ण करू लागले. आणि आता दहावीच्‍या विद्यार्थ्‍यांना देण्‍यात आलेले सरसकट गुण. अशा या पद्धतीतून शैक्षणिक धोरणकर्त्‍यांना काय साध्‍य करायचे आहे? आजकाल विद्यार्थी परीक्षेमध्‍ये अनुत्‍तीर्ण होण्‍याच्‍या भितीने आत्‍महत्‍या करण्‍याचे प्रमाण वाढू लागले आहे. पण, ही स्थिती का निर्माण झाली, याचा धोरणकर्त्‍यांनी विचार केला आहे का? सरसकट गुण दिल्‍याने या स्थितीमध्‍ये बदल होईल असे त्‍यांना वाटते का?

भाषा विषयांत सरसकट गुण?

माझे तर स्‍पष्‍ट मत आहे, भाषा विषयांमध्‍ये सरसकट गुण देणे अत्‍यंत चुकीचे आहे. या विषयांच्‍या उत्‍तरपत्रिका अधिक बारकाईने तपासणे गरजेचे आहे. असे सरसकट गुण देण्‍याने विद्यार्थ्‍यांमध्‍ये गर्व निर्माण होऊ शकतो. ते भविष्‍याबाबत विचार न करता फक्‍त मिळालेल्‍या गुणांबाबत बढाई मारत राहतील. आता त्‍यांना १०० टक्‍के गुण मिळाले, पण बारावीला एवढेच गुण पुन्‍हा मिळतील का? १०० टक्‍के गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांचे भविष्‍य उज्‍ज्‍वलच असेल, हे खात्रीपूर्वक सांगता येऊ शकते का? आणि भविष्‍य चांगले घडले नाही, तर अशा गुणांचा उपयोग काय? कदाचित ते भविष्‍यात यशस्‍वी ठरले नाही, तर त्‍यांना इतरांचे मनाला दुखावणारे शब्‍द ऐकावे लागतील. म्‍हणून गुण देताना या बाबींचा देखील विचार करणे, आवश्‍यक आहे.

सरसकट गुण देण्‍याची पद्धत थांबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कशाप्रकारे करता येईल, यावर विचार केला गेला पाहिजे. कारण आजचा सर्वगुणसंपन्‍न विद्यार्थी भावी उज्‍ज्‍वल भारताची निर्मिती करू शकतो आणि स्‍वत:च्‍या प्रगतीसोबतच भारताला प्रगतीच्‍या दिशेने घेऊन जाऊ शकतो.

(लेखक स्वत: माध्यमिक शालेय शिक्षक आहेत.)

(छायाचित्र प्रातिनिधिक)प्रतिक्रिया द्या1299 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर