फेबुगिरी
सोमवार , १९ जून, २०१७ टीम बिगुल

ताज्या घडामोडींबाबत किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्यक्त होणा-यांची संख्या मोठी आहे. यातल्या काही निवडक खास पोस्ट्स ‘बिगुल’च्या वाचकांसाठी...

होय मी देशद्रोही आहे. आज मॅचऐवजी मी जॉली एल. एल्. बी.२ पाहिला.

- शंतनु पांडे

...........

आयजीच्या जिवावर बायजी उदार!
गेले काही दिवस पाकिस्तानात टीव्ही फोडण्यावरून आपला अहंगंड कुरवाळणारे विनोद प्रसृत होत होते. कुणी अभिनेता बापाशी मॅच आहे वगैरे ट्विट करत होते. या सर्वांमधे जी नशा होती ती बेगडी देशप्रेमापोटी चढलेल्या वीरश्रीची होती. खेळ हा खेळ न राहता त्याआडून अनेक अजेण्डे राबवण्याचा उद्योग होण्यामागे या मंडळींचं अभूतपूर्व असे योगदान आहे. जितक्या जास्त बढाया माराव्यात त्याच प्रमाणात भर चौकात इज्जत लुटली गेल्यासारखे वाटणार हे साहजिक आहे.

खेळात काहीही होऊ शकतं हे विसरलेल्या सर्वांची थोबाडं फुटली हे या मॅचचं फलित आहे. बाकी फायनलला भारत इंग्लंड किंवा भारत श्रीलंका अशी लढत झाली असती तर लोकांनी फक्त खेळ पाहिला असता यात शंका नाही.

बाकी तुम्हाला देशप्रेमच सिद्ध करायचे असेल तर कार्सचे डिझाईन इटालियन डिझायनर्सकडून विकत घ्यावे लागते ते थांबवा. मॅचचे तास कमी करून स्टेट ऑफ द आर्ट डिझाईन बनवा. झेक सारखे देश १६ व्हील ड्राईव्ह व्हेईकल बनवतात. आपल्याला स्वत:ची ४ बाय ४ व्हेईकल बनवता येत नाही. टाटा इंडीकाचं सुरूवातीचं इंजिन फेल गेलं. ते फियाटकडून बनवून घ्यावं लागलं....

डिझाईन आणि तंत्रज्ञान यात रेकॉर्डस बनवायला हवेत. तैवान, कोरिया, चीन हे देश आयसीज बनवण्यात,पीसीबी बनवण्यात अग्रेसर आहेत. आपण इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअरमधे अद्याप खूप मागे आहोत. चीनकडून फोन बनवून घेऊन मायक्रोमॅक्ससारखी कंपनी बनवण्यापेक्षा उलटे कसे होईल हे पाहिले पाहिजे.

संपूर्ण गुजरातमधे अवजड अभियांत्रिकीचे टेण्डर्स भरून ते फिलिपिन्स किंवा इतर गरीब देशातून स्वस्तात बनवून घेण्याची लाट आलेली आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे. अभियांत्रिकीची महाविद्यालये वाढताहेत आणि दुसरीकडे काम बाहेर एक्स्पोर्ट होतंय. क्रिकेटच्या जिवावर बेडक्या फुगवण्यात हेच गुजराती बनिये भक्त आघाडीवर आहेत. देशात बेरोजगारी निर्माण करणा-यांना कसला हक्क पोहोचतो देशप्रेम दाखवण्याचा?

जाणीवपूर्वक कर्ज बुडवण्यात व्हिडीओकॉन सारखी कंपनी आघाडीवर आहे. असे बरेच आहेत. सहा लाख कोटी एनपीएपैकी साठ कंपन्या मुख्य थकबकीदार आहेत. क्रिकेटच्या जाहिरातदारांपैकी हे आघाडीवरचे लोक आहेत. यांनी आम्हाला देशप्रेम शिकवायचे का? रिलायन्स , अदानी यांना कर सुद्धा माफ झालेत. थोडेथोडके नाहीत तर ४० हजार कोटी. हा पैसा मग क्रिकेट, बॉलिवूडमधे वापरला जातो. या पैशानेच काळ्याचा पांढरा करण्याचा उद्योगही या क्षेत्रामधे फोफावलेला आहे. आणि हे आम्हाला देशप्रेमाचे धडे देणार!

दिवसभर रस्त्याकडेला दगडी फोडून मिळणा-या मजुरीतून पोरांना कधी फळं किंवा मटण घेऊन जाण्याचं स्वप्न बघणा-या गरीबांना देशप्रेमाचा हक्क नाही. आपले काम इमाने इतबारे करून काढलेली कर्जे फेडता येत नाही म्हणून आत्महत्या करणारे देशप्रेमी नाहीत. फक्त टीव्हीवर क्रिकेट खेळतात म्हणून जाहीरातून हजारो कोटी ओरपणारे तेव्हढे देशप्रेमी...

या सर्वांचं विमान जमिनीवर आणणा-या आजच्या या सामन्याचं महत्त्व या दृष्टीने औरच आहे. माझ्या घरचा टीव्ही फुटला नाही त्यामुळे मला देशद्रोही म्हणायचे असल्यास तो माझा सन्मान समजण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी!

कळावे आपलाच एक राष्ट्रद्रोही.

- किरण चव्हाण

...........

राजीव खांडेकरांनी घेतलेल्या अमित शहांच्या मुलाखतीबद्दल ब-याच पोस्ट्स दिसताहेत. अमित शहांनी खांडेकरांची होलपट उडवली अशा अर्थाच्या. असं होणं मला साहजिक वाटतं. त्याचं पहिलं कारण म्हणजे खांडेकर हे खूप सज्जन गृहस्थ आहेत. दुसरं, अधिक महत्त्वाचं, अमित शहा हा खूपपेक्षाही जास्त अट्टल इसम आहे.

- बालाजी सुतार

...........

आजच्या मॅचमध्ये फक्त पंड्या खेळणं हा एक 'ब्राह्मणी कावा' आहे..

फिलींग #मणुवादी

- निमेश वहाळकर

...........

कडूनो, 
ते बाप पोरगा मेसेज, मोका मोका वेग्रे शेयर करून करून वात आणलात. अन आता ते हॉकी चे मेसेज,बापाचे हृदय मोठे असते म्हणून पोराला जिंकू देतो वेग्रे ...
तुचियापंती बंद करा. कसले फॅन्स तुम्ही, तुमची टीम एखादा सामना हरत असेल तर तिला धीर सुद्धा देऊ शकत नाही तुम्ही! 
तुमचे गणित इंग्रजी चे मार्क्स बघून तुमच्या बापूने तुम्हाला लहानपणी घरातून हाकलून दिलं नव्हतं!!
असो.. फादर्स डे आहे.. थोडं मोठे व्हा. आग्रह नाही, पण प्रयत्न नक्की करा.

..आपला युनिव्हर्सल बाबा...

- बिपीन राजन कुलकर्णी

...........

पाकिस्थान संघाचे हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन....you deserve this victory... कधी ना कधी भारतीय संघ हरणार होता तो आज हरला... प्रेशर सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी घेणे कधीही चांगले असते.. आजपर्यंत आपण अनेक सामने दुसऱ्यांदा गोलंदाजी करून जिंकले आहेत. आजचा गोलंदाजीचा निर्णय पूर्ण चुकीचा.. असो... वर्ल्डकप सामन्यात आपण आजपर्यंत सुंदर कामगिरी केली आहे... फक्त चॅम्पियन्स स्पर्धेतच आपण पाक संघाकडून तीनदा हरलो आहे.. कधीतरी असे होते हे परवाच मी लिहिले होते.. एखादा दिवस काहीच क्लीक होत नाही.... पण अशा मोठ्या स्पर्धांमध्ये चांगल्या खेळ केलेल्या दोन संघाना IPL मध्ये जसे QUILIFY आणि ELIMINATE सोय देतात तशी द्यायला हवी ..कारण साखळीत चांगले खेळून एखादा सामना बाद खेळला गेला तर चांगला खेळ दाखवलेला संघ एका वाईट खेळीने बाहेर जातो..अथवा ऑस्ट्रेलियात जसे बेस्ट ऑफ 3 खेळवतात तसे तीन सामने खेळायला लावावेत.. जी खरेच चांगली टीम असेल ती लागोपाठ दोन सामने खेळून जिंकून जाईल नाहीतर चांगले तीन सामने होतील... ICC आणि SATTA वाल्याना तीन तीन वेळा पैसे कमवायची संधी मिळेल... असो..... बऱ्याच मित्रांना हे कौतुक आवडणार नाही पण हे फक्त खेळ म्हणून लिहिले आहे ह्याची नोंद घ्यावी..

- उज्वल शुभांगी

...........

सेकंडहँड टीव्ही साधारण काय किंमतीला मिळतात आपल्याकडे?

- अभिजीत पेंढारकर

............

रामायणात शूर्पणखा रामाला सरळ 'मागणी घालते'. कैकेयी नवर्‍याकडून वर चोख वसूल करते. वाली मेल्यावर तारा सुग्रीवाची बायको होते. अंजनीला आकाशातून हातात फळ पडतं आणि अपत्य होतं; पण तिच्या पतीचा उल्लेख नाही. म्हणजे ती 'सिंगल मदर' असते. ही सगळी उदाहरणं बायकांना काही लोकांच्यात तरी मोकळेपणा, निर्णयस्वातंत्र्य असल्याची आहेत. रावणाने सीतेला सहा महिने स्वतःकडे कैदेत ठेवली पण तिच्यावर बळजबरी केली नाही.

रामाच्या मागे वनवासाला जाणे, हा सीतेचा स्वतंत्रपणे घेतलेला निर्णय होता, तिच्याकडून तशी अपेक्षा नव्हती.

म्हणजे, पातिव्रत्याचं अवडंबर हे नंतरच्या काळात घुसडलेलं मूल्य आहे, असं मानायला जागा आहे.

- हेमंत कर्णिक

............

असे काही महत्त्वाचे नियम, जे न्यूटन सुद्धा सांगू शकला नाही, ते खाली देत आहे.

----------------------------------------

नियम १
जर ब्रेड तुमच्या हातातातून सुटला तर तो जमिनीवर त्याच बाजूला पडतो, ज्या बाजूला "जाम" किव्हा "बटर" लावलेले असते,

हळहळ....

----------------------------------------

नियम २
जेव्हा तुमचे हात ग्रीस किव्हा पिठाने भरलेले असतात, तेव्हाच तुमच्या नाकाला अचानक "खाज" सुरु होते.

कासावीस....

----------------------------------------

नियम ३

जेव्हापण तुम्ही कुठला Worng Number डायल करता, तेव्हा तो कधीच Busy/Engage लागत नाही.....


दुर्दैव...

----------------------------------------

नियम ४

WhatsApp वर जेव्हा कुठला फोटो चुकीच्या ग्रुप मधे पोस्ट होतो तेव्हा, नेट एकदम फास्ट चालत असते.

तुमच्या लाख प्रयत्नानंतर सुद्धा तो मेसेज सेंड होतोच, आणि जेव्हा Urjent मेसेज पाठवायचा असतो तेव्हा नेट कासवाच्या गतीने चालते.

पश्चाताप...

----------------------------------------

नियम ५
जेव्हा पेट्रोल पंप वर तुम्ही फक्त 30 रुपयाचे पेट्रोल भरण्यासाठी उभे असता, तेव्हाच तुमच्या शेजारी एखादी, हॉट मुलगी येऊन थांबलेली असते......


लाज...

----------------------------------------

नियम ६
जेव्हा तुम्ही एखाद्या रांगेतील गर्दी पाहुन दुसऱ्या रांगेत जाता, तेव्हाच ती पहिलीवाली रांग पटापट पुढे जाते.......


चिडचिड...

----------------------------------------
नियम समजावून घेतल्याबद्दल आभार !!

- राजेंद्र मंत्री

...........

कालचीच गोष्ट आहे. पुण्यात संध्याकाळी अगदी मजबूत पाउस पडत होता. आमच्या भागात वीज तर नव्हतीच. सगळीकडे अंधार. कशीबशी सोसायटीच्या दारात पोचले तर आमच्या सोसायटीत जी अनेक भटकी कुत्री बसलेली असतात त्यातली एक पांढरी कुत्री पटदिशी मला पाहून उठली. आता तिच्याबद्दल मला सांगायलाच हवं. ही ठकू आपली मी आले की मला वरपर्यंत सोडायला येते. अंधार असेल तर. कशी काय कोण जाणे. आधी तिची भीती वाटायची मला. आता सवय झाली. परत अपेक्षा काही नाही. (अर्थातच. ती काही माणूस नाही ना) तर ही उठली आणि विचित्र भुंकली. मला काही कळेना आणि मी जरा पुढे अंधारात नीट पहायला लागले. तर ही भराभर पळत मी जिथून गाडी पार्क करायला आत वळते तिथे गेली आणि एका जागेवर जाऊन पाय खाली आपटून दाखवू लागली. मी नीट पाहिलं तर झाडाची मोठी फांदी तुटून पडली होती. त्या गच्च अंधारात हे दिसलच नसतं मला आणि म्हणून ही तिथे आधीच उभी राहिली होती. पुढे जाता येणारच नव्हतं. परत यू टर्न घेऊन मी दुसऱ्या रस्त्याने घरी गेले. कसं कळलं असेल या ठकीला की ही येडी इकडेतिकडे न पहाता नेणार गाडी आणि पडणार. वेळेवारी सांगितलेलं बरं म्हणून...
खरंच काही कळत नाही हे कुठले ऋणानुबंध? तिची माझी ओळख जिन्यातलीच फक्त. तेही अंधार असतानाच भेटलो तर. बाकी म्हणाल तर कधी साधं बिस्कीट सुद्धा मी अजून तिला दिलं नाही. कारण भेटतो तेव्हा वेळच वेगळी असते. फक्त अंधार. पण हिचं काही कळेना. फार आश्चर्य, आनंद, कृतज्ञता अस काहीतरी वाटतंय. 
ठके.. धन्यवाद ग. आता आवर्जून भेटायलाच हवं तुला.

- सविता सरपोतदार देशपांडे

...........

बाबांनी लहानपणी मला कुऱ्हाड आणून दिली होती पण आमच्या अंगणात एकही झाड नव्हतं, इतकंच काय, आमच्या घराला अंगणही नव्हतं. शेजारच्या जोशींच्या झाडावर कुऱ्हाड चालवली असती पण ते आंब्याचं झाड उन्हाळ्यात कैऱ्यांसाठी उपयोगी पडायचं. केवळ एक पुरेसं मोठं झाड नसल्यानं माझी थोर पुरुष होण्याची संधी हुकली.

आणि लहानपणी मी सार्वजनिक बागेत तासनतास बसून डोक्यावर सफरचंद पडायची वाट बघायचो. पण सफरचंद सोडा, कधी त्याची बीपण डोक्यावर पडली नाही. नाही म्हणायला उंबरं भरपूर पडायची डोक्यात. डोक्यावरून अंघोळ करताना केसांतल्या उंबराच्या बिया काढायचा ताप व्हायचा. अर्थात, उंबरं डोक्यात पडून कुणी महान शास्त्रज्ञ होतं का?

चहाच्या भांड्यावरचं झाकण वाफेनं थरथर हलताना मी कधी पाहिलं नाही. एकतर, स्वयंपाकघरात गूळ-शेंगा चोरण्यापलीकडं कधी जायचा प्रसंग आला नाही. शिवाय, मी सकाळी उठेपर्यंत चहाची वेळ टळून गेलेली असायची. हा आळस माझ्या महान संशोधक होण्यातला आडकाठी बनून गेला.

वयाच्या पाचव्या वर्षी सिंफनी लिहिण्याऐवजी मी शिंपली गोळा करत बसलो नसतो तर कदाचित मी प्रख्यात संगीतकारही झालो असतो. असो.

आपण कंडक्टर असलो आणि मरण्याआधीची दहा वर्षं आपल्याला बहिरेपणा आला तर एक महान संगीतकार होता येईलसं वाटतंय. बघू, बहिरेपणाची प्रॅक्टिस म्हणून सध्या बायकोचं ऐकायचं सोडून दिलंय. या वयात, कंडक्टरची नोकरी मिळणार नाही म्हणून पीएमटीत चढलो की मुद्दाम ओरडून लोकांना (विशेषतः मुलींना) स्टॉप कुठला आलाय हे आवर्जून सांगत असतो. कंडक्टर लोकांना याचं फार अप्रूप वाटतं. परवा एका कंडक्टरनं "का आमच्या नोकरीवर गदा आणताय?" असं गमतीनं विचारलं. आणि काल तर, कंडक्टरनं मंडईच्या स्टॉपवर धक्का मारून मला खाली उतरवलं.
रस्त्यावरच्या दिव्यांच्या उजेडात बसून अभ्यास करावसं कधी वाटलं नाही. मुळात कधी अभ्यासच करावासा वाटला नाही. आणि आमच्या गल्लीतला दिवाही इतका नतद्रष्ट होता की मी झोपायचो तिथं डोळ्यांवर प्रखर उजेड पाडून झोप घालवायचा. त्याकाळात कुणी मोठं होण्यापेक्षा भरपूर झोपणं हीच एक मोठी महत्त्वाकांक्षा होती.

पुणे-कोल्हापूर प्रवासात जनरलचं तिकीट असूनही मी फर्स्टक्लासमध्ये जाऊन बसलो होतो. तेव्हातरी टीसी पकडून चालत्या ट्रेनमधून मला सामानासकट ढकलून देईल अशी आशा होती. निमशिरगाव-तमदलग्याच्या त्या (नसलेल्या) प्लॅटफॉर्मवर रात्रभर थंडीत कुडकुडत बसायची सुखस्वप्नं मी पाहात असताना टीसी माझ्याकडं बघून ओळखीचं हसत निघून गेला. मी त्याला तत्परतेनं गाठून "अहो, माझ्याकडं तिकीट नाहीय हो." अशी तक्रार केली. त्यावर, त्यानं माझ्याकडं रोखून बघत, "तो क्या? पास है ना? बैठ जाओ." असं म्हणत मला नाऊमेद केलं. मी लोचटपणाने त्याच्या कोटाच्या बाहीला पकडून "मेरे पास जनरल का तिकीट है. फिरभी मैं इधरकू बैठा है." असं सांगितलं. यावर तो हरामखोर, दयाळू टीसी "बैठ जाओ भाई, वैसे भी पुरा डब्बा खालीच्च है ना?" असं म्हणत पुढच्या डब्यात निघून गेला. माझं महापुरुष होणं हे असं थोडक्यात हुकलं.

(मात्र कोल्हापूरच्या स्टेशनवर मला फर्स्टच्या डब्यातून उतरताना पाहून तिथल्या टीसीनं "XXXX, जनरल के थिकीट पें येसीमें बैटता क्या?" असं म्हणत दोन कानाखाली लगावल्या होत्या.)
अशीच वर्षांमागून वर्षं निघून गेली.
मी प्रसिद्ध पुरुष व्हायचा चिकाटीनं प्रयत्न करत राहिलो. पण एरंडाचं झाड कितीही वाढलं तरी ते वटवृक्ष होत नाही असं काहीसं संस्कृतचे हसबनीससर म्हणायचे- तसं झालं होतं. मी जितके प्रयत्न करेन तितकं माझं महापुरुष होणं दूरदूरच जात होतं. या जन्मी तर आपण महान व्यक्ती बनू शकणार नाही या निराशाजनक विचारांचा मला विळखा पडला होता.
आणि...
आणि मग अचानक सीनियर ब्रह्मेंचा ऑनलाईन जन्म झाला आणि मग त्यांचा मानसपुत्र म्हणून मीही (कु)प्रसिद्ध बनलो.

- ज्युनियर ब्रह्मे

...........

ब्राह्मण समाजाने खासकरून जे कुठल्याही मंदिरात पुजारी आहेत, अशांनी देवस्थानातील पूजा सोडून द्यावी. आपल्या आराध्याची पूजा घरी मनोभावे करावी व देवस्थानाची पूजा समाजावर सोपवावी. 
.
जेव्हा व जिथे समाजातर्फे सन्माननीय पद्धतेने पूजेची जवाबदारी दिली तर मान ठेवून जरूर स्वीकारावी. 
 .

भक्तीचा संबंध फक्त आराध्य आणि भक्त या दोघातील आहे.
.
त्याला विशिष्ट मूर्ती, विशिष्ट देऊळ, यांचा काही संबंध नाही. 
.
देवाचे स्थान भक्ताच्या हृदयात असत.
.
बाकी अंबेची इच्छा तिची ती समर्थ आहे.

- रवी विघ्ने

...........

मधेच येऊन रिप्ले पाहून...अगबाई ss आता पुन्हा कोण आऊट झालं ?... असा प्रश्न विचारणाऱ्या सगळ्या काकुंची आवडती मालिका लागेल तेव्हा लाईट घालव रे ss महाराजा !!

- वैशाली प्रसाद पराडकर जोग

...........

अरे काय ते चिमणे खेळाडू हल्लीचे! नुकतेच भव्य मार्कांनी दहावी नापास होऊन टीममध्ये भरती झाल्यासारखे शाळकरी मुलांसारखे वाटतात. आधीचे खेळाडू कसे यह फेव्हीकॉल का जोड है सारखे मजबूत आणि टिकाऊ असे दणकट असायचे. विव्ह रिचर्ड्स, मॅथ्यू हेडन,क्लाइव्ह लॉयड, जेकस कलीस, केव्हीन पिटर्सन, अक्रम, इम्रान, सायमंड; इतकेच काय तर आपले कपिल, अमरनाथ, शास्त्री हे सुद्धा तसे चांगली शरीरयष्टी असणारे होते.

मी मॅचेस क्वचित बघतो, त्यापेक्षा मला खेळायला जास्त आवडते. मी कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये होतो, पुढे जिथे कामाला होतो त्या काही कंपन्यांच्या टीममध्ये होतो. पण टीममध्ये सिलेक्शन होईल एव्हढी धमक असली तरी नावच दीपक असल्याने पुढे जास्त काही प्रभाव पाडू शकलो नाही. आईवडिलांनी त्याऐवजी माझं नाव सूर्यकांत ठेवलं असतं तर निदान मी चंद्रकांत एव्हढा तरी प्रकाश पाडू शकलो असतो, असो!

तर सांगायचा मुद्दा असा की मी चॅम्पियन्स कपची एकही मॅच पहिली नव्हती. नुकतंच मित्राने whatsapp वर एका भारतीय खेळाडूचा फोटो दाखवला ज्याचं नाव मला माहित नव्हतं. तेव्हा त्याचा चेहरा 'अरे यह pspo नही जानता!!' असा झाला होता.

कर्मधर्मसंयोगाने आजची मॅच काहीवेळ बघायला मिळाली तेव्हा आजकालचे खेळाडू असे दिवसेंदिवस आकुंचन का पावत चालले आहेत असा प्रश्न पडला. मग तो कोहली, केदार, अजिंक्य असू दे की बाबर आणि फखार (यांची नावं आणि चेहरे आजच कळले).

धोनी आणि युवराजची पिढी लवकरच लयाला जाईल. हा पिझ्झा बर्गरचा इफेक्ट की उत्क्रांतिवाद हे कळेनासे झालंय!!

- दीपक पाटील

...........

आज दुपारी कामासाठी बाहेर निघालो. एक टर्न घेऊन उजवीकडे वळायचं होतं. तो टर्न घेत असताना लक्षात आलं की डावीकडे एक इनोव्हा मी जायची वाट बघत त्या टर्नच्या सहा एक फूट अलीकडे शांतपणे थांबली होती, हॉर्न बिर्न न वाजवता. त्यातल्या ड्रायव्हर ने हलकेच स्माईल देत मला "जा" असं खुणावले.

माझ्या लक्षात आलं हे बेणं काही वर्षे अमेरिकेत किंवा युरोप मध्ये राहून नुकतंच भारतात परत आलंय.

मनात आलं, बेट्या फक्त दोन महिने जाऊ दे. सिंहगड रोड वर रस्त्याच्या मधोमध घुसाघुस करत यु टर्न मारताना तू जर दिसला नाहीस अन सिग्नल हिरवा व्हायच्या आधी प्या प्या करून हॉर्न वाजवला नाहीस तर नावाचा राजेश नाही.

बाहेर राहून कितीही शिस्त वगैरे शिकून आलास तरी ती विसरवण्याची ताकद या देशाच्या ट्रॅफिक सिस्टममध्ये आहे, हे लक्षात ठेव. कळलं का तात्या!

- राजेश मंडलिक

...........

नांगरावरचे हात पखवाजावर चालतात, टाळ धरतात, वीणेला पेलतात...
आणि त्याच कुणब्याच्या त्याच हातांनी स्वराज्य निर्माण केलंय

धार्मिक ध्रुवीकरणाला ते हात पुरून उरतील.

धर्मांध नसलेली एकमेव महाप्रचंड गोष्ट कुठली आहे तर तो वारी आणि विठ्ठल.
त्याला हायजॅक केलं की संपलं.

ते बैठक वगैरे मागची लोकं कोण उघड आहे, प्रचार कसा होतो तेही उघड आहे.

पण सगळ्यात महाप्रचंड काय आहे तर वारी.
वारी ला समाज तळागाळापासून ते वरपर्यंत सगळा सगळा आहे, विठ्ठलामागून राम घुसवायचा प्रकार बेकार आहे.

राम तर होताच रे, आमचा राम रामराम मधेय.

लोकहो हे इग्नोर करू नका, महाराष्ट्र कोसळेल...

- आकाश चटके

...........

त्या तलवारी घालून घ्या.. म्यानात.
हातात विठ्ठलाची शांती व सहिष्णूतेचा संदेश देणारी पताका धरा.
हिंदुत्व-बिंदुत्व घरी खुंटीला टांगून या..
बुक्का लावा, गळाभेट घ्या ..
माऊली माऊली चा गजर करा..
सामान्य वारकऱ्यात मिसळून जा, लाखातले एक व्हा..
तुमचं स्वागत असेल.
अतिक्रमण करण्याचा प्रयत्न कराल तर हे तुकोबांना आदर्श मानणारे वारकरी आहेत हे ध्यानात असू द्या..
भले तरी हे गांडीची लंगोटी काढून देणे जाणतात, तसेच नाठाळाच्या माथी काठी देणेही खूब जाणतात !!

- सुहास भुसे

...........

वहाँ सेना सियाचीन मे लढ रहा है और तुम क्रिकेट खेल रहे हो?

असं अजून कोणताच भक्त का नाही म्हणाला?

- सुनील गजाकोश

...........

एक मुलगी। असेल ११ ते १२ वर्षाची। तिची एका इमारतीत वॉचमनचे काम करणारी सावत्र आई व वडील सांगतात, तिला चौदा पूर्ण आहेत म्हणून। सावत्र आईला तिच्या तीन मुली, गो-यापान। चौदा पूर्ण सांगितल्यामुळे तिच्याकडून रोज चार मजली इमारत झाडणे, पुसणे, पार्किंग धुणे, सर्विस वॉशरूम स्वच्छता ही सगळी कामे तिची सावत्र आई करून घेत असे। वडिलांना तर काय मनच नाही। अर्थातच तिची शाळा बंद झालेली। तिच्या लहान सावत्र बहिणींप्रमाने ती शाळेत जात नाही।
इमारतीतिल सुशिक्षित लोकांना ती बालकामगार असल्याबद्दल छेडले असता तिथे खालील उत्तरे ऐकायला मिळाली।

१. कुणीतरी काम केलेच पाहिजे। मग त्यांच्या घरातले कुणीही येवो।
२. तिला इथे काम करू दिले नही ना, तर तिला तिचे आई वडील विकतील।
३. इथे आहे म्हणून सुरक्षित आहे, डोळ्यासमोर।
मुलगी डोळ्यासमोर हवी असणाऱ्यांना जेव्हा विचारले की तुम्हाला मुळीच एवढा कळवळा आहे तर तिच्या शिक्षणाची, जेवणाची, राहण्याची जबाबदारी ती मोठी होईपर्यंत आपन घ्यायची का।
तेव्हा काहीच होकार आला नाही।
तिला कुठेतरी सोडून या, हा एकच तगादा तिची सावत्र आई लावत असे।
मुलींना सुट्टी लागली।
सावत्र आई तीन मुलींना घेऊन महिनाभर गावी गेली।
इमारतीचे सर्व व्यवस्थापन ती सावत्र मुलगी पाहत असे।
ती गावाहून यायच्या आधी काही दिवस वॉचमन त्या मुलीला घेऊन गायब झाला।
ते कुटुंब कालांतराने परतले। त्यात सावत्र मुलगी नव्हती।
कुठे गेली, असे विचारल्यावर हा आमच्या घरचा प्रश्न आहे, असे उत्तर आले।
एके काली त्या मुलीच्या संरक्षणासाठी तिच्याकड़ून काम करून घेणाऱ्या इमारतवासीयांनी त्याबद्दल काहीच जाब विचारला नाही।
आता वॉचमन त्याच्या कुटुंबाबरोबर जास्त काम न करता तिथे राहतो।
दोघेही बाहेर जाऊन काम करतात।
तीन गो-या मुली शाळेत जातात।
घरभाडे नाही, वीजबिल नाही, इमारत कधीतरी झाडली जाते, कचरा लोक आपला आपला घंटा गाडीमधे टाकतात।

पण मारुती कांबळेचे काय झाले, नजीबचे काय झाले, या धर्ती वर प्रश्न पडतो, त्या मुलीचे काय झाले।

अशा कितीतरी नाकोशा, शाळावंचित बालकामगार भारतात असतील।

- शिल्पा दातारप्रतिक्रिया द्या2391 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर