श्रद्धा.. बकवास खानची टकळी.. अहंकाराची तृप्ती
सोमवार , १९ जून, २०१७ मुकेश माचकर

बोधकथा, मुल्ला नसरुद्दीन कथा आणि विनोद यांचा सकाळच्या कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून...

एक गुरू आणि त्यांचे शिष्य जंगलातून चालले होते.

वाटेत एक मोठी नदी आली.

गुरू म्हणाले, माझ्यावर श्रद्धा ठेवा आणि एक्सवायझेड म्हणा. तुम्ही पाण्यातून चालत पलीकडे पोहोचू शकाल.

गुरूंमागोमाग अनेक शिष्य सहजगत्या पलीकडे जाऊन पोहोचले.

एकाने मात्र गटांगळ्या खाल्ल्या. बुडता बुडता त्याला वाचवून पलीकडे नेलं गुरूंनी.

थोडा ताळ्यावर आल्यावर तो गुरूंना म्हणाला, छया, काहीच पॉवर नाहीये तुमच्या मंत्रात. असती तर मी बुडालो नसतो.

गुरू म्हणाले, तुझी माझ्यावर खरोखरच श्रद्धा असती, तर तू एक्सवायझेड एवढंच म्हणून चालत गेला असतास पाण्यावरून, आम्ही आलो तिथे पाण्याखाली दडलेल्या दगडी पुलावरून. तुझा माझ्यावर विश्वास नव्हता म्हणून तू एक्सवायझेड असं एकदाच म्हणून माझ्यामागे न येता एक्सवायझेड, एक्सवायझेड असा जप करत राहिलास आणि ती जागा चुकलास. श्रद्धा डळमळली 
म्हणूनच तुझे पायही डळमळले गाढवा.

.................................

बकवास खान एकदा मुल्ला नसरुद्दीनकडे काहीतरी सल्ला मागायला आला. सल्ला मागायला आलेले लोक बऱ्याचदा स्वत:च काहीतरी सांगून जातात आणि वर मोलाचा सल्ला दिल्याबद्दल आभारही मानतात, असा मुल्लाला अनुभव होताच. पण, बकवास खान सगळ्याच्या पुढे होता. तो आल्यापासून अखंड बोलतच होता, तासभर बोलल्यानंतर तो म्हणाला, मी शेजारच्या गावातल्या एका मुल्ला फकरुद्दीनकडेही गेलो होतो, याच विषयासंदर्भात मार्गदर्शन घ्यायला. तिथे फकरुद्दीन तुमच्याबद्दलही काही बोलत होते...

खोटं, साफ खोटं, मुल्ला कडाडला.

बकवास खान म्हणाला, अहो, पण ते काय बोलले हे मी सांगितलं कुठे तुम्हाला?

पण, ते बोलले ते खोटं आहे असं मी म्हटलोच कुठे, मुल्लाने प्रतिप्रश्न केला, ते काही बोलू शकले असतील, त्यांना तू काही बोलू दिलं असशील, हेच मला साफ खोटं वाटतं...

..................................

अहंकाराच्या तृप्तीसाठी लोक वेगवेगळे मार्ग अवलंबतात…

एखादा वित्तेषणेने प्रेरित माणूस उदाहरणार्थ एक मोटार घेतो, तशा मोटारी अनेकांकडे आल्या, तर त्यांच्यापेक्षा भारी मोटार घेतो… त्याने त्याच्या अहंकाराची तृप्ती होते…

मोटार घेण्यासाठी त्याला काही कामधंदा, काही व्यापारउदीम, किमान चोऱ्यामाऱ्या का होईना कराव्या लागतात, म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारची मेहनत करावी लागते…

दुसरा मार्ग असतो फुकट-फकिरीचा…

त्यात माणूस अनवाणी चालू लागतो…

रस्त्यातल्या काट्याकुट्यांचा थोडा त्रास होतो सुरुवातीला, पण नंतर चामडी निबर होते…

तो अनवाणी चालतो आहे, म्हणजेच तो काही महान पदाला पोहोचला आहे, असं मानून भारीतली भारी मोटारवाला माणूसही त्याच्या पायाबिया पडतो… आपली मोटार त्याच्या दिमतीला देतो, कधी सेवेला लावतो…

याला बरं वाटतं…

त्याने घेतली असेल लाखो रुपयांची मोटार, पण, शेवटी माझ्याच पाया पडतोय, मी न कमावता ती माझ्या उपयोगाला येतेय, म्हणजे मी मोठा…

जंगली जनावरंही हजारो वर्षं अनवाणी चालत आलेली आहेत, त्यात जशी त्यांची काही थोरवी नसते, तसंच नुसतं अनवाणी चालून, शरीर कष्टविल्यानेही कोणा माणसाचंही आत्मिक पातळीवर काही उन्नयन झाल्याचं ऐकिवात नाही…

- ओशोच्या ईशावास्य उपनिषदांवरील प्रवचनांवर आधारित

..........................................प्रतिक्रिया द्या2141 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर