शेकूच्या बायकोच्या आठवणींना उजाळा
शनिवार, १७ जून, २०१७ संपत मोरे

'बनगरवाडी'त बैलासोबत औत ओढणा-या शेकूच्या बायकोसारखे काम मनीषा खरातने केले आहे. वडील परमुलुखी असताना स्वत: कुळव चालवून शेती करणा-या मनीषाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

व्यंकटेश माडगूळकर यांच्या बनगरवाडी कादंबरीतील बैलाबरोबर औत ओढणारी शेकूची बायको मराठी वाचकांच्या मनामध्ये घर करून राहिली आहे. तिची आठवण करून दिली आहे ती माणदेशातल्याच गटेवाडीच्या मनीषा खरात या तरुणीने. सोशल मीडियावर वायरल झालेल्या तिच्या फोटोमुळे सध्या तिच्या कर्तृत्वाची सगळीकडं चर्चा सुरू आहे.

माणदेशी माणूस प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाच्या छायेत वावरलेला इथला माणूस लढत राहतो; त्याचं लढणं हे निसर्गाच्या अवकृपेमुळ त्याच्यात येतं. माणदेशी माणसाचं झुंजारपण, त्याची जगण्याची लढाई आणि वेगळेपण आजवर कौतुकाचा  विषय बनलं आहे. व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा-कादंब-यांमधून अशी अनेक माणसं मराठी साहित्यात अजरामर झाली आहेत. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे माणदेशी मुलुखातील एका मुलीची बातमी सध्या सोशल मीडियावर फिरते आहे.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गटेवडी नावाच्या एका खेड्यातील भीमराव खरात हे मेंढ्या घेऊन त्यांच्या बायकोसह परमुलुखात गेले आहेत. त्यांचे आईवडील आणि त्यांची मुलं गावात रहातात. मनीषा खरात ही सगळ्यात मोठी मुलगी. ती बारावीत शिकते. शिकत असतानाच ती आजी-आजोबांना आणि लहान भावंडांना सांभाळते. फार कष्टाळू मुलगी आहे. हीच मुलगी सध्या चर्चेत आहे.

झालं असं. माण तालुक्यात चांगला पाऊस पडला. या पावसानंतर लोकांनी मशागती सुरू केल्या. मनीषाला वाटलं आपणही वडिलांच्या शेताची मशागत करावी. कारण मेंढ्या घेऊन वडील परत यायला उशीर होईल. मग तिने नातेवाईकांकडून बैलजोडी व औत आणले आणि स्वतः कुळवणी सुरू केली. अर्थात तिला याअगोदर औत चालवायचं शिक्षण मिळालं आहे. पण यावर्षी ती पहिल्यांदाच स्वतः औत चालवत आहे. ती रानात कुळवत असताना रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाटसरूने तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यांनतर काही स्थानिक पत्रकार तिला भेटले. पत्रकारांना त्या मुलीचं कुळव चालवणं विशेष वाटत होतं, पण त्या मुलीला त्यात काही विशेष वाटत नव्हतं. ती सहजपणे बोलत कुळव चालवत होती. कुळव चालवल्यामुळं बातमीचा विषय बनलेली  माणदेशी कन्या मनीषा  वृत्तपत्रांमधूनही झळकली. या फोटोच्या निमित्तानं मनीषाचे वेगळेपण समोर येत असतानाच मेंढ्या घेऊन परमुलुखात जाणाऱ्या पालकांच्या मुलांचे काही प्रश्न समोर आले आहेत. रस्त्यावरून कार चालवणा-या मुली सर्रास दिसतात. पण कुळव चालवणारी मुलगी अपवादानेच दिसते. वडील परत येण्याची वाट पहात न बसता स्वतः उन्हातान्हात रानात उतरलेली मनीषा खरंच ग्रेट आहे. तिच्या जिद्दीच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.प्रतिक्रिया द्या2020 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
बाळासाहेब गलांडे - रविवार, २५ जून, २०१७
आधुनिक काळातील रणरागिणी मनीषा खरात आपल्या बापाला शेती कामात मदत करून जगापुढे एक आदर्श कन्या। म्हणून नावलौकिक मिळवला
Ashok Devkate - बुधवार, २१ जून, २०१७
आपल्या बापाची अडचण समजुन घेणारी मुलगी
Sadashiv - रविवार, १८ जून, २०१७
Khupch chhan
Sateesh Nirgudkar - रविवार, १८ जून, २०१७
Good

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर