राष्ट्रनेताच वाटतो उद्धारकर्ता
शनिवार, १७ जून, २०१७ अशोक वाजपेयी

जागतिकीकरण व्यवस्थेने अधिक विषमता निर्माण केल्यामुळे मूल्याधारित राजकारण संपल्यात जमा आहे. व्यक्तिपूजक वृत्तीमुळे जनतेस राष्ट्रनेताच आपला उद्धारकर्ता वाटू लागला आहे.

विसाव्या शतकातील पोलिश कविता दीर्घकाळ भयाच्या सावटात खडतर जीवन जगत राहिली. तो काळ तिच्यासाठी आणीबाणीचा नि दहशतीचाच होता म्हणायचा. महायुद्धाच्या भीषण विद् ध्वंसानंतर ती दोन प्रकारच्या हुकूमशाहीत रगडून निघाली. या सर्वांतून जे दबाव नि तणाव, अतिरेक आणि अत्याचार निर्माण झाले त्यांच्या परिणांमपुढे हतप्रभ कवितेस आपलं अस्तित्व टिकवणं कठीण होऊन गेलं. विशेषतः विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आपली ओळख आणि वैशिष्ट्य जपत या कवितेने स्वतःचे असे काव्यशास्त्र निर्माण केले. यात मात्र वैयक्तीक आणि सामाजिक, नैतिक आणि राजनैतिक यामधील अंतर संपुष्टात आले. या काळात कवितेने ज्या सत्याचा आग्रह धरला होता त्यात वैयक्तिक सत्याशिवाय त्या काळाचं नि समाजाचं वास्तवही भरलेलं नि भारलेलं होतं. भारतीय दृष्टीकोनातून बोलायचं झालं तर हे कवितेतलं 'सत्याग्रह युग'च होतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य रक्षणासाठी कवींनी कित्येक प्रकारचे धोके सहन करत सत्यास अभय दिलं. कधी त्याच्याशी प्रतारणा नाही केली की त्याचा आपलाप नाही होऊन दिला. एकप्रकारानी हे दुःसाहसच म्हणायचं. शोकांतिका, हताशा, निराशा, आत्मसंघर्ष, आत्मलोचना वा स्वटीका, मानवीय संबंधांत निर्माण झालेल्या अनेक प्रकारच्या द-या इत्यादी कवितेची वैशिष्ट्ये बनून गेली होती.

पोलिश कवितेच्या या सत्याग्रह युगात रिषर्द क्रिनीत्स्कीचं असणं, त्याची उपस्थिती आणि क्रियाशील असणं एक शांत संकोची घटना होती. शांत क्रांती होती ती! ही कविता जन्मली मात्र एका राजकीय घटनेची प्रतिक्रिया म्हणून. तिचं येणं मोठं नाटकीय, चकित करणारं होतं. क्रिनीत्स्कींचा जन्म सन १९४३चा. दुस-या महायुद्ध काळात ऑस्ट्रियातील सांक्त वेलंटीनच्या नाझी श्रमछावणीत झाला. तिथे त्यांच्या आई-वडिलांना तत्कालीन युक्रेनमधील कोजाब नामक छोट्या शहरातून वेठबिगार मजूर म्हणून आणण्यात आले होते. रिषर्द क्रिनीत्स्की यांना १९६८च्या पिढीचा कवी म्हणून ओळखलं जातं. आपल्याकडील इतिहासानुसार ते साठोत्तरी कवी होते. सन १९६८-७०च्या दरम्यान ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्याची प्रतिक्रिया देत त्यांच्या कवीचा जन्म झाला. तो काळ प्रसिद्धीपूर्व नियंत्रणाचा (सेन्सॉरशिप) होता. क्रिनीत्स्कीच्या पहिल्या कवितासंग्रहास याची झळ पोहोचली होती. बर्थ सर्टिफिकेट या त्यांच्या संग्रहातील कवितांत परिनिरीक्षण मंडळांनी अनेक फेरपार केले होते. गंमत म्हणजे कविता संग्रहाचं नाव धारण करणारी बर्थ सर्टिफिकेट ही कविताच संग्रहातून काढून टाकण्यात आली होती.

क्रिनीत्स्कीवर ही कोपदृष्टी अनेक वर्षे होती. काही काळ तर त्यांच्या कविता प्रकाशनास बंदी असल्यासारखीच स्थिती होती. राजसत्ताविरोधी त्यांच्या पवित्र्यामुळे त्यांना अनेक नोक-यांवर पाणी सोडवं लागलं. पासपोर्ट न दिला गेल्याने ते पोलंड सोडून परदेशी जाऊ नाही शकले. विदेशी अभ्यासवृत्ती, पुरस्कार मिळून ते स्वीकारू शकले नाही. तसं पाहिलं तर रुढ अर्थानी राजकीय कवी, नव्हते. पण त्यांच्या भाषेवरील प्रभुत्वामुळे ते जे लिहित ते जहाल, परिणामकारकच ठरायचं. साम्यवादी सत्तेसाठी क्रिनीत्स्कींची भाषा नवीच म्हणायची. ती सत्ताधा-यांच्या अनेक अन्याय, अत्याचारांनी भरलेली असल्याने राजकीय वाटायची. हळूहळू सवयीने हा कवी अत्यल्प शब्दांत व्यापक आशय व्यक्त करू लागल्याने तर त्याच्या काव्याला एका कसदार शिल्पाचं रूप येत गेलं. आपली कविता अधिक सटीक, सार्थक होत  रहावी म्हणून तो आपल्या जुन्या कविता नव्या शब्दकळेसह पेश करत राहिला.

 त्याचा आवाज शांत, धीर- गंभीर, सहज परंतु खोल होता. त्याच्या कवितेत अवांतर, पाल्हाळीकास वाव नसायचा. अल्पाक्षरी तरी परिपूर्ण अगदी गागर में सागर म्हणा ना. बाष्कळ बडबडीच्या काळात त्याच्या कवितेचा हा आवाज एकदम उठून दिसायचा नि प्रभावी ठरायचा. तो अपेक्षा उंचवायचा पण तत्पूर्वी मौन व्हायचा!

खालील ओळींवरून ते तुम्हांला कळेल....

दिव्यावर झडप घालणा-या किड्या

मी तुला काहीच मदत नाही करू शकत

फक्त मी दिवा विझवू शकतो.

तशीच ही दुसरी कविता पहा....

अस्वस्थते झोप.

स्वप्नं नको पाहूस

जर तू काहीच करू शकत नसशील

तर किमान डोळे उघडे ठेवून झोपू शकशील ना?

हे स्पष्टच आहे की रिषर्द क्रिनीत्स्कीची कविता वाचकांना झोपेतून जागी तर करतेच पण पुढे सतत जागी ठेवते. सध्या आपण अशा काळात आहोत की जगभर माणसाला झोपवणा-या शक्ती सक्रीय आहेत. अशावेळी कविताही आत्मिक विरोध करणारीच हवी, अगदी जीवाच्या आकांतानी विरोध करणारी!

हुकूमशाही राजवटीत वास्तव, सत्यापेक्षा दृष्टीवरच लक्ष ठेवलं जातं. क्रिनीत्स्कीची कविता मात्र एकाग्र, एकटक लक्ष्यावर नजर ठेवून असते. ती मार्मिक अभिव्यक्तीने आपले इप्सित साध्य करीत असते.

जेंव्हा दरवाढीचा कायदा केला जाता होता.

तेंव्हा लोकसभेत खासदारांनी मैत्रीचा हात पुढे केला

आणि समाजवादी रमणा मिळवला

सेना, वृत्तपत्रे, तुरुंग

सर्व स्वैच्छिक लाभार्थी

आणि मिलीशियातील राखीव कुरण

ते निर्दयतेने कार्यरत होते.

कितीतरी वेळा हे लक्षात आलेली गोष्ट आहे की जेव्हा केव्हा संधिसाधूपणा नि खुशमस्करीचा कळस गाठला जातो, तेंव्हा कविताच अत्यंत निर्दय होऊन या सर्वांबद्दल किळस व्यक्त करत असते. ही निर्दयता तीव्र असली तरी ती स्वतः आखून घेतलेली लक्ष्मणरेषा मात्र कधीच ओलांडत नाही.

 क्रिनीत्स्कीच्या कवितेत विनम्रतेचा अर्क नैतिक असल्यानेच तो राजकीय बनून जातो.

मला हक्क आहे की नाही माहिती नाही

बोलण्याचा, मौन धारण करण्याचा,

जखमांना स्पर्श करण्याचा,

तुम्ही प्रार्थना करा...

निःशब्द!

तो आदिम सर्वकाही जाणून आहे.

क्रिनीत्स्कीनी एका ठिकाणी सहज लिहून ठेवलंय की, 'मी जरी कविता लिहिल्या असल्या तरी कविता काय असते ते मला नाही माहीत. कविता कुणाचा जीव वाचवू शकते यावर माझा विश्वास नाही. पण कविता अशा असतात की त्या हातातून निसटून जाणा-या क्षणांना अर्थ देऊ शकतात. हीच मुळी मोठी गोष्ट आहे. दृष्यांना चपखल शब्दबद्ध करणा-या जपानी हायकूशी माझ्या कवितेचं काही नातं असावं असं वाटतं. तिनं हायकूचं शिल्प, रूप, आत्मसात केलंय. परंतु खरं सांगायचं झालं तर माझीच जुनी कविता नवं रुपडं घेऊन अवतरलीय.' क्रिनीत्स्कीच्या काही कवितांचा अनुवाद वाणी प्रकाशन, नवी दिल्ली यांच्यातर्फे 'रेत के कण कण में' शीर्षकांने नुकताच प्रकाशित झालाय.

 

0000000000000000

क्रुद्ध जग

हे वास्तवं कोणीच नाकारू शकणार नाही की, सध्या जग कधी नव्हे इतक्या रागात आहे. असंतोषाच्या ज्वालामुखीवर बसल्यासारखी जगाची स्थिती आहे. यापूर्वी जे स्थायी, चिरकालीन मानण्यात येत होतं. त्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड सुरू आहे. आज जगात सर्वत्र घडत असलेली हिंसा यापूर्वी कधीही झालेली नाही. अनेक उदार मूल्ये जी आजवर अपराजेय मानली गेली होती, अमर मानली गेली होती, त्याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. शिवाय ती पायदळीही तुडविली जात आहेत. ज्या तत्त्व नि घटकांना आजवर क्रूर, अनुदार, व्यक्ती व मानवविरोधी मानलं जात होतं अशा शक्ती भारतासह अन्य अनेक देशांत सत्तारुढ होताना दिसतात. त्यांच्या सत्तेव्यतिरीक्त हिंसा व हत्यांच्या संदर्भात स्पर्धा करणा-या इस्लामिक स्टेटसारख्या प्रतिहिंसात्मक शक्ती सक्रिय आहेत. या शक्ती सर्वसामान्यांचं जीवन उद्धध्वस्त व अशाश्वत बनवत आहेत. मूल्यांच्या राजकारणापेक्षा व्यक्तीपूजक राजकारणाचे साम्राज्य सर्वत्र पसरत आहे. सत्तारुंढांना 'उद्धारक नेता' मानलं जात आहे.

या क्रोधाची व्याख्या नि वर्णन करणारं पंकज मिश्र यांचे 'एज ऑफ अँगर' हे पुस्तक पेंग्विन प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केले आहे. या पुस्तकावर एक चर्चासत्र नुकतच दिल्लीत संपन्न झालं. त्या चर्चासत्रात आशिष नंदी, पीटर डिसुझा, जोया हसन, नीरजा जयाल आणि अनन्या वाजपेयी यांनी भाग घेतला होता. सर्वांनी या महत्त्वाकांक्षी पुस्तकात पंकज मिश्र यांनी जो विस्तृत पट मांडला त्यांची तोंडभरून स्तुती केली आहे. या पुस्तकात त्यांनी स्पष्ट केले आहे की, आज सर्वत्र दिसणारी हिंसा, असहिष्णुता नि अनुदारता ही आधुनिक युरोपच्या प्रारंभीच्या काळातील राजकारण व बौद्धिक चिंतनाचे अपत्य होय. काहींच्या मते पंकज मिश्र हे युरोपीय आधुनिकतेस जबाबदार मानून तिला अपयशी समजतात. पण, ते हे विसरतात की लोकशाही, सामाजिक न्याय, समानता या संकल्पना आधुनिकतेतूनच जन्माला आल्या. आज या गोष्टी आपणास नाकारता येणार नाहीत की समानतेची समर्थक असूनही आधुनिकतेतून अनेक प्रकारच्या विषमता निर्माण झाल्या. इतकेच नव्हे तर त्यांना खतपाणीही घालण्यात आलं. तथाकथित समाजवादी व्यवस्था, जागतिकीकरण, इत्यादींमुळे विषमतेचे साम्राज्य दूरवर पसरले व ते ठळकही झाले. आशिष नंदींनी म्हटल्याप्रमाणे सर्वाधिक नरसंहार हा धर्मनिरपेक्ष मानल्या गेलेल्या राजकीय व्यवस्थेत झाला.

ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, उदार आणि कल्याणकारी मानली गेलेली व्यवस्था इतकी टुकार कशी झाली की अनुदारता नि हिंसेमध्ये कस्पटाप्रमाणे वाहून गेली. आज लोक विचारांनी नाही तर भावनांनी प्रभावित होतात. भावनांवर ते स्वार होतातत असं म्हणणं आधिक संयुक्तिक होईल. अंतिमतः क्रोध विचार नसून ती एक भावनाच आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. या रागास एखादा सकारात्मक विचार का नियंत्रित करू शकत नाही, हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. रागास घृणा व अविश्वास प्रोत्साहित करत आहेत. तसे पाहिले तर उदारमतवादी दृष्टीकोन हा गेल्या दोन तीन शतकात प्रबळ झाला. पण त्याची प्राणशक्ती इतकी कमजोर निघावी याचं आश्चर्य वाटतं. ते काहीही असलं तरी 'एज ऑफ अँगर' हे एक निश्चितच विचारोत्तेजक पुस्तक आहे, यात तीळमात्रही शंका नाही.

(अनुवाद – डॉ. सुनीलकुमार लवटे)

(लेखक अशोक वाजपेयी हे हिंदीतील ज्येष्ठ कवी आणि विचारवंत आहेत आणि अनुवादक डॉ. सुनीलकुमार लवटे हे मराठीतील ख्यातनाम साहित्यिक आणि अनुवादक आहेत.)प्रतिक्रिया द्या4283 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर