फेबुगिरी
शनिवार, १७ जून, २०१७ टीम बिगुल

ताज्या घडामोडींबाबत किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्यक्त होणा-यांची संख्या मोठी आहे. यातल्या काही निवडक खास पोस्ट्स ‘बिगुल’च्या वाचकांसाठी...

माझ्यात एकच गोष्ट वाईट आहे रे .... अशी कुणी सुरवात केली की ओळखावे, तो आता स्वत:चा कोणतातरी महान गुण सांगणार आहे.

- संजय भास्कर जोशी

...........

एखाद्या माणसाचं आयुष्यभराचं काम एका वाक्यात निकालात काढणं सोप्पं आहे. मनात आलेली गोष्ट उधळून मोकळं तर व्हायचं असतं. त्यात सिनेमा तर असं माध्यमय की, कुणीही व्यक्तिसापेक्ष आवडीवर कुणालाही निकालात काढू शकतं. पण स्वतःला संवेदनशील समजणाऱ्या माणसांनी असं ट्रोलिंग करणं खरचं दुर्दैवी आहे. ते ही एका अशा माणसाविषयी, ज्यानं माणूसपणाच्या गोष्टी सांगण्यासाठी अविरतपणे आपल्या हातातलं माध्यम वापरलं आहे. तांत्रिक बाबी, सिनेमाची मांडणी याबाबत सिनेसमीक्षा नक्कीच होऊ शकते. ती होणं सिनेमासाठीही पोषक आहे. पण तो दिग्दर्शक जिलेब्या पाडतो आणि तत्सम भाषेत टवाळक्या करताना आपण त्याचं काम किती गांभीर्यानं पाहिलं आहे, हा प्रश्न तरी स्वतःला विचारायला हवा. गजेंद्र अहिरेंनी सिनेमात बेंबीखाली कपडे घातलेल्या पोरी नाचवल्या की सिनेमाच्या नावावर लोकांना उधळलं? माणसाच्या संवेदनशीलतेला प्रश्न करणारी कथानकं आणि ते पडद्यावर उभं करण्यासाठी पैसे गुंतवणाऱ्यांना लुबाडलं जाऊ नये, याची दक्षता घेत कमी बजेटमध्ये सिनेमा साकारण्याचा प्रयत्न करणं , यासाठीची गजेंद्रची अविरत धडपड मराठी सिनेसृष्टीनं पाहिलीय.
अनुमतीमध्ये एक म्हातारा स्वतःच्या ब्रेन हॅमरेज झालेल्या बायकोला वाचवण्यासाठी उंबरे झिजवतो. आयुष्यभराची सोबतीण एका क्षणात सोडून जाईल, या धास्तीनं झुंजणारा हा नायक नीट पाहिलाय का तुम्ही? स्वप्नांची पुरचुंडी घेऊन अख्खं आयुष्य मन मारत जगणारा मध्यमवर्गीय पुरुष आणि आहे त्यात भागवून भविष्याकडं डोळे लावून बसलेली बाई, अशी साधीसुधी माणसं. त्यांचं आयुष्य अहिरेंना पडद्यावर आणावं वाटतं. या संवेदनशीलतेची टवाळी करताना आपल्या संवेदनशीलतेचे स्तर तपासून पहायला हवेत. आजही बलात्काराचे विषय चघळताना बाईला पीडित-बीडित दाखवून तिला लाजिरवाणं करण्याचा समाजाचा पुरेपूर प्रयत्न दिसतो. पण आपल्या पहिल्याच 'नॉट ओन्ली मिसेस राऊत'पसनं आत्ताच्या 'सायलन्स'पर्यंत गजेंद्रची नायिका असल्या संकटांना निव्वळ धीरानं तोंडच देत नाही, तर सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत नव्यानं उभं रहायचं बळ देते. हळवी प्रामाणिक माणसं, त्यांचे प्रश्न, त्यांचा संघर्ष सिनेमाच्या मिर्च-मसाला संस्कृतीत घेऊन येणं आणि त्यात टिकावं धरणं याचं कौतुक व्हायला हवं की टवाळी?
सिनेमाला निव्वळ पैसा कमावण्याचं माध्यम म्हणूनच पहायचं असतं, तर उथळं रसिकांच्या आवडी जोपासून गल्लेभरु सिनेमे काढणं कदाचित गजेंद्रलाही जमलं असतं. पण आपल्याला प्रामाणिकपणे काही सांगायचं आहे, हा त्याच्या सिनेमाचा पाया आहे. जो कधीच ढळलेला नाही. त्याच्या सिनेमाची संख्या आणि त्याची घाई याबाबतही बोलणाऱ्यांनीही विचार करुन पहायला हवा की, तीन तासांचा सिनेमा करण्यासाठी खरंच तीन-चार वर्षांची गरज असते का? गोष्टी जुळवून आणणं आणि काम वेळेत पूर्ण करणं, हे खरंतर त्याचं कौशल्य ठरायला हवं. अर्थात हे करत असताना मांडणीवर परिणाम होत असेल, तर त्याबाबत नक्कीच विचार व्हायला हवा. पण एक माणूस अवघ्या ४५ वयात चाळीसेक सिनेमे करतो. त्या सिनेमांची कथा त्याचीच असते. याचा अर्थ त्याच्या कल्पनाशक्तीचा आवाका किती मोठा आहे, हे विचारात घ्यायला नको का?
गेल्या काही वर्षात नवं सुचत नाही म्हणून मराठीच काय, पण बॉलिवूडमध्येही बायोपीकचा भडीमार होतोय. नवी कथानकं सापडत नाहीत, अशी रड कित्येक जण करताना दिसतात. अशात असा एखादा माणूस मराठी सिनेमात असणं, ही मराठी सिनेमासाठी कौतुकाचीच बाब असायला नको का? असो. याही पलीकडं समीक्षेमुळं कलेच्या आकलनात आणि काही अंशी निर्मिती प्रक्रियेच्या सुधारणेलाही मदत होते. पण त्यासाठी समोरच्या माणसाचं काम नीट समजून घेऊन न पटलेले मुद्दे नेटकेपणानं मांडले जायला हवेत.
- योजना यादव
...........
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला सारख्या रचनेतून या माणसानं आपल्याला संस्कृती, परंपरा आणि संस्कार यांचं दर्शन एकाच तिठ्यावरून करून दिलं आणि जन्म वेचीत गुंफीत

आलो आदि बिंदुतून तुला जन्माची त्या शैया संगतीस माझे मन असे म्हणत काळाच्या विशाल पडद्यावरचं माणसाचं खुजेपण ठसठशीतपणे आपल्यासमोर मांडलं पण माणसाच्या मनाचा योग्य सन्मान करायलाही ते विसरले नाहीत. काळाच्या बदलाची अचूक चाहूल घेणारे समाजाबरोबर चालणारे ते कवी होते त्यामुळे रसिकांना त्यांच्याकडे कधी मान वर करून बघावं लागलं नाही. साधे सोपे पण नादमय असे त्यांचे शब्द होते-
तू झेंडूची फुले ओवीत होतीस 
ओवता ओवता सगळा धागाच केशरी होत गेला 
तुझ्या माझ्या संबंधा बद्दल 
मला एवढेच सांगायचे आहे' 
अशी एकीकडे मुग्ध दुसरीकडे स्पष्टवक्ती अशी त्यांची कविता होती.
पावसात एका छत्रीत अनोळखी अशा 'दोघांनी ' चालण्याचा प्रसंग त्यांच्या कवितेतून अनुभवताना त्यातून निर्माण होणारा ,हेलकावे खाणारा नात्यांचा ओला पदर हा या पावसाळयात आपल्या मनात सतत फडफडत राहील .
हा असा पाऊस पडत असताना तुमच्यासारख्या अनोळखी तरुणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावंस वाटलं…. याचं बरं वाटलं..!!
ह्या अशा पावसाच्या वेळी कुणीतरी बरोबर हवंच…!
छत्री तशी छोटीच आहे, पण घेईल सामावून दोघांना..
समजूतीने चाललो तर…!
पुढं पाणी बरंच साचलेलं आहे, रस्ता चाचपीतच पावलं टाकायला हवीत.
शक्य असेल तर माझ्या हाताचा…
अं…खांद्याचा आधार घ्या,
म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर नीट चालत रहाल… न पडता.
शिवाय तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही मला दूरही ठेवू शकाल.
मी तुमच्याकडे न पाहताच चाललो आहे खरा…
पण मला कुठूनतरी केवड्याचा वास येतो आहे.
अं.. तुमचं नांव ‘केतकी’च आहे, असं मी धरून चाललो आहे.
तुमच्या बोटांतली अंगठी कळत्येय माझ्या खांद्याला;
लक्ष कसं सारखं तिथेच घोटाळतंय…
अरे..!
तुमच्या पोहचण्याचं ठिकाण तर मागेच गेलं.. तुम्ही बोलल्या कशा नाहीत?
अं…माझं काय..?!
अमुक एका ठिकाणी पोहचण्याचा उद्देश नव्हताच माझा.
पावसाचा जोर एकदम वाढलाय म्हणून तुमच्या हाताची पकड घट्ट झाल्यासारखी वाटत्येय.
पण घाबरू नका.. पुढचा रस्ता चांगला आहे!
एक पाहिलंत का?
तुम्ही अगदी नीट चालल्या आहात… माझ्याबरोबर..!
त्यामुळे….छत्री किती मोठी झाल्यासारखी वाटत्येय… नाही का..?!!
इतकी चित्रमय शैलीतली कविता लिहिण्यासाठी पाऊसाळे नीट पाहावे लागतात हे ठीक पण पावसाळ्यातच जन्माला यावं लागतं की काय ? कविवर्य शंकर वैद्य यांची ८८वी जयंती (जन्म १५ जून,१९२९) प्रणाम !

- उल्हास (केशव) साठ्ये

............

हिटलर -
मुंबईतल्या मेट्रो थिएटरजवळ मशिदी बाजूच्या फूटपाथवर २५-३० वर्षांपूर्वी एक मोची असायचा। तो हिटलरचा भयानक मोठा फॅन होता। इतका की त्याने स्वतःच्या मिशीची ठेवणदेखील हिटलर कट ठेवली होती। आसपासच्या परिसरातले सगळे त्याला 'हिटलर' म्हणूनच ओळखायचे। तो स्वतःचे नाव देखील हिटलर असेच सांगायचा। पाठीमागे सध्याचे नाना नानी पार्क आहे। त्या काळात हे गार्डन म्हणजे 'अंट्या'चा म्हणजे अफूचा अड्डा असायचा। एक रुपयात अंगठयावर अर्धे नख भरेल इतकी अफू दिली जायची आणि अफीमबाज लोक ती अफू चोखत बागेत दिवसरात्र पडलेले असायचे। बरं या 'हिटलर'चे दुसऱ्या महायुद्धबद्दल ज्ञान अफाट होते। अगदी डंकर्कच्या चढाई पासून हिरोशिमा नागासाकीबद्दल खडानखडा माहिती त्याला होती। यार लोक कधी त्या परिसरात गेले की आवर्जून देशी 'हिटलरला' भेटायचे। त्याने त्याच्या खोपटावर हिटलरचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावला होता। सतत म्हणायचा ,'इस इंडियाको सुधारना है तो इस कंट्री मे भी कोई तो हिटलर पैदा होना मांगता है। सब इंडियन्स साले आलसी है। मोफत की रोटी खाने को मांगते है।' 
आज सहजच मेट्रो थिएटर जवळून चालत असताना 'हिटलर'ची आठवण आली, आसपास विचारले तर इतर जुन्या लोकांनी सांगितले की 'हिटलर' पंधरा वर्षांपूर्वीच वारला आणि त्याच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्या खऱ्या हिटलरच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोबरोबर त्याचे दफन केले गेले।

आजचा दिवसच अस्वस्थ करणारा आहे... दुपारी 'हिटलर' गेल्याची बातमी मिळाली तर आता कैफे मोंडेगारचा पारशी अंकल 'रुसी' गेल्याची। रुसी अंकल १९८४ पासूनचा यार लोकांचा मित्र होता। यार लोक कधीही एकटे बियर पिताना दिसले की हमखास टेबलवर येऊन पाणी पीत यार लोकांना कंपनी द्यायचे। यार लोक मोंडेगार मध्ये बसून अनेक जाहिरातींचे कॉपी रायटिंग, नाटकांची टिपणे, पुस्तके वाचन करायचे। यार लोकांना रुसी अंकल 'तुम साला बोंबे का मवाली है।' असे पारशी टोनमध्ये बोलायचे कारण यार लोक वेगवेगळ्या मैत्रिणींना मोंडेगारमध्ये बियर प्यायला न्यायचे। तरीही रुसी अंकलचे यार लोकांवर खूप प्रेम होते। 'तुम लोग साला कूच भी नही करता है। मै देख १९६६ में मेरा वाईफको बोंबेसे इस्तंबूल तक मेरा 'डुकर फियाट' मे लेके गया था। 'क्या बात करता है अंकल?' असे म्हटल्यावर तो सगळे रस्ते तंतोतंत सांगायचा। त्याच्या देवळालीच्या बंगल्यावर पार्टी करायला रुसी अंकल सतत बोलवायचा, पण ती पार्टी कधी झालीच नाही। यार लोकांच्या लग्नानंतर आणि कन्येचा जन्मानंतर एकदा मोंडेगारला सहकुटुंब बसलो असताना रुसी अंकल टेबलावर आला आणि कन्येला कडेवर घेऊन बायकोला बोलला , 'ये एकदम डेंजर आदमी है। टेरेको किधर मिला? अभी मिला है तो संभालके राखना नाही तो ये 'मवाली' कभीभी, कूच भी कर सकता है।' :)

- महेश पवार

...........

J1 झालं का? खरंच हा प्रश्न एवढा इंटरेस्टिंग आहे का? संभाषणाची सुरुवातच अशी रटाळ करणारा माणूस कसा काय संवाद साधू शकेल आणि कसलं फ्लर्टिंग करेल?

हा जो feel good factor किंवा love to be loved हे पुरुषांएवढंच बायकांनाही आवडतं की... पण अशासाठी ज्याच्याबरोबर संवाद साधायचा त्याच्या निदान काही आवडी तरी जुळणं किंवा दोघांची वैचारिक पातळी सारखी असणं ही किमानपक्षी अपेक्षा असते ....

फक्त पुरुषांना कुठे थांबायचं याचं भान अनेकदा रहात नाही तर महिला या बाबतीत बर्‍याच सतर्क असतात .....

पण एकदा का हे सुरुवातीचे अडथळे दोघांनी पार केले की मस्त निर्भेळ मैत्री होते आणि अनेकदा harmless flirting देखील होतं जे खरंच धम्माल असतं ....

- नयना पिकळे

...........

राजस्थानच्या १० वी आणि १२ वी च्या पुस्तकात लावण्यात आलेल्या काही नवीन शेंड्या .
१. ब्रिटिशांचे राज्य अधिकाधिक काळ टिकावे यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्नशील होते. 
२. मांसाहार मनुष्य शरीरास घातक असतो. 
३. स्वदेशीचा उल्लेख करताना पतंजलीचे उदाहरण आहे. 
४. विमुद्रीकरणातून (नोटबंदी) काळा पैसा आपोआप नष्ट होतो. भारत सरकारने ८ नोव्हें २०१६ ला असा निर्णय घेतला.

- अविनाश पवार

...........

....एकमेव जवळच्या मैत्रिणीशी बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर...

ती- अगं, याची काकी आलीय. बरं नाहीय बरच तिला. सगळंच करायला लागतय तिचं. काहीच सुख मिळालं नाही गं आयुष्यात. निदान आजारपण तरी निघू दे नीट.

मी- म्हणजे? अगदी अॉन द वे आहे का? एम टेक?( मरायला टेकलेली)

ती- काही कळत नाही गं. चायना आयटम झालीय अगदी. चारपाच वर्षंही काढेल नैतर दोन तीन दिवसांतही जाईल...

यानंतर हसण्याच्या धबधब्यात पुढचं बोलणं वाहून गेलं.

(मैत्रिणीने दिवंगत सासूचं मोठं आजारपण काढलय. सासरे नंतर वर्षभरात गेले. तिचे वडील किडनीच्या आजाराने ग्रस्त, तिच्या घरीच मुक्कामाला असतात. आता आजारी काकी सासू आलीय.)

तिचा अख्खा दिवस शुश्रुषेतच जातो पण दुर्मुखल्या तोंडाने रडगाणं न गाता त्यातल्या त्यात हसण्याचं कारण आणि निमित्त शोधण्याचा गुण घेण्यासारखा आहे...!!

- प्राजक्ता गांधी

...........

स्वत: फारसे दिवे न लावता 
अंधारात मठ्ठ काळ्या बैलासारखे बसून 
दुस-यांना 
सुमार समजणाऱ्यांची गर्दी 
दिसामासाने 
बेसुमार वाढत चालली आहे
ही 'सुमारांच्या सद्दी'पेक्षाही 
अधिक चिंतनीय बाब आहे!

- सतीश तांबे

...........

मठ्ठ डोक्याच्या सामान्य -
(पक्षी: बुकी, राजकारणी, जाहिरातदार, खेळाडू किंवा आयसीसीची टोपली घेऊन क्रिकेटचा माल विकायला बसलेले - याखेरीज इतर सर्व) 
- लोकांना हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत हे कधी कळणार?

गेला आठवडाभर टीव्हीला, स्क्रीनला डोळे चिकटवून बसलेल्या अनेको लोकांना ''असं डेडिकेशन आपण आपल्या ख-या प्रॉब्लेम्ससाठी कधीही दाखवत नाही'' याची खंतही वाटत नाही.

तुला क्रिकेट आवडत नाही का? किंवा का आवडत नाही?

याचं मी नुकतंच उत्तर दिलं ते असं.. 
- क्रिकेट हा व्यवसाय (धंदा) आहे. ज्या दिवशी आयसीसी nse वर लिस्टिंग करेल, आणि त्यांच्या प्रॉफिटमधला वाटा मला मिळू लागेल त्या दिवशी धंदा म्हणून (खेळ म्हणून कधीही नाही) मला क्रिकेट नक्की आवडेल. बात खतम्!

- योगिनी नेने

...........

दररोज नजरभेटीला सोकावलेले डोळे शाळेच्या पहील्या दिवशी दोन महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर मैदानात जमलेल्या जमावात तिला कावरंबावरं होऊन शोधत असतात. शेवटचा पेपर दिल्यानंतर आपण वायव झाल्यासारखं उधळत घराकडे पळत सुटतो, पण त्या आधी छातीशी पॅड धरून मैत्रिणींच्या घोळक्यातून चाललेल्या तिला मनसोक्त पाहिल्याशिवाय राहवत नाही, आपण पुढचे दोन महिने पुरेल इतकं रेकॉर्डिंग करून ठेवतो. हंगामातली शेवटची नजरभेट झाल्याशिवाय पाय निघता निघत नाही.

पुढचे दोन महीने लवकर उठणे नाही, शाळा नाही, मास्तर नाही, अभ्यास नाही आणि मारसुद्धा नाही.

साला मज्जाच मज्जा नुसती. मनात आनंदाची नुसती उधाणलेली भरती.

मामाच्या गावाला जायचं, शिवारभर उधळायचं, मनसोक्त पोहायचं, वाट्टेल ते खायचं, झाडं झुडपं येंगायची, आबं-जांबळं तोडायची, पण ती कुठेच सोबत नसणार या नुसत्या विचारानेच आभाळाला गवसणी घालायला गेलेलं मन क्षणांत ताळ्यावर येतं. मनाला तिच्या जवळ सोडून आपलं शरीर मार्गस्थ होतं. उन्हाळभर आजुबाजुच्या मुलींत आपण तिलाच शोधत असतो.

शेवटी ती मिळतच नाही, आपण हतबल होतो. मग वेध लागतात शाळेचे. शाळेतल्या तिचे. सुट्टी उगीचच रटाळ वाटत राहते. संपता संपत नाही.

मैदानातल्या जमावात तिला शोधत डोळे भिरभिरत असतात. अचानक खांद्यावर ओळखीच्या हाताचा स्पर्श होतो. दोस्तच असतो आपला.
"साल्या ती बघ तिथे उभीय, मोरेच्या बाजूला"
ती आधीपासूनच आपल्याकडे बघत असते. नजरेला नजर मिळते तशी ती लाजून नजर चोरते. गालावर रुळलेली बट, खांद्यावरून घसरलेली ओढणी सावरते.

दोन महिन्यात तिच्या शरीराला आलेली गोलाई, डोळ्यांचा वाढलेला नितळपणा, लाल होत असलेले गाल, चकचकीत तेजस्वी झालेली कांती, कमरेला आलेला बाक, त्याच्या ही खालपर्यंत आलेले आणि वा-याबरोबर भुरभुरणारे रेशमी केस आपल्याला अचंबित करून सोडतात.

खरं तर ती वर्षभर रोजच वाढत असते. आणखी तरुण होत असते. फक्त रोज रोजच्या बघण्यामुळे आपल्या लक्षात येत नाही.

तिचं वाढणं, तरुण होणं, बहरणं मोहरणं आपल्या लक्षात यावं, त्याची दखल घेऊन आपण आणखी घायाळ व्हावं, नव्याने तिच्या प्रेमात पडावं म्हणुनही असेल उन्हाळ्याची सुट्टी....नाहीतर आंबे खायला दोन महिने कशाला हवेत बे. शनिवार रविवारची सुट्टी पुष्कळय की त्यासाठी....!

- सागर जाधव

...........

कुत्र्याबद्दल ब-यापैकी लोकं भित्री असतात. त्यामुळं कुत्रा त्यास्नी चावतोय. कुत्र्यापुढं शानपन किंवा फुकटमध्ये रुबाब केला तर ते त्याला ब-यापैकी वळकून गुरगुरून था-यावर आणतो. कुत्रं ब-यापैकी बॉडी लँग्वेज रीड करून अॅनेलिसीस करून मगच चावतं. ब-याच वेळेला थेट चावतो. अशावेळी तो कॉन्फिडन्ट असतो की पुढंचं शंभर टक्के भित्रं हाय. ते त्याला कळतं.

कुत्र्यांचे प्रकारपण असू शकतात. त्यात आक्रमक, भुंकतो तो चावत नही, पाव टाकल्यावर शेपूट हलविणारे ई.

कुत्र्यांपुढं वागायला कायकाय प्रोटोकॉल असतात. काहीकाहींना वाटतं की आपल्याला कुत्रंपण इचारत नही अशी लोकं मुद्दाम दगड मारत्यात. तसं नसतंय करायचं. जर गप्प पडलं असलं तर सोडून द्यायचं आणि चालतं व्हायचं.

जर एखाद्या मित्राच्या किंवा कुणाच्याही घरी गेलं कुत्र्याला फेस करायचं झालं तर पहिला हाय तिथं थांबावं. कॉमन नावं असत्यात कुत्र्यांची मोत्या, टॉम्या वगैरे.

पण कुत्र्यांना ई आणि ऊ स्वर प्रिय असतो. मोत्याला मोत्या म्हणून हाक मारली तर तो चिडतो. पण मोतु, मोती म्हणटल्यास शांत येऊन दोनदा शेपूट हालवलं कि वळकायचं न्युट्रल झालंय. मोती मोती, मोतु बाळा चातोस काय रे असं सबागती बोलावं तो येतो चाटतो वास घेतो गप्प बसतो शेवटपर्यंत निरीक्षण करतो.

मोत्या, कोल्या, भाल्या असा उच्चार केला तर त्याला आपले दात दिसतात. दात हे एक प्रकारचे हाडूक असते, हाडूक कुत्र्यास प्रिय असते त्यामुळे ते चावते. मोती, मोतु पिल्लु सोनु ह्यात तोंड चुंबनाकार होऊन हाडूक प्रमाणापेक्षा कमी दिसते असंही कारण असत.

कुत्रं हे शान आणि आगाव बाळ असतं त्याला समजून घ्यावं लागतं. जीवनभर मरेपर्यंत कुत्र्यात मॅचुरीटी न येता बालीश राहतात. त्यांचा द्वेष न करता. माया करावी. म्हणजे चावत नाहीत. 

- श्रेणिक नरदे

...........

जगातील ९९.९९% महिलांच्या नावातील शेवटचे अक्षर A किंवा I असते असा दावा केला जातो . 
ही नावे बघा ---

सगळी नावे स्त्रियांची आहेत, 'आ'कारान्त किंवा 'ई'कारान्त नसलेली.

किरण, शिरीष, कनक, कमल, कोमल, गुलाब, विमल, शीतल, मीनल, हेतल, पर्ण, हिरल, धनू, रेणू, पारुल, सरू,  शरयू, जयू, मनू, अनू, अॅलेक्सिस, मेरिलिन  केट, कॅथरिन, शिरीन, ज्यूलियट, मुमताज, पायल, अॅन, रूथ, ग्रेस, इझाबेल, सरोज, पूनम, झेलम, सतलज, पर्ल, अँजेलिन, जेन, जेनिफर, निलोफर, रेचल, तेत्सुको, गेल, रोझ, वेणू, माणिक, एलिझाबेथ, जेनेट, जास्मिन, रॉबिन, एंजल, सेजल, सोनल, कांचन, तेजल, कुशल, काजल, बकुल, सुहास, मार्गारेट, एरियल, इव्हलिन, मेहबूबे, रपुंझेल, जोसेफाइन, व्हिक्टॉयर, फ्लर, गॅब्रियल, यास्मिन, मॅक्सिन.

या सर्व नावांत काय साम्य आहे?

- नंदिनी देशमुख

...........

#वाऱ्यावरची_वरात #GST
GST म्हणजे नेमकं काय आणि तो कसा चुकता करायचा याबदल जबरदस्त संभ्रम असला तरी GST चुकवायचा कसा याबाबत अखंड हिंदुस्थानात सगळा अभ्यास झालेला हे कालच आम्हांस कळून चुकले आहे. एका व्यापारी मित्रासोबत त्याच्या CA कडे गेलो असता, "GST बद्दल अजून सरकारलाच काय *** माहीत नाही तर आम्हाला काय फुल्या फुल्या फुल्या माहीत असणार? अशी सुरवात सदरहू CA कडून होऊन GST चुकवायचा कसा यावरच बरीच चर्चा झाली. मला माझा देश प्रचंड आवडण्यामागचे हे एक कारण आहे, दांभिक माणसांसाठी भूतलावरची सर्वाधिक योग्य जागा म्हणेज भारत होय आणि मी योग्य ठिकाणी जन्मास आलोय यावरचा आमचा विश्वास दृढ झाला. यानिमित्ताने मला सदू आणि दादू आठवत असून जुनी एक पोस्ट आठवत आहे, ती खालील प्रमाणे.

"भाऊ GST म्हणजे रे क्काय?"
"रे, तो एक प्रकारचा टॅक्स आहे"
"टॅक्स म्हणजे रे काय भाऊ?"
"रे, जो आपण भरतो त्यास टॅक्स असे म्हणतात"
"पण मग आपल्याला उरतो त्यास काय रे म्हणतात भाऊ?"
"श्ये बुवा, तू तर फरच प्रश्न विचारतोस, रे तो एक प्रकारचा गुड्स अँड सर्विस टॅक्स आहे"
"हं हं, म्हणजे म्हणजे चांगली सेवा देणारा टॅक्स का रे भाऊ?"
"रे नव्हे, चांगलं नि टॅक्स यात जमीन अस्मानाचा फरक असतो, रे, ती एक पारदर्शक करप्रणाली आहे"
"पारदर्शक...पारदर्शक म्हणजे काय रे भाऊ?"
"अरे पारदर्शक म्हणजे म्हणजे ट्रान्सपरंट, सगळं क्लीयर, स्वच्छ"
"हं म्हणजे आपले अण्णा हजारे का रे भाऊ?
"रे नव्हे, ट्रान्सपरंट म्हणजे भ्रष्टाचारमुक्त, सोयीची वाटणारी आभासी व्यवस्था"
"हं.. हं.. म्हणजे आपले मोदीसरकार का रे भाऊ?"
"रे नव्हे, आता काय बरे करावे, मी तर बूच कळ्यात च पडलो आहे, अरे GST म्हणजे एकच टॅक्स जो भरला कि दुसरे टॅक्स भरावे लागत नाहीत"
"हं.. हं म्हणजे लाच का रे भाऊ?"
"रे नव्हे, आता काय करावे बरे, मी तर तुझ्यापुढे करच जोडले बुवा"

- सुहास नाडगौडा

...........

कुणी आजारीय का?
रक्त हवंय का?
योग्य तो रक्तगट मिळत नाहीये?
मानसिक आधार हवाय?
घाबरून, गोंधळून जाऊ नका. फक्त एक फोन करा. 'अक्षर मानव'चे कार्यकर्ते हवं तिथं, हवं तेव्हा रक्तदाता उपलब्ध करून देतात. रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना आधार, मानसिक बळ देण्याचं कामदेखील करतात.
माणसांच्या मदतीला उभं राहण्याचा व समाज शांत, सुखी करण्याचा 'अक्षर मानव'चा नवखा उपक्रम, धावपळ पथक!
आपणही यात सहभागी होऊ शकता. 
आपली काही मिनिटं माणसांना उभं करायला कामी येऊ शकतात.

संपर्क -
सुहेल - ९७६६१५८७६५
अनिकेत - ९४०४६२९८८३

- अनुराधा मेहता

...........प्रतिक्रिया द्या2830 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर