भिक्खू आणि ओझं.. मुल्लाची दुखापत.. योगींचं अज्ञान
शनिवार, १७ जून, २०१७ मुकेश माचकर

बोधकथा, मुल्ला नसरुद्दीन कथा आणि विनोद यांचा सकाळच्या कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून...

ते दोन तरुण भिक्खू निबीड अरण्यातून वाट चालत होते. वाटेत एका ठिकाणी नदी जवळपास खांद्यापर्यंत वाहणाऱ्या पाण्यातून त्यांना नदी ओलांडायची होती.

तिथे पाण्यात पाय घालणार तोच एक तरुण, उफाड्याची युवती तिथे आली आणि हात जोडून म्हणाली, महाराज, मला पोहता येत नाही. नदीत उतरायची भीती वाटते. कृपा करून तुम्ही मला नदीच्या पलीकडे पोहोचवाल का?

पहिला भिक्खू मना करणार, इतक्यात दुसऱ्या भिक्खूने तिला उचलून पाठुंगळी घेतलं आणि पाण्यात पाय टाकला. दुसराही मागोमाग गेलाच. त्या अर्धवस्त्रांकित युवतीचे सगळे कपडे पाण्याने भिजले होते, तिच्या लावण्याकडे, तिचं शरीर आपल्या मित्राच्या शरीरावर कुठे कुठे घट्ट चिकटलं आहे, त्याकडे न पाहण्याची पराकाष्ठा करत तो भिक्खू कसाबसा पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचला.

तिथे पोहोचताच दुसऱ्या भिक्खूने तिला जमिनीवर ठेवलं आणि तो आपली वाट चालू लागला.

संध्याकाळी मुक्कामी पोहोचल्यावर पहिला दुसऱ्याला म्हणाला, मित्र साधका, आपण कडक ब्रह्मचर्यव्रताचं पालन करणारे संन्यासी आहोत. आपल्याला परस्त्रीकडे पाहायलाही मनाई आहे. तिचा स्पर्श तर दूरच. असं असताना तू त्या स्त्रीला उचलून घेतलंस, नदीपार करवलंस, हा अधर्म नव्हे काय?

दुसरा भिक्खू म्हणाला, मी ते ओझं सकाळीच किनाऱ्यावर सोडून आलो. तू ते अजून का वागवतो आहेस?

...................................

डॉक्टर डॉक्टर, जरा यांना तपासता का?

मुल्ला नसरुद्दीन डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरला. मागोमाग दोन हमाल शिरले. त्यांनी एकापाठोपाठ एक वस्तू आणायला सुरुवात केली. त्यात एक खुर्ची, एक टेबल, काही वह्या-पुस्तकं, काही भांडी, ताटवाटीपेले, बॅगा यांचा समावेश होता.

मुल्ला म्हणाला, माझी स्कूटर, मोटार, लोकल आणि बस यांना मात्र मी घेऊन येऊ शकलो नाही. त्यांना तुम्हाला बाहेर येऊनच तपासायला लागेल.

डॉक्टर म्हणाले, अहो, हा काय प्रकार आहे? या सगळ्यांना का तपासायचं?

मुल्ला म्हणाला, अहो, यातल्या प्रत्येक वस्तूला हात लावला की माझी बोटं दुखतात. काय प्रॉब्लेम झालाय या सगळ्या वस्तूंचा काही कळत नाहीये. त्यांना तुम्ही तपासल्यावर कळेलच म्हणा मला.

डॉक्टर म्हणाले, अहो, पण, या सगळ्या वस्तूंना हात लावल्यावर तो दुखत असेल, तर तुमच्या हाताला दुखापत झाल्याची शक्यता जास्त नाही का? तो तपासून पाहायला हवा. या सगळ्या वस्तू तपासून काय होणार?

मुल्ला म्हणाला, असं आहे होय. आमच्या दारावरून मघाशी कशामुळे तरी भावना दुखावलेल्यांचा मोर्चा गेला… तो पाहून माझी जरा वेगळी कल्पना झाली. ठीकाय मग हातच तपासा.

…………………………………………

उत्तर प्रदेशाचे प्रसिद्धीच्या झोतात असलेले पदवीधर मुख्यमंत्रीआज असं म्हणाल्याचं मी वाचलं की : “अकबर, औरंगजेब आणि बाबर हे आक्रमक होते. हे सत्य आपण जेवढ्या लवकर स्वीकारू तेवढ्या लवकर देशातील सगळे प्रश्न संपुष्टात येतील.”

माझा असा अंदाज आहे की ते शाळेत इतिहासाच्या तासाला झोपा काढत होते. म्हणूनच त्यांच्यासाठी आणि त्यांच्या हिंदुत्व ब्रिगेडसाठी हा इतिहासाचा धडा.

या तिघांमधला बाबर एकटाच फौजा घेऊन भारत पादाक्रांत करण्यासाठी आला होता. पण, त्याने महान हिंदू साम्राज्याचा पराभव केला नाही. का? कारण, कारण हिंदुस्थानचं महान हिंदू साम्राज्य अस्तित्त्वात नव्हतं. त्याने एक मुस्लिमाचा, इब्राहिम लोधीचा पानिपतच्या युद्धात पराभव केला.

अकबर हा त्याचा नातू. तो कुठून बाहेरून स्वारी करायला आला नव्हता. तो भारतातच जन्माला आला होता. उमेरकोटच्या राजपूत किल्ल्यात. तिथे त्याचे आईवडील आश्रयाला गेले होते. आमेरचा राजपूत हिंदू राजा भारमल याच्या मुलीशी त्याचं लग्न झालं होतं. त्याने आपल्या बायकोला धर्मांतर करायला लावलं नाही. तो होली आणि ईद आणि सगळेच भारतीय उत्सव साजरे करायचा. त्याच्या हिंदू पत्नीपासून झालेला मुलगा जहाँगीर हा त्याचा वारस आणि पुढचा सम्राट बनला. त्यानेही एका हिंदू राजकन्येशी विवाह केला. या दोघांचा अर्धा राजपूत आणि अर्धा हिंदू मुलगाच पुढचा सम्राट शाहजहान बनला.

औरंगजेब हा अस्सल भारतीय होता, असं म्हणता येईल. अतिशय कडवा, निर्दय, धर्मांधतेच्या पातळीवर पोहोचलेला कट्टर धार्मिक... आजच्या कट्टर हिंदुत्ववाद्यांशी तुलना करता येईल असा. तरीही त्याने जमाव गोळा करून कोणाला विनाचौकशी ठार मारल्याची इतिहासात नोंद नाही. त्यामुळे त्याला कमअस्सल भारतीय मानायलाही थोडा वाव आहे.

मुघल राजे हे आपल्याप्रमाणेच भारतीय होते. ते बाहेरून आलेले आक्रमक नव्हते. ते भारताचे सम्राट होते, लुटारू नव्हते. आजच्या अनिवासी भारतीय मुलांपेक्षा तर ते नक्कीच अधिक भारतीय होते.

बाहेरून आलेले मोठे आक्रमक होते आर्य. देशातल्या सगळ्या समस्यांना आर्यांना जबाबदार धरायचं, असं द्रविडांनी ठरवलं तर?

तेव्हा, आदित्यनाथ महोदय, आपलं अज्ञान आपल्यापाशी ठेवा. इतिहास तरी शिका किंवा तोंड बंद तरी ठेवायला शिका.

- संजीव भट

.......................................................प्रतिक्रिया द्या1446 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर