'बार्बी'च्या डोळ्यातून वाहणारं रक्त
शुक्रवार, १६ जून, २०१७ समीर गायकवाड

समाजात एकीकडे मुलींना कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स दिलं जात असताना, दुसरीकडे समवयीन मुलींना अवयव फुगीर करणारी औषधं दिली जात आहेत. एका नव्या समस्येवर टाकलेला हा प्रकाश.. 

कुणाच्या दुनियेत कोणती दुःखे असतात याचा अंदाज लावणं कठीण असतं.

श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेशमार्गे पश्चिम बंगाल आणि तिथून आपल्या देशातील सर्व मेट्रो शहरातल्या वेश्यावस्तीत एक नवं खूळ आलं, वाऱ्याच्या वेगानं पसरलं आणि अनेकांचे कान टवकारले गेले.
आता मेट्रो शहरातून छोट्या शहरातही याची 'कीर्ती' पसरली आहे.

म्हटलं तर याला कायद्याच्या चौकटीत अडकवणं कठीण आहे आणि मनात आणले तर यासाठी जेलची हवा पक्की होऊ शकते. पण मूळ दुखणंच इतके गुंतागुंतीचं आणि जुनं होऊन गेलंय की त्याला आता जळवा लागू लागल्या आहेत..

या नव्या प्रॉब्लेमचे नाव आहे, ऑरेडेक्सोन.

ही एक गोळी आहे, यात डेक्सामिथेसोन नावाचे स्टिरॉईड ड्रग आहे. मनुष्यासाठी त्याची पाच मिलीग्रामची गोळी येते. ती अनेक (ब्रान्डनेम्सनी) नावांनी आपल्या देशात उपलब्ध आहे. यात व्हेटर्नरीचे (पशुंसाठीचे) डोसेस चाळीस ते शंभर मिलीग्राम पॅकचे आहेत.

मरतुकडी जनावरे फुगीर दिसावीत, त्यांचे आचळ फुगून यावे म्हणून अनेक अडाणी शेतकरी हे औषध त्यांच्या अशक्त/ मरणासन्न/ विक्रीस काढलेल्या गायीम्हशींना खाऊ घालतात. वास्तवात हा त्या गोळ्यांचा उपयोग नसून साइडइफेक्ट आहे. पण आपल्याकडे इफेक्टपेक्षा साइड इफेक्ट लवकर लोकप्रिय होतात त्याला ऑरेडेक्सोन कसे अपवाद राहील? असो.

या गोळ्या मुलतः त्वचाविकार, अॅलर्जी आणि ग्रंथी असंतुलित होण्यावर वापरल्या जातात पण याचे वर दिलेले साइडइफेक्ट आहेत. यात ग्रंथी असलेले मांसल भाग सुजतात. श्रीलंकेतल्या एका सायकोथेरपिस्टने या गोळ्या एका मुलीला खाऊ घातल्या आणि अनाहूतपणे त्यातून एक नवा शोध 'चमडीबजार'च्या हाती आला. बघता बघता याचे लोण पूर्ण दक्षिण आशियायी देशात पसरले आहे.

आधीच प्रॉस्टीट्युशनचे वय घटत जाऊन ते बालवयावर आलेले आहे. ज्या वयात भातुकलीचा खेळ मांडायचा, बाहुलीशी खेळायचं, टेडीबिअरला दोस्त बनवायचं त्या वयात यांना निमूटपणे कुस्करलं जातं. आणि त्यात आता हा नवा फंडा आला आहे. या गोळ्या कुठल्याही पशुऔषधी दुकानात मिळतात. मायक्रोग्राम, सायप्रोडेक्स, डेक्साम इत्यादीा नानाविध ब्रांडनेम्सने त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत.

जनावरांसाठीच्या गोळ्या या अल्पवयीन, अज्ञानी अल्पशिक्षित मुलींना टॉनिकच्या गोंडस नावाखाली हातावर ठेवल्या जातात. गोळ्या खाल्ल्या नाहीत तर त्यांची उपासमार केली जाते. वेळप्रसंगी मारहाण देखील होते. या गोळ्या नेमक्या कशासाठी दिल्या जाताहेत आहेत हे त्या मुलींना सांगितले जात नाही.

पोरीने आठवडाभर जरी रोज एक गोळी खाल्ली तरी ती सात आठ वर्षाची असली तरी तिचे अवयव उभारून येतात, (खरे तर ही सूज असते), तिच्या ठराविक अंगावर गोलाई येते, तिचा चेहरा देखील सुजल्यासारखा वाटू लागतो आणि त्यातला बालिशपणा जाऊन एक रासवटपणा चेहऱ्यावर येतो. 
जेणेकरून तिला रात्रभर उसंतच मिळू नये.

तिचं अंथरून रक्ताने माखले तरी हा खेळ चालू राहतो!!!!!

पोरीला आपल्याला काय होतेय हे कळतच नाही कारण या गोळीमुळे स्नायू ताठरून जातात आणि तिचं अंग ठणकणं, मांड्या भरून येणं, ओटीपोट ताणलं जाणं यातले काहीच जाणवत नाही (खरं तर हाही एक साइड इफेक्टच आहे), त्यामुळे तिला तक्रारीस जागा राहत नाही....

असं काही महिने, वर्षं चालतं...

पुढे जाऊन एक वेळ अशी येते की ती मुलीला त्या गोळीचं व्यसन लागतं. गोळी खाल्ली नाही तर तिला बेचैन वाटू लागतं! मग ती स्वतः होऊन गोळी मागू लागते. या गोळ्या मुलींना खाऊ घालण्याचे प्रयोग जिथे आधी सुरू झाले त्याला आता आठ नऊ वर्षे झालीत. आता खरा आणि मोठा साइडइफेक्ट समोर येतोय.

आठ वर्षांची असताना पश्चिम मिदनापूरच्या झरीनने (नाव बदललेले आहे) या गोळ्या पहिल्यांदा खाल्ल्या. नंतर किती वेळा आणि किती खाल्ल्या हे तिला नेमकं आठवत नाही. पण आता ती अधू झालीय! तिचे गुडघे पूर्ण ठिसूळ होऊन त्याचा भुगा झालाय. साठीत होणारा ऑस्टिओपोरॅसिस तिला चौदाव्या वर्षी झालाय...

आता तर तिच्याकडे 'गिऱ्हाईकं'ही येत नाहीत, कारण तिचा देह म्हणजे निव्वळ अस्थींचा सापळा झालाय!

हे संकट मोठं आहे, तितकेच पुढे येणारे हातही पुष्कळ आहेत ही चांगली गोष्ट आहे. या गोळ्यांचं सेवन किती हानिकारक आहे हे यात गुंतलेल्या अड्डेवाल्या आंटीच्या गळ्यात उतरवणं जिकीरीचे काम आहे पण अशक्य नाही.

आपली यंत्रणा फार हुशार आहे ती कायद्यावर बोट ठेवते. हे अन्न आणि औषध विभागाचं काम आहे की पोलिसांचं यावर आधी कीस पाडला जातो. मग दोषी नेमकं कोण ठरवायचं हा प्रॉब्लेम मुद्दाम समोर आणला जातो.

गुन्हा नेमका कोणता आणि कोणावर नोंदवायचा यातच इतकी चालढकल केली जाते की न्याय नको पण डोकेदुखी आवर अशी परिस्थिती येते. चुकून गुन्हानिश्चिती झालीच तर मग गुन्हा कुठल्या ठाण्याच्या एरियात घडला याच्या सीमा ठरवल्या जातात. तोवर एनजीओवाल्याचा कंड जिरलेला असतो..

गोळ्या आणणारा औषध दुकानात चिठ्ठी दाखवून गोळ्या घेऊन येतो, त्याचा वापर जनावराऐवजी चिमुरडया पोरींवर केला जातो तोदेखील त्यांच्या तथाकथित रखवाल्यांकडून! मुली आधी नकळत खातात आणि नंतर त्यासाठी व्याकुळ होतात. गोळ्या आणणारा, विकणारा हे कायद्याच्या कात्रीत अडकत नाहीत. तीच बाब खाऊ घालणाऱ्या व्यक्तीसाठी लागू होते. गुन्हेगार निश्चिती होणे महाकठीण होऊन बसते.

कायदा, पोलिस, केसेस याचे वर्तुळ पूर्ण कधी होईल याचा कुणालाच थांगपत्ता नाही त्यामुळे मुलींचं आणि तिथल्या आंटीचंच कौन्सिलिंग करणं हा एकच पर्याय उरतो. सुदैवाने त्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. मात्र तोवर ज्यांच्या आयुष्याचं अक्षरशः भुस्कट पडतं त्यांचं काय?

आपण आपल्या चिमुरडया मुलींना बोर्नव्हिटा देतो, कॅल्शियम देतो आणि त्याचवेळी याच जगाच्या एका अंधारलेल्या कोपऱ्यात त्यांच्या समवयीन मुलींना कुणीएक व्यक्ती नव्हे तर आपल्याच समाजाचा एक हिस्सा विष पाजत असतो!!

रेडलाईट एरियात आता नवी दुःखे आहेत आणि त्यांचे चेहरेही आगळे आहेत. तिथल्या ‘बार्बी’ला 'पिरीयड' येत नाही पण तिच्या डोळ्यातून 'रक्त' येतं, जे व्यवस्थेला कधी दिसत नाही...

(लेखाला जोडलेला फोटो प्रातिनिधिक आहे.)प्रतिक्रिया द्या4654 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
राजेंद्र शिखरे - शनिवार, १७ जून, २०१७
असे बरेच काही आपल्या आजूबाजूस सतत घडते आहे. भयानक. फार लपून नाही संबंधितांपासून. पण घाई आहे ज्यालात्याला लवकर जगून निकामी व्हायची. निकामी रहायची. मी 'लोकमत'मधून लिहिले होते, काही वर्षांपूर्वी आणि वर्षभर. .. किमान लिहिले पाहिजे. लोक वाचतात. चवीने. गप्प किती दिवस बसतील? आपण गप्प नाही रहायचे. लक्षात आणुन देत रहायचे. विकृत मरणापेक्षा सरळ जगणे सोपे आहे. 🤞🏻
Nitin wankhede - शनिवार, १७ जून, २०१७
वाचून..खुप मोठा धक्का बसला समाजात हे जे सगळे चालू आहे ना मानसाला जनावर सारखे वागवाने हे बंद झाले पाहिजे..
Prof. Nandkmar Kakirde - शनिवार, १७ जून, २०१७
For the first time I really feel ashamed of fellowmen for doing this act. It is not only shocking bt disgesting . All ot efforts mst be made on the governmental level to stop this menace at once. Thanks for this well researched article. The athor has done a remarkable job. Regards to him
सुशील केकान - शनिवार, १७ जून, २०१७
शोधनिबंध लिहिल्याबद्दल समीर भाऊंचे अभिनंदन..!

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर