कल… आज... कल…
शुक्रवार, १६ जून, २०१७ सुषमा शितोळे

तरुण असताना अनेक चौकटी मोडल्या पण तरीही आपला आपल्यावर विश्वास होता. मग आता तरुण पिढीलाही स्वत:वर विश्वास बाळगण्याचा हक्क आहे. त्याबद्दल शंका का?

आज पुण्यात एसपी कॉलेजात गेलेले. जरा वेळ पाण्याच्या हौदाशेजारील झाडाखाली बसून कॉलेज न्याहळत बसलेले.

समोर अपरिचीत तरुणाई. १७ -१८ वर्षांनी लहान. कॉलेज सोडून मला इतकी वर्षं झाली. कॉलेजच्या इमारतीत फारसा काहीच बदल नाही. तीच आहे. भव्य आणि ऐतिहासिक वास्तू...१९१६ सालची. थोड्या वेळानं कँटीनमध्ये गेले. तिथं काही वेळ बसले. कॉफीचे घुटके घेत. जोशीली तरुणाई न्याहाळत. कँण्टीनही फारसं बदललं नव्हतंच. तसंच होतं, तिथले बाक अजूनही जुने कळकळीत..मला तेव्हाही वाटायचे, की जरा छान रिनोव्हेशन करायला हवं या लोकांनी, पण नाही.. हं भिंतीवरील जाहिरातींचे पोस्टर्स तेवढे नवीन होते, म्हणजे बर्गर..कोको.. मिरिंडा... इइ. म्हणजे आमच्यावेळी वडापाव, चहा, सामोसा एवढंच असायचं... आणि मुलामुलींमध्ये कमालीचा मनमोकळेपणा दिसत होता. हे तर आमच्या वेळपेक्षा खुप्पच. हातात हात...बसताना थोडं अंतर ठेवावं असं काही नाही. अगदी लागूनच. थोडाही कॉन्शसनेस नाही..निर्लज्जपणाच म्हणायला हवा खरं तर.. गप्पा...बहुदा टाईमपासच असावा त्यात.. टेबलवर थम्सअप. कुरकुरे. चीप्स. काहीजण सेल्फी, फोटो काढण्यात दंग.. काही आपल्याच धुंदीत मोबाईलवर चॅटिंग करण्यात व्यस्त...काहींची दांडगाई.. हसीमजाक.. मस्ती...

आणि माझ्या मनातले विचार -  आमच्या वेळी खरंच किती छान होतं.. यांचं हे जरा अतीच होतंय नाही का.... अभ्यास सोडून नेमकं चाललंय तरी काय यांचं...अभ्यास तरी करत असतील का ही मुलं.. की चॅटिंग नि सेल्फीच फक्त...किती हा बिनधास्तपणा...कपडे तर कायय..तरी इथं बरंय...तिकडं फर्ग्युसन, सिम्बायोसिसला तर काय विचारायलाच नको...नेमकी येतात तरी कशासाठी ही मुलं कॉलेजला...? कॉलेजबाहेरच काय हवी ती मजा करायची नं..इथलं पवित्र वातावरण का खराब करतात ही मुलं... ? अशीकशी...ही तरुणाई...?

.........आणि माझा मुलगा आत्ता दहा वर्षांचा आहे...हे रब्बा..त्याच्या तरुणपणी पुढच्या काळात आणखी कायकाय मला पहावं लागणार आहे...!!!!

...आणि अचानक मी स्वत:ला हटकलं, अरे अरे..अररेरे...चाललंय चाललंय काय नेमकं माझ्या मनात....? मी हा काय विचार करत बसलेय ? आणि कधीपासून...ओये..छान आहे की हे सगळं चित्र. परिवर्तन हा जगाचा नियमच आहे. तो तर होणारच.

कॉलेजचं पहिलं वर्ष संपताच भले मोठे लांब केस कापून बॉबकट करणारी मी. चष्मा बाजूला करून लेन्स वापरायला सुरवात केलेली मी. घरी न सांगता आहे त्या पैशात काटकसर करून परस्पर जीन्स विकत घेऊन त्यात कम्फरटेबल फिल करणारी मी. परस्पर स्विमिंग कॉश्युम विकत घेऊन स्वीमिंग शिकायला जाणारी मी. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत टिळक रोडवर मुलांइतकंच बेभान होऊन मैत्रिणींसोबत नाचणारी मी. ३१ डिसेंबरला हॉस्टेलमेट्‌ससोबत संपूर्ण रात्र बाहेर घालवणारी मी...आणि "हे बघ, कॉलेजमध्ये मुलांशी मैत्री करायची काही गरज नाही, आपल्या समाजात कोणाला कळलं तर बदनामी व्हायला वेळ लागणार नाही.." असं घरून सतत बजावूनही मुलांशी मैत्री करणारी मी...रात्री उशिरापर्यंत नाटकाच्या तालमीसाठी जाणारी व येताना मित्राच्या टू व्हीलरवर घरी येणारी मी. लेक्चर्सला दांडी मारून कट्ट्यावर रमणारी मी आणि या इथंच प्रेमात पडणारी मी....हाहाहा...माझीच विविध तरुण रुपं माझ्या डोळ्यासमोर येत गेली...त्यावेळचे आईबाबा नि समाजाच्या नजरेतून हे सारं म्हणजे अतीच होतं खरं तरं, आणि मला ते माझं स्वातंत्र्य वाटत होतं. आपल्या विचारानं वागण्यात केवढी हुशारी वाटत होती...आपण म्हणजे इतरांपेक्षा वेगळे..खास...असं फीलिंग, अन् त्यानुसार जे मनाला व बुध्दीला वाटेल ते वागणं हे ठरलेलं, मग जग नि समाज काय काहीही म्हणो....आपला सद्सदविवेक आपल्याशी काय बोलतोय..तो परवानगी देतोय ना, ते महत्त्वाचं. मग झालं तर!  म्हणजे मी तारुण्यसुलभच वागत होते...आणि माझा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. मग आता पुढच्या पिढीकडे काही क्षण का असेना मी असं का बघितलं..? त्यांनाही तो हक्क आहेच नं. त्यांचाही स्वतःवर विश्वास असेलच. विवेक त्यांच्याकडेही नक्कीच आहे. त्याबद्दल एवढा डाऊट का? व कशासाठी?

हं... डिअर मी,

तर चाळीशी जवळ येतेय एवढंच! दुसरं काही नाही. और क्या कहुँ!! J 'तारुण्यभान' कायम हवं. मग पिढी कोणतीही असो. ते असेल तर मग तुम्ही काहीही करा बस्...नो प्रॉब्लेम. तारुण्याचा वीस वर्षांचा काळ, जो फार महत्त्वाचा असतो. स्वत: साठी, कुटुंबासाठी, समाजासाठी व देशाच्या विकासासाठी. तेव्हा एवढं कळलं म्हणजे झालं आणि ते तेव्हाही होतं आणि आजही आहे बॉस. सो काहेका रोना!! आपण जसेजसे काळानुरूप पुढे जातो तसतसे अधिकाधिक नवेनवे व्हायला हवे हेच पूर्ण सत्य आहे, हे ज्याला समजते तो शेवटपर्यंत जगतो, बाकी नवा बदल सहन न होऊन अर्ध्यावरच मान टाकल्यासारखे जगतात. काही लोक खरोखरच असे असतात जे नव्या बदलांमुळे भयग्रस्त होतात, आधीचे तेच योग्य होते असे ज्यालात्याला सांगत रहातात, नव्या पिढीपुढे तेच ते उगाळत बसतात, पण नुसतेच भूतकाळाचे गोडवे गात बसलो, तर हातात काहीच येत नाही, असते तेही निसटते.. कारण तो भूतकाळ पुन्हा कधीही परतणार नसतो!! नव्या बदलांकडे लक्ष असायला हवे, ते दिले नाही तर कालांतराने जीवनातून एकदम मागे पडणारच. नवीन साच्यात स्वतःला फिट करता आलं पाहीजे. जीवन हे सतत पुढं जाणारं असावं. आनंदी उत्साही अन् वर्तमानात रहाणारं. नाहीतर जीवनाचं डबकं व्हायला वेळ लागत नाही, परंतु फार थोडी माणसं प्रवाही राहतात. नव्या बदलांकडे डोळे मिचकावून पाहतात. आवश्यक ते स्वतःत बदल करतात, नव्याचा अंगीकार करतात व जुन्यातील सत्त्व नव्यांना देतात. तिथं मग ना पिढीतील अंतर उरत ना.. संवादातील अंतर!  प्रश्न, समस्या आपोआप सुटत जातात. असं जीवन परिपूर्तीकडे जातं. जुन्या व नव्या ज्ञानातून मग आपलाच असा नवा राग निर्माण होतो. परंपरेतलं पूर्णतः असं कधी संपतच नसतं, किंबहुना त्याआधारावरच जीवनाचे नवे संगीत निर्माण होत असते. ‘मुरांबा’ या नवीन मराठी चित्रपटात हे खूप छान दाखवलंय. खूप वेळा नवीन पिढीला जे अगदी ‘टिपिकल’, ‘ओल्ड’ वाटत असतं, त्यातच नेमकं जीवनाच्या महत्त्वाच्या क्षणांना ‘अमेझिंग’ असं सापडून जातं, अन् त्याचा स्वीकारही सहजपणे होऊन जातो. मी नाही का केला? काही वेळा ते उशिरा समजतं, पण समजतं हे नक्की.

त्यामुळं जुनं सारं संपत चाललंय आणि नवं हे सारं अंगावर येणारं, भयानक आहे असं काही नसतं. खरं म्हणजे हे ज्याच्या त्याच्या दृष्टीवर अवलंबून असतं. कारण आपल्यावेळी आपण जेजे काही वागलो त्यामुळं जर आजचं जग बिघडलंय,भयानक झालंय असं आपल्याला वाटत नसेल, तर आजच्या नव्या पिढीमुळे तरी ते उद्या कसे बिघडेल...?  ते उलट आणखी आणखी व्यापक होत जाणार, एकजिनसी...सुंदरच होत जाणार आहे.

सो,  बी स्मार्ट हार्ट यार.. :)

(लेखाला जोडलेले फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत.)प्रतिक्रिया द्या1726 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
ज्योती वाळके - गुरुवार, ६ जुलै, २०१७
उत्तम लेख.. सद्यस्थितीवर प्रकाश टाकणारा..
Vandana Patil - शनिवार, १७ जून, २०१७
Khup chaan
Rushikesh Gurav - शुक्रवार, १६ जून, २०१७
काळानुरूप बदलणे हा निसर्ग नियम आहे..हे सुद्धा न रुचनारइ माणसे आहेत. तरुणाई त्यांनी हि अनुभवली आणि आता ते तरुणाई ला न्याहाळताना ते दिवस ते जागे ना करता उगाच टोचणी मारतात.. हा सुद्धा एक सस्वाभाविक आहे म्हणा.. पण तुम्हीच म्हणून असे adapt झाला.. नाहीतर उगाच आमच्या वेळी असे होते आता जर जास्त हर ऐकून ऐकून कान वैतागलेत.. बदल होईल होईल या आशेवरच सगळे सुरु आहे म्हणा.. hope so. बूट तुमच्या सारख्या व्यक्तींमुळे थोडा तरुणाई ला आपले कोणतरी आहे असे वाटते तरी.. bye the way ewriting was flawless.. interactive and communicative..हीच तर तुमची खासियत आहे ना.. सो बरं वाटले.. लेख वाचून
Mangesh Koli - शुक्रवार, १६ जून, २०१७
खूप छान लेख मॅडम.... बदल हा निसर्गाचा नियम आहे. तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. आपल्याला माहीत आहे, वाहते पाणी नेहमी स्वच्छ आणि निर्मळ राहते. त्याप्रमाणेच काळानुसार मानवाने स्वत:मध्ये बदल घडवून घेतले पाहिजेत. आज आपण पाहतो की नवीन पिढी खूप वेगाने बदलत आहे परंतु खूप छान छान बदल देखील घडताना दिसतात कमी वयात अनेक जण विश्व विक्रम करताना दररोज पेपरमध्ये वाचावयास मिळते. त्यामुळे नवीन पिढीतील बदलांचा स्वीकार आपण केला पाहिजे.
Vikram Arne - शुक्रवार, १६ जून, २०१७
Madam. सर्व काही नाटकासारखेच आहे. ज्या भूमिका आपण केल्या आणि निव्रृती घेतली, त्या आपल्या भूमिका नवीन कलाकार कसा निभावेन याचा ताळेबंध मांडताना स्वतः ला मात्र आपण नकळत झुकते माप देतो. But, I appreciate you की तुम्ही लगेच स्वतः केलेला बंडखोर पणा ही अगदी प्रांजळ पणाने मान्य केला. नवीन पिढी आणि आपण तुलना करता आपण जरा जास्तच बंडखोरी केली याचे समाधान मात्र असते. कारण आपल्याला असं का केलेस असं विचारणारं कोणीतरी होतं तरी आपण बिनधास्त वावरलो.आजच्या तरूणाईला असं विचारणारं कोणी नाही.......
आरती घारे - शुक्रवार, १६ जून, २०१७
मलाही माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. सुषमा, मस्त आहे लेख .

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर