अंतरातली आग.. शिकारी मुल्ला.. जिवंत व्यक्तिरेखा..
गुरुवार, १५ जून, २०१७ मुकेश माचकर

बोधकथा, मुल्ला नसरुद्दीन कथा आणि विनोद यांचा सकाळच्या कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून...

गावाबाहेरच्या एका झोपडीत राहणारा एक फकीर 'वेडा फकीर' म्हणून प्रसिद्ध होता.

त्याच्या जवळ जायला लोक घाबरायचे. तो लोकांवर ओरडायचा. त्यांना सतत घालून पाडून बोलायचा. कायम स्वत:च्या तंद्रीत असायचा.

एके रात्री सगळा गाव गाढ झोपेत असताना एकदम त्याच्या झोपडीतून आरोळ्या सुरू झाल्या, 'आग, आग, वाचवा, वाचवा.'

गावातले सगळे लोक धावतपळत फकिराच्या झोपडीपाशी पोहोचले.पाहतात तो आग वगैरे काहीच लागलेली नव्हती. फकीर झोपडीबाहेर अंगणात पडून तळमळत, इकडून तिकडे वळत, 
विव्हळत ओरडत होता.

सगळा गाव गोळा झालेला पाहून तो खो खो हसू लागला, हसणं थांबवूनत्याने तिरसटपणे विचारलं, काय आहे? कशाला गोळा झालायत सगळे?

गावकरी म्हणाले, तुम्हीच आग आग म्हणून ओरडत होता ना?

फकीर म्हणाला, मी ओरडलो आणि आलात सगळे धावत विझवायला! तुम्हाला इथे न लागलेली आग विझवायला धावता येतं आणि आपल्या अंतरात पेटलेल्या कितीतरी प्रकारच्या आगी जाणवतही नाहीत. त्या रोज तुम्हाला कणाकणाने नष्ट करत आहेत, ते कळत नाही. आधी त्या विझवायला शिका 
आणि नंतर परोपकारासाठी धावा. चला फुटा. फुकट माझी झोपमोड करू नका.

हे बोलून तो डाव्या कुशीवर वळून क्षणार्धात घोरू लागला.

.............................

‘बेटा फजलू,’ मुल्ला नसरुद्दीन स्वकौतुकात रंगून सांगत होता, ‘तुला सांगतो या जंगलात अशा एकेक शिकारी केल्यात मी की खुद्द जिम कॉर्बेटपण म्हणाला होता, माझा लिहिण्यात पहिला नंबर असेल, पण शिकारीत पहिला नंबर मुल्लाचा. अरे, लोक पळत्या हरणाकडे पाहात असताना मी झाडीतून त्या हरणांवर नजर ठेवून असलेला वाघ टिपायचो आणि सगळे चाट पडायचे. माझ्या नेमबाजीवर खूष होऊन बिजनौरच्या महाराजांनी तर त्यांचा मोत्यांचा कंठाच काढून घातला होता माझ्या गळ्यात... एकदा तर एक रानडुक्कर...’

फजलू जांभई देत म्हणाला, ‘अब्बाजान, नुसत्या गोष्टीच काय सांगताय? जरा एखादा नमुना तरी दाखवा तुमच्या नेमबाजीचा.’

मुल्लाने आकाशाकडे बंदूक रोखली... एक बगळा उडत होता... नेम धरून त्याने गोळी झाडली... ठो आवाज झाला... बंदुकीच्या धक्क्याने मुल्ला मागे फेकला गेला... फजलूने कसाबसा त्याला सावरला... दोघे उत्सुकतेने आकाशाकडे पाहात होते... बगळा शांतपणे उडत होता...

मुल्लाचा चेहरा खर्रकन् उतरला... आपल्याला हीरो मानणाऱ्या लेकरासमोर पितळ उघडं पडल्याने त्याची चर्या काळवंडली...

...हिरमुसलेल्या बापाला पाहून फजलू एकदम टाळ्या पिटत म्हणाला, ‘चमत्कार अब्बा, चमत्कार... मेलेला बगळा उडतोय आकाशात चक्क. चमत्कार!!!’

...पोरगा मोठा झाला, हे उमगून मुल्लाने त्याच्या केसांतून प्रेमाने हात फिरवला आणि त्याच्या नकळत डोळे टिपले...

.....................................

टॉलस्टॉय किंवा तल्स्तोय त्याची प्रख्यात 'रिसरेक्शन' कादंबरी लिहीत होता, त्या काळात त्या कादंबरीतली मस्लोवा ही प्रमुख व्यक्तिरेखा जणू त्याच्यासाठी जिवंत होऊन आजूबाजूला वावरत होती.

एकदा एका लायब्ररीच्या जिन्यावरून चढून जात असताना वरून ग्रंथपाल महोदय आले. टॉलस्टॉयने त्यांना बाजूला होऊन जागा दिली. ग्रंथपाल चकित होऊन म्हणाले, पण आपल्या दोघांसाठी पुरेशी जागा आहे की जिन्यावर.

टॉलस्टॉय म्हणाला, हो, पण आपण तिघे आहोत. माझ्यासोबत मस्लोवाही आहे.

द थ्री मस्किटीअर्स आणि काउंट ऑफ माँटे क्रिस्टोचा कर्ता अलेक्झांडर ड्युमा याच्या घरातून अनेकदा कडाक्याच्या भांडणाचे आवाज ऐकायला यायचे. शेजारपाजारचे लोक धावत जायचे तेव्हा ड्युमा आपल्या भावी कादंबरीतल्या काल्पनिक व्यक्तिरेखांबरोबर वाद घालताना सापडायचा.

 प्रतिक्रिया द्या5291 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर