मराठी व्यवहारभाषा झाली पाहिजे!
गुरुवार, १५ जून, २०१७ सागर विद्वांस

मराठी शाळांची स्थिती खालावत आहे यामागचं मुख्य कारण म्हणजे व्यवहारात मराठीला स्थान उरलेलं नसल्याने लोक इंग्रजीकडे वळत आहे. हे बदलायचं तर मराठी व्यवहार भाषा झाली पाहिजे.

गेल्या काही वर्षांपासून मराठी शाळांची स्थिती झपाट्याने खालावत चालली आहे. विद्यार्थीसंख्या प्रतिवर्षी घटत आहे, विद्यार्थ्यांअभावी काही शाळा बंद पडत आहेत, नवीन शाळांना शासन अनुमती देत नाही, अशी एक ना दोन अनंत संकटे ठाकली आहेत. इंग्रजी शाळांचे पीक मात्र भरघोस वाढते आहे. त्यांच्या शुल्काचे आकडे गगनाला भिडत असूनही पालक प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंग्लिश शाळेत दाखल करत आहेत.

तरीही पालथ्या घड्यावर पाणी

काही मराठीवादी या परिस्थितीमुळे व्यथित झाले आहेत. ते योग्यच आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी त्यांनी चळवळ सुरू केली आहे. मराठी शाळांना अनुमती न देण्याच्या शासनाच्या धोरणाविरुद्ध ते आंदोलन करत आहेत. विद्यार्थीसंख्या वाढण्यासाठी मराठी शाळांचा दर्जा सुधारावा असे काहीजण म्हणत आहेत, शाळा वाचवण्यासाठी काहीजण सेमी-इंग्लिशचा पुरस्कार करू लागले आहेत. मातृभाषेतून शिक्षण घेणेच योग्य असते अशा अर्थाच्या विविध तज्ज्ञांच्या निष्कर्षांचा आधार घेऊन काहीजण लोकजागृती करत आहेत. पण दुःखाची गोष्ट अशी की यापैकी कसलाही उपयोग होताना दिसत नाहीये.

या चळवळीत सहभागी असणारे सर्वजण वय, ज्ञान, अनुभव अशा सर्वच दृष्टींनी माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. तरीदेखील लहान तोंडी मोठा घास घेण्याचा दोष पत्करून मी सांगू इच्छितो की कुणीही समस्येच्या मुळाशी जायचा प्रयत्न केलेला नाही. डॉ. प्रकाश परब यांच्यामुळे ही बाब माझ्या लक्षात आली. परब सरांचाच मुद्दा विस्ताराने सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

मराठी शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटण्याचे कारण काय? सगळ्या मराठी शाळांचा दर्जा एकाएकी खालावला आहे का? आपल्या मुलांना इंग्लिश शाळेत पाठवणारे सगळे पालक मराठीद्वेष्टे आहेत का? या प्रश्नांची उत्तरे अगोदर शोधायला हवीत.

व्यवहार सर्वत्र इंग्रजीतूनच

शालेय शिक्षण मराठीतून घेतले तरी पुढे काय? महाविद्यालयीन शिक्षण मराठीत उपलब्ध नाही. जे थोडेफार अभ्यासक्रम आहेत, त्यांची पुस्तकेही मिळत नाहीत. बरे, अगदी हट्टाने मराठीतून शिक्षण घेतले तर मराठीतून पदवी घेतलेल्यांना नोकरीच मिळत नाही. कारण शासकीय, निमशासकीय, खाजगी अशा सगळ्या क्षेत्रांमधील सगळा कारभार इंग्रजीतच चालतो.

मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास आकलन लवकर होते, जास्त चांगल्या प्रकारे होते, ती पद्धत आदर्श आहे असे वारंवार सांगितले जाते. पण मातृभाषेतून मिळवलेले ज्ञान वापरण्याची संधी कुठे मिळते? किंबहुना, इंग्लिशमध्ये लिहिल्या-बोलल्याशिवाय आपल्या ज्ञानाला मान्यताच मिळत नाही.

आज आपले दैनंदिन जीवनदेखील इंग्रजीने व्यापले आहे. काही खरेदी केली की देयक (bill) इंग्रजीत, त्या वस्तूची माहिती इंग्रजीत, वस्तू वापरण्याच्या सूचना इंग्रजीत, हमीपत्र (warranty card) इंग्रजीत, कर भरण्यास जावे तर आवेदनपत्र (form) इंग्रजीत, कर भरल्याची पावती इंग्रजीत, वाहन अनुज्ञप्ती (driving licence) इंग्रजीत, जागांचे करारपत्र इंग्रजीत, विम्याचे प्रपत्र इंग्रजीत, कंपन्यांचे हिशोब इंग्रजीत, सहज कोणाकडे पत्ता मागावा तर तोही मिळतो इंग्रजीत. विशेष संतापजनक बाब म्हणजे बऱ्याच ठिकाणी इंग्लिशच्या जोडीने हिंदीला स्थान असते, पण मराठीला नाही. आपल्या मराठीतील शिक्षणाचे करायचे काय? पुढे आयुष्यभर ज्या भाषेत कामं करायची आहेत त्याच भाषेत मुलाला शिक्षण द्यावे असा विचार पालकांनी केला तर काय चुकलं?

जपान, चीन, जर्मनी यांची उदाहरणे देऊन सांगितले जाते की तिथे मातृभाषेत शिक्षण दिले जाते म्हणून त्यांनी अशी प्रगती साधली आहे. हे अर्धसत्य आहे. तिथे शिक्षणाच्या माध्यमाची भाषा आणि व्यवहारभाषा एकच आहे हे त्यांच्या प्रगतीचे खरे कारण आहे.

भाषा कितीही समृद्ध असली, लोकांना तिचा अभिमान असला तरी व्यवहारभाषा म्हणून तिचे स्थान जर घसरू लागले तर अस्तित्व धोक्यात येते. संस्कृत हे मोठे उदाहरण आपल्यासमोर आहे. ही अतिशय समृद्ध भाषा आहे. शब्दसंपदा, अलंकारिकता अशा बाबतीत तर ती श्रेष्ठ आहेच, पण शरीरशास्त्र, ध्वनिशास्त्राचाही संस्कृत भाषा विकसित होताना विचार झाला आहे. संस्कृतच्या विशिष्ट शब्दोच्चारांचा बोलणारा व ऐकणारा या दोघांवर परिणाम होतो. परंतु रोजच्या जीवनात असे काटेकोर नियमबद्ध बोलणे शक्य नसते. त्यामुळे संस्कृतची विविध प्राकृत रुपे प्रचलित होत गेली. एकदा व्यवहारभाषा म्हणून स्थान गमावल्यावर संस्कृत केवळ ग्रंथांची भाषा उरली.

याउलट इंग्लिशच्या बाबतीत झाले. सोळाव्या शतकापर्यंत इंग्लिश ही केवळ एक बोली भाषा होती. खुद्द इंग्लंडमध्ये इंग्लिश बोलणाऱ्याकडे तुच्छतेने पाहिले जाई. सोळाव्या-सतराव्या शतकापर्यंत इंग्लंडच्या राजालासुद्धा इंग्लिश येत नसे. इंग्लंडचा मानबिंदू म्हणून ज्याचा गौरव केला जातो त्या आयझॅक न्यूटनने इंग्लिशमध्ये एक ओळही लिहिलेली नाही. त्याचे सर्व ग्रंथ लॅटीन भाषेत आहेत.

स्वाभिमानी इंग्लिश भाषिकांनी नेटाने प्रयत्न केल्यावर कालांतराने इंग्लिशला राजभाषेचा दर्जा मिळाला. एवढेच नव्हे तर इंग्लिशमध्ये व्यवहार न केल्यास जबर दंड ठोठावण्यास सुरुवात केली. त्यामुळे इंग्लंडमध्ये ठाण मांडून बसलेल्या फ्रेंच व लॅटिन भाषा हद्दपार झाल्या.

इंग्लिशला जमले ते मराठीला का जमू नये. मराठीची सध्याची स्थिती तेव्हाच्या इंग्लिशइतकी निश्चितच वाईट झालेली नाही. आवश्यकता आहे स्वाभिमान जागवण्याची! मराठी व्यवहारभाषा होण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. ते झाले की पालक आपोआपच मुलांना मराठी शाळेत पाठवू लागतील.

 

- .प्रतिक्रिया द्या2065 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर